वळण – जीवन संघर्षातून प्रेरणा देणारे आत्मचरित्र | मराठी पुस्तक

जीवनाच्या खडतर संघर्षातून सकारात्मक वाटचालीकडे घेतलेलं 'वळण.' उसाच्या कांडक्यांनं पाठीमार मार देत आईनं शाळेला घातलं. पाठीवरच्या मारानं लेखकाचं पाटीवरचं शिक्षण सुरू झालं. अक्षरांच्या वळणापासून जीवनाच्या खऱ्या वळणाला इथूनच सुरुवात होते. घरचं आठरविश्व दारिद्र्य. बाप काहीसा विरक्ती वृत्तीचा. बापाला कोणतंही व्यसन नसताना देखील संसारात लक्ष कमीच. त्यामुळे संसाराचा जास्त करून भार आईच्या खांद्यावरच. भौतिक सुखाच्या लोभापायी घर दुभंगणारी कोत्या वृत्तीची आत्ती आतून किती निष्ठूर असते, यावरून नाती जशी भासतात तशी असतातचं असे नाही, याचा प्रत्यय येतो. शेती-घराच्या वाटणीवरून भाऊबंदकीतला तिडा आणि मग वाटणीवरून सतत एकमेकाला भिडा. त्यातून हाणामारीपर्यंत उद्भवणारा तंटाबखेडा हा भाऊबंदकीतला कडवटपणा म्हणजे कुठंही जावे पळसाला पानं तीनंच, हे इथंही प्रकर्षाने दिसून येतं. गावात प्राथमिक शिक्षण सुरू असताना सकाळ संध्याकाळ शेरड-गुरं राखत शाळा शिकायची. लेखकाचे बालपण अगदी माती, नदीनाला, रानाशिवारात, झाडाझ...