आजच्या काळात जेंव्हा मुलगा मुलगी पहायला जातो तेंव्हा सहाजीकच मुलगीच्या घरच्या अपेक्षा वाढलेल्या दिसून येतात... आणि त्यामध्ये एक अपेक्षा असतेचं असते ती म्हणजे मुलगा सरकारी नोकरीला असला पाहिजे...ही अपेक्षा असणं वाईट नाही पण याचा अर्थ असाही नाही नोकरीलाचं प्राधान्य देताना की तो मुलगा कसा आहे..? याला आपण दुय्यम स्थान द्यावं...त्यावर आधारित ही रचना...
.... सरकारीच पाहिजे.
आवं पावणं पोरगं निरोगी,निर्व्यसनी हाय.
चांगलं धट्टा-कट्टा,धडपडी,हरहुन्नरी हाय....
पावणं ते काय न्हाय...
पोरगं सरकारीच पायजे हाय.
पावणं...पोरगं चांगलं शिकल्यालं हाय,सुशिक्षितबी हाय..
पण एवढंच काय,जरा खाजगी नोकरीला हाय.
पावणं ते काय न्हाय...
पोरगं सरकारीचं पायजे हाय.
प्रामाणिक हाय हं...पोरगं.
चांगल्या विचारांचं हाय.
लई चांगल्या गुणांचं, माणुसकीला धरून हाय.
पावणं ते काय न्हाय...
पोरगं सरकारीचं पायजे हाय.
बरं... पोरगं उद्योगी हाय..चांगला पैसा कमावणारा हाय...
घरदार बघितला तर सगळं जिथल्या तिथं हाय.
पावणं ते काय न्हाय...
पोरगं सरकारीचं पायजे हाय.
पावणं चार एकर शेती हाय, पोरगा उत्तम शेती करतो..
कायबी कमी न्हाय गुण्यागोविंदाने राहतो.
पावणं ते काय न्हाय...
पोरगं सरकारीचं पायजे हाय.
पोरगा माप शिकलाय पण
व्यवसाय करायचा म्हणतोय,
लाथ मारील तिथं पाणी काढल..
आसं खणखणीत नाणं हाय.
पावणं ते काय न्हाय...
पोरगं सरकारीचं पायजे हाय.
स्वभावानं पोरगं बघा,एक नंबरी हाय..
आई-बाच्या शब्दाबाहीर जरासुद्धा न्हाय.
पैसा आडका धन दौलत काय कमी न्हाय
खाऊनपिऊन सगळं कसं सुखामधी हाय..
पावणं ते काय न्हाय...
पोरगं सरकारीचं पायजे हाय.
सरकारी...सरकारी...सरकारी.
बरं पावणं हाय एक पोरगं आसं.
तुम्हीं म्हणताय तसं..
वरून दिसायला माप चांगलं पण गुणानं चांगलं नाय...
व्यसनीबी हाय आणि जरा रोगीबी हाय.
नोकरी हाय म्हणायची सरकारी,
पण कसं वागायचं कळत नाय..
लाचारासारखा वागतो, थोडा भ्रष्टाचारही करतो..
प्रमाणिक तर नाही,
ना कुणाशी देणं-घेणं.
सदा आपल्याच तोऱ्यामोऱ्यात.
नाही विचार करून वागणं.
पगार माप चांगला हाय खरं वागण्याची अक्कल नाय.
पण एवढं मात्र नक्की पोरगं सरकारीचं हाय...
मग काय पावणं...? याच्यापुढं तुमचा इचार तरी काय..?
पावणं ते काय बी आसू दे..
पोरगं नक्की सरकारीच नवं हाय...
याच्यापुढं कसलाच इचार पाचार न्हाय.
- किरण चव्हाण.
Mast aahe sir
उत्तर द्याहटवाखुपचं सुंदर..
उत्तर द्याहटवाएक नंबर सर
उत्तर द्याहटवा