वाकीघोल परिसरातील आनंददायी निसर्गवारी – हिरवाईचा साज

 


वाकीघोल परिसरातील आनंददायी निसर्गवारी.

                         भरजरी मखमली शालूचा हिरवागार पदर मावळत्या अंगाला पसरून हिरवाईचा साज लेवून सजून धजून उभी असलेली ती वनराई. दोन्हीं बाजुंनी दंड थोपडून अंगावर हिरवाईचा कोट चढवून रुबाबात उभे असल्यासारखे पाठीराखे पहाडी डोंगर. एका डोंगराच्या मध्ये कोरडे ठाक पडलेले निसरड्या फिकट पांढऱ्या धबधब्याचे घसरते पात्र.एखाद्या लेकुरवाळीचं लेकरू पुढ्यात बागडावं तसं त्या हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत लपलेली ती एवढीशी वाडी. दोन्हीं बाजुले डोंगर आणि त्या निसर्गमायेच्या  हिरव्यागार समृद्ध संपन्नतेच्या नगरात आनंदाने नांदणारी ती वाडी म्हणजे त्या निसर्गमायेचं लेकरू जणू. 

                      राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील अगदी शेवटचं टोकं म्हणजे ही कामतेवाडी. एका गल्लीतचं आटोपणारी.काजू,फणस,आंबा करवंदीच्या वेलींनी गुंफलेली. अगदी दुर्गम आणि कोकणी भाग. अंतिम मुक्कामाचं ठिकाण म्हणजे ही वाडी.याच्यापुढे ना रस्ता ना कोणतं गांव.तिच्या मावळतीला फक्त न फक्त जंगलाचं साम्राज्य. पाठीराख्या डोंगराचा आधार घेऊन पूर्वेला पुढा करून पश्चिमेची अंतिम सीमा सांगणारी ही कामतेवाडी.          

                        आडोली गावच्या महालक्ष्मी विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.पी.पाटील सरांच्या आग्रहावरून जंगलभ्रमंती करण्याचा योग आला. त्यांच्या चारचाकी गाडीतून या वाडीत मी पहिल्याप्रथमच आलो होतो. हिरव्यागार रानातून या वाडीच्या पोटात शिरलेला वळवळणाचाकाळा करकरीत डांबरी रस्ता.हा रस्ता  येणाऱ्या नवगतांचे स्वागत करत आजूबाजूची हिरवाई दाखवत आपसूक या वाडीत आणून सोडतो.  वाडीच्या काही अंतर लांबूनचं मंदिराचा गोलाकार पांढरट रंगाचा देखणा कळस त्या गुजबुर देवराईसारख्या हिरव्यागार पृष्ठभागावर उठून दिसत होता. वाडीत शिरल्यानंतर मग रस्त्याच्या दोन्हीं बाजुंनी बेंगलोर खापरीच्या नव्या जुन्या घरांची रांगचं सुरु होते. आम्हीं या वाडीत पोहोचलो तेंव्हा भर दुपार व्हायला आली होती. त्या गल्लीतल्या बालचमूना गाडीत घेतले आणि थोड्या अंतरावर जाऊन गाडी मराठी शाळेच्या समोर उभी केली.

                        शाळेच्या खालच्या अंगाला असलेल्या एका घरात गेलो.वरती गडद निळा आणि खाली मातकट रंगाने रंगरंगोटी केलेले ते घर.त्या घराची एक पारंपरिक जुनी ढब दिसून येत होती.  शेणाने सारवलेली शेंड्यावरची कट्टी, एका कोपऱ्यात गुंडाळून ठेवलेला भाताचा तट्ट्या.आत गेलो तर शेणाने सारवलेली भुई.घरात नऊवरीतल्या त्या रांगड्या मावशीने हसतमुख आनंदाने आमचे स्वागत केले. आणि  मधाची बाटलीचं मावशी घेऊन बाहेर आली.  जंगलातून गोळा केलेला तो मध.अगदी अस्सल मधाने मावशीने आमचे तोंड गोड केले.आम्हीं तोंड गोड करण्यापुरता दोघांनी चमचाभर मध घेतला. मधा सारखेच मावशीचे बोलणेही मधाळ... मायाळू शब्द.थेट हृदयाला भिडणारे. तिथून बाहेर पडल्यानंतर उंचवटावरून मी ती वाडी न्याहाळत होतो.एका गल्लीच्या मधल्या कप्प्यातून डोंगराचा संपूर्ण भाग नजरेच्या टप्प्यात येत होता. एका घराच्या भिंतीला लागून उभे असलेले फणसाचे झाड.खालच्या फांदीला काटेरी टुमदार फणस दिसत होते. फणसाच्या झाडाखाली बैलगाडी लावलेली. त्या मोकळ्या मैदानात चिमुरडी पोरं खेळ खेळत होती. दोघे तिघे त्या बैलगाडीच्या जु वर दोन्हीं बाजूला बसून स्वतःला तोलत होते. ते दृश्य पाहताना बालपणीचा भूतकाळ नजरेत गोळा झाला. 

