🌱 आपल्या रोप लावणीची सुरुवात 🌱
🌱 रोप लावण 🌱
रोप लावण लावण | आज आलिया भरात
रोपं कोवळी कोंबण | मऊ मऊ चिखलात ||
लेकीवाणी रोप माझी | दिसतीया गं साजिरी ||
तान्ह्या हिरव्या अंगाची | माझी लाजिरी गोजिरी ||
भरतार माझा बाई | चिखलान गं माखला
कड काढितो बांधाची | माझ्या पोटचा धाकुला ||
सासू तरव्यात माझी | गाणं गातीया सुरात
नणंद आणूनि देती | माझ्या तरवा हातात ||
बांध लिंपितो गं बाई | उभा वाफ्यात सासरा
हाती दिराच्या शोभतो | बैल जोडीचा कासरा ||
चिखलाची गं आंबील | उभ्या अंगाला शिंपती
पावसात वाकूनीया | सख्या रोपण करीती ||
दाटी वाटीनं लाविली | रोप मोठाले होईल
हिरवं गं शेत माझं | उद्या सोन्याचं होईल ||
वयल्या अंगानं पावसानं एकसारखी धार सुरू केली की, वाफ्यातनी तरवा टाकायचा.. तरवा चांगला हिरवादाट इतभर फुटून आला की, सुरू झाली बघा रोपा लावणीची लगबग. वरनं एकसारखा कोसळणारा धो धो पाऊस आणि सगळ्या शिवारात रोप लावणीची धांदल. आमच्या बायकासनी तरी भागाटल्यापासून थाराचं नाही. तसं रोपा सुरू झाल्या की त्यांच्या पायाला दम कुठला असतोय. भगाटायला कावळं करकरायला लागलं की यांची जेवण करायची लगबग, जेवणाचं आटोपलं की म्हशींच्या धारा...धारा काढायच्या ते घरातलं सगळं आवराआवर करून डोईवर कागदाची खोळं घेऊन शेताच्या वाटला लागायचं... घरात करणारी म्हातारी कोतारी असली की या बायका आपलं एक मार्गी लवकरच शेताकडं..मागणं आणि शेरडा करडांची लटाबर असतीचं संग म्हणा. शेतात पाय टाकला रे टाकला की कंबरला पावसाळी कागद घट्ट बांधून तिरवड्यावर बुड टेकून तरव्यात बसायचं... हिरव्यागार तरव्याचा ताटवा पुढ्यात घिवून तिरावड्या वर बसून घाई घाईनं मग तरवा वरबडायचा...तरवा निघल तसा खालच्या गढूळ पाण्यात खदबळून वरच्या पात्यानं भोवतीबोर गुंडाळून पेंड्या करायच्या आणि मग मागं ठेवत पुढे सरकायचं.....
रोपंच आणि या माय माऊलींचं नातंच न्यारं...लेकीला जन्माला घालून तिचं हात पिवळं होईपतोर आई तिला जशी जीवापाड जपतीया.. आक्षी तसंच कोवळ्या हिरव्यागार अंगाच्या रोपासनी मऊ चिखलाच्या पोटात रवून त्या मोठाल्या होईपतोर त्यांची माय माऊल्या निगराणी ठेवत्यात... त्याच्यावरनं मायेचा हात फिरवत्यात तवा कुठ सुगीला रोपा सोन्या मोत्यांनी मडत्यात.
सगळ कस हिरवं हिरवं... झाडं हिरवी झुडपं हिरवी.. सगळा रान शिवार हिरवाकंच डोळ्यात जणू हिरवाई दाटून येते.. हिरवाईचा शालू जणू जमिनीला अंथरलेला. वयल्या गडद काळ्या अभाळातन दाट सरीन कोसळणारा साऱ्या सृष्टीला चिंब चिंब भिजवणारा पाऊस..पांढऱ्या धुक्याची झालर अंगावर पांघरून लांबूनच राना शिवारावर नजर ठेवून असल्याला पाठीराखा डोंगर.मधल्या व्हाळा चिवळाटातन धुमाळीनं पळत असल्याल खळाळत नितळगार पाणी.
बरं का..? रोपा लावणीचं काम म्हणजे दोघा तिघांचं काम नव्ह. कवा कवा रोपा लावणीला पाहुण्यारावळ्यांची मदत घ्यावी लागतीया .आळ बळनं का असना गल्लीतल्या माणसांस्नी बी रोपा लावायला बोलवायला लागतंय. माझं कोणा वाचून आडत नाही असं म्हणून नाही चाल. अशायेळी सगळ्यांची गरज पडतीया .कामाच्या माणसांचा पैराच करावा लागतोया.आज माझ्यात तर उद्या तुझ्यात अस केलं तरंच तवा कुठं रोप लावून वसारतीया म्हणायची. म्हाताऱ्या आयाबायांच्या कडं तरवा काढायचं काम...डोक्यावर इरलं घेऊन खालच्या तिरावड्यावर बसून बोलत चालत त्या तरवा वरबडत असत्यात...... रोप लावायची म्हणजे कंबार घट्ट असावी लागतीया इळभर वाकून रोप लावायला लागत्यात म्हणून तरण्या बाया रोप लावायच्या कामाला.. .शेतातली पारंपरिक गीतं तवा बायकांच्या ओठांवर नांदत असत्यात...किटलीतनं कपात धार लावून चा वतावा तसं वाफ्या वाफ्यातनं बांधवरच्या चिवळाटातन 'चा' गत लाल पाण्याचा मुसंडा खालच्या दिशेनं वाहत असतो.
पुरुष माणस चिखल करायला.. उभं आंग चिखलानं राड रिबीट व्हतं...पयलं बैलांचं , रेड्याचं औत असायचं... उभ्या पावसात खालच्या चिखलातून बैलगुठा जोरात पळवायचा...बैलवान दादा तर एक पाय गुठ्यावर ठेवून लंगडी घालतचं बैलं हाकत असायचा..बैलांची पांढरी पाठ लाल चिखलान माखून जायाची.पयला गुंठ्यान चिखल करायला वेगळीच रंगत यायची ..आता बैलं, गुठा मागं पडला आता जिकडं बघावं तिकड पॉवर ट्रेलरन चिखल केला जातो..एकजण हातात खोरं घेऊन बांधाच्या कडा काढायच्या कामावर असतो.. बांधाच्या कडा नीट काढल्याशिवाय वाफ्याला शोभा येत नाही..वावार देखणं दिसत नाही..."बांध नीट काढलं नाही तरी मालकीण बाई म्हणते, " आव बांध सळळ काढा की, नाही तर येणारी जाणारी लोकं नावं ठेवतील, म्हणजे काम कसंही करून चालायचं नाही इकडं काम पण करताना वावार देखणं पण दिसलं पाहिजे .. आधन मधनं पाण्याकड लक्ष ठेवावं लागतं. पाऊस जरा वसारला तर पाणी कमी पडून चालायचं नाही. नाहीतर चिखल पातळ होत नाही.पांदीच्या व्हाळाचं नाही तर चिवळाटातलं पाणी अडवून वाफ्यात घालायचा आणि आंबीलीसारखा पातळ बिरबिरीत चिखल करायचा...म्हणजे बायकासनी चटाटा रोपा लावायला येत्यात..
लाल मातीच्या चिखलाच्या पातळ आंबीलीत एका हातात तरव्याची पेंडी धरून दुसऱ्या हातानं एकेक काडी बीरबीरीत चिखलाच्या पोटात रवत माग सरकायचं..वयन पावसाच्या थेंबक्याला आणि इकडं बाईच्या हाताला जरा म्हणून दम नसतोय.. पहिली इरली असायची किती बी नेटका पाऊस येऊ दे की, इरली घट आत थेंब का कुठंला येईल. एवढ्या गारठ्याच्या पावसात इरल्यामुळे अंगाला उब मिळायची. पण आता कागदाची खोळ आली आणि उभा कोसळणारा पाऊस थेट अंगावर घेऊन वाकून रोपा लावायच्या..आता तिरावडी, इरली पोत्याची खोळ मागं पडली म्हणायची... पण निदान या रोप लावणीच्या कामाच्या निमित्ताने कोकणातल्या भागात कुठं कुठं दिसत्यात म्हणायची.. या टायमाला तरव्याची एक गंमत आसती.. कुणाला तरवा कमी पडतोय तर कुणाला जादा व्हतोय. मग कुणाला पुरूट पडून उरला आसल तर न्या जावा म्हणत्यात...तेवढीच. कुणाची तरी गरज भागतीया...आता तर मोबाईलच्या व्हाट्सअप ग्रुप वरून तरवा फिरायला लागलाय म्हणं... अमुक पेंड्या तमुक पेंड्या शिल्लक राहिल्यात कुणाला पायजे असलं त्यानी घेऊन जावा म्हणून मेसेज फिरतोया मोबाईलवरनं.
पावसानं जरा इसवाटा घेतला की दुपारच्याला उघड्या माळरानाला नाही तर मिळल त्या जाग्याला बसायचं आणि त्या वलीतच दुपारचा भाकरतुकडा मोडायचा. शेतमालकीनीन करून आणल्याली उसळ बचाक बचाकभर डावीन ती लोकांच्या भाकरीवर वाढती....बांधावर बसून तळहातावर घेतलेल्या कांदा भाकर, उसळ आणि मिरचीच्या ठेच्याची चवरव कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळलं व्हय...या जेवणाचं सुख घ्यावं ते आमच्या मायाबापड्यानीच.
पाऊस किती बी कोसळू दे की चार वाजता गरमागरम चा आला की तिथंच बांधाकडला जरा बुड टेकून 'च्या' चा एकेक घुटका घेतला की अंगातला गारठा पळून जातोया तेवढाच जीवाला तजेला मिळतोय..
जसजशी सायंकाळ होईल तशी आयाबायाची जास्तच झनपण सुरू व्हती...गडबडीन हात हालीवत्यात. धारच्या बायकांस्नी मग घरला परतायची ओढ लागतीया. घरातल्या जनावरांस्नी वैरणकाडी पायजे म्हणून सांज व्हायला वैरणीचा भारा कापून तयार ठेवला जातो..हातातली तरव्याची मुठ संपवून शेवटचं आळं खवुन बायका वाफ्यातनं बाहीर पडत्यात...आणि मग सांज वकोत झाला कीं बापयमाणसं डुईवर वैरणीचा भारा आणि मागणं आया बाया घराच्या वाटला लागत्यात.
माती संग माती व्हऊन
आंगभर चिखल लिंपूण
चिखलामधी घामाचं शिंपण करून
उभा पाऊस अंगावर झेलून
काळ्या आईच्या कुशीत
हिरवं सपान जवा लाविलं
तवाले उद्या कुठं
शेतं सोन्यामोत्याचं होईल
सोन्यामोत्याच होईल.
असं या रोपा लावणीचं काम...साधसुध नाही चांगला महिना घुमतोया रोप लावन करायला.. आंग नी आंग शिणून जातंय..दिसभर वाकून श्यान कंबार घाईला येतीया.. बोट चिंबून जात्यात.. तरवा काढून काढून बोटांची नारं निघत्यात...उभा पाऊस अंगावर झेलावा लागतोया....भूक तान हरपून जाती...आज चिखलात जीव कालवला तर उद्या कुठं पदरात चार दाण पडत्यात.पुढ्यात आल्याला भात खाताना काय वाटत नाही पण रोप लावताना कळतंय काय हाल व्हत्यात ते..इथं राबण्याला येळ नसतोया..सकाळच्या धारा काढून शेताला पळायचं ते दिसभर पावसाच्या धारत न्हाऊन घामाच्या धारा चिखलात सांडून सांजच्या धारलाचं घरला परतायचं...
- किरण सुभाष चव्हाण
🌱 चला आता रोप लावणीच्या शेतात जाऊया… 🌱
📸 आमची रोप लावणी गॅलरी 🌱
🌿 चला मग, रोप लावणीचा हा सुंदर प्रवास व्हिडिओतून पाहूया! 🎬
💚 एकदा नक्की पाहा आणि तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये जरूर लिहा!
👉 व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈































