आठवणींचा सांदीखोपडा#१ - 'गणक्यांची बैलगाडी'- किरण चव्हाण.

आठवणींचा सांदीखोपडा#१ आज बैलपोळा त्यानिमित्त... 'गणक्यांची बैलगाडी.' कुडाण्यातनं पिंजार उपसून आणलं की त्या पिंजराच्या भाऱ्यात लांबसडक कडब्याच्या पेंडीचा बिंडा असायचा.गोठयात न्हाय तर शेड्यावर भारा टाकला की, भलत्याच आनंदात माझी पावलं त्या भाऱ्याकडं झेपावायची...त्या भाऱ्यात घबाड असल्यागत मन हारखून जायाचं. पिंजाराच्या भाऱ्यात तुरा खवल्यागत कडब्याच्या धाटांचं बाहेर आल्याल शेंडं दिसायचं...त्या सरळसोट धाटांच्या वरती दोन इत लांब पांढुर पिवळ्या रंगाचं गणकं असायचं.ते वरचं गुळगुळीत गणकं कटाकदिश्यान मोडून घ्यायचं...या गणक्यांचं माझ्या बालमनाला किती अप्रूप..? दहा बारा गणक्यांचा मेळ करून घ्यायचा.दोन मुठीतला तो जुडगा एक करून रवी घुसळावा तसं घुसळत घराकडं पळायचं..ते गुळगुळीत गणकं एकमेकांवर घस्टून सळकून निस्टांयचं आणि कातर कातर आवाज यायचा...लई मज्जा वाटायची... घरात आलं की, गणकं घेऊन बाबांकडं जा...