"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"

 



सोशल मीडिया आणि विद्यार्थी.


                     आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. डिजिटल क्रांतीमुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल होत आहे. एका क्लिकवर  जगातील संपूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध होते. सोशल मीडियाने तर आपलं संपूर्ण जीवन व्यापलं आहे. आपल्या पाच मूलभूत गरजापैंकी सोशल मीडिया ही आता आपली सहावी मूलभूत गरज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या जगण्याचा तो एक अविभाज्य घटक बनला आहे.सोशल मीडियाने सर्वांना व्यापले आहे मग आपला शालेय विद्यार्थी सुद्धा या सोशल मीडियापासून कसा दूर असेल.,? पण सोशल मीडियाशी आपला विद्यार्थी कसा जोडला आहे. त्याचबरोबर आपला विद्यार्थी सोशल मीडिया कशाप्रकारे हाताळतो आहे. हे पाहणे महत्वाचे आहे.सोशल मीडिया चांगला की वाईट..? मग सोशल मीडिया आणि विद्यार्थी यांच्याबद्दल आज आपल्याला विचार करण्याची वेळ का आली आहे..? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

                  आपल्या जीवनात आज सोशल मीडियाने आमूलाग्र बदल केला आहे. संपूर्ण जगाला समावून घेण्याइतपत त्याची व्याप्ती आणि आवाका विस्तारलेला आहे.पण आज केवळ सोशल मीडिया आणि विद्यार्थी यांच्या संबंधाचा विचार केला तर आज विद्यार्थ्यांना एका क्लिक वर जगातील संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.  अभ्यासासंबंधीचे असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे  व्हिडीओ पाहायला मिळतात. एखादी संकल्पना कठीण जात असेल तर ते यु ट्यूब वर पाहून समजावून घेऊ शकतात. अशी कोणतीही माहिती नाही जी आज सोशल मीडियावर उपलब्ध नाही. ज्ञानाचा खजिनाच आपल्याला इथे सापडतो. सोशल मिडिया याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यामधील टॅलेंट समोर येतानाची असंख्य उदाहरणे आहेत. उदा.शाळेतील छोटी मुले किती सुंदरपणे गाणे गातात, अभ्यासातील काही प्रयोग अथवा कृती प्रभावीपणे सादर करतात. त्यामुळे सोशल मीडियामुळे आपल्यातील कलागुणांना जगासमोर प्रकटीकरणाची सहज,सोपी संधी सोशल मीडिया उपलब्ध करून देतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जागतिक व्यासपीठ विद्यार्थ्यांना मिळाले आहे असं म्हणायला हरकत नाही. जो की वैयक्तिकरित्या या जगाशी जोडला जातोय. आपले मत,भावना विचार आणि कला आपल्या पध्दतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतो आहे. सोशल मीडियाची ही इतकी अफाट ताकद आहे की,अगदी खेडोपाड्यावरील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना सोशल मीडियाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली आहे. ही एक सोशल मीडियाची सकारात्मकता म्हणता येईल. आपण जाणतोच की कोरोनाच्या काळात शाळा बंद शिक्षण सुरू हे केवळ आजच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकार होऊ शकले.सोशल मीडियातील अनेक सकारात्मक गोष्टी विद्यार्थ्यांच्यासाठी प्रेरक ठरतातदेखील.

