कविता संग्रह

 अनुक्रमणिका


१. मायबापा

२.गुरू

३. माझा गुरू

४. संस्कारांचा परिसरस्पर्श

५. ओव्या

६. पांडुरंग

७. भार

८. हरी मुखे म्हणा

९. ऋण तयांचे

१०. बालग्राम प्रार्थना

११.  इंद्रजीत

१२. शाळा

१३. शिक्षका तू वेडा कुंभार 

१४. माय मराठी

१५. कविता

१६. बाप

१७. असावे असे माझे गांव.

१८.  'सजा-ए -मौत'

१९. . गांव विकताना पाहिला

२०. . भ्रष्टाचार.

२१. कामगार.

२२. 'अजून अशा किती निर्भया..?'

२३. ऑनर किलिंग. न्याय मिळालाच पाहिजे.

२४. भूक

२५.  learn or not to learn ..

२६. आम्ही सारे भारतीय 

२७. माझा शेतकरी बाप

२८. .पीक

२९. . धरित्रीचा बाळ.

३०. .  पान्हा आटला.

३१.  माझ्या कोकणी माहेरा...

३२. . तिचं अस्तित्व..

३३. .  हुंडाबळी...

३४. जन्म लेकीचा

३५. पोरी

३६. आईची आई

३७. माई

३८. नारी

३९. स्कार्फ

४०. तू

४१. तिन्हींसांजेचे सुख

४२. तुझ्या डोळ्यांतील निज

४३. माझे हरवलेपण

४४. रुसवा

४५. मी

४६. माणूस म्हणून

४७. अश्रू

४८. बाजार फार झाला

४९. बासरी

५०. भूक

५१. स्वप्नही..

५२. स्वप्नांचा चुराडा

५३. बाळ...माफ कर

५४. मी

५५. जगणं स्वतःसाठी

५६. करार

५७. मोरपीस

५८. हो विश्वात्मक

५९. वरद

६०. ती

६१. साक्षीदार

६२. पोशिंद्याला वाली कोण ?

६३. अरे अरे माणसा तू

६४. सलाम तुमच्या कार्याला

६५. उन्हाळा

६६. श्रावणमासी

६७. दुःख

६८. गरीब कुणाला म्हणावं.? 

६९. लावणी

७० काव्यदान


















◆ भक्ती.


१) मायबापा


जन्मासी घातलें तुम्हीं मायबापा |

           जपिले फोडाप्रमाणे तळहाता ||

                अपार कष्टसायास झेलीले |

 हे जीवन ऐसें घडविले  ||

शब्दे अपुरेच पडतील |

काय सांगू तुमची गाथा  ||

चरणांवरी आपुल्या सदैव  |

टेकवितो माझा माथा ||

नाही ऋणातूनी या उतराई  |

अवघे जीवन हे तुमचे ठायी ||










२) गुरू


                 धन्य झालो बा पांडुरंगा |

     भेट झाली तुझिया स्वरूपा||

अद्वैतची झालो ठायी |

ही सारी तुझीच कृपा ||

भाग्य उदयास आले  |

सुखाचे सुख लाभले ||

जन्मींचे पुण्य फळले

सार्थक झाला हा जन्म पुरता||

शोध नाही गा आता |

मज माझा गुरू भेटला ||

हृदयाचा गाभारा उजळला |

परमेश्वररुपी इंद्र मज सापडला ||








३) माझा गुरू.


 गुरू ज्ञानाचा उगम संस्कारांचा संगम 

आनंदाचे धाम माझा गुरु ||

गुरु सुखाची प्रचिती चांगुल्याची नीती

 करी लाभाविन प्रीती माझा गुरु ||

 गुरु अमृताची वाणी नित्य श्रवणावी कानी.

 आठवावा ध्यानीमनी माझा गुरु ||

गुरू ज्ञानाचा दीप दाखवी मज पथ

पैलतीरी सोडी सुखरूप माझा गुरु ||

गुरु सदगुणांचा ध्यास गुरु मांगल्याचा वास 

जीवनाचा श्वास माझा गुरु ||

 गुरु मायेची माऊली विसाव्याची साऊली 

आधाराची कृपावली माझा गुरु ||

गुरु अंतरीचे ध्यान गुरुचरणी माझे वंदन 

आत्मज्ञानाचे चंदन माझा गुरु ||







४ . संस्कारांचा परिसस्पर्श...


संस्कारांचा परिसस्पर्श आम्हा मानवांना व्हावा

गुणी सज्जनांचा संग सदा जीवनी घडावा.

नको भिन्नता कशाची मनी द्वेष ना कुणाचा

लाभला हा जन्म आम्हा शोध घेऊया सुखाचा.


उच्चनीच भेदभाव सारे गळुनी पडावे

एकतेचा एक भाव सारे एकरूप व्हावे.

माया ममतेचे बीज हृदया अंतरी रुजावे

फुलूनिया प्रेमाअंकुर नाते सर्वदा बहरावे.


परी चंदनासारखा देह आपला झिजावा

उजळाया जग सारे प्राणदिप हा जळावा.

दुःख झेलूनिया सुख एकमेकांस देऊया

मी पणाला मालवुनी एक विश्वची होऊया.


जन्म माणसाचा आपला भाग्य आमचे हे थोर

सुखे करुया सकलांना जीवनाचा हा विचार.

आम्ही संस्कारांचा आता परिसस्पर्श होऊया

जे का रंजले गांजले सोनियाचे ते करूया.


५. ओव्या


पहाटंच्या ओव्या गात जात्यावं दळीते |

रामाधरमाच्या गं पारी गणगोत मांडीते ||

कीर्ती जगी बाई त्यांची ओव्यातूनी  सांगिते |

ऐकायाला ये रं बा तू पंढरीच्या विठ्ठला ||


पहिली माझी ओवी गं प्रभू रामचंद्राला |

सीतामाई शोधासाठी वणवण फिरला ||

घेऊनिया वानरसेना सेतू सागरी बांधीला |

माथा टेकवितो बाई अशा पतिराजाला ||


दुसरी माझी ओवी गं किती गुण गाऊ गं |

पती सत्यवानाचा जीव घेऊन आली गं ||

पत्नीधर्म पाळावा कसा गं बाईन |

पतिव्रता सावित्री जशी गेली होऊन ||


तिसरे माझे वंदन थोर आई बापाला |

पुण्याईचे फळ आले संत त्यांच्या पोटाला ||

निवृत्ती-ज्ञानेश्वर...सोपान-मुक्ताई |

भक्तिभाव ज्ञान अवघ्या जगाची माऊली ||


चौथे माझे नमन जिजाऊ बाईला |

पुत्र असा घडविला शोभे राजा प्रजेला ||

शूरवीर घेऊन शत्रुसंगे लढून |

शिवबाने बांधले गं स्वराज्याचे तोरण ||


सावित्रीबाई माझी सरस्वती ज्ञानाची |

शिक्षणाची गंगा तिने घरोघरी आणिली ||

तिच्यामुळे बाई माझ्या लेकीबाळी शिकल्या |

थोरमोठ्या जाहल्या नावारूपाला आल्या ||


क्रांतीवीर, नेत्यांनी गं मुक्त केले मातीला |

सुधारक,महात्म्यांनी शहाणे केले देशाला ||

किती ज्ञानी किती गुणी किती कीर्ती वर्णू मी |

 संत,विभूतींनी बाई पावन झाली ही भूमी. ||


शेवटची ओवी माझी माझ्या गं बंधुला |

सीमेवर उभा असे देशाच्या रक्षणाला ||

रात्रंदिवस पहारा देतो गं सैनिक  |

त्याच्या जीवावर आम्हीं राहतो गं सुखात ||

  

                              


     ६.  'पांडुरंगा...'


तूच पांडुरंगा निवारी हा काळ । 

राहिले न बळ अंगी आता  ।। 


चित्त नाही चित्ती जीव जीवापाशी। 

काय माझी स्थिती सांगू तुज  ।। 


मुक्यापरी मन सोसतची जाय । 

 किती हे सायास सहावे मी  ।। 


सुखाचे कारणी दुःखाचा हा भोग ।

 नाही उपभोग मज घ्यावयाचा ।। 


    सोसवेना आता दे गा तू आधार ।   

टाकीतो मी भार तुजवरी ।। 


नको ऐसें जिणे देऊ मज देवा । 

नाही आता हेवा जीवनाचा  ।। 


पुरे झाली आस नको आता वास । 

तुच माझा श्वास पांडुरंगा  ।। 


काय उरे आता इथे माझेपण । 

देई मज ठाव तुजपाशी  ।।




















७. भार तुजवरी


टाकोनिया भार तुजवरी आता | 

राहे कैसी चिंता मज पांडुरंगा ||


तुझे कारणी हा प्राण हे जीवन |

तुज हाती आहे विश्वाचे पालन ||


तूच माय पिता गुरू सर्व दाता |

दाखवीशी वाट मज तू अनंता ||


तूच करवीशी आणि घडविशी |

तूच मोडविशी आणि उभारीशी ||


सुख दुःख व्याप ताप या संसारी |

हरी धावुनिया येई वेळोवेळी ||


कैसे भोग भोगविशी या जीवनी |

न कळे हा खेळ मज पांडुरंगा ||


उगा कैसी आता जीवाशी या भ्रांत |

तुझे ठायी चित्त झालो मी निश्चिन्त ||


८. हरी मुखे म्हणा..


घेऊ टाळ हाती गळ्यामधी वीणा

हरी मुखे म्हणा तुम्हीं हरी मुखे म्हणा !!धृ!!


या रे या लहानथोर करू नामाचा गजर

मिळुनी आनंदाने गाऊ मांडू भक्तीचा जागर !!१!!


तालासुरांच्या संगती ओठी अभंग जुळती

हरी भजनात दंग अवघे भक्तजन होती !!२!!


तुझें नाम आळविता हरली माझी भय चिंता

तूच सकळांचा देवा करता करविता !!३!!


रूप साजिरे गोजिरे विटेवरी असे उभे

सारी त्याचीच लेकरे कोणी नाही इथे दुजे  !!४!!


टाळी वाजवा वाजवा विठ्ठल विठ्ठल बोला

करा जप हरिनामाचा तोच पुण्याईचा ठेवा !!५!!



०९. असे ऋण तयांचे.


मिळाला हा जन्म मज मानवाचा |

उपकार थोर त्या ईश्वराचा ||


घेतलासे जन्म ज्या आईबापा पोटी |

तयांचे ऋण असे अनंत कोटी ||


नित्य करितो मी हे अन्नसेवन |

असो त्या अन्नाशी माझा  प्रणाम ||


प्रकाश, ऊर्जा मज देई भास्कर |

प्रातः समयी त्याशी माझा नमस्कार ||


देई मज ठाव ही धरणीमाता | 

तिच्या ठायी सदैव टेकवितो माथा ||


ज्या प्राणवायूने जिवंत हा प्राण |

करितो मी त्याला रोज प्रणाम ||


पाण्यावाचून का असे हे जीवन |

करितो मी त्याशी नित्य वंदन. ||


ज्या ज्या कृपादाने माझे हे जीवन |

असो त्या सर्वा ठायी माझे नमन ||


दिलासे हा जन्म  सुफळ व्हावा देवा |

अवघ्यांच्या कल्याणा देह माझा झिजावा ||

















१०. बालग्राम प्रार्थना


बालग्राम हे मंदिर आमचे प्रेमळ हळव्या नात्यांचे.

एक दिलाने इथे नांदतो आनंदवन हे साऱ्यांचे. 


मायेची ती उब इथे अन जिवास या आधार मिळे. 

बंधूभाव ही एक भावना सर्वांच्या हृदयात वसे.


बालग्राम हे मंदिर आमचे.. 


ज्ञान ध्यान अन संस्कारांचे धडे गिरवीतो नित्य नवे. 

हातामध्ये हात घेउनी  संगे चालतो पुढे पुढे 


बालग्राम हे मंदिर आमचे.. 


कुटुंब आमचे हे साऱ्यांचे सुख सोहळे सदा घडे.

आनंदी आनंद इथे मन मौजमजाही चोहिकडे 


बालग्राम हे मंदिर आमचे.. 


माय बाप आणि देव आमचाया मंदिरी सर्व मिळे

असे आमची एक प्रार्थना अखंड जीवन त्यास मिळे


११. इंद्रजीत


 'इं'- द्रायणीच्या काठचा ज्ञाना वदतो आपल्या मुखातूनी..

