गावकुसातील कथा - 'तानी' - किरण चव्हाण.

'तानी...' वरल्या आंगच्या तोंडानं पाऊस मजबूत झोडपत व्हता.रानाशिवारात नुसता हैदोस घातल्याला.जमिनीला जरासुदीक पाणी थरत नव्हतं का निसरडीला धावणाऱ्या लाल पाण्याला दम व्हता. शेतवडीतनं तुंबून बांधाच्या साण्यातन पाण्याचा मुसोंडा खाली उतरीता..बारीक मोठ्या चिवळाटातनं पाणी बेलगाम दौडत,जवळच्या वड्या वताडाला मिळत व्हतं...वड्या वताडातलं गदुळ पाणी उर भरून खायल्या आंगाला सपाट्यानं धावतं.हिरव्या लुसलुशीत रान कुरणाच्या उरावर वरनं रापराप थेंबका आदळालता...आंगचा पाझर फुटावा तसं एकेक दगुडधोंडा वरनं खाल पाझरत व्हता.आंघोळीचं पाणी आंगवळण घित खालपतोर नितळावं तसं झाडीझुडीच्या उभ्या आंगावरनं नितळ पाणी बुडाला धाव घीतं. धुळणीच्या माळावरची धोंड पिंडीवर जलध...