वाकीघोल परिसरातील आनंददायी निसर्गवारी – हिरवाईचा साज

वाकीघोल परिसरातील आनंददायी निसर्गवारी. भरजरी मखमली शालूचा हिरवागार पदर मावळत्या अंगाला पसरून हिरवाईचा साज लेवून सजून धजून उभी असलेली ती वनराई. दोन्हीं बाजुंनी दंड थोपडून अंगावर हिरवाईचा कोट चढवून रुबाबात उभे असल्यासारखे पाठीराखे पहाडी डोंगर. एका डोंगराच्या मध्ये कोरडे ठाक पडलेले निसरड्या फिकट पांढऱ्या धबधब्याचे घसरते पात्र.एखाद्या लेकुरवाळीचं लेकरू पुढ्यात बागडावं तसं त्या हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत लपलेली ती एवढीशी वाडी. दोन्हीं बाजुले डोंगर आणि त्या निसर्गमायेच्या हिरव्यागार समृद्ध संपन्नतेच्या नगरात आनंदाने नांदणारी ती वाडी म्हणजे त्या निसर्गमायेचं लेकरू जणू. राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील अगदी शेवटचं टोकं म्हणजे ही कामतेवाडी. एका गल्लीतचं आटोपणारी.काजू,फणस,आंबा करवंदीच्या वेलींनी गुंफलेली. अगदी दुर्गम आणि कोकणी भाग. अंतिम मुक्कामाचं ठिकाण म्हणजे ही वाडी.याच्यापुढे ना रस्ता ना कोणतं गांव.तिच...