"माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग: जीवनातील भावनिक प्रवास आणि अंतर्मनाचा अनुभव"

माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग यांची कविता. आजचा दिवस एक विलक्षण योगायोग घेऊन सुरू झाला. भल्या पहाटेच्या समयी मनपरिवर्तनाचा झालेला साक्षात्कार हा मला अचंबित करणारा होता. याला मानवी जीवनातील एक चमत्कृती म्हणूया की, एका दीर्घ चिंतनाचा जगण्याच्या अर्थाशी घातलेला मेळ म्हणूया. ते कसं ठरवावं.? ही घटना सांगण्याच्या अगोदर अर्थातच माझ्या मानसिक आंदोलनाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घ्यावीच लागेल.किंबहुना मला ती परखडपणे व्यक्त केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. जगणं म्हणजे समुद्राच्या लाटेसारखं चढउतार घेत किनाऱ्याला लागत असतं. तसंच जगण्याच्या चढउतारात मध्येचं घुटमळत असलेला मी. जीवनातील अशा काही घडामोडींनी सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली दुभंगलेल्या मनाची नकारात्मक अवस्था. पालापाचोळ्यासारख्या विस्कटून सैरभैर झालेल्या भावना. काही केल्या ताबा मिळवता येणार नाही इतकं मोकाट सुटलेलं मन. अधीर झालेल्या मनाला संयमाच्या कोणत्या धाग्याने करकचून बांधावं अशी केविलवाणी झालेली अवस्था. स...