"शिवम परिवार पांगिरे: प्रेरणा, एकत्रित संकल्पना आणि काकांजींचा आशीर्वाद"

 शिवम परिवार पांगिरे.

'शिवम परिवार पांगिरे या आमच्या परिवाराची अशी ही अनोखी स्थापना'.*


           दिव्याखाली अंधार म्हणतात ना अशीच आमची आतापर्यंत गत होती.परंतु एका दिव्य प्रकाशाने तो अंधार नाहीसा व्हावा असं झालं.कारण मागच्या रविवारी १ सप्टेंबर रोजी काकांजीचा चरणस्पर्श आमच्या गावी माझ्या घरी झाला.आणि त्यानंतर रविवार ८ सप्टेंबर रोजी आदल्या रात्री ज्या आजीविषयी चर्चा करून आम्हीं झोपी गेलो होतो, दुसऱ्यादिवशी तिचाच विचार घेऊन अस्वस्थ मनाने उठलो.आणि अवचित हळुवार एका संकल्पनेने मनात जन्म घेतला.आणि आमच्या सहृदयी मंडळींनी या संकल्पनेला उस्फुर्तपणे प्रतिसाद देत काकांजीच्या विचाराने प्रेरित झालेलो आम्हीं प्रातिनिधिक स्वरूपात एकत्र आलो.आणि आजीच्या घरी निघालो.

             आमच्या गावातील बायाका पाटील या आजीबाई.वय जवळपास ७० च्या पुढे असावं.आजीच्या गरिबीची वेगळी ओळख करून द्यायला नको.त्या जुन्यापन्या घरात आजी एकटीच राहते.तिला सोबत करते ती फक्त तिची गरिबी.याच गरिबीमुळं अगदीच ती उतार वयाकडे झुकल्यासारखी दिसते.चालताना काठीचा आधार घेऊन चालते.अशक्त झाली आहे.एकाकी असं जीवन.नवरा,मुलंबाळं यांचं सुख तिच्या नशिबी नाही.पण भावांची मुलं ती आपलीच मुलं अशी  मानते.ते ही तिच्याकडे लक्ष देतात.कधी घरी आली की खाऊपिऊ घालतात.शेवटी त्यांचा आधार आहे.पण तिला एकाकी जगण्याची सवयच झाली आहे.   

              तिचं घर तिच्यासारखंच थकलेलं.दारातोंडाला पावसाचं पाणी तुंबलं होतं.आत गेल्यानंतर कळतं की,ते किती सुरक्षित आहे.दिवसाकाठी ही अंधार भरून राहतो.लाईटची व्यवस्था नाही.काळवंडलेल्या जाडजूड तुळया,एका कोपऱ्यात नकाडी म्होरी.. तिच्यापुढची भुई गरावून ओली झालेली. निकारड्याला मोजकी जरबंदी भांडी,प्लॅस्टिकच्या बरण्या,कधीपासून थंड पडलेली मातीची चूल.

           आम्हीं आत गेलो आजीजवळ जाऊन बसलो..आजीचा अवतार व तिची ती अवस्था बघून सगळी परिस्थिती लक्षात येत होती...काही मोजकेच प्रश्न विचारले...पेन्शनचा विषय काढताच आजीने आमच्यासमोर हातच जोडले.ती चापसत आमचे पाय धरू लागली....आम्हालाच ते कसतरी वाटू लागलं.अशी असून देखील तिला पेन्शन सुरू नाही.आम्हीं तिला धीर दिला.

आता आम्हीं ठरवलंय.आजीच्या जवळच्या नातलगांच्या सहकार्याने आम्हीं शिवम परिवार आजीची इथून पुढची जबाबदारी घेणार आहोत....दुसरी गोष्ट म्हणजे त्या घरात लाईटची व्यवस्था नाही...आम्हांला ती व्यवस्था करायची आहे आणि तिसरं आणि महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे आजीची पेन्शन मंजूर करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.तसेच आजीच्या मोफत उपचाराची जबाबदारी आमचे शिवम साधक डॉक्टर सुनील लाड यांनी स्वीकारली आहे.अशा कार्याच्या शुभारंभातून आणि काकाजींच्या आशिर्वादाने आजीच्या या चंद्रमौळी झोपडीत आज आम्हीं शिवम परिवार पांगिरेची स्थापना करीत आहोत.आणि शिवम परिवार पांगिरे या आमच्या छोट्याशा परिवाराची ओळख आम्हांला समाजकार्यातून निर्माण करून द्यायची आहे.

*'काम हीच आमच्या परिवाराचे तत्व राहील'*  प्रथमतः आमच्या या कार्याला शुभेच्छा व प्रेरणा म्हणून.

आमच्या शिवम परिवार मुरगुड विभागाने  वडीलबंधूंच्या नात्याने आमच्या शिवम परिवाराकडे आजीला महिनाभर पुरेल इतके संपूर्ण जेवणाचे किट दिले, आम्हीं ते मुरगुड मधून आणून रात्री आजीकडे सुपूर्द केले.त्या किटमधील सामान व्यवस्थित ठेवायला आजीला मदत करताना एक दोन जरबंदी डबे मी उघडून पाहिले एका डब्यात आजीने कायबाय भरून ठेवलेलं आणि दुसरा डबा अर्धा पिटाने भरलेला..पण त्या पिटात अळ्या भरलेल्या...काही त्या टोपणावरही दिसत होत्या.

दिव्याच्या उजेडात आजी ते ठेवण्यासाठी धडपडत होती.आम्हीं आजीचं अंथरून पाहिलं..दोन पोती खाली अंथरलेली व एक रग पायाशी पडलेला...दांडीवर दोन जीर्ण गोधड्या मात्र होत्या..आम्हीं वाकून बाहेर पडलो.

            खरंच काकांजी... आमच्या दिव्याखालचा अंधार होता तो आता नाहीसा झाला आहे.आजीच्या पुढ्यात बसून तिची अवस्था जवळून पाहताना आमची आम्हांला लाज वाटू लागली.की अजूनपर्यंत गरिबीने हतबल झालेल्या आजीकडे आमचं लक्षच गेलं नाही.आम्हीं स्वच्छ प्रकाशात ऐसपैस आरामात राहतो पण दुसरीकडे मात्र ही आमची आजी या एका खोपड्यात किती तिष्ठत... कष्टत जगत होती.आम्हीं पुढं बघण्याच्या नादात पायात बघायचेच राहून गेले होते..आता झाले गेले मागे टाकून आम्हांला आजपासून पुन्हा नव्याने  सुरुवात करायची आहे..अशा हलाखीच्या हतबल जिवापर्यंत आम्हांला पोहोचायचं आहे.शिवम परिवार पांगिरे या परिवाराच्या माध्यमातून अशा सामाजिक कार्याला सुरुवात करत आहोतच.काकाजींच्या अमृतरुपी वाणीने आणि विचारांनी प्रेरित होऊन निश्चितच पुढील काळात यामधील शिवम साधकांची संख्या वाढणार आहे.या परिवाराचा सदस्य  आपणही होऊ शकता.अजून कोणाला या परिवारात यायचं असेल तर सेवाभावी वृत्तीने आपणही  सामील होऊन समाजाप्रती आपल्या कार्याचे योगदान या परिवाराच्या माध्यमातून देऊ शकता. तर चला मग

*"अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोकं"* या उक्तीला आपल्या कृतीची जोड देऊया.


जय हो..! मंगल हो..!!


*'शिवम परिवार पांगिरे' कार्यालयाचे आज साध्या पध्दतीने झाले उदघाटन.*


             आदरणीय गुरुवर्य इंद्रजीत देशमुख साहेब काकाजींच्या प्रेरणेतून *'अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक'*

हे ब्रीद घेऊन आपल्या शिवम परिवार पांगिरे कार्यालयाचे आज मंगळवार दि.१०/०९/२०१९ रोजी साध्या पद्धतीने आमचे शिवम साधक व मार्गदर्शक श्री नामदेव पाटील सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले.

            सुरुवातीला शिवम साधक श्री अनिल सुतार यांनी प्रस्तावना मांडली, यामध्ये थोडक्यात आपल्या शिवम परिवाराचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला आपल्याला माणूस म्हणून एकत्र येऊन माणसांच्या जाणिवा,नेनिवा लक्षात घेऊन समाजातील गरीब,गरजू व उपेक्षित माणसांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्यांच्या अडचणी, समस्या निवारण्याचे प्रयत्न यामाध्यमातून करायचे आहेत.अशा सामाजिक कामातून आपल्या शिवम परिवाराची ओळख आपल्याला निर्माण करायची आहे.तसेच नामदेव पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित शिवम साधक व आपल्या शिवम परिवाराला भरभरून प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.उत्साही व आनंदी वातावरणात हा छोटासा कार्यक्रम संपन्न झाला.यशवंत गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले सामाजिक विचारांनी प्रभावित असणाऱ्या संवेदनशील माणसांची मांदियाळी म्हणजे हा शिवम परिवार आहे.आणि यांतील शिवम साधकांना एका ध्येयाच्या धाग्यात गुंफून 

*'आनंदाचे आवारू मांडू जगा.'*  या कार्याचा सुगंध या समाजात पसरवायचा आहे.हेच परमकर्तव्य या शिवम परिवाराचे असेल.आणि म्हणून 

यावेळी गावातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व समाजकार्यात आपले योगदान द्यायचे आहे त्यांनी शिवम साधक म्हणून या परिवारात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले.

                यावेळी शिवम साधक श्री.नामदेव पाटील, श्री.अनिल सुतार,श्री यशवंत गुरव,डॉ.सुनील लाड,पांडुरंग आरागडे,राजेंद्र भोसले,प्रवीण आराध्ये, युवराज कांबळे,अक्षय पेरणोले,सुदर्शन  पाटील आदी उपस्थित होते.


🙏🙏!! राम कृष्ण हरी!!🙏🙏


♦ *'शिवम परिवार पांगिरे'*♦


🔹 *स्थापना दिनांक.-*

       १० सप्टेंबर २०१९.


🔷 *प्रमुख मार्गदर्शक व प्रेरणास्थान.-* गुरुवर्य आदरणीय इंद्रजीत देशमुख साहेब (काकांजी)



🔶 *'शिवम साधक'*🔶


१) श्री.नामदेव सतुन्या पाटील.(सेवानिवृत्त शिक्षक.)

२) श्री.यशवंत परशुराम गुरव.

३) श्री. पांडुरंग साताप्पा इंगळे.

४) श्री.सुनील शामराव लाड.

५) श्री.अमर रघुनाथ जाधव 

६) श्री.अनिल सातापा सुतार.

७) श्री जयवंत मारुती जाधव.

८)किरण सुभाष चव्हाण.

९) प्रवीण प्रकाश आराध्ये

१०) अक्षय नवनाथ पेरणोले.

११) विनायक बाळू गायकवाड

१२) सुदर्शन संजय पाटील.


*टीप:-* आपणही या परिवाराचा एक सदस्य होऊ शकता.सेवाभाव वृत्तीने समाजाप्रती आपले योगदान या परिवारात सामील होऊन देऊ शकता.


*आपले ब्रीद व उद्दिष्ट -* 


'अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक."


 🏠 *शिवम परिवार पांगिरे संपर्क कार्यालय:*

ग्रामपंचायत पांगिरे समोरील बिल्डिंग.


📱 *शिवम साधक संपर्क -*

श्री. यशवंत गुरव - ९७६४७५५७५४.

श्री. सुनील लाड - 

९५५२७०१७०८

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक दिनीच घेतला अखेरचा श्वास... विनाअनुदानित शिक्षक किशोर पाटील यांचा करुण अंत | १५ वर्षांची अध्यापनाची नि:स्वार्थ सेवा करून शेवटपर्यंत पगार मिळाला नाही.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"