                     परंतु दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाच्या नकारात्मक बाजूचा जर विचार केला तर या सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांच्यावर कोणता परिणाम होत आहे.? हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. तर सोशल मीडियाचा वाढता व बेसुमार वापर हा एक चिंतेचा विषय होऊन बसलेला आहे. पहिल्या काळी विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर बाहेर जाऊन खेळण्यात त्याचा वेळ जात होता. किंबहुना बाहेर मैदानात जाऊन खेळणे हे त्यांचे साधन होते. परंतु आजचा विद्यार्थी हा शाळा व्यतिरिक्त वेळ हा मोबाईलला चिकटून असतो. खरं तर आजचा विद्यार्थी हा तीन स्क्रीन समोर असतो. एक टी. व्ही. दुसरा संगणक, आणि तिसरा हा मोबाईल. आणि त्यामध्ये मोबाईलचे सर्वाधिक प्रमाण आहे. मोबाईलचे हे वेड प्रत्येकालाच आहे हे आपण कोणीही नाकारू शकत नाही. पण विद्यार्थ्यांच्या बाबतीतले हे वेड त्याच्या भविष्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. आजचा विद्यार्थी हा सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह असतो याचे एक सर्वेक्षण झाले तर कळून येईल की, ज्यां पालकाकडे मोबाईल आहेत त्यांची मुले ही सोशल मीडियापासून दूर नाहीत. किंबहुना मुलांना आपण मोबाईलपासून किती वेळ दूर ठेवणार..? सोशल मिडिया पासून वंचित असणे म्हणजे आपण कुठे तरी मागे आहोत अशी भावना मनात निर्माण होते म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात सोशल मिडियाने आपले स्थान किती पक्के केले आहे.

                     आजचा विद्यार्थी हा सोशल मीडियाचा वापर करताना जरी अठरा वर्षे पूर्ण नसली तरी नकली आय डी काढून तो अनेक सोशल मीडियाच्या प्लँटफॉर्मवर ऍक्टिव्ह आहे. आज वर्गात ज्यावेळी ते एकमेकांच्या सोशल अकाऊंट विषयी चर्चा करतात किंवा त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट,फोटो व्हिडीओ यावर बोलतात त्यावेळी ते सोशल मीडियाच्या किती जवळ आहेत हे प्रकर्षाने जाणवते. आणि मग सोशल मीडियाच्या शेअरिंग वर जेवढी चर्चा होताना दिसते त्यामानाने केअरिंगच्या बाबतीत होताना दिसत नाही. सोशल मीडिया हे एकमेकांना जोडण्याचे जाळे आहेचं पण या जाळ्यात तो कसा गुंतत गेला आहे. हे त्याचं त्यालाही कळत नाही. तो कोणकोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आला आहे. त्या किती ओळखीच्या आहेत किती अनोळखी आहेत. तो त्यांच्याशी कशाप्रकारे संपर्क ठेवतो. त्यांच्याशी काय बोलतो..? काय शेअर करतो..? याची माहिती कदाचित एखादा विद्यार्थी पालकांना सांगत असेल पण अशी माहिती सहसा पालकांच्या पर्यंत जात नसते. कारण सोशल मीडियाच्या खाजगी वापराला इथे खूप वाव आहे. त्यामुळे आपला विद्यार्थी किंवा पाल्य सोशल मीडियाच्या जाळ्यात कुठपर्यंत अडकला आहे हे कळणे मुश्कील आहे. 

                    त्यामुळे असे विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा संबंध बाह्य जगाशी प्रस्थापित करत आहेत याच्यावर नेहमी पालक व शिक्षकांनी कटाक्ष ठेवला पाहिजे. सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे मोबाईल गेमींगचे वाढते प्रमाण. गेमचे काही घातक प्रकारही आपल्यासमोर येत आहेत. की त्यातील टास्क पूर्ण करताना काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. इतका हा जीवघेणा खेळ आपल्या मुलांच्या बाबतीत सध्या मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. फेसबुक, इंस्टा अशा आणि अशा अनेक माध्यमातून ऑनलाईन ओळखी होणे, नंतर ओळखीचे रूपांतर पहिल्यांदा मैत्रीत आणि मग प्रेमात आणि  त्यानंतर घर सोडून पळून जाण्यात होतंय. अशाप्रकारे किशोरवयीन मुले मुली अशा वरवच्या दिखाऊ आणि प्रदर्शनीय नात्यांना भुलून चुकीचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. 

              अजाण मुलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा गैरफायदा घेणारे काही लोकही आज अशा माध्यमावर सक्रिय आहेत. आज सोशल मीडियावर तर अश्लीलतेचे स्तोम माजले आहे. आठरा वर्षाखालील मुलांनी हे पाहू नये अशी टॅगलाईन देऊन कामुकता वाढवणारे अनेक लैंगिक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत फिरत असतात. ते आपल्या विद्यार्थ्यांच्या नजरेस पडत नसतील का..? आणि त्याचा त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल. म्हणजे एकप्रकारे ज्या किशोरवयीन वयात त्यांना लैगिंकतेचे योग्य धडे मिळाले पाहिजेत तेथे अशा पैसे कमावण्याच्या हेतून बनवण्यात आलेल्या लैंगिक प्रदर्शनाच्या व्हिडीओमधून आजच्या मुलांच्या मानसिकतेवर कोणता परिणाम होत असेल..? याची कल्पनाच केलेली बरी.

               आजच्या सोशल मीडियाने आपण लोकल टू ग्लोबल जरी जोडले गेलो असलो तरी घरातील चार माणसातील आपआपसातील संवाद हरवत चालला आहे हे वास्तव आहे. फेसबुकवर आहेत पाच हजार मित्र पण संकटाच्या वेळी त्यातला एकही मदतीला नाही. अशा प्रदर्शनीय मैत्रीचा काय उपयोग..? ऑनलाईन नाती जपण्याच्या नादात ऑफलाईन नात्याकडे आपलं दुर्लक्ष तरी होत नाही ना..? याचा विचार होणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा आणखीन एक वाईट दुष्परिणाम म्हणजे त्याच्या अतिवापरामुळे मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे. अशी मुले अधिक चंचल होतात मन एकाग्र होत नाही त्यामुळे मग अभ्यासात लक्ष लागत नाही. चिडखोर होतात. एकलकोंडी बनतात. स्वतःच्याचं विश्वात रमतात. तर सोशल मीडियाचा अधिक वापर आज विविध शारीरिक आजारांना निमंत्रण देत आहे. डोके दुखणे, दृष्टीदोष याचे प्रमाण वाढताना आपल्याला दिसून येत आहे. सोशल मीडिया म्हणजे एक आभासी जग आहे. त्या जगात आपण किती वावरायचं. त्याला किती स्वीकारायचं हे समजलं पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करायचा माहिती आहे पण तो कसा करायचा याचे ज्ञान विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे. सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वरदान कसा व  शाप कसा याचे मार्गदर्शन शिक्षक पालक,तज्ञ व्यक्ती,अभ्यासक यांच्याकडून मिळणे अपेक्षित आहे. सोशल मिडिया वाईट नाही आजच्या नवीन युगाची ती नवीन क्रांती आहे ती आपण स्वीकारलीचं पाहिजे. परंतु त्याचा वापर विधायक कसा होईल याकडे आपले लक्ष दिले पाहिजे.सोशल मीडियाचे काही अलिखित नियम विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसवले पाहिजेत जेणेकरून त्याचे चांगले वाईट परिणाम तो स्वतः समजून घेईल. आणि येणाऱ्या काळात अभ्यासाबरोबर त्याच्या सर्वांगीण विकासात सोशल मीडियाचाही सकारात्मक परिणाम होताना दिसू शकेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली मुलं आपलेच अनुकरण करीत असतात.. ती सांगून ऐकणार नाहीत...तर आपल्याकडे बघून शिकणार आहेत म्हणून आपणच मोबाईलचा वापर कमी केला तर मुलं आपले बघून तसेच अनुकरण करतील. म्हणून शिक्षक आणि पालक यांनी कृतीतून हे दाखवून दिले पाहिजे.


 - किरण सुभाष चव्हाण.


डॉ.तात्यासाहेब लहाने यांच्या भाषणातून...






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भारताची जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुख- किरण चव्हाण.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'