ज्ञानामृताने ओंथबती शब्दे पाझरती हृदयातूनी.


'द्र'- वती पाषाणहृदयेही आपुल्या शीतल वाणीने

धन्य होती वाणी वर्षावात भिजूनी अवघ्यांची तने-मने.


'जी'- वा सवे जीव जडवी मायेचा धागा गुंफती आपुली वचने.

चांगुलपणाच्या सुवासाने दरवळती इथली सुमने.


'त'- याजयांच्या सुखाचा ध्यास अखंड आपुल्या हृदयांतळी

अवघ्यांच्या कल्याणाचे साकार करावया स्वप्ने आपुला जिवात्मा तळमळी.









१२. शिक्षका तू वेडा कुंभार 


ज्ञान देऊनी करिशी ज्ञानी..

देशी तया आकार

शिक्षका तू वेडा कुंभार 

शिक्षका तू वेडा कुंभार 


खडू फळा आणि शाळा 

विद्यार्थ्यांचा भोवती पसारा

ज्ञानार्थी मग ये आकारा

तुझ्या ज्ञानाच्या उतरंडीला

नसे अंत ना पार


तू वेडा कुंभार,

शिक्षका तू वेडा कुंभार


गुरुजनांचे रूप आगळे

आईसम ते नसे वेगळे

तुझ्याविना हे जीवन नकळे

मुखी तुझ्या रे मंगल वाणी

करीशी रे उद्धार 


तू वेडा कुंभार,

शिक्षका तू वेडा कुंभार



तूच घडविशी तूच मडविशी

कुरवाळीशी तू तूच ताडीशी

न कळे यातून काय जोडीशी

देशी डोळे देशी दृष्टी थोर तुझे उपकार


तू वेडा कुंभार,

शिक्षका तू वेडा कुंभार












१३. माय मराठी


असे आमुची माय भाषा मराठी

 तिची लेकरे आम्ही बोलतो मराठी


ऐकतो मराठी बोलतो मराठी

वाचतो मराठी लिहितो मराठी


संत सज्जनांची महात्म्यांची ही मराठी

वाणी लेखणीतूनी ओसंडते मराठी


घराघरात अंगणात बागडे मराठी

दर्या खोऱ्यात देव्हाऱ्यात वावरे मराठी


मनामनात सोहळ्यात दंगते मराठी

पानाफुलात शिवारात रंगते मराठी


परभाषेचेही आक्रमण झेलते मराठी

आपल्याच माणसांचे सल सोसते मराठी


शूरवीरांच्या नसानसात भिनते मराठी

शौर्याची गाथा सांगताना गर्जते मराठी


आमची शान आमचा मान आमची ही मराठी

जगात ज्ञान बहुमान मिरवते मराठी


आमच्या कणाकणात सर्वांगात ही मराठी

आमच्या रोमारोमात आमची माय ही मराठी

















१४. कविता..


वेदनेला शब्दांत साकारते कविता.

अस्वस्थतेला शब्दरूपात मांडीते कविता.


असह्य दुःखांना मनात कांडीते कविता.

आनंदांचे गाणे कधी होते कविता.


अन्यायावर आसूड ओढीते कविता.

सत्याची कास नेहमी धरिते कविता.


जनात थोर मान मिरविते कविता

अपमानाचे घोट घोटते कविता


कधी कुणाच्या प्रेमात पडते कविता 

कधी कुणाच्या विरहात झुरते कविता.


कधी कुणावर हक्काने रुसते कविता

आपल्याच नादात असते मश्गुल कविता.


कधी कुणाच्या डोळ्यांतून सांडिते कविता

कधी मनातल्या मनात लाजते कविता


मनातील भावनांचा आरसा असते कविता

चांगुलपणाचा वारसा जपिते कविता


कधी विद्रोही कधी प्रेमळ कधी शांत कधी उग्र

कधी निरागस कधी कठोर व्यक्त होते कविता


जशी हवी मनाला तशी उमटते कविता

पुन्हा पुन्हा नव्याने जन्म घेते कविता.















१५. बाप


बाप गरीबीत जगला

बाप गरिबीत झिजला.

आणि शेवटाला बाप

गरिबीतच विझला.

गरिबी होती त्याच्या

पाचवीला पुजलेली.

याच गरिबीशी झुंज

माझ्या बापानं दिलेली.


इवलासा होतो तवा

बोटाला धरून 

शाळला धाडलं होतं

मला माझ्या बापानं.

हातात पुस्तक ठेऊन

बाप म्हणायचा मला.

आमच्या वाट्याला आलं

तुझ्या येऊ नये रं पोरा.

गरिबीचा पांग फेड 

लई लई शिक पोरा 

लई लई शिक शाळा 


उन्हातान्हात बाप

राबराबायाचा 

घरासाठी आपुल्या

रातंदिस खपायाचा

नसायचा पायाला त्याच्या दम

नसे हाताला थारा.

जोडायचा एकेक ठिगळ

फाटक्या संसाराला.


हिंडायाचा बाप रानोमाळ

एकेका घासासाठी

कासावीस व्हायचा 

विझवाया पोटातली आग 

गरीब असूनबी कधी

नाही वागला खोटं

स्वतः राहून उपाशी

भरायचा आमची पोटं.


बाप गरिबीत जगला 

बाप गरिबी भोगला.

किती आली वादळं

बाप नाही घाबरला

किती आली संकटं.

माग नाही सरला.


बाप गेला जवा माझा

गेला मायेचा आधार.

झालो पोरका मी

दिनवाणी लाचार.

बापाविन मी आता

झालो भिकारी

बाप मिळायाचा नाही

नाती मिळतील सारी.

बाप कुणा म्हणू मी

बाप कुठं शोधू मी.

कासावीस होतो बापासाठी

तवा डोळे मिटून घेतो मी

बाप दिसतो मला

आता बंद डोळ्याआड



                

१६. असावे असे माझे गांव.


असावे सुंदर असे माझे गाव

गुण्यागोविंदाने सर्वांनी रहावं


नको कुणी दुःखी असो सर्व सुखी 

गोड वाचा असो सर्वांमुखी


गरीब श्रीमंत नको भेदभाव

सर्वांभूती असो समभाव


आपणची ठेऊ गावची स्वच्छता 

दिसावी सर्वांना सुंदरता


गावाचा विकास मिळुनी करूया 

आम्हीं प्रगतीची कास धरूया


लहानांची कदर मोठ्यांचा आदर

एकत्र कुटूंब तेचि सुखी घर


गुणी सज्जनांचा असो अधिवास

करावा उपदेश सकळ जनास


अवघाची गांव एकीने नांदावं

समृध्द संपन्न गांव माझे व्हावं.




















◾ सामाजिक


१७.  'सजा-ए -मौत'




ए दहशतवादी गद्दार पीठ पीछे  वार करते है |

 कैसे कहूँ दुर्भाग्य है उस धरती का जिसमे पैदा हुई ऐसी जिंदा लाशें |

तुम जिंदा मुर्दों की बात क्या करें, तुम तो मानव जाती पर कलंक हो |

क्या औकात हैं तुम्हारी ? कभी पूछो जन्म देने वाली अपनी माँ को, 

शरम आती होगी,पछताती होगी अपने आप पर,

 जो पैदा हुआ ऐसा पाप अपनी कोकसें |

किसी कोने में छीपकर हमें धमकाते हैं |

लेकिन हम जवाब नहीं देतें |

क्योंकी तुम्हे मालूम है,खुद अपने आपको तुम हो डरपोक 

अपनी दुम टांगो में लेकर किसी आडसे भौंकनेवाले...

अरे हमारे घर के पालतू कुत्तेभी ईमानदारीसे जीते हैं और सामनेसे भौंकते हैं |

सामने आने की हिम्मत नही होती इसलिए पीछे से आते हो बार बार, 

पीठ पर वार करने की आदतें हैं तुम्हारी नामर्दो..

क्योंकी तुम्हें मालूम है,हाथ में बंदूक जरूर होती है पर मन मे वो हिम्मत नहीं |

बम गोलियोंकी ढाल बनाते है पर सीने मे वो धैर्य नहीं |

किसीके टुकडों पर पलनेवाले हरामी टुकड़ो की बाते करते है |

सामने आने की हिम्मत नही डरते है क्योंकि उन्हें मालूम है 


यह अपने टुकडे टुकडे करके जमीन में गाड़ देते है |

इसलिए पीछेसे वार करतें हैं पर तुम क्या मारोगे हमें..

हम तो इस मिट्टी के लिए जीते हैं |

इस देश की मिट्टी के रज-कण में समाया हैं हमारा प्राण.

हम जीते हैं अभिमान से इस मिट्टी के लिए और मरते हैं कहाँ |

बलिदान देते है इस मिट्टी के वास्ते |

 देश कि मिट्टी हमारा प्राण है | हमारें देश के लिए हमारा तन-मन -धन अर्पण है |

 तुम हमें मारते नहीं,हम खुद हमारी धरती माँ के लिये मिटने को तैयार रहते है |

 तुम क्या मारोगे हमें  हमारी शहादत हमें  अमर बना देती हैं |

हमारे बलिदानी खून के एक एक बूंद से तैयार होते हैं नौजवान  हमारे देश की रक्षा के लिए |

कितनो को मारोगे तुम तुम्हारे जैसे टुकड़ो में नहीं बटे हम |

बल्की हम एक है और बलिदान पर खडा हुआ सारा ए देश हैं |


और इस देश ने ही सिखाया है हमें देश पर मर मिटने के लिए |

हम डरते नही किसी से,लढते है खडे होकर सामने से सामना करने  का हौसला रख कर |

एक बार सिर्फ एक बार हमसे आमने-सामने का मुकाबला करके देखों,

माँ कसम तुम्हारी रूह भी अंदर से कांप उठेगी

अब वो दिन दूर नहीं गिनते रहो.. इंतजार की घड़ी पल-पल तुम्हारी मौत नजदीक ले आएगी..|

बदला तो जरूर लेंगे..

पीछे से वार करनेवालों.. तैयार रहना पीछे से नहीं सामने से तुम्हारी मौत चलकर आएगी |

सर्जिकल स्ट्राईक तो एक ट्रेलर था |

अब सजा-ए- मौत पूरी की पूरी होगी |


                      जय हिंद ! वन्दे मातरम !!



















१८. गांव विकताना पाहिला



दिवसाढवळ्या  लोकशाहीचा उदो उदो पाहिला.

आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.

बोल किती द्यायचं पाचशे हजार..दोन हजार मताला.?

अहो तुम्ही द्याल तेवढं मी हायचं की तयार घ्यायला.

तो बघा आताच हजार देऊन गेला तुम्ही किती देताय.?

हे घे दोन हजार त्याच्यापेक्षा डब्बल.

मी काय कमी वाटलो का काय..?

मग उचल भंडारा,घे शपथ,म्हण माझं मत नाही बदलत.

हा बघ उचलला,घेतली शपथ तुझ्या आईच्यान नाही बदलत..

दारू आमची मजा तुमची जाऊ दे गाडी सरळ धाब्यावरती.

खा-प्या भरा पोटं आडवं- तिडवं पण बोट बरोबर बटणावरती.

दारू मटण पैशावरती गांव ताव मारताना पाहिला.

आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.

काय होता इतिहास इथे मातीचा... मातीसाठी माणसांचा.

सारं काही विसरला माणूस क्षणात पैशासाठी बदलला.

आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.

स्वराज्यासाठी,मातीसाठी,राजाच्या एका शब्दासाठी 

जान कुर्बान करायचीत इथं माणसं.

आणि आता कोण कुठला ,कुणाच्या स्वार्थासाठी

 आज स्वतःलाच विकायला तयार झालीत माणसं.

भंडारा उचलायचे इथे एकेकाळी हर हर महादेवाच्या घोषात

 मातीच्या इमानासाठी आमचे जिगरबाज मावळे

आणि आज स्वार्थासाठी देवालाचं गहाण टाकून

 चोरी छुपे उचलतायत भंडारा बेईमान कावळे.

आयुष्य वेचलं की रे घरादारावर तुळशीपत्र ठेऊन 

त्या महान लोकांनी या मातीला स्वातंत्र्य मिळवून दिलं.

