कविता तिन्हींसांजेच्या - तिन्हींसांजेचे सुख...किरण चव्हाण.

     

                      'तिन्हींसांजेचे सुख...'



लावलीस...देव्हाऱ्यात लामण दिव्याची सांजवात.

आता बस बघू अशी माझ्या पुढ्यात..

काय निरखतेयस अशी एकसारखी.

बघ तुझ्या डोळ्यांतही तिन्हींसांज दाटून आलीय.

तिथेही एक लामनदिवा जळतोय सांजेचा.

तेवतोय तळ पापणींच्या खाचेतल्या नितळ पाण्यावर.

नको पापण्यांची उसंत काढून घेऊ.

नको नको हलकीशीही पापणी ढळू देऊ नकोस.

नाही तर मिटल्या पापण्यात दडेल ना तो...विझेलही...

कसा तेवतोय बघ हळुवार 

तुझ्या नितळ पवित्र ओल्या डोळ्यांत.

कडकोपरा उजळवलाय काजळ काळ्या काठांवरही ओसडंलाय.

ती वात तान्ह्या अंगाने  कशी शहारतेय बघ..सोसवेना का तिला सांजवाऱ्याचा झोत.

कसे गं तुझे पुरातन राऊळासारखे हे निरामय नेत्ररूप.

जुनेपुराणे देखणेपणाचे मनमोहक प्रसन्न पवित्र तीर्थस्थळच.


दोन नयनपात्रांच्या काठांवर  विसावलेत अलगद समाधिस्त दोन पानमोती.

त्या मोतीयांच्या नितळकाचेतून  सळसळणाऱ्या सोनसळी किरणांचे सोनेरी कवडसे..

हळुवार बिलगतायेत माझ्या नेत्रकटाक्षी.

माजघरातील सांदकोपऱ्यात

घुटमळणारी अवघी शांतता विसावलीय तुझ्या डोळ्यांच्या कानाकोपऱ्यात.

त्या घनदाट काळोखाची चाहूल लागलीसे वाटते  तुझ्या डोळ्यातील उपजल्या नजरेला.

तरीच सावरलीय ती भिडल्या कटाक्षातून.

झाली का पापण्यांच्या पाखरांची लगबग सुरू..

एवढी का कुठे परतीची सांज सरलीय अजून..     

नको ना इतक्यात सुरू करू पापण्यांची पाखडणी.

नाही तर उगीच मनाला लागून राहते ती रुखरुख..

मला अगदी डोळे भरून पाहू दे...डोळेभरुन...

तुझ्या नयनगाभाऱ्यातील माझे तिन्हींसांजेचे सुख.




                                    - किरण चव्हाण.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"

भारताची जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुख- किरण चव्हाण.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'