"शाळेतील शेवटचा दिवस: मित्र, बेंच आणि आठवणींचा प्रवास" दहावी सदिच्छा समारंभ | आकाशी झेप घे रे पाखरा.

आकाशी झेप घे रे पाखरा. अखेर तो दिवस आलाच. बाळांनो... घालमेल होत असेल ना जीवाची आतल्या आत. होणारच हो सहाजिकच आहे. आई बापाच्या घरात मायेने वाढलेली ,हसरी खेळकर, बागडणारी लेक जशी मोठी झाल्यावर सासरी जाताना, तिचा पाय घराबाहेर निघता निघत नाही. हळव्या क्षणांच्या गोड आठवणीं पायगुंता होऊन पुढे जाऊ देत नाहीत. अगदी तशी तुमच्या मनाची आज अवस्था झाली आहे समजू शकतो बरं आम्हीं. ज्या उंबरठ्याच्या आत तुम्हीं ज्ञान घेण्यासाठी यायचात. तो उंबरठा ओलांडून ते ज्ञान घेऊन बाहेरच्या जगात तुम्हीं चाललात. आज तुम्हीं देहान इथून बाहेर जाल पण मनानं या वर्गातच रेंगाळणार आहात काही दिवस तरी. ज्या बेंचवर बसायचात, प्रत्येकाचा आपापला बेंच आणि सोबती ठरलेला असायचा. कधी कधी माझा बेंच म्हणून हुज्जत घालायचात एकमेकांच्यासोबत. तो बेंच आज तुम्हांला सोडून जावा लागणार. ज्या बेंचवर एकत्र बसायचात ते मित्र उद्या कुठल्या कुठे असतील, उद्या त्यांच्या बसायच्या जागा वेगवेगळ्या असतील.. सकाळची नेहमी प्रार्थ...