सागर गुरव – समाजसेवेच्या जिद्दीच्या जीवनकथेवर आधारित प्रेरणादायी पुस्तक


'सागर गुरव म्हणजे  समाजसेवेला वाहून घेतलेलं एक जीवन...'

                         भुदरगड तालुक्यातील कोळवण हे थोडं दुर्गमचं म्हणावं लागेल असं गांव...जेमतेम दोन हजाराच्या घरात असलेली लोकसंख्या...शेती हा प्रमुख तर त्याच्या जोडीला पशुपालन हा जोडव्यवसाय.. अशा या खेडेगावात...सागर गुरव यांचा अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाला...आईवडील शेतमजूर...घरची फक्त पाच गुंठे जमीन...कुठे तरी मोलमजुरी केल्याशिवाय भागायचे नाही...हातावरचे पोट... आणि त्यात ही तीन मुले पोटाला...सागरजींना तीन भावंडे...थोरली बहीण...भाऊ मग सागरजी...बहीण लग्न होऊन सासरी गेली...भावाचे लग्न झाले...कालांतराने...त्यावेळी सागरजी दहावीला असतील... भावाने आपला वेगळा संसार थाटला...आपला सख्खा भाऊ आपल्यापासून दूर गेल्याची बोच त्यांच्या लहान मनाला लागली...घरचा कर्ता पुरुष म्हणून ज्या भावाने कुटूंबाची  जबाबदारी स्वीकारायची...तोच आपली जबाबदारी झटकून मोकळा झाला...पुढे आणखीन एक दोन वर्षाने सागरजींना असाच धक्का बसला...१२ वी ला असताना वडिलांचे डोळे गेले...दोन्हीं डोळ्यांनी वडील पूर्णपणे अंध झाले..भाऊ तर आधीच विभक्त झालेला...आणि आता वडिलांचा होता आधार तो ही अशाप्रकारे अधू झालेला...आता काय करावं..? घर कस चालवावं..?सागरजींच्या डोळ्यापुढे सगळाच अंधार दाटून आला होता.शिक्षण पूर्ण करायचं की घर चालवायचं...? पण जिद्द न सोडता आर.ए.मोहिते. टेक्स्टाईल या कंपनीत दिवसभर काम करून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे रात्रीच्या कॉलेजमधून ११ वी चे शिक्षण घेतले..आणि पुन्हा गावी येऊन आपले घर सांभाळत १२ वीचे शिक्षण पूर्ण केले.पण आता पुढे खूपच मोठा प्रश्न निर्माण झाला... शिक्षणाकडे लक्ष दिले तर माझ्या वयस्कर आईवडिलांना कसे सांभाळता येईल..? एकीकडे घरची जबाबदारी आणि दुसरीकडे शिक्षण अशा परिस्थितीत स्वतःच्या आईवडिलांकडे पाहून पोरसवदा वयात घराची जबाबदारी अंगावर घेतली...आणि शिक्षण सुटलं...
            पण संकटं काही पाठ सोडायला तयार नव्हती.. थोरला भाऊ दारूच्या पूर्णपणे आहारी गेला होता...दारूचे व्यसन त्याला जडले होते...पुन्हां प्रश्न निर्माण झाला... आपले घर सावरता सावरता आता समोर भावाचे घर उध्वस्त होताना पहायचे का..? चार माणसात बसता-उठता पंचाईत होत होती..नाही मला काही तरी केलं पाहिजे. दारूमुळे मी माझ्या भावाचा संसार उध्वस्त होताना नाही पाहू शकत...मन पेटून उठलं...आणि नकळत पहिल्यांदा इथेच समाजकार्याची पहिली ठिणगी मनात पडली...ती व्यसनमुक्तीची....काहीही झालं तरी या दारूच्या व्यसनातून भावाला सोडवायचा हा विडाच त्यावेळी त्यांनी उचलला..
भावाला समजावून सांगितले ,दारूच्या दुकानात जाऊन सांगावं लागलं माझ्या भावाला दारू देऊ नका म्हणून.पण जिथं आपलंच नाणं खोटं तिथं दुसऱ्याला सांगून तरी काय उपयोग...कित्येक वेळा समजावून सांगण्याचा  हा अयशस्वी प्रयत्न केला... उपयोग झाला नाही...शेवटी गावातील दारूबंदी झाली पाहिजे यासाठी लोकांच्यात मिसळून जनजागृतीला करायला सुरुवात केली...घरोघरी जाऊन दारूबंदी साठी प्रबोधन करावे लागले...गावातील मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवून दारू बंदीच्या विरोधात लोकप्रबोधन सुरू केले...सभा घेतल्या...

एक चळवळ उभी केली...यात त्यांच्या पत्नी सौ.अनुराधा गुरव यांची त्यांना मोलाची साथ मिळत गेली.. काहीवेळा रागाने ग्रामपंचायतीच्या दारात दारूचा साठा जाळण्याचाही प्रयत्न केला...शेवटी चांगल्या लोकांच्या सहकार्याने असा एक निर्णय घेतला की,जो कोणी गावात दारू पिऊन येईल त्याची...मुंडन करून धिंड काढण्यात येईल...पण इथे एक सत्वाची आणि तत्वाची परीक्षा सागरजींना द्यावी लागली...की काही विघ्न संतोषी लोकांनी सागरजींच्याच भावाला मुद्दाम माघारी दारू पाजवून गावात आणले...आता कसली धिंड आणि कसलं मुंडन...?त्यांना गंमत बघायची होती... या संकल्पनेची टर उडवायची होती...पण सागरजींनी हिंमत दाखवली...नियम तर सर्वांनाच लागू आहे भाऊ असला म्हणून काय झाले...सागरजींनी स्वतः आपल्या भावाचे मुंडन करून गावातून धिंड काढली...बोले तैसा चाले...या उक्तीप्रमाणे त्याची प्रचीती दाखवून दिली. की फक्त मी बोलतच नाही करून दाखवतो..आणि  लोकांना त्यावेळी पटलं की,नाही एक भाऊ जर अशाप्रकारे भावाची धिंड काढण्याची कठोर पाऊले उचलत असेल तर खरंच ती दारू किती वाईट आहे... हळूहळू यातून भावाचे व्यसन सुटले...पण समाजात आणखीन असे असंख्य भाऊ आहेत जे अशा व्यसनाच्या विळख्यात सापडले आहेत... म्हणून सागरजींनी ही दारूबंदीची चळवळ अधिक व्यापक केली. प्रसंगी पत्नीची कर्णफुले या कार्यासाठी गहाण ठेवली.वटपौर्णिमेच्या दिवशी सहा हजार महिला भगिनींचा मेळावा घेऊन आपल्या गावात कायमची दारूबंदी झाली पाहिजे याचा निर्धार करून गावातील दारूबंदी पूर्णपणे यशस्वी करण्याच्या दृष्टीने पाउले उचलली.या घटनेला आज नऊ वर्षे लोटली. आजतागायत गावात पूर्णपणे दारूबंदी आहे.
           घरची परिस्थिती लक्षात घेऊन अवघ्या २१ व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

एक अशा गरीब कुटूंबातील मुलगीशी लग्न केले की, त्या घराचाही आपल्याला भविष्यात आधार होता येईल...वडिलोपार्जित पाच गुंठे जमीन आणि दोन म्हैशी... एवढीच काय ती दौलत गाठीला.आणि संसार सुरू झाला...अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक..या उक्तीप्रमाणे आपल्या संसाराबरोबर समाजाचा संसारही बघायचा होता...जबाबदारी खूप मोठी होती.. समाजाला आपले कुटुंब मानून समाजसेवेचे व्रत हाती घेतले आणि खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यात सागरजींनी स्वतःला झोकून दिले.
                  व्यसनमुक्ती या कार्यापाठोपाठ अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले ,आसपासच्या शाळेत जाऊन मुलांना याविषयी मार्गदर्शन करणे...लेक वाचवा या गंभीर सामाजिक विषयासंदर्भात शाळेत, समाजात जाणीव जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली...आपल्या स्वतःच्या कुटूंबाचा मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प त्यांनी केला आहे एवढेच नाही तर अशाप्रकारे आतापर्यंत २५० जणांना अवयव दान करण्यासाठी परावृत्त केले...वर्षातून तीन वेळा असे आजपर्यंत तब्बल २१ वेळा सागरजींनी रक्तदान केले आहे...सरकारच्या काहीं योजनांचा लाभ गरीब व गरजू लोकांच्यापर्यंत पोहचवणे..


जीवनदायी योजनेच्या माध्यमातून सुमारे २५० पेक्षा जास्त लोकांना लाभ मिळवून दिला...परिसरात वृक्षारोपण करणे,लोकसहभागातून विद्या मंदिर कोळवण या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे...गावातील मयताच्या उतरकार्याला भांडी देण्याची प्रथा मोडीत काढून त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी असे शैक्षणिक साहित्य देणे आणि रक्षाविसर्जन नदीमध्ये न करता एखाद्या झाडाला ती घालणे... अशा पारंपरिक प्रथेला मुरड घालून बदलत्या काळानुसार परिवर्तनवादीसंकल्पना त्यांनी मांडल्या आणि त्या सत्यातही उतरवल्या...सागरजी स्वतःच्या बापाची केस,दाढी आजही स्वतः करतात..

 या निमित्ताने आपल्या बापाच्या गालाला मायेचा स्पर्श करण्याची संधी न सोडणारा हा विरळा पुत्र असेल...उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहार समाजातील मुलगा... आईवडील पोटाची खळगी भरण्यासाठी इकडे आलेले ,गावोगाव फिरून लोहारकाम करायचे...अशा भटकंतीमुळे मुलांचे शिक्षण खुंटले होते...जेंव्हा ही गोष्ट सागरजींच्या लक्षात आली तेंव्हा जातिनिशी त्यांनी यात लक्ष घालून त्या आईवडिलांची समजूत काढून त्या मुलाला आणि त्याच्या मामाच्या मुलाला अशा दोन मुलांना मुरगुड विद्यालय मुरगुड येथे  प्रवेश घेतला आणि त्यांचे इ९वीचे शिक्षण सुरु झाले... या मुलांच्या लागणाऱ्या शिक्षणाचा खर्च सागरजींआज लोकसहभागातून  करताहेत.

तसेच मुरगुडमधील शिवमचे साधक डॉ.श्री रणजितसिंह साठे डॉक्टर या मुलांच्या आजारपणात पूर्णपणे मोफत उपचार करतात..आज ही मुले आनंदाने शिक्षण घेत आहेत..आईवडिलांना उपस्थित राहता येत नाही म्हणून स्वतः सागरजी शाळेतील पालकमिटिंगला हजर राहतात...आजही पूर्णपणे त्या मुलाकडे त्यांचे लक्ष देतात.अशाप्रकारे शिक्षणाविना वंचित राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याला एक नवे जीवन देण्याचे हे मोलाचे कार्य सागरजींच्या हातून घडले आणि घडत आहे..असा हा सागरजींच्या सामाजिक कार्याचा उंचावणाराच आलेख...दोन अडीच वर्षांपासून ते ज्यांना गुरुबंधू मानतात ते दाभोळे साहेब यांच्यामुळे शिवम फाउंडेशनला जोडले गेले...आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या या कार्याची पुण्याई म्हणावी लागेल...की त्यांची इथे मा.इंद्रजीत देशमुख साहेब(काकाजीं) यांच्याशी भेट झाली..


.पुण्याई फळाला आली... गुरुभेट झाली...सागरजींना आपला परमेश्वर भेटला...गुरुशिष्याचे नाते इतके घट्ट झाले...की उठता बसता आपल्या गुरूंचे नामस्मरण करून...सागरजी आपले कार्य पुढे नेटाने करू लागले...प्रातःकाळी उठल्या उठल्या त्यांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा उभे राहते ते परमपूज्य काकाजींचे रुप...एवढे सागरजींच्या हृदयात खोलवर रुजले आहेत काकाजीं..आता या कार्याच्या पाठीमागे खरी प्रेरणा,प्रोत्साहन आणि मार्गदर्शन होते ते साक्षात गुरूंचे...मग काय समाजसेवेचा वसा आता अमाप ऊर्जेने आणि प्रेरणेने अगदी जोमाने पुढे चालू आहे.. शिवमच्या माध्यमातून गेल्यावर्षी सिंदखेड लपाली आणि यावर्षी मान तालुक्यातील शिंदी खुर्द या गावी पाणी फाउंडेशनने सुरू केलेल्या पाणी आडवा पाणी जिरवा या श्रमदान शिबिरात ही सागरजींनी उत्साहाने सहभाग घेऊन...पूर्णपणे तनामनाने  श्रमदान केले..


शिवम फाउंडेशनच्या कोणत्याही कार्यात आणि कार्यक्रमात सागरजींचा मोठा सहभाग असतो...एक प्रमुख भूमिका असते...काकाजींचा एकेक शब्द ते जीवाप्रमाण मानतात...काकाजींचा शब्द आणि आशीर्वाद घेऊनच सागरजीं कोणत्याही कामाची सुरुवात करतात.काकांजीची विचारधारा हीच सागरजींची जीवनधारा बनली आहे....
                    सागरजींच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या  समाजसेवेच्या नीतीला  योग्य गती मिळावी यासाठी अयोध्या फाऊंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने यावर्षीच्या युवा हृदय संमेलन घारेवाडी येथे सन्मानपूर्वक नाना पाटेकर यांच्या हस्ते बोलेरो गाडी सागरजीना प्रदान करण्यात आली..

त्यांच्या सामाजिक कार्याची ही पोचपावतीच म्हणावी लागेल.आता आपल्याबरोबरीने या गाडीलाही त्यांनी समाजसेवेत रुजू केले आहे...
आपल्या भागातील  गोरगरीब लोकांची सेवा करण्याची अनोखी संधी यातुन त्यांना मिळाली...भागातील अनेक रुग्णांना विनामोबदला फक्त डिझेल खर्च घेऊन जिल्ह्याच्या दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याची सेवा या गाडीच्या माध्यमातून सध्या ते करत आहेत...आज अनेकजण सांगतात...वेळेवर सागर गुरव यांची गाडी आली नि मला वेळेवर उपचार मिळाले....काहीजण सांगतात की खरंच सागरदादांच्या मुळे मला हे नवीन जीवन मिळाले.आहे..आजपर्यंत सहा सात महिन्याच्या काळात ४० भर रुग्णांना दवाखान्याच्या दारात वेळेत पोहोचवण्याची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली... आज सागरदादांची ही गाडी म्हणजे गोरगरीब, सामान्य जनतेची जीवनवाहिनी बनून फिरते आहे...


पण काहीवेळा अशी ही वेळ येते की साधे डिझेलचे पैसेही समोरच्यांकडून मिळत नाहीत.स्वतःच्या खिशातले तरी कितीवेळा घालायचे...अशी एकेकदा निराशा पदरी यायची...आणि काय योगायोग... ठरलेल्या पेट्रोल पंपावर गाडी घेऊन गेल्यानंतर हजार रुपयांचे डिझेल घाला म्हणतांना तो पाच हजारांचे डिझेल टाकीत भरतो...आणि वरून म्हणतो...सागरदादा एक व्यक्ती आली होती पाच हजार रुपये देऊन गेली...ज्यावेळी सागर गुरुवांची गाडी डीझेल भरायला येईल त्यावेळी या पैशांचे डिझेल त्या गाडीत भरा.म्हणून.आणि हो जाताना माझे नाव त्यांना सांगू नका बरं असे सांगून गेली...आणखीन एक अशीच घटना.ओळख ना पाळख सागरजींच्या माघारी एक व्यक्ती त्यांच्या पत्नीच्या हातात शंभर रुपये ठेवते आणि हे सागरदादांच्या कार्यासाठी घ्या म्हणून सांगते...तेंव्हा खरंच ते पाच हजार असतील किंवा शंभर रुपये... ते केवळ पैसे नसतात तर पैशांच्या रुपात चांगल्या कार्यासाठी मिळालेली ती एक प्रेरणा असते...निराशा बाजूला सरते आणि मन नव्या ऊर्जेने भरते.पुन्हा पुढच्या कामासाठी नवी स्फूर्ती मिळते....असा हा सागरजींचा अनुभव आहे.
                 अलीकडे गावातील शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पद गावकऱ्यांनी सर्वानुमते सागरजींना दिले आहे..आणि मिळालेल्या या संधीचे सोने करायचे या उद्देशाने अध्यक्ष कसा असावा याचा आदर्श ते आपल्या कामातून घालून देत आहेत... लोकसहभागातून शाळेतील मुलांना जास्तीत जास्त शालेय उपयोगी साहित्य उपलब्ध करून देणे आणि चांगले व्याख्याते,वक्ते मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत आणणे असे विविध कार्य अध्यक्ष पदावर राहून ते करत आहेत..तसेच शाळेतील दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शाळेचा संपूर्ण खर्च ते स्वतः करत आहेत... त्याचबरोबर पाच अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करत त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारायची..असा त्यांचा मानस आहे...
               त्यांच्या आतापर्यंतच्या अशा सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक संस्थाच्या मार्फत सन्मान व पुरस्कार मिळाले आणि मिळत आहेत...काहीवेळा ते पुरस्कार स्वीकारण्यास तयार होत नाहीत कारण  आपलं कार्यच सर्वश्रेष्ठ मानणारे सागरजी नेहमी अशा प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवतात...अलीकडेच त्यांना अखिल भारतीय ग्राहक मंच कोल्हापूर यांच्यावतीने मौनी विद्यापीठ गारगोटी येथे  जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे...


                     बोलण्यात नम्रता...वागण्यात सौजन्यता.... लहानथोर कुणाशीही बोलताना पहिल्यांदा मुखात राम कृष्ण हरी हा उच्चार...लहानांची कदर आणि मोठ्यांचा आदर मनापासून करणारे हे व्यक्तिमत्त्व.अतिशय गोड हृदयाचा माणूस...त्यांच्या सहवासात कुणीही राहिलं की हमखास हा गोडवा आपल्याला चाखायला मिळतो...काहीही असो ओठातून नाही तर पोटातून बोलणारा हा माणूस आहे.              स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीवर हिमतीने मात करत...समाजकार्याचे व्रत हाती घेतले...आणि आजतागायत ते प्रामाणिकपणे आपले सर्वस्व पणाला लावून हे काम ते करताहेत...आणि यामध्ये मोलाची साथ आहे ती त्यांच्या अर्धांगिनीची......एका आईबापाचा मुलगा एक भाऊ,एक पती, एक पिता ,एक शिष्य आणि एक समजासेवक अशा अनेक रूपातील एक आदर्श जीवन आज सागरजी जगत आहेत..
           खरं तर ऐनवेळी लहान असताना स्वतःच्या भावाने साथ सोडली...आपला वेगळा संसार थाटला...नंतर दारूच्या आहरी गेला..संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर....पण सागरजींनी या स्वतःच्या भावाला मार्गावर आणलेच...त्यांचा संसार सावरलाच भाऊ आज वारकरी झाले आहेत पण समाजातील अशा अनेक बांधवांना आपलेसे करून आपल्या भावाप्रमाणे त्यांचे दारूचे व्यसन सोडायला लावून त्यांना चांगल्या मार्गावर आणले...अनेकांचे या दारूपायी उध्वस्त होणारे संसार वाचवले...कित्येक माताभगिनींच्या कपाळाचे कुंकू त्यांनी मजबूत केले... खरंच पैसा म्हणजे ज्या लोकांना सर्वस्व वाटतो त्या लोकांनी एकदा ह्या व्यक्तीमत्वाकडे जरूर पहावं...जाणून घ्यावं... एका दुर्गम अशा खेडेगावात गरीबीत जन्म घेतलेला,हातावरचे पोट असणारा हा सामान्य माणूस...पण आज असे असामान्य कर्तृत्व करतो..फक्त पैसा असून चालत नाही तर त्यासाठी मनात खूप मोठी जिगर असावी लागते ...मनात आणलं असतं तर कुठेतरी चांगल्याचुंगल्या पगाराची नोकरी करून सुखासमाधानाचा एकट्याचाच संसार थाटला असता...आपल्या बायकामुलांत आनंदात राहता आलं असतं..मग कशासाठी एवढा हट्टाहास ..? कशासाठी एवढी जीवाची धडपड...?पण
हे विश्वची माझे घर
या माऊलींच्या उक्तीप्रमाणे त्यांनी समाजलाच आपले कुटुंब मानले.. माऊलींनी सांगितलंय..
"अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक."
जन्माला आलोय ना तर एकट्याचा नाही अवघ्यांच्या सुखासाठी मी धडपडणार.आहे..मी माझ्या एकट्यासाठी नाही तर संगळ्यांच्यासाठी जगणार आहे.


हा माऊलींच्या विचारांचा वसा आणि वारसा  खऱ्या अर्थाने जगणारा आणि पुढे नेणारा हा माणूस आहे.जो  फक्त स्वतःसाठी जगतो तो कधीच मेलेला असतो पण जो इतरांसाठी जगतो तोच खरा जगतो….आणि हे खरं जगणं सागरजींच्याकडे पाहिल्यानंतर कळतं...धन्य आहे आपले जीवन...आपला हा जीवनप्रवाह म्हणजे निखळ,निर्मळ झऱ्यासारखा आहे... की जीवनाच्या वाटसरुला या आपल्या प्रवाहात आल्यानंतर तृप्तीचा आनंद मिळावा. आणि जीवनाचा खरा मार्ग सापडावा…आपले जीवनकार्य म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे…
का जगावे...?कसे जगावे..? आणि कशासाठी जगावे...? हे सारं काही आपल्याकडून शिकता येतं...खूप काही घेता येतं...शेवटी
आपले हे समाजसेवेचे कार्य पुढे असेच चालू राहो.
आपले विचार,आपल्या संकल्पना पूर्णत्वास जावो..आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला व आपल्या परिवाराला निरोगी,उदंड असे आयुष्य मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना... धन्यवाद...

जय हो..!मंगल हो..!!


संवाद साधण्यासाठी संपर्क : 
सामाजिक कार्यकर्ते श्री सागर गुुुुरव.
मोबा - 9146148904


 -किरण सुभाष चव्हाण.
पांगिरे,ता-भुदरगड,जि- कोल्हापूर.
मोबा - ८८०६७३७५२८.

टिप्पण्या

  1. सागर माऊली यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून लेख वाचला खुपचं प्रेरनादायी आहे जन्म दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. सागर माऊली यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून लेख वाचला खुपचं प्रेरनादायी आहे जन्म दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक दिनीच घेतला अखेरचा श्वास... विनाअनुदानित शिक्षक किशोर पाटील यांचा करुण अंत | १५ वर्षांची अध्यापनाची नि:स्वार्थ सेवा करून शेवटपर्यंत पगार मिळाला नाही.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"