              

      एका कोनाड्यातून सुरुवात होणाऱ्या दोन घरांच्या मधल्या बोळातून जंगलात जाणाऱ्या पाय वाटेवरून आम्हीं जंगलाच्या दिशेने निघालो. दोन्हीं बाजूच्या दरडेवर वाढलेल्या झुडपांची एक बाकदार कमान तयार झाली होती.त्या बाकदार झुपकेदार कमानीतून पलीकडच्या तेजस्वी किरणशलाका उठून दिसत होत्या. आम्हीं दोघे आणि आमचे छोटेसे बालदोस्त होते गणेश, पृथ्वीराज,श्री हरी,आदित्य. ते पुढे आणि आम्हीं त्यांच्या मागे. वाडीला मागे टाकून एकदासे शिरलो आम्हीं जगलांत. एका उतारावर छोटी नदी लागली.एक दोन डबके वगळता सगळी नदी कोरडी ठाक. सगळे दगड गोटे, मोठाले खडक त्या रणरणत्या उन्हात तापत होते.दोन्हीं दरडेकडेला झाडं वेलीनी आच्छादलेल्या होते.नदीच्या वरच्या आंगचे दृश्य तर

एखाद्या  भुयारासारखे भासत होते. नदीच्या काठाला असलेल्या जांभळीच्या खाली एक नितळगार पाण्याचे छोटेसे डबके होते. कॅरमच्या पिसासारख्या फिरणाऱ्या इकडे तिकडे  पाण्यावर फिरणाऱ्या नितळ्या बघितल्या. त्यांना 'water skelter' असं म्हणतात त्या ज्या पाण्यात असतात ते सर्वात स्वच्छ पाणी असते.'पाटील सरांनी थोडक्यात अशी त्यांची माहिती आम्हांला सांगितली.

                  नदीकाठची आंब्याची,जांभळीची झाडं बघत पुढे चालू लागलो. आमचा आदित्य म्हणाला, "सर या नदीकाठच्या झाडांचे आंबे आंबटंच असतात. जगलांतल्या झाडांचे आंबे गोड असतात." लहान मुलांचे निरीक्षण किती जबरदस्त होते. कारण त्यांनी ते अनुभवलंय त्यांनी ते चाखलय. अशीच आमची फौज आणखीन दाट जंगलात शिरू लागली.एकेक चढण वळण घेत एकेक कदम पुढे टाकू लागलो.डोक्यावरती सूर्यनारायण तळपत होता.कडक उन्हाचे लोळ अंगावर बरसत होते पण आजूबाजूला इतकी हिरवाई दाटली होती की उन्हाची पर्वा करावीशीचं वाटत नव्हती. वृक्ष लता वेलींच्या सहवासात जाणवत होता तो मायेचा गारवा.डोळ्यांनी ती दाट हिरवाई पाहताना आमची नजर ही हिरवाईने दाटून गेली होती. माळरानावरच्या करवंदीच्या झुडुपांकडे आमचा मोर्चा वळाला. या झुडुपांकडून त्या झुडुपांकडे. कुठे कच्ची- कुठे पिकलेली छोटी मोठी ,आंबट गोड करवंदे. काटेरी वेलींच्या हिरव्याकंच पानांच्या ताटव्यावर लगडलेली काळीभोर करवंद पाहून मन हरखून जायचं.त्यांची चव चाखायला उतावीळ व्हायचं.ती अलदग तोडत तोंडात टाकत चव चाखत आम्हीं रानोमाळ तुडवू लागलो. एक नवीनच फळाचा आस्वाद घ्यायला मिळाला साधारण चिक्कू सारखे दिसणारे आणि चवीला गाभूळ चिंचेच्या चवीसारखे आंबटगोडयुक्त लागणाऱ्या या फळांचे नाव होते 'हळू'..खूपच अवीट चवीचा आस्वाद घ्यायला मिळाला. माळावरच्या खरबुड दगडावर बसून फोटो सेल्फी काढण्याचा मोह आवरत नव्हता. अगदी अंगावर धावून येतायत की काय असे दोन्हीं बाजूला तसेच पश्चिमेला असणारे डोंगर. दाट झाडी वेली झुडपानी पार आच्छादून गेलेला अगदी घनदाट परिसर.रान सजीवांच्या खाणाखुणा जागोजागी पहायला ऐकायला मिळत होत्या.जंगलाचा काही अंशी भाग फिरून वाडीच्या मावळत्या आंगच्या जगलांला वळसा घालून पुन्हा आम्हीं वाडीत परतलो.