आणि आपल्याचं स्वार्थासाठी निष्ठा विकून

 तुम्हीं स्वतःला एवढं कवडीमोल होऊ दिलं.

अरे तरुणांनो,तुमच्या वयाचे असताना

 भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फासावर गेलेत या देशासाठी.

का सळसळत नाही असं तुमचं ताजं रक्त निदान गावासाठी तरी?

जिवंतपणीच बांधलं की रे कफन डोक्याला त्यांनी या मातीसाठी.

आणि तुम्हीं कुणाच्या पैशाची बाटली ओठाला लावून

 तरुण रक्ताला बाटवताय कुणासाठी..?

सत्ताच पाहिजे आहे,गावचा विकास-प्रगती करायची आहे

मग त्यासाठी का तुम्हाला पैशाचा एवढा खेळ करावा लागला..?

आणि पाच वर्षांसाठी लोकांचा विश्वास तुम्हांला विकत घ्यावा लागला ?

घेणाऱ्यांनी आणि देणाऱ्यांनीही बघा कसा सत्तेसाठी घोडेबाजार मांडला.

आणि रात्रीच माझा गांव मी विकताना पाहिला.

दिवसाढवळ्या लोकशाहीचा उदो उदो...

लोकशाही.. लोकशाही.. लोकशाही...

कुठली लोकशाही....?


रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा गळा घोटताना पाहिला

आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.



















१९. भ्रष्टाचार.


शिष्टाचाराने भ्रष्टाचाराचं पालन पोषण करत रहायचं नुसतं.

मी का म्हणतोय असं...

स्वमतांध स्वार्थी लुटारूंची टोळी व्यस्त आहे राजरोस 

वर पासून खालीपर्यंत आपापल्या परीने लुटायला. 

काळ्या कृत्यांची ही धडपड सुरू असते

स्वच्छ सफेद कपडे घालून...

खुर्चीत बसून..

खोटे मुखवटे चढवून..  

पैशाच्या कुरणावर चरतायेत असे बोकड असहायतेचा फायदा घेत 

ताटाखालचं मांजर बनून तळवे चाटणारे त्यांचे दलाल लाळ घोटत 

असतातच त्यांच्या सोबत असहायतेचे बळी शोधत.

व्यवस्थेने  विश्वासाने सोपवलेल्या अधिकाराचा

गैरवापर करून आपल्या सोयीने हवा तेवढा हवा तसा 

टेबलाखालून टेबलावरून केला जातो कारभार.

देशात राहून देशचं लुटायला बसलेत हे देशद्रोही.

जणू यांची घरं भरण्यासाठीचं नाही का..

त्या देश बांधवांनी आपल्या घरांची राखरांगोळी केली.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे, देशाचे रक्षण करणारे 

देशासाठी देतात जीवाची कुर्बानी

आणि आपल्याच घरात राहून आपलीच चोरी करून आपले घर भरणारे

तयार झालेत हरामी.

घरचे कुत्रेदेखील इमानदारीने खातात आणि इमानदारीने चाकरी करतात.

परंतु खाणाऱ्या भाकरीशी बेईमानी करून खायच्या ताटात माती कालवणारे

कागदाच्या चार तुकड्यासाठी इमानदारी गहाण ठेवतात. 

किती खायचं कुणाचं खायचं यांच्या खाण्याला काही माप..?

अरे सुटलेल्या पोटावरचं बटन तुटेपर्यंत भरतात पोटं अमाप.

नियम कायदयाच्या कचाट्याची दिली जाते धमकी आणि बंद केली जाते बोलती.

ज्या व्यवस्थेने जन्माला घातलं तिच्यावरचं करतात दिवसाढवळ्या बलात्कार.

आणि मग वरून अशा नालायकांचाचं लोकांना करावा लागतो सत्कार.

कधी लपून छपून कधी उघडपणे केला जातो असत्याचा प्रयोग राष्ट्रपित्याच्या साक्षीने.

आणि दिलं जातं आव्हान सत्यालाच बिनधास्तपणे

देशात राहून आपल्याच व्यवस्थेला लुटणारे गद्दार कमी नाहीत

 हजारो कोटींचे घोटाळे आता काही देशाला नवे नाहीत आणि.

देशालाच लुटून देशाबाहेर पळून जाणारे चोरटे काही मामुली नाहीत

बेंधुद मुजोर होऊन या व्यवस्थेची अब्रू लुटणारे,तिचा उपभोग घेणारे

धनपिपासू  शोषत आहेत या व्यवस्थेला रात्रंदिवस.

हे असेच राजरोस करत राहतील तिच्यावर बलात्कार

आणि जन्माला घालतील 

आपल्यासारखंच भ्रष्टाचाराचं गोंडस पिल्लू

आणि मग शिष्टाचाराने या भ्रष्टाचाराचं पालन पोषण करत रहायचं नुसतं..

आणि म्हणून मी म्हणतोय...

शिष्टाचाराने या भ्रष्टाचाराचं पालन पोषण करत रहायचं नुसतं..


हे असंच चालू आहे आजपर्यंत.

ते शोषत आले ,शोषत आहेत आणि इथून पुढेही शोषत राहतील.

ते शोषक आणि आपण शोषित... 

त्यांनी शोषण करत रहायचं, जमेल तसं आपण सहन करायचं.

नाही तरी आपण काय करू शकतो..?

उघड्या डोळ्यांनी पाहत मूग गिळून गप्प बसायचं.

आपणच नुसतं आतून पेटून उठायचं.

तनामनाला आग लागते..याच्यापलीकडे काही नाही.

आणि त्यांच्या बुडाला आग लावण्याचं धाडस अजूनही 

आपल्यात का नाही..?













२०. कामगार.


का- मात सदा झिजविलास आयुष्याचा प्रत्येक क्षण तू 

 कष्टाच्या बळावर जगण्याच्या संघर्ष दिनरात पेलास तू 


म- ळले शरीर तुझे राबवण्याच्या झुंजीत सदा झगडले

तुझ्या कायेच्या रगडण्यावर कुणाच्या मायेचे स्वप्न बहरले


 गा- ठलीस उमर गेली कष्टात हयात सारी

कवडी मोलाच्या मोबदल्यात गहाण  झाली जिंदगी प्यारी


र- णरणत्यात्या धगधगत्या संघर्षाच्या झळा सोसल्यास तू

 ओघळत्या घामाच्या धारातुनी आनंदाच्या सरी घरी बरसल्यास तू









२१. 'अजून अशा किती निर्भया..?'


परवा दिल्ली,काल कोपर्डी, आज प्रियांका रेड्डी

'अजून अशा किती निर्भया..?'

नाही ना थांबला हा अत्याचार.. आपल्या समाजातील नाही ना बदलल हे चित्र....

अजूनही घडतायेत राजरोसपणे बलात्कारी घटनांचे सत्र...

दिल्लीत घडल्या त्या घटनेने गल्लीपर्यंत हादरलो होतो आपण..

आणि मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत किती केली होती आंदोलने आपण..?

किती पेटल्या मेणबत्त्या श्रद्धांजलीसाठी...?

किती केला आकांडतांडव..? त्यावेळी...आजही...अजूनही करतोय आम्हीं.

पण नाही थांबवू शकत...नाही संपवू शकत... समाजातील ही वृत्ती अघोरी..

निर्भयासारखीच पुनरावृत्ती घडतेय आमच्या डोळ्यामाघारी..

सोसणाऱ्या अशा किती निर्भया जगताहेत मरणयातना घेऊन भयाप्रमाणे...

आणि भोगणारे मात्र निर्लज्ज नराधम फिरताहेत उजळ माथ्याने आणि जगताहेत निर्भयपणे...

सोसणाऱ्यांना निखळ श्वास आपण देऊ नाही शकत..

आणि भोगणाऱ्यांचे श्वास आपण घेऊ नाही शकत..

वासनांध राक्षस विझवून टाकताहेत आमची एकेक पणती..

आणि मग काय उरतं आमच्या हातात..?

तिच्याच श्रद्धांजलीसाठी एक मेणबत्ती...?

उरावरचा राक्षस झेलताना आठवला असेल ना तिला आपला बाप ...आई...भाऊ...बहीण..

घातली असेल ना साद एखाद्या माणूसपणाला..

जिवाच्या आकांताने फोडली असेल ना आभाळभरून किंकाळी तिने..?

वेदनेची ती किंकाळी कुणाच्याही कानात शिरली नसेल का.?

 .....त्या नराधम राक्षसांना हे पाप करताना वाटलं नसेल का अशीच एक मागे.....

माझी आई आहे,माझी बहीण आहे..अशीच पोटची लेक आहे..

वाटली नसेल का थोडी तरी लाज..?

अखेर तळमळणाऱ्या शरीरातील प्राण घेऊनच त्यांनी तिची सुटका करायची.

हीच पद्धत आहे अशा नालायकांची...

निष्पापाचा बळी देऊन शेवटी वासनेची भूक भागवायची.

अरे एकट्या नारीवरती तुम्हीं वासनेचं बंड केला.

 तिथेच तुम्ही तुमच्यातला षंढ पुरुषार्थ सिद्ध केला.

नराधमांनो...

               तुमच्या नरडीचा घोट घेणारा दोर...

तुमच्या गळ्याभोवती जोपर्यंत आवळणार नाही...

तोपर्यंत त्या निष्पाप जीवांचा आत्मा...

आणि आमच्या उरातील आग थंड होणार नाही...

कायद्याने हात बांधलेत म्हणून...

 नाही तर...

इथे टकमक टोकाचा...आणि कलम करण्याचा इतिहास आहे...

खबरदार...





२२. ऑनर किलिंग.


न्याय मिळालाच पाहिजे.


इवल्याच्या वीट भट्टीवर नेऊन भर दिवसा नितीनची यांनी वाट लावली 

आणि कोवळ्या देहावर नंगानाच करून जिवंतपणीच त्याची विटंबना केली.

                                   कुणी हातपाय मोडतो कोण उराशी खेळतो गुर्मीत कुणी त्याला मातीत लोळवतो 

ही कुठली रीत म्हणायची तप्त गरम सळ्या त्याच्या शरीरात भोसकतो.

अहो क्रुरपणालाही काही अंत असतो निर्घृणपणे तुम्ही असा त्याचा खून केलात

 केलात तो केलात गावच्या वेशीवर नेवून लिंबाच्या झाडाला त्याला  फाशीला दिलात

 हद्द पहा मारणाऱ्यांची मारून फासावर देणाऱ्यांची कुठपर्यंत गेली.

 जातीच्या मस्तीत जगणाऱ्या या जातीयवाद्यांची नशा आता कोणत्या थराला गेली.

 म्हणे दलिताने प्रेम करू नये वरच्या जातीच्या मुलीवर

 आणि म्हणूनच आमचा नितीन गेला हाक नाक फासावर 

अरे मुक्या जनावरावर जरी प्रेम केलं तरी ते इमान राखतं माणसाशी

 आणि माणसावर जर प्रेम केलं तर माणूसच बेईमान होतो इथे माणूसाशी.

 आहो माणूस आहोत आपण माणूस माणसावरतीच प्रेम करणार

   पण जातीच्या विषानं पोसलेल्या तुमच्या मनाला

 खऱ्या माणसांचं प्रेम कसं कळणार..?

अरे कोण दलित,कोण सवर्ण कोण उच्च कोण निच्च आम्हीं मानतच नाही अशी जातीची बंधनं 

तुमच्यासारख्या अशा जातीच्या कुबड्या घेऊन कधीच नसतं आमचं जगणं.

 आम्हाला ठाऊक आहे फक्त एकच माणूस नावाची जात 

कुणाला निच्च ठरवता..? अरे निर्लज्जनालायकांनो निच्च तर तुम्ही

 आता विचारा तुमच्याच मनाला तुम्हाला माणसांच्या जातीत

 माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे काय.?

 भेकड जातीच्या नामर्दांनो असे एकट्या कोवळ्या जीवाला मारून जात काय मिरवता.

जातीची लढाईचं जर करायची असेल तर ती आमच्याशी करा असे समोर येऊन.

 तापलेलेल्या लालबुंद सळ्या आमच्याकडेही आहेत अजूनही जागे व्हा.

 एकदा का ही माणूस नावाची जात पेटली की, तुमच्या कुठे कुठे कोंबेल ते पहा.

 आज अवघा महाराष्ट्र हळहळतोय नितीनसाठी.

 कोण आहे त्यात दलित आणि कोण आहे सवर्ण.

लक्षात ठेवा प्रेमाला आणि भावनेला कोणतीही जात नाही.

माणूस आहोत आम्ही माणसावरतीच प्रेम करणार.

याद राखा जातीयवाद्यानो पुन्हा कुणाला नितीन करायचा प्रयत्न कराल

 ही माणूस नावाची जात तुम्हाला तुमच्या जातीच्या मुळासकट ठेचायला मागे नाही पडणार.

 आबा आले, बाबा आले, दादा आले सांत्वन करून दुःखाचे

 जरूर न्याय देण्याचे आश्वासन देऊन गेले 

सुखाची आश्वासन आणि दुःखाची सांत्वन या पलीकडे महाराष्ट्रानं आजपर्यंतय  बघितलं तरी काय..?

अन्याय ,अत्याचार, जाती द्वेष वाढतोत दिवसेंदिवस महाराष्ट्र बदलतोय आम्ही नाही म्हणतोय की काय.

अन्याय अत्याचाराचे डाग कधी पडलेत तुमच्या व्हाईट कपड्यावर तसं तुम्हाला आमचं दुखणं कळेल.

 तुमचे पाय हल्ली असतातच कुठे जमिनीवर तस जातीच्या मातीत मळलेलं आमचं तुम्हाला जगण कळेल.

  दिवसाढवळ्या जातीयवाद्यांनी खून करून प्रेताला वेशीवर नेऊन झाडाला टांगल.

आणि सबळ पुराव्या अभावी  न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केलं.

नितीनचा खून केला हे तर सिद्ध आहे आणि कोणी केला आहे तर साऱ्या जगाला ठावं  आहे

 मग एवढं प्रकरण घडून सुद्धा कसे निर्दोष सुटलेत खुनी.

 मग न्यायालयाने हे पण सांगावं नितीनचे खरे मारेकरी आहेत तरी कुणी..?

साक्षीदार फितूर होऊन आरोपीला सामील झाले

 पैसे घेऊन खऱ्याला खोटं म्हणायला तयार झाले.

 मेलेल्याच्या टाळू वरील लोणी खाणारी ही जात बघा त्यांच्या पेक्षा आहे का वेगळी.

 पैशाने बघा कशी माणसे विकत घेता येतात अशी दुबळी.

अन्यायाच्या पारड्यात पैसे घेऊन मत टाकणाऱ्या साक्षीदारांनो

 तुमच्यात ईतका लाचारीपणा का आला हो

तुमची नीती इतकी भ्रष्ट का झाली तुमच्या पोटाला असा एकही नितीन नाही का हो..?

 अजूनही आमचा न्यायदेवते विश्वास आहे तुझ्यावर म्हणून प्रतीक्षा करतोय न्यायची 

मग शेवटी आमच्या हेच पदरी काय गं..?

माफ कर पण वाटतं कधी कधी मनात न्यायदेवते

तुझ्या बंद डोळ्याआड सुद्धा जातीयता लपली आहे काय गं..?

सुरुवात अन्यायाने झाली शेवट न्यायाने झाला पाहिजे 

सुरुवात फाशीने झाली होती शेवट फाशीनेचं झाला पाहिजे.







      २३.   सरकारीच पाहिजे.


आवं पावणं पोरगं निरोगी,निर्व्यसनी हाय.

चांगलं धट्टा-कट्टा,धडपडी,हरहुन्नरी हाय....


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीच पायजे हाय.


पावणं...पोरगं चांगलं शिकल्यालं हाय,सुशिक्षितबी हाय..

पण एवढंच काय,जरा खाजगी नोकरीला हाय.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


प्रामाणिक हाय हं...पोरगं. 

चांगल्या विचारांचं हाय.

लई चांगल्या गुणांचं, माणुसकीला धरून हाय.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.



बरं... पोरगं उद्योगी हाय..चांगला पैसा कमावणारा हाय...

घरदार बघितला तर सगळं जिथल्या तिथं हाय.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


पावणं चार एकर शेती हाय, पोरगा उत्तम शेती करतो..

कायबी कमी न्हाय गुण्यागोविंदाने राहतो.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


पोरगा माप शिकलाय पण 

व्यवसाय करायचा म्हणतोय,


लाथ मारील तिथं पाणी काढल..

आसं खणखणीत नाणं हाय.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


                                                 स्वभावानं पोरगं बघा,एक नंबरी हाय..

आई-बाच्या शब्दाबाहीर जरासुद्धा न्हाय.


पैसा आडका धन दौलत काय कमी न्हाय

खाऊनपिऊन सगळं कसं सुखामधी हाय..


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


सरकारी...सरकारी...सरकारी.

बरं पावणं हाय एक पोरगं आसं.

तुम्हीं म्हणताय तसं..


वरून दिसायला माप चांगलं पण गुणानं चांगलं नाय...

व्यसनीबी हाय आणि जरा रोगीबी हाय.


नोकरी हाय म्हणायची सरकारी,

पण कसं वागायचं कळत नाय..


लाचारासारखा वागतो, थोडा भ्रष्टाचारही करतो..

प्रमाणिक तर नाही,

ना कुणाशी देणं-घेणं.

सदा आपल्याच तोऱ्यामोऱ्यात.

नाही विचार करून वागणं.


पगार माप चांगला हाय खरं वागण्याची अक्कल नाय

पण एवढं मात्र नक्की पोरगं सरकारीचं हाय..

मग काय पावणं...? याच्यापुढं तुमचा इचार तरी काय..?


पावणं ते काय बी आसू दे..

पोरगं नक्की सरकारीच नवं हाय...

याच्यापुढं कसलाच इचार पाचार न्हाय. 













२४. भूक




तिच्या दोनचार पैशांच्या वाटीचा तो खडखडाट प्रत्येकजण ऐकत होता.

पण तिला ना कुणाला त्याच काहीही वाटत नव्हतं.

कोवळ्या हातातील तो भला कितीदा ती न्याहाळायची.

आणि तसाच एकेक रुपया ती झोळीमध्ये टाकून द्यायची.

मुठीमधल्या त्या पैशांची गणितं तिला अजिबात मांडता येत नव्हती.

गोल बंद्या रुपयाशी ती फक्त खेळत असायची.

कोवळे गोबरे गाल,मऊशार ओठ किती सुदंर दिसत होती.

चमकणाऱ्या सोनेरी केसांची वेणी पण पार विस्कटून गेली होती.

सजली धजली असती तर गोडशी परीच शोभली असती

पण कुणाचं ठाऊक ती अशी असूनही ती तशी का दिसत नव्हती.

खेळण्या बागडण्याचं वय पण खांद्याला झोळी अडकलेली

पाणीदार डोळ्यातील तिची नजर सतत कुणाला तरी न्याहाळणारी.

माणसांच्या मागे धावून ती अनेकदा थकून जायची.

पण येणाजाणाऱ्यांच्या पुढे ती पुन्हां पुन्हां हात पसरायची.

वाटीत पडणारा एकेक पैसा पाहून ती खूप आनंदीत व्हायची

आणि आनंदाच्या भरात वाटीमधला पैसा ती हवेत उडवायची.

लोकांनी तिच्या वाटीत टाकलेला एकेक पैसा म्हणजे तिला घातलेली भीक होती.

पण यातलं तिला काहीही कळत नव्हतं ना याच्याशी तिला काहीही देणंघेणं नव्हतं.

कारण कोवळ्या वयाच्या पोटात मात्र एकच भूक होती.






















२५.  learn or not to learn ..


learn or not to learn that is the question

शिकावं की शिकू नये हा एक सवाल आहे....

             या शिक्षणाच्या बाजारात कवडीमोल झालेली पदव्यांची सर्टीफिकेटं घेऊन.... 

फिरावं नोकरीसाठी बेशरम, लाचार आनंदानं...की,फेकून द्यावी ही सहनशीलतेची सगळी किल्मिश

 आत्मसात केलेल्या मूल्यांच्या तत्वासह अंधकारमय अज्ञानाच्या काळ्याशार डोहामध्ये...

आणि करावा शेवट अशा अन्यायी व्यवस्थेचा... सर्वांचा सहभाग घेऊन 

माझा,तुझा,याचा आणि त्याचाही...

संतापी उद्रेकाच्या महासर्पानं या व्यवस्थेला असा डंख मारावा

की,नंतर होणाऱ्या त्यांच्या पश्चातापला नसावा कोणाच्याही सहानुभूतीचा किनारा कसलाही...

पण या निर्लज्ज व्यवस्थेलाही पुन्हा तीच स्वार्थीपणाची स्वप्नं पडू लागली तर... तर...

इथंच मेख आहे.

प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष करण्याचा धीर होत नाही.

 म्हणून आम्हीं सहन करतो हे बेकारीच लाजिरवाणी जगणं...

सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं आमच्या स्वाभिमानावर होणारे अत्याचार...

बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवलेल्या गुणवत्तेची,मूल्य संस्कारांची विटंबना...

आणि अखेर लाचारीपणाचा कटोरा घेऊन आम्ही उभे राहतो.... खालच्या मानेने...

'युवाशक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती' नावाचं गाजर दाखवून आम्हांला भिकेला लावलेल्या या व्यवस्थेच्या दाराशी....

विधात्या तूच बघ...ही व्यवस्था कशी कठोर झाली..

एका बाजूला कितीही प्रामाणिकपणे अभ्यास केला तरी गुणवत्तेपेक्षा पैसे भरून शिक्षण घ्यावं लागतं.

आणि दुसऱ्या बाजूला कितीही चांगलं शिक्षण घेतलं तरी लाचार होऊन नोकरीसाठी दारोदार फिरावं लागतं...

मग आमच्या आईवडिलांनी अपार कष्टातून दिलेल्या या शिक्षणाला 

आणि आम्हीं रात्रंदिवस अभ्यास करून मिळवलेल्या या गुणवत्तेला तिलांजली देऊन...

हे करूणाकरा...

आम्हीं शिक्षित तरुणांनी आणखीन कोणत्या व्यवस्थेचा गुलाम म्हणून जगायचं रे...आणि कसं जगायचं...???



२६. आम्ही सारे भारतीय 


मी माझ्यापुरता तू तुझ्यापुरता.

 हा आमचा माणूस तो तुमचा माणूस 

हा आमच्या गटाचा तो तुमच्या गटाचा

 हा आमच्या पक्षाचा तुमच्या पक्षाचा 

हा आमचा प्रांत तुमचा प्रांत

हा आमचा गाव तो तुमचा गांव

 हे आमचे राज्य ते तुमचे राज्य 

ही आमची भाषा ती तुमची भाषा

 ही आमची संस्कृती ती तुमची संस्कृती 

ही आमची जात ती तुमची जात 

हा आमचा धर्म तो तुमचा धर्म

 असे आपणच आपल्यामध्ये वाटून घेऊ.

आणि म्हणताना मात्र 'आम्ही सारे भारतीय एक आहोत' 

असे अभिमानाने म्हणू.








■ शेती.


२७. माझा शेतकरी बाप


भाताच्या राशीवर उभा हाय माझा बाप 

वाऱ्यासंग हालतय त्याच्या हातातलं सूप 

धार सुरात लावूनी दाणं सांडतोय खाली.

पालापाचोळ्याला उडून जायाची हो घाई 


खोल उरामधी त्याच्या आनंदाची लाट वाही

 खुळ्यागत माझा बाप गाणी ओठावर गाई

वारं थांबल की साऱ्या शिवारात पाही

भाकरीच्या आधाराची हीच काळी आई.


 कष्टाच्या हातानं सारं शिवार फुलवलेलं

 दगडा धोंड्यासंग ठेचा खाऊन रक्तही सांडलेलं 

जुन्या डोळ्यांमध्ये त्याच्या काळी माती दिसायाची 

त्याच्या आसवांची ओघळ हीच माती गिळायाची


झाडाच्या सावलीला माय सोडायाची भाकर

पोटभर जेऊनीया बाप द्यायचा ढेकर.

उशी करून  दगडाची छाया बाभळीच्या झाडाची 

सवय होती माझ्या बाला मातीवर झोपायाची.


दिस बुडायला बाप दाणं पोत्यात भरायचा 

सोनं दिलं त्या मातीवर माथा टेकवायाचा.

हात जोडोनी बाप काळ्या आई म्हणायचा.

मांडलाय तुझ्या कुशीत माझा खेळ संसाराचा.
















२८. पीक.


शेतामधी माझं पीकं माझं मायेचे लेकरू

डुलतं गं वाऱ्यावर माझ्या लाडाचा पाखरू

माय धरित्रीच्या पोटी बाई बीज मी पेरला

 उसवली कुस तिची आत बीज अंकुरला.


ओल्या पदरात तान्हं खेळत गं बागडतं.

कोंब कोवळे अजून दुमडलेल्या पानात.

पाते फुटूनिया आज तरारूनी उभारीला

दिसे हिरव्या रंगात किती छान गोतावळा 


हात फिरवी रानवारा त्याच्या माथ्यावर मायेने 

आंजाराती गोंजारती सकाळची सोनसळी किरणे

वेली सजल्या धजल्या बाई काठाच्या बांधला

 चारी बाजूनी शिवार कसा झोकात फुलला 


सेवा करीते मी त्यांची बाई उन्हात तान्हात

रोज उसाभर त्यांची मला करावी लागत 

आलं पिकं पोसावूनी ऐन जोमाच्या भरात.

राजबिंडे दिसे रूप उभारिले गं थाटात.


 मणीमुकुट मोत्यांचा त्यांच्या आला शिरावर

 धनधान्यांचे तोरण बहरले अंगावर.

 काळ्याआईची श्रीमंती झाला आनंद ऊरात 

राज पिकांचं पाहूनी दिष्ट काढते मनात


 दान पदरात माझ्या त्याने भरून घातलं 

धनधान्याच्या राशींनं माझं घर गं मुजलं 

सारं दिल लेकरानं किती उपकार त्याचा

पांग फेडला गं त्यानं जन्म देणाऱ्या आईचा














२९. धरित्रीचा बाळ.


माझी धरित्री गं माय

ओली बाळंतीण बाय

तिच्या कुशीतून कसं

अंकुरलं तान्हं बिय...


मऊ मऊ लोण्यागत

ओल्या मायेचा पदर

पिकबाळराजा तिचा

पोसतो तिच्या अंगावर


कोळ कोळ किती पात

इवलासा नाजूक देठ

दिस साजिरं गोजिरं

कुठं लावू त्याला तिटं


सुवासिनीगत बाई

झाडवेली गं सजल्या

धरित्रीच्या या लेकीबाळी 

बाळ पाहुनी नटल्या.


गडी राकट रांगडा

बाळ मायेचा आधार

उभा पाठीशी तो हाय

भाऊ पाठचा डोंगर.


वारा झुलवतो झुला 

खेळवतो बाळराजा

सवंगडी वारा करतुया

लाडक्याला गुदगुल्या.


आली नणंद काठाला

नदी धरित्रीला भेटाया

आलं तिला गं भरून

बाळराजाला बघून 


तान्हा पीकबाळ त्याला 

किती जपावं जपावं.

माया करावी तरी कशी

कोडकौतुक करावं.


बाप मेघराजा येतो

माय-लेकरांची भेट घेतो

त्यांचा बाळपिकराजा

कसा दिसामासानं वाढतो.





















  ३०.  पान्हा आटला.


माझा पोटचा गोळा गं राती चिकटला छाती

किती चघळल बाई काय दूध नाही वटी.

कसा हुंदका आवरू कसं जीवाला मी साहू

 तान्ह्या उपाशी पोटाचं कुठं बाई पाप फेडू 


किती पोटाला जाळावं काय खायला मिळना

किती राबून मी मरावं कसं जगावं कळना.

 काय बांधू पोटावर काय हाताला गावना

 जसा वाळला शिवार तसा पान्हा गं आटला.


कशी सोसावी ही झळ करपलं गं डोंगर.

इथं मरण भोगत रोज जळत सरण.

 टाक भर पाण्यासाठी माळरान गं सोकला

 डोळा साठवून पाणी जीव कोणी गं सोडला.


भेगाळल्या भुई परी भेगाळला माझा जीव

 कुठल्या सांदीत कोंबू भागला गं  माझा जीव.

 रान उपाशी ठेवूनी उरी सुकली गं माती 

वल आटली मायेची पोरं असूनी वांझूटी.


रातभर गोळा माझा डोळ्याखाली गं भिजला.

किती आवळू पोटाशी पान्हा नाही गं सुटला.

ओल्यापणी का ह्यो भोग बाई पान्हा का सुकला.

माय असूनी जवळ बाळ उपाशी निजला.

 


















३१. पोशिंद्याला वाली कोण ?


भला मोठा मळवट माय कपाळी लावायची आणि

भल्या पहाटे घाईघाईने धन्यासाठी

भाकरी बडवायला लागायची

शेतकरी धनी तिचा झुंजूमंजू उजेडात

खांदी नांगराचा फाळ, घेऊनिया दोन लडिवाळ

पायवाटेने तो बीगीबीगी शेतावर जायचा.


कासऱ्याची दोरी हाती एक हात पाठीवर

भार सोसायाचा बैलराजा जु घेऊन मानेवर

चार पायांचं रे बळ खर्ची पडे रात्रंदिन

कष्ट करी मुका जीव लावी संसारी हातभार

किती राबतो कष्टतो धारा घेऊनि माथ्यावर

उभ्या जन्मीचा संसार मायमातीच्या उरावर


उगा नाही म्हणत त्याला साऱ्या जगाचा पोशिंदा

जगा पोसणारा बंदा त्याच्या शिरी रोज राबण्याचा धंदा

आज चंद्रा मंगळावरी पाय पोहोचले मानवाचे

तरी प्रत्येकाच्या मुखी घास अजुनी त्याच्याच कष्टाचे


एकीकडे निसर्ग तर दुसरीकडे ही व्यवस्था

कुणाकुणाशी हा त्याचा संघर्ष..?

भाव मिळण्यासाठी पिकाला वर्षावर्षाला व्यवस्थेशी आंदोलन

तर एक वर्षी पीक करपून गेलं दुष्काळानं आणि एकदा तर

आलेलं भरलं पीक नेल गारपिटीनं


माय मातीला मानून मातीसंगे माती झाला

पण कर्जापायी स्वतःचीचं माती करून गेला

जिच्या कुशीत मांडला खेळ सारा संसाराचा 

तिचीच कूस तो पोरकी का करून गेला


कृषिप्रधान देशात आज शेतकरी गळफास लावून घेत आहे

जगाला पोसणाऱ्या संस्कृतीचा हा ऱ्हास नव्हे का..?

किती शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी अजून..?


सांगा या पोशिंद्याचा वाली कोण व्हायचं..?

आता नाही तर मग कधी खाल्लेल्या अन्नाला जागायचं.

खरंच अशी वेळ किती माऊलींच्यावर येणार ?

भल्या पहाटे मोकळ्या कपाळी माय कुणासाठी भाकरी बडवणार..?






◾ स्त्री.


३२.  माझ्या कोकणी माहेरा...


कोकणात बाई माझं दूर दूर गं माहेर,

आंब्याफणसाच्या खाली माझं इवलसं घरं.

दारी माझी माऊली गं सारं शिंपते अंगण,

रोज पुजुनी तुळस तिला करिते नमन.


धरित्रीच्या उरावर लाल मातीचा पदर,

तिच्या कुशीत नांदतो झाडवेलींचा संसार.

हिरव्या रानानं बाई सारं सजतं शिवार,

शेतामधी उभं पीक डुलत गं वाऱ्यावर.


पहाटेच्या गात ओव्या जाग येई माझ्या गावा,

गाय पाजते वासरा धारा काढतात बाया.

उंच राऊळी कळस बाई शोभतो गावात,

पहाटेच्यापारी भक्त देवाला गं भजतात.


काय सांगू माझी माय हाय ती  गरीब गाय,

राबता राबता तिला येते रोज माझी सय.

बाप माझा देवभोळा उन्हातान्हात खपतो,

रांतदिस राबून तो माझ्या घराला पोसतो.


भाऊ पाठचा माझा गं हाय अजुनी लहान,

काय सांगू बाई त्याची रोज येते आठवण.

लाडकी बहीण माझी माझी करिते काळजी ,

लई चांगल्या गुणांची हाय शोभा ती घराची .


माझ्या मनीच्या सांगू गं किती गोड आठवणी,

रानोमाळाच्या वाटांनी संगे फिरू साऱ्याजनी.

भातुकलीचा खेळ मांडू तळ्याकाठी झाडापाशी,

रोज गाणी गप्पा गोष्टी संगे चार मैत्रिणींशी.


अशा साऱ्या आठवांनी रोज दिवस सरतो,

बोलू कुणापाशी बाई जीव एकला उरतो.

किती आठवू मनात पाणी डोळ्यात दाटत,

देह सोडूनि राहिला जीव माझा माहेरात.


गाठलं वरीस बाई कधी भेटेन माहेरा,

नको लावूस उशीर ने रे मला तू माघारा.

रोज पाहते मी वाट कधी येशील तू घरा,

नेशील कधी मला तू माझ्या कोकणी माहेरा.


३३. तिचं अस्तित्व..



कसायाच्या दाव्याला बांधावी गरीब गाय 

तशा बांधल्या जातात पोरी यांच्या घरात

 असहाय्य गरिबीने पिचलेल्या मायबापाच्या.

मारला जातो खुंटा तिच्या अस्तित्वावरच 

आणि लावलं जातं दांव  निरागस मोकळ्या भावनांना..

आयुष्यभर फिरायचं असतं मग तिने एकाचं वर्तुळात..

चार भिंतीतच कोंडल जातं तिचं स्वातंत्र्याचं अवघ जग.

हक्काची गुलामी त्यांची पत्करायची असते तिला हयातभर.

जळत रहायचं असतं फक्त तिने त्यांच्यासाठी 

कोनाड्यातल्या वातीच्या तुकड्यासारखं.

पुरुषार्थ गाजवण्याची हक्काची जागा असते ती.

आपल्या मनाप्रमाणे वागवल्या जातात...

मारल्या जातात..

भोगल्या जातात..

रात्रीच्या अंधार कोठडीत राजरोस दाबल्या जातात.

तिच्या मनाची तमा न बाळगता..

... नसतो तिचा कुठलाही प्रतिकार.

मेलेल्या मनाला कुठे करता येतं बंड..

ती नुसते असते त्याच्यासाठी मादी.

एवढंच का तिचं अस्तित्व..?

कुठल्या एका नराला पुरुषार्थ गाजवण्यासाठी.

आणि झालंच तर घराचा वंश वाढीसाठी..

समस्त स्त्री वर्गाला समर्पित ही रचना...


















              ३४.   'बाळंतपण'.


बाळंत या शब्दाचाचं अर्थ मुळात बाळ तरी नाही तर अंत तरी असा आहे.

गर्भात आकाराला आलेला जीव पूर्ण रुपात साकारताना

 मांडलेला जीवाचा आकांत म्हणजे बाळंतपण. 

बाळंतपण म्हणजे असतो बाईचा नवा पुनर्जन्म.

बाईपणातून आईपणात रूपांतर होणारी अत्युच्च पातळी म्हणजे बाळंतपण.

बाळंतपणाच्या प्रसूती वेदनांची तीव्रता असते तरी किती..?

४३ डेल इतकी.

म्हणजे माणसाची २० हाडे फ्रॅक्चर झाल्यानंतर जितक्या वेदना होतात माणसाला.

तितक्या वेदना बाळंतपणात सहन कराव्या लागतात बाईला.

दुःखातून जन्म पावणाऱ्या वेदना वाहतात नेहमी दुःखाचा भार.

पण इथं असतं उलटं...

वेदनेतून सुख जन्माला येतं आणि शेवटी मानते ती या वेदनांचेचं आभार.

वेदना कोणाला हवीहवीशी वाटेल...?

परंतू कितीही असह्य असल्या तरी  तिला त्या हव्याहव्याशा वाटतात.

वेदना नको म्हणून कुठलीही बाई नाकारत नसते कधीच बाळंतपण.

मरणयातना भोगून पुन्हा मिळणार असते तिला जिवंतपण.

वेदनेचं नी बाळंतपणाचं नातं असतं अतूट.

सोसत नसते तरी सोसते...अनावर किंकाळी फुटत असते.

व्याकुळ होते...कासावीस होते भान हरपून जात असते.

आणि जीवन मरणाच्या मधली झुंज बाई देत असते.

शेवटी बाळ तरी...नाही तर अंत तरी.

इतक्या अटीतटीची निकराची झुंज असते बाळंतपण म्हणजे.

कित्येक बाया बाळंतपणात आई होताना गेल्या आहेत हे जग सोडून.

मागे एखादं गोंडस बाळ ठेऊन.

कित्येक आया आजही भोगताहेत बाळंतपणानंतरच्या कळा अजून.

पण नसते कधीच भीती तिच्या मनात अशा दुर्दैवी घटनांची.

किती मोठा त्याग असतो ना बाईचा...आई होण्यासाठी.

शरीरासोबत जीवाचं समर्पण देते ती यासाठी.

शेवटी अनंत यातनेचा वेदनेचा अंत पाहणाऱ्या सहनशीलतेचा सामना करून होते ती बाळंत..

टाकते सुटकेचा निश्वास...देते एका जीवाला श्वास...जणू ओतते आपला जीव त्या जीवात.

हाडामासाचं जिवंत-साजिवंत सुंदर कलाकृती साकारणारी विश्वातली एकमेवाद्वितीय कलावंत असते ती म्हणजे बाळंतीण.

बाळ जन्म घेतो आणि बाईचाही आई म्हणून जन्म होतो.

सोपं नाही आई होणं ते दिव्य पार करावं फक्त बाईनं.

आईपणाच्या अंगावर फुटणारा पान्हा.. आणि छातीला बिलगून दूध पिणारा तान्हा...

आहे ना हा अद्भुत आणि अद्वैत नात्याचा नमुना..

बाईलाच आईपणाची का हो असते चाहूल..?

वेदनेचा हा भोगवाटा बाईच्याच का वाट्याला ?

तिच्याच वाट्याला निसर्गानं का हे बाळंतपण दिलंय..?

निसर्गानं नवनिर्मितीचं आणि सृजनशीलतेंच सौख्य एक मातीच्या आणि दुसरं मातेच्या पदरी घातलंय.

मातीच्या आणि मातेच्या नावात एका वेलांटीचा फरक आहे असं म्हणतात. 

खरंय ते...

जशी माती तशी माता.

माती भिजते..ओलावते...पाझरते...तिच्या कुशीत बियाणं रुजत...पोसतं...फुलत...बहरतं.

अगदी तशीच माता ओलावणारी,पान्हावणारी,पोसणारी, मायेनं अखंड पाझरणारी.

माती कुणालाही अंतर देत नाही .

कुणामध्येही भेद करीत नाही.

मातीशी कसंही कुणी वागलं तरी माती कधीचं सोडत नाही आपलं मातीपण.

असंच आई जपत असते आपलंही आईपण.

मातीसारखंच मातेला आईच्या कसोटीवर उतरावं लागतं.

आणि म्हणूनच तर बाईला आईचं वरदान लाभलेलं असत.

सोपं नसतं आई होणं...

त्यासाठी बाईच्या जन्माला यावं लागतं.

आणि आई होण्यासाठी प्रत्येक बाईला बाळंतपणातून जावं लागतं.










३५  हुंडाबळी...


एवढीशी आसल्यापासन तिला आम्ही तळहाताच्या फोडासारखी जपली.

डोळ्यादेखत हसत खेळत, कधी अंगाखांद्यावर नाचली.

लई हौस केली माझ्या गोदूची हेंच्या तर लईच लाडाची.

जीव ओवाळून टाकावा तिच्यावर,जीवातला जीव अशी ती आमच्या दोघांची.


आबाळ व्हायचं एकेक दिस पण लेकरांच्या पोटाला काय कमी पडू दिलं न्हाई.

साजऱ्या धडुत्यामधी चांगली दिसावीत लेकरं म्हणून कष्टाला कधी आवर घातला न्हाई.

लेकरांनीबी जे मिळल तेच्यात समाधान मानून घेतलं,

मोठी आशा कधी केली असं अजूनपर्यंत तरी नाही घडलं.


ताप यायचा जवा लेकीला माझ्या  रातीचा,

तवा डोळ्याला डोळा नाही लागायचा.

रातभर बसून उशाला तिच्या, जीव माझा नुसता खाली वर व्हयाचा.

दुखण्याला तर माझी पोर लईच बुळी,

सारखी नुसती अंगाला डसून रडायची खुळी.


आठरावरीस लेकीला पोसून आम्ही तेंच्या पदरात घातली.

थोरली हाईत आमच्यापरास माणसं लई चांगल्या गुणाची वाटली.

आमच्याकडनं काय कमी पडलं तिला ,ते तेंच्याकडनं मिळल असं वाटलं.

सुखाच्या घराला गेली बाय माझी देवाला केल्यालं नवास फिटलं .


पण जेंच्याकडं पैसा हाय तेलाच लई पैशाची हाव असती.

 तिथं जिवाभावाच्या माणसापरास पैशालाच मोठी किंमत असती.

पैशात लोळणाऱ्या या माणसास्नी जगण्याची हो रीत कुठली.

अन्नात माती कालवणारी ही बेशरम जात माणसातन आता उठली.

येजानं पैसा काढून द्यायचा कुठंनतरी आम्ही गरिबांनी .

आणि पुन्हा भिकाऱ्यासारखं हात पसरायच गरीबापुढं या श्रीमंतांनी.


संग आणलं काय संग न्यायचं काय तरीबी एवढी हौस कसली...?

माती व्हती रं शेवटी साऱ्याची ती येळ कुणालाबी न्हाई चुकली.

माणसं नव्ह तूम्ही तुमच्यापरास जनावार बरी,

माया नाही उरली आता तुमच्यात नुसती पैशासाठी झालात लाचारी.

आरं नाही वाटलं का रं तुम्हाला तुमची आई ,भन, लेक  कुणाच्या घरात सुखानं नांदावी...?

 लाज कशी नाही वाटली तुम्हाला सोन्यासारखी पोर माझी पैशासाठी जाळून टाकली..


३८.जन्म लेकीचा...


माय माझी विनवणी मी आता करू कोणापाशी,

तू ही असा कसा गं घाव घालतेस माझ्या मुळाशी.

सांग तुझ्याशिवाय मी कोणाच्या गर्भात वाढायची ...?

तू पण जर अशी वागत असशील तर..

 मी आई कोणाला म्हणायची...?


खरंच का गं तुला वाटतं..?

मी जन्मालाच येऊ नये

जन्मानंतर एकमेकींनी तोंड कधीच पाहू नये.

बाबांनाही माझ्या काहीसं असंच वाटत का गं..?

मग त्यांना तू हवी,आई हवी, बहीण हवी 

पण पोटची मुलगी नको का गं..?


नशीबवान आहात आईबाबा तुम्ही 

तुम्हाला तुमच्या आईबाबाने जन्म दिला,

मीच दुर्दैवी  जन्माला येण्याअगोदर 

तुम्ही माझा जन्म नाकारला.

तुमच्या पोटी येण्याचा असा मी हो कोणता गुन्हा केला?

गर्भातच खुडून टाकता का हो एवढी मोठी शिक्षा मला..?


तुम्हांला दिवा हवा वंशाला , 

तर गर्भपात करून पैसा हवा कुणाला,

स्वार्थ साधताय तुमचा तुम्ही 

पण माझ्या जीवाचा कोण घेणार हवाला..?

निर्लज्ज आहेत नराधम ते त्यांना लाज जनाची ना मनाची,

पण तुम्हालाही आईबाबा कस कळू नये

 मुलाच्या हव्यासापोटी हत्या करताय पोटच्या मुलीची.


या नराध्यमांच्या नादी आई तू ही कशी लागलीस गं..?

नदी नाल्यांच्या काठाने पुरताना मला 

तुला काहीच कस नाही वाटलं गं...?

खरंच आईपणाच्या नात्याचा तू आता लिलाव केलास आहेस का...?

गर्भातील तुझ्या या वासराला 

कसाबांच्या हाती तूच दिलस का?


शेवटी आई एवढंच मला तुला सांगावस वाटतं,

मलाही जन्माला येऊन हे जग पहावंस वाटत.

तूच ठरव मला जन्माला घालायचं कि नाही

 शेवटी तुझा अधिकार आहे ,

स्वार्थासाठी लोक काहीही करतील तुझ्या उदरात नाळ माझी

 तुझ्याशी जोडली आहे .


                                             मी करेन ते स्वप्न पूर्ण मी होईन तुमच्या वंशाची पणती,


करीन घरादाराला समृद्ध लावीन संस्कृतीच्या नव्या ज्योती.

थकलेल्या तुमच्या आयुष्यात मी होईन जीवाचा आसरा तुमचा,

विश्वास ठेवा माझ्यावर अभिमान वाटेल तुम्हाला

 असा सार्थ करीन हा जन्म लेकीचा.









३९.  आईची आई


आई तर ती रोजचीच असते आपली

एकदा होऊया ना आपण तिची आई.

घेऊया एकदा तिच्या हृदयाची जागा 

आपल्या हृदयी.

काय असतं आईपण जरा जागवूया 

ते आईपण आपल्या अंतरात

आपल्या प्रेमाचा एक थेंब मिसळू दे 

त्या मायेच्या महासागरात..


रात्रीचं उठून घालते अंगावरती 

अलगद पांघरून

गडद झोपेत असताना फिरवते 

मायेनं हात कपळावरून 

आपणही असंच कधी घालू 

तिच्या अंगावर पांघरून

 थकलेल्या पायांना  हळुवार दाबू 

तिच्या पायथ्याशी बसून..


अखंड रात्रभर जागते उशाला बसून

आपण आजारी असताना

बळजबरीने चार घास चारवते

 नको नको म्हणताना

आपणही तिच्या आजारपणात 

अशीच काळजी वाहू

नको नको म्हणताना

 'खा गं माझ्यासाठी' म्हणून

एकेक घास आपल्या हाताने भरवू.


आपल्या आनंदात आनंद आणि 

सुखात सुख शोधणारी

आपलं दुःख आपलंसं करणारी

आपणही शोधुया ना तिच्या आनंदात आनंद

 सुखात सुख

समजून घेऊया तिचंही दुःख


जन्म देऊन दिनरात कष्ट करून पोसलंय ना तिनं

 मायेच्या पंखाखाली घेऊन वाढवलंय तिने

थकल्या जीवाला तिच्या आता विसावा थोडा देऊ

आयुष्यभर तिची अखंड सेवा करू


झुरते रे ती पण कधी आपल्या आईसाठी

व्याकुळ होते आईच्या कुशीत शिरण्यासाठी.

दाटून येईल जेंव्हा ती आईच्या आठवणीने

आपणही कधी तिची आई होऊ..

मायेनं तिला आपल्या कुशीत घेऊ.


४०. नारी


नारी है तू न्यारी हैं,

जग में सबसे भारी हैं |

माँ-बेटी बहन-पत्नी,

सबको तू प्यारी हैं |


तू ही जन्म देती हैं

पाला-पोसा करती हैं |

परिवार के सारे सुख दुःख

सबकुछ सहा लेती हैं |


रोशनी हैं तू उजाला हैं,

घर को उजागर करती हैं |

 ज्ञान की तू गंगा है

सबको लेकर बेहती हैं |


तू हैं धारा सबका सहारा,

तू ही हमारा निवारा हैं |

करती हैं सबकी चिंता

सबको पहारा देती हैं |


तू हैं जीवन तू हैं पावन,

तू हैं तो सबकुछ हैं |

नारी नहीं तो कुछ नहीं,

ए संसार भी अधूरा है|




४१.  माई...

अनाथांची माय हरपली... माई आपल्याला सोडून गेली...

सिंधुताई सपकाळ (माईस) विनम्र अभिवादन...😔

माईस समर्पित काव्यगाथा.....



माई...


किती अनाथांची लयाला गेलेली माय गवसली ती तुझ्या रूपाने.

किती बेवारस जीवांच्या मायेची तू वारस झालीस.

किती बाटलेल्या..विस्कटलेल्या..नाहीशा झालेल्या अभागी कुशीतून निपजलेल्या निष्पापांना 

तुझ्या पवित्र मायेची कुशी लाभली.

रोजच्या भुकेसाठी दिनवाणी लाचार होऊन जगापुढे पसरणारे कोवळे हात.

नाही फैलावू दिलेस पून्हा तू कुणासमोर. 

माणसांच्या पसाऱ्यात कुठं कुठं विस्कटलेली,पांगलेली,दुभंगलेली कुणाची कोण इवली इवलीशी ती लेकरं,

 घेतलीस आपल्या मायेच्या पंखाखाली ऊबीला.

हरवलेल्या पाखरांचं आभाळ झालीस तू.

उजाड वाळवंटासारख्या त्यांच्या आयुष्यात मायेचा पाझरणारा झरा झालीस तू.

स्वतःच्या आयुष्याच्या संघर्षात तर  किती तावून सुलाखून निघत होतीस..

पोटच्या गोळ्याची नाळ दगडाने जशी कचाचा तोडलीस,तशी नाती तोडली गं तुझ्या जीवलगांनी.

वनवास्यासारखी फिरत राहिलीस रानोमाळ.

पण निर्धास्तपणे तुडवत राहिलीस काट्याकुट्याची वाट 

रक्ताळलेल्या पावलांनी.

जिवंत माणसांची भीती वाटत होती म्हणून तू रहायचीस मेलेल्या मडयांच्या सोबतीला स्मशानात.

ज्या सौभाग्यवतीने काठवटीत थापून भाजावी तव्यावर भाकर,

तिच्या वाट्याला आली वेळ निवदाला ठेवलेल्या गोळ्याची भाकर करून चित्तेच्या अग्नीवर भाजून खाण्याची.

किती नियतीने केली गं तुझी क्रूर विटंबना...कुठला हा भोग तुझ्या वाट्याला आला.

पण तू नाही डगमगलीस, नाही थांबलीस जराही....सगळं सहन करत राहिलीस.. चिवटपणे संघर्ष करीत राहीलीस..

केलास आईपणाच्या मोहमायेचा त्याग..

 केलंस दान पोटच्या गोळ्याचं... आणि तू झालीस अवघ्या अनाथांची माय.

ज्यांच्या वाट्याला जन्मतः आलं दुःख त्यांच्यासाठी साकारलंस आनंदवन..

अनाथ जीवांच्यासाठी वाहिलंस आपलं अवघं जीवन.

चिमण्यां लेकरांच्या चोचीत दाणा भरवण्यासाठी रानोमाळ फिरतेस गं पाखरांसारखी..

लेकरांच्या भुकेसाठी आपल्या रसाळ वाणीने घालतेस काळजाला हात पसरतेस जगापुढे आजही आपला पदर.

तुझ्या पंखाखाली पोसलेली

चिमणीपाखरं आज मोठी होताहेत..झेपावताहेत आता उंच उंच..

राहायला जाताहेत आपल्या नव्या घरट्यात.

आणि नवीन पिल्ली येताहेत आसऱ्याला माई तुझ्या घरट्यात.

काय झालं असतं गं या जीवांचं तू नसतीस तर..? 

तू अनाथांची माय व्हावी म्हणून तर नाही ना दैवाने एवढा  संघर्ष लिहिला तुझ्या भाळावर.

ज्यांनी अन्याय केला तुझ्यावर त्यांना तर तू कधीच क्षमा केलीस.

कुंकूवालाही लेकरू म्हणून पदरात घेण्याचं सामर्थ्य माई तुझ्यात येतं कुठून...

भारतात जशी ती पुरातन सिंधू वाहते अखंड सगळं सामावून घेऊन.

तशी महाराष्ट्रातही मानवतेची माई,मायेची  सिंधू वाहते आहे अविरतपणे.

माई

खरच तुझं अंतःकरण विशाल अवकाशासारखं..

अथांग सागरासारखं.

किती जीवांना सामावून घेतेस,किती जीवांना जीव लावतेस.

माई तू त्या हरवलेल्या अनंत आईंचा ठाव आहेस, अनाथांच्या नात्यांचा गाव आहेस.

अनाथ वासराची गाय आहेस

माई तू अवघ्यांची माय आहेस.

माई तू अवघ्यांची माय आहेस.


- किरण चव्हाण.


४२.स्कार्फ.


 केसात माळलेले गजरे आता दिसणार नाही तुम्हाला

 फडक्याने गुंडाळलेली डोकी मात्र सर्वत्र अवश्य दिसतील तुम्हाला 

त्या गजऱ्याचा सुगंध आता कधीच येणार नाही तुमच्या श्वासाला

 फडक्यावर चितारलेली रंगीत छापील फुले पडतील तुमच्या नजरेला 

ओळख लपवण्यासाठी फडके आली की,सौंदर्य जपण्यासाठी

 स्वातंत्र्याचा स्वैराचार केलात तुम्ही इथे स्वतःच्या स्वार्थासाठी 

सौंदर्य जपता कि लपवता पण सौंदर्याचा इतका ही नखरा काय कामाचा..?

 म्हाताऱ्या झालात की पुढे कोण म्हणणार तुम्हाला हा मज भासे चंद्र नभीचा.

सौंदर्याचे लेणे आता फडक्यात बंद झाले कोण बरं दडलंय फडक्याआड

 मुखवटे लपवणे किती सोपे झाले

 फटीतून दिसते फक्त नजर त्यांची बघणे त्यांना किती सोपे झाले 

आमच्यासाठी मात्र त्यांना ओळखणे महाभयंकर कठीण झाले 

झाशीची राणी रणांगणी तलवार घेऊन इथे झुंजली होती.

शिक्षण देण्या इथे माणसा सावित्रीने दगडे अंगावर झेलली होती

 कठीण समयी ताराराणीने स्वराज्याची लढाई शिरावर पेलली होती.

 स्वरक्षण करण्या कुणी हो मग फडकी तोंडाला बांधली होती.

वाघिणीचे दूध पिणाऱ्या तुम्ही सावित्रीच्या लेकी.

 ताठ मानेने फिरु द्या इथे तुमच्या अभिमानाची डोकी

 ओळख लपवण्याची गरज नाही ओळख निर्माण करण्याची गरज आहे.

फडकी तोंडाला बांधण्याची गरज नाही कंबर बांधायची वेळ आह


◾ प्रेमायन


४३..तू..


तू साऊली मायेची तू शांतता सुखाची 

कळी उमलते तशी तू गोजिऱ्या रुपाची.

तू देखणी.. आरस्पानी सौंदर्याची लेणी

तू अलंकार सुंदरतेचा तू सोनियाचा मणी

प्रसन्न तू पवित्र तू तू स्वच्छंदी मनाची.

फुलल्या फुलातला सुगंध तू कस्तुरी गंधाची

 ह्रुदयात साठलेले तू ओल भावनांची.

विरहात साचलेली तू ओढ पापण्यांची.

 तू लाघवी तू गोड तू  हळव्या स्वभावाची.

 तू भाबड्या गुणांची तू सार संस्कारांची

तू देव्हाऱ्यात तेवणारी वात समईची.

सुगंधाने दरवळणारी तू काया चंदनाची.

तू आदी तू अंती तू माझी सांगाती.

तू माझ्या अंतरीची जिवंत ज्योती.




  ४४. तिन्हीसांजेचे सुख


लावलीस...देव्हाऱ्यात लामण दिव्याची सांजवात.

आता बस बघू अशी माझ्या पुढ्यात..

काय निरखतेयस अशी एकसारखी.

बघ तुझ्या डोळ्यांतही तिन्हींसांज दाटून आलीय.

तिथेही एक लामनदिवा जळतोय सांजेचा.

तेवतोय तळ पापणींच्या खाचेतल्या नितळ पाण्यावर.

नको पापण्यांची उसंत काढून घेऊ.

नको नको हलकीशीही पापणी ढळू देऊ नकोस.

नाही तर मिटल्या पापण्यात दडेल ना तो...विझेलही...

कसा तेवतोय बघ हळुवार 

तुझ्या नितळ पवित्र ओल्या डोळ्यांत.

कडकोपरा उजळवलाय काजळ काळ्या काठांवरही ओसडंलाय.

ती वात तान्ह्या अंगाने  कशी शहारतेय बघ..सोसवेना का तिला सांजवाऱ्याचा झोत.

कसे गं तुझे पुरातन राऊळासारखे हे निरामय नेत्ररूप.

जुनेपुराणे देखणेपणाचे मनमोहक प्रसन्न पवित्र तीर्थस्थळच.

दोन नयनपात्रांच्या काठांवर  विसावलेत अलगद समाधिस्त दोन पानमोती.

त्या मोतीयांच्या नितळकाचेतून  सळसळणाऱ्या सोनसळी किरणांचे सोनेरी कवडसे..

हळुवार बिलगतायेत माझ्या नेत्रकटाक्षी.

माजघरातील सांदकोपऱ्यात

घुटमळणारी अवघी शांतता विसावलीय तुझ्या डोळ्यांच्या कानाकोपऱ्यात.

त्या घनदाट काळोखाची चाहूल लागलीसे वाटते     

तुझ्या डोळ्यातील उपजल्या नजरेला.

तरीच सावरलीय ती 

भिडल्या कटाक्षातून.

झाली का पापण्यांच्या पाखरांची लगबग सुरू..

एवढी का कुठे परतीची सांज सरलीय अजून..     

नको ना इतक्यात सुरू करू पापण्यांची पाखडणी.

नाही तर उगीच मनाला लागून राहते ती रुखरुख..

मला अगदी डोळे भरून पाहू दे...डोळेभरुन...

तुझ्या नयनगाभाऱ्यातील माझे तिन्हींसांजेचे सुख.













४५. तुझ्या डोळ्यातील निज.


ओलांडून पापण्या तुझ्या डोळ्यांत निज नांदायाला आली.

किलकिल्या पापण्यांची उघडझाप मंद मंद झाली.


जागेपणाला डोळ्यात आता जागा नाही किंचितही

जडावल्या पापण्यांचा अतिभार सोसवेना जराही


पेंगळुल्या डोळ्यांत हळुवार धुंदी दाटून आली.

हरवून तू स्वतःला कशी भान हरपून गेली.


हिरव्याकंच काकणांची ऐन किणकिण कानी.

कशी मग फिरते लगोलग माघारी मिटणारी पापणी.


अर्धमिटल्या पापण्यांची तुझी मूर्ती किती देखणी आरस्पानी.

दुर्मिळ समाधीस्त सुदंरता पुरती साठवून ठेवावी मनी


एकदाश्या गच्च झाकोळल्या तुझ्या चिरेबंदी पापण्या

लोपल्या जागेपणाच्या खुणा कटाक्षांच्या मैफिली झाल्या सुन्या सुन्या.


अंधाराच्या खाईत अखंड ही लोचने बुडाली.

कोण जाणे कुठल्या दुरदेशीच्या स्वप्नी रमून गेली.


कशी गेलीस तिच्या आहारी झाली सुखाची निज दाट दाट

ती ही नांदू लागली सुखाने तुझ्या डोळीयांत.




















४६. माझे हरवलेपण...


मी माझे हरवलेपण तुझ्यात शोधत आहे.

मी उभा असा काठी तुझ्या तुज नकळत दुरून पाहे.


डोळ्यात तुझ्या मी पाहिले पाहिले ते मला.

तू पापण्या झाकोळताना मिटून घेतेस मला.

अंधार दाटल्या अंतरात तू जपून ठेव मला.


मी माझे हरवलेपण तुझ्यात शोधत आहे...


मनकोपऱ्यात सांजवेळी आठवणींची दाटी.

मी अबोल होऊनी हरवून पुन्हा जातो कोणासाठी.

भय उरातले हे सांगू कुणा मी उरलो कोणासाठी.


मी माझे हरवलेपण तुझ्यात शोधत आहे...


तू घेशील अंती जवळी मजला माझे म्हणुनी मला.

हरवला जीव हा सापडला सापडला तो तुला.

वाटते पुन्हा मी हरवून जावे अन शोधावे तू मला.


मी माझे हरवलेपण तुझ्यात शोधत आहे...


४७.  रुसवा


आठवतय का तुला तू माझ्यावरती पहिल्यांदा रुसली होतीस.

उसना राग चेहऱ्यावर आणून माझ्याकडे रागाने पहात होतीस.


खरंच घाबरलो होतो मी तेंव्हा  तू बोलतच नाहीस म्हटल्यावर..?

काय अशी चूक घडली माझी तू इतका रुसवा धरावास माझ्यावर.


खूप विचार केला मनात असं माझ्याकडून काय घडलं होतं 

पण अंदाज असा खेळात केलेली गंमत एवढं छोटसचं कारण होतं.


तरीच तू अधूनमधून माझ्या नकळत मला न्याहाळायचीस.

आणि गालातल्या गालात नकळतपणे एकटीच हसायचीस.


इकडे माझ्या मनाला लागलेली हुरहूर आणि तुझी तिकडे चुळबुळ.

इकडे मी धास्तावलेलो आणि तिकडे तू मात्र बिनधास्तपणे


शेवटी चोरट्या नजरेची तुझी चोरी  कशी बरं मला सापडली.

तुझी ही खोडी का दडून राहिली..लबाड कुठली.


खोटं कारण शोधून खोटं खोटं रुसणं नेमकं तुझ्या मनात काय चाललं होतं..?

सांग ना आता तरी असं अचानक रुसण्याला खरं कारण काय होतं...?






















४८.   झुंज जगण्याशी.



    झुंज जगण्याशी माझी अखेरच्या

 श्वासापर्यंत मी झुंजवीत ठेवीन.

येऊ दे कुठूनही कसाही तो

त्याला जशास तसे उत्तर देईन.


कंठाशी आले जरी आले प्राण 

तरी नाही सरावयाचा मागे तसूभरही.

झुगारून देईन प्राणपणाने 

त्या संकटाला नाही मेचणार जराही.



करेन निकराचा प्रतिकार क्षणाक्षणाला

 परतवून लावेन प्रत्येक हल्ला.

जिंकण्याची एकही संधी नाही देणार

 एवढा का माझा मला प्राण स्वस्त झाला.


कर्दनकाळाशी देईन टक्कर

  निर्भयपणे सामोरी उभा ठाकेन.

नाही डरावयाचा बिलकूलही

 काळाच्याही पुढे निर्धास्त पाऊल टाकेन


 मरणाच्या दारात जरी असेन उभा मी

तरी ठणकावून सांगेन त्यालाही.

एवढ्यात नाही जिंकू देणार माझ्यासवे 

झुंजाव लागेल अखेरपर्यंत तुलाही.

















४९. माणूस म्हणून


मला फूल नाही होता येत कुणाला सुगंध देण्यासाठी.

मला झाड नाही होता येत कुणाला साऊली देण्यासाठी.

मला ढग नाही होता येत कुणाला पाऊस देण्यासाठी.

मला पाऊस नाही होता येत कुणाला पाणी देण्यासाठी.

मला पाणी नाही होता येत कुणाची तहान भागवण्यासाठी

मला सूर्य नाही होता येत कुणाला प्रकाश देण्यासाठी

मला चंद्र नाही होता येत कुणाला शीतल छाया देण्यासाठी

मला दगड नाही होता येत कुणाचा पाया होण्यासाठी

मला घर नाही होता येत कुणाचा निवारा होण्यासाठी.

मला हवा नाही होता येत कुणाला श्वास देण्यासाठी.

पण मला माणूस म्हणून काय देता येईल कुणासाठी..?










५०.  अश्रू


 कधीपासून वाट सोडून गेलात माझ्या गालावरची रुळलेली.

 टचकन भरून धारोष्ण पापण्यांच्या फटीतून उलटायचात मुक्तपणे खाली.

 दाटलेल्या कंठातूनी भिजुनी स्वर निनादायचेन भेसुर 

आणि डोळ्यातील उगमांचे तुमच्या ओघळ वहायाचे दूर.

 यातनांची वेदनांची नाळ तुम्हास जोडलेली असायची.

दुःखाच्या नशेत तुमची वाट कधी ओठांपाशी चुकायची.

हुंदक्यांनी दाटलेली रात्र तुम्ही पाहिली असेल कित्येकदा.

 गळक्या थेंबांना तुमच्या मी उशाशी चिरडले असेल अनेकदा.

 कळायची थेंबातूनी तुमच्या दुःखाची खरी किंमत मजला.

ओहोटी दुःखाची सुरू व्हायची भरती येईल जशीजशी तुम्हाला.

खऱ्या हृदयी भावनांचे हे आसवांनो तुम्ही प्रतिरूप होता.

कळकळीची संवेदनांचे माझ्या तुम्ही मूर्त स्वरूप होता.

व्हायचो मी मुक्त असा या दुःखी,पीडापापातूनी.

 पवित्र व्हायचो मी माझ्याच डोळ्यातल्या गंगेत न्हावूनी.

या पाशातूनी सुटका व्हायची माझी तुमच्या ढळण्याने.

मनाचे गुंते सुटायचे हळूवार मोकळेपणाने.

आभाळ माझ्या हृदयातलीया जणू संपली वाटते का..?

ओल्या भावनांचे संवेदनांचे ढग आताच गोठले का.?

 दुष्काळा आसवांचा ओघळ डोळ्यातला आटलेला.

 गालावरच्या वाळवंटी ओला थेंबही नाही घसरलेला.

अनावर दुःखाचा अतिभार आता मुकेपणाने सोसत आहे.

माझ्याच आसवांना मी आता पारखा झालो आहे.

हे आसवांनो... हे आसवांनो अनावर होऊनी

ढळणार नाही का कधीच माझ्या डोळ्यातूनी.

का सांगा ढळताय कोठे माझ्यासाठी अनावर होऊनी कोणाच्या डोळ्यांतूनी..?


५१ बाजार फार झाला...


ओठात एक पोटात एक

बोलतात एक करतात एक

ताळमेळ नाही कशाचा कशाला.

अशा बाजारबुनग्यांचा बाजार फार झाला.


घेतात सोंग करतात ढोंग

आतून एक बाहेरून एक

खोटेच रूप दाविती जगाला.

अशा बाजारबुनग्यांचा बाजार फार झाला.


सांगे लोका ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण.

उगा लोकांपुढे मांडीती आपुले अज्ञान.

कोण रोखणार अशा खोट्या तत्वज्ञानाला

अशा बाजारबुनग्यांचा बाजार फार झाला.


सत्यमेव जयत असे म्हणायचेच नुसते

असत्यावाचून यांचे काहीच चालत नसते.

सत्य असत्याचा काहीच फरक पडत नाही याला

अशा बाजारबुनग्यांचा बाजार फार झाला.


उघड्यावर टाकीती आपुल्या आईबापाला

तेच आईबापाचे महत्व सांगिती जगाला.

म्हणावे तरी काय अशा करंट्याला.

अशा बाजारबुनग्यांचा बाजार फार झाला.


घालून सफेद कपडे काळे धंदे करीतो.

वरून प्रामाणिकपणाचा टेंभा मिरवितो.

स्वार्थासाठी आपुल्या नाडतो जगाला

अशा बाजारबुनग्यांचा बाजार फार झाला.














५२. बासरी


ती घेऊन जाते मजला कुंजवनी.

अंथरलेली परिजातके,चाफ्याचे कोवळे 

झाड उभे त्या निबिडरानी.

गर्द सावलीतुनी निसटुनी गळतात खाली

किरणांचे कवडसे हिरवट फांद्यातूनी. 

उनाड वारा भिरभिरणारा मधेच करतो मस्ती पानापानातूनी.

कोसळत्या जलधारा नाजूक खळखळणारे झरे, 

उभ्या अंगावर झाडांनी माळलेले नाजूक वेलींचे गजरे.

ते दव मोती साचून पानावरती पसरले अथांग रानावरती.

भासे मज हिरे माणके पाचू मोती 

सोन्याचे मनी ओवले गवताच्या पाती. 

मी बसून राहतो त्या चाफ्याच्या खाली

मज देहा भोवती पसरली परिजातके ती चाफ्याची फुले ओली.

कळ्या फुलांच्या गाभाऱ्यातील सुगंध चोहीकडे दरवळे.

सुवास श्वासागणिक आणिक गंधाळले पण जाणवे.

धुंद हात घेऊनी उरी त्या फुलांनी,

पेलले ओले ओझे माझे इवल्याश्या  पाकळ्यांनी.

कानी भरते स्वर असा की मी मोहन जातो क्षणोक्षणी

मिटतात अर्ध पापण्या गळतात सारी

 दुःखे त्या झाकोळल्या साच्यातूनी.

 मी धुंदतो मी गुंततो या स्वर्गी मज घेऊन आली ही परी.

निघू दे गं तुझ्या ओठातूनी अखंड स्वर माझ्यासाठी

 तु माझी गं बासरी... तु माझी गं बासरी.       




















५३ भूक


पोटासाठी लढलो...

तर मला बंडखोर म्हणतील..

पोटासाठी शांत राहिलो...

 तर मला षंढ म्हणतील.

काहीच नाही केलं तर शेवटी 

भुकेनं मेला म्हणतील.

पोटासाठी लाचार झालो

तर भिक माग म्हणतील..

       पोटासाठी स्वार्थी झालो 

तर चोरी कर म्हणतील..

 यापैकी गुन्हा करायच्या आगोदर,

सांगा यातला कोणता आरोप सिद्ध

करायचा आहे माझ्यावर.

त्यासाठी जबाबदार धरा 

आणि दावा ठोका त्या भुकेवर..

आणि...

भूक लागतेच कशी...?

शेवटी असा गुन्हाचं नोंदवा सरळ

सरळ माझ्या उपाशी पोटावर.

गुन्हा काय..? उपाशी पोट...

पोटातली भूक...

होय...तर मी ठरेनच गुन्हेगार.

कारण माझं उपाशी पोट आहे,

आणि पोटात भूक आहे.



















५४. 'स्वप्नंही मरतात...'



                     माणसं मरतातच....

                     पण माहिती आहे 

                     स्वप्नंही मरतात.

                     ..नाही माहिती

                     स्वतःचा गळा घोटून 

                     स्वप्नं आत्महत्याही करतात.

                     हे तर खूपच मामुली..

                    स्वप्नांच्यावर अन्याय,अत्याचार होतो

                   स्वप्नांच्या पाठीतही निर्दयपणे

                   खंजीर खुपसला जातो..

                  .... स्वप्नांचाही खून केला जातो.

                  त्यांचीही खांडोळी केली जाते.

                     स्वप्नं...

                     तुडवली जातात..

                     कुस्करली जातात..

                     भरडली जातात..

                     चिरडली जातात...

                     गाडली जातात...

                     जाळली जातात..

                     मनाच्या स्मशानात 

                       स्वप्नांचीही राख होते...

                     आणि मग शेवटी 

                    मागे उरतात फक्त..

                      मेलेल्या स्वप्नांचे स्मारक

                  म्हणून माणसांचे जिवंत सांगाडे.

















५५. स्वप्नांचा चुराडा.


चाललो मनातील स्वप्नांना पायाखाली तुडवत.

 आता फिकीर नाही कशाची आणि भीतीही नाही वाटत.

 जराशी झुकवून मान खाली पुन्हा त्यांच्याकडे एकवार पाहतो.

आणि पडतील अश्रूंची  ठिपके ज्यांच्यावर 

त्यांना तर अधिकच पायाखाली चिरडतो.

 त्या कठोर काट्यांच्या तुकड्यांनी रक्ताळले जरी पाय

 तरी घायाळ मनाच्या वेदनेपेक्षा.

 त्या चिरलेल्या जखमांचं मला भान नाही राहत.

मनातील अनेक रंगांनी मी रंगवले त्या स्वप्नांना.

पण त्यांनीच पायात सांडू दिलेल्या त्या रंगाला 

माझ्या लेखी तरी महत्त्व नाही.

 मी अपूर्व विश्वास ठेवला त्यांच्यावर

पूर्णत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना श्रेष्ठ ठरवत राहिलो.

 सृजन मनाच्या सिंहासनावर त्यांना पाहत 

मी वास्तवातील जिने अखंड कष्टत राहिलो.

 दुखावले नाही कधी त्यांना  दूर जाण्याची भीती मनात बाळगून.

स्वाभीमानाने मी त्यांच्या आशेचा गुलाम म्हणून जगत राहिलो.

म्हणे स्वप्नांनी बनते सुंदर जगणे 

पण त्याच स्वप्नांनी केले आहे बेभरवशाची जगणे.

मनातून उडाले ते दुश्मनासारखे टपून बसलेत.

 हृदयात जपून ठेवले आजवर ज्यांना पाकळ्या सारखे.

 तेच आज बिखरलेत पायात काचेच्या तुकड्यासारखे.

पण मी ही नाही लाचार आता नाही झुकणार कधी.

 त्यांच्यासमोर त्यