कविता - धरित्रीचा बाळ..---किरण चव्हाण.



धरित्रीचा बाळ.

माझी धरित्री गं माय
ओली बाळंतीण बाय
तिच्या कुशीतून कसं
अंकुरलं तान्हं बिय...

मऊ मऊ लोण्यागत
ओल्या मायेचा पदर
पिकबाळराजा तिचा
पोसतो तिच्या अंगावर

कोळ कोळ किती पात
इवलासा नाजूक देठ
दिस साजिरं गोजिरं
कुठं लावू त्याला तिटं

सुवासिनीगत बाई
झाडवेली गं सजल्या
धरित्रीच्या या लेकीबाळी 
बाळ पाहुनी नटल्या.

गडी राकट रांगडा
बाळ मायेचा आधार
उभा पाठीशी तो हाय
भाऊ पाठचा डोंगर.

वारा झुलवतो झुला 
खेळवतो बाळराजा
सवंगडी वारा करतुया
लाडक्याला गुदगुल्या.

आली नणंद काठाला
नदी धरित्रीला भेटाया
आलं तिला गं भरून
बाळराजाला बघून 

तान्हा पीकबाळ त्याला 
किती जपावं जपावं.
माया करावी तरी कशी
कोडकौतुक करावं.

बाप मेघराजा येतो
माय-लेकरांची भेट घेतो
त्यांचा बाळपिकराजा
कसा दिसामासानं वाढतो.
------------------------------------------------------
-किरण चव्हाण.
मोबा-८८०६७३७५२८.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"

भारताची जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुख- किरण चव्हाण.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'