              रणरणत्या उन्हाचा तडाखा सुरूच होता. तहानलेल्या आमच्या जीवाला पाण्याची ओढ लागली होती. त्या डेरेदार केळीच्या सावलीत पाण्याचा नळ होता. या सावलीत जाऊन नितळ थंडगार पाणी ओंजळीत घेऊन पहिल्यांदा पाण्याचे फपकारे तोंडावर मारले.त्या उन्हाच्या रकात अंगभर ओला गारवा पसरत गेला.ओंजळीतले पाणी घटाटा पिऊन तहान शमवली. आता भुकेची जाणीव होत होती. आमच्या पाटील सरांची त्या वाडीभर ओळख.शाळेच्या विद्यार्थ्यांमुळे सरांचा इथल्या प्रत्येक  वाडीकरांशी स्नेह व ऋणानुबंध अगदी घट्ट. कुणापाशी अगदी हक्काने सांगावे अशी सारी घरची लोकं. एका मावशीला पाटील सरांनी जेवणाविषयी सांगितले. ती मावशी लगोलग आमच्या पुढं गेली.आम्हीं काही वेळाने त्यांच्या घरी पोहोचलो.मावशी साधी होती तसंच तिचं ते घरंही साधं.आम्हीं आत आलो. पार आम्हांला तिने जेवणखोलीत चुली समोर बसवून तिनं जे रांधलं होतं ते मनापासून आणि मायेनं वाढलं. चुली समोर बसून आमच्याशी भरभरून बोलत होती. पोटभर जेवण्याचा आग्रह करीत होती.आम्हीं मनसोक्त जेवून तृप्तीचा ढेकर दिला.त्या माऊलीच्या हातच्या साध्या सात्विक जेवणाला महागड्या हॉटेलमधल्या पंचपक्वणाची सर कधीच येऊ शकणार नाही.मावशीचा निरोप घेऊन खूप समाधानाने आम्हीं बाहेर पडलो.

                माघारी वळताना काही अंतरावर असणाऱ्या हिरव्यागार देवराईला भेट दिली.एखादा ऋषी नदीकाठी ध्यानस्थ बसावा तशी शांत,स्थिर,अविचल घनदाट अशी ती देवराई. या ठिकाणी एका झाडाखाली उघड्यावरचं 'बाटम देवाचं' देवस्थान आहे.नदीकाठी वसलेली ही देवराई झाडी लतावेलींनी अगदी भरभरून आणि बहरून गेली आहे. चिरस्थायी शांतता,तिला दुभंगणारी ती चिमणी पाखरांची चिवचिव करणारी नादमयता, डेरेदार वृक्ष आणि वेलींचा अधिवास,जमिनीला अंथरलेला पालापाचोळा असा सगळा देखणा हिरवाईचा गोतावळा. क्षणभराच्या उपस्थितीत चिरंतन शांततेच्या सुखाचा लाभ या देवराईच्या कुशीत मिळतो. हे ठिकाण पाहून आम्हीं माघारी वळलो.

                    हिरवागार बहरलेला घनदाट निसर्ग,त्याच्या कुशीतील जगापासून दूर असलेली ती छोटीशी वाडी.वाडीतील साधी,सोपी,सरळ कष्टाळू आणि मायाळू माणसं. आजही ती माणसं सायंकाळी विठ्ठल मंदिरात जमून हरीभजनात दंग होतात. हे सुख जवळून पहायला अनुभवायला मिळालं. किती नटून-थटून, सजून- धजून निसर्ग उभा असतो ना आपल्यासाठी. त्याला न्याहाळलं पाहिजे,अनुभवलं पाहिजे त्याच्या अधिवासात चार पावलं चाललं पाहिजे. इथली प्रत्येक झाडं, वेली रान झुडपे आपल्या भेटीसाठी आसुलेली असतात.त्यांची ही एक भाषा आहे. ती समजून घेतली पाहिजे.त्यांच्याशी हितगुज साधलं पाहिजे. इथल्या जंगलातला रानमेवा पिकलेला आहे  त्याचा आस्वाद घ्यायचा कुणी..? रानमेवा विकत घेऊन खाण्यात मजा नाही तो इथं येऊन चाखण्यात खरी मज्जा आहे.सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडून या खऱ्या खुऱ्या हिरव्यागार जंगलाच्या पोटात शिरलं पाहिजे.  जबाबदारी,व्याप याचा उंबरठा ओलांडून या मोकळ्या प्रदेशात काही क्षण वावरलं पाहिजे,सोशल मीडियात गुंतलेलो आपण एकदा मोकळा श्वास घेण्यासाठी इथे आलं पाहिजे. 

निर्जीव स्क्रीनवर असलं हे सजीव  सुख आपण कधीच अनुभवू शकत नाही.ते शाश्वत सुख अनुभवायचं असेल तर इथंच यावं लागेल. इथल्या रानजीवांचा संसार याची देही याची डोळा आपण पाहिला पाहिजे. प्रत्येक झाड वेली झुडपानां आपला स्पर्श झाला पाहिजे. अशी ही वाकीघोल परिसरातील आमची छोटीशी ही निसर्गवारी समृद्ध आणि संपन्न अशी ठरली. ती आपलीही ठरावी निसर्गाच्या रम्य सुखाची आनंदाची अनुभीती आपणही जरूर लुटावी.



  - किरण सुभाष चव्हाण.

  ८८०६७३७५२८.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक दिनीच घेतला अखेरचा श्वास... विनाअनुदानित शिक्षक किशोर पाटील यांचा करुण अंत | १५ वर्षांची अध्यापनाची नि:स्वार्थ सेवा करून शेवटपर्यंत पगार मिळाला नाही.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"