"पाठीमागच्या बेंचपासून पुढच्या बेंचपर्यंत: केंगार सरांचे मार्गदर्शन आणि शिक्षक होण्याची प्रेरणा"

पाठीमागचा बेंच, ती दुपार आणि केंगार सरांचे ते बोल... २००६ साली दहावी उत्तीर्ण होऊन श्री.लक्ष्मी विद्यालय ज्युनिअर कॉलेज हसुर येथे मी ११ वी ला प्रवेश घेतला. कॉलेज जीवनाच्या वयात नुकतेच पदार्पण केलेले. पण माझा स्वभाव हा थोडा लाजरा बुजरा असल्याने सुरुवातीला मी शेवटच्या बेंचवर बसायला लागलो. अर्थातच शेवटचा बेंच म्हणजे मागे बसून दंगामस्ती करण्याऱ्या मुलांचा अड्डाचं. शेवटच्या बेंचवर बसून मुलं हुल्लडबाजी गोंधळ करायची. मी ही त्या मुलांच्यात मिसळलो होतो पण माझा गोंधळ वगैरे करण्याचा कोणताच उद्देश नव्हता. आणि मला असा गोंधळ वैगरे घालणं कधी जमलंही नसतं. आमच्या वर्गावर केंगार सर मराठी विषय शिकवायचे.एकदा वर्गात सर शिकवताना मागे पोरांची चुळबुळ सुरू होती. सर अचानक आमच्या दिशेने आले. आणि सरळच मला म्हणाले , "किरण तू उद्या पासून पुढच्या बेंचवर बसायचं. तुला १२ वी ला ७५ % गुण मिळवायचे आहेत. आणि तुला डी.एड करून शिक्षक व्हायचंय एवढं लक्षात ठेव." या वाक्यानं मी चमकूनचं गेलो. माझ्या आतापर्यंत हे कधी डोक्यातच नव्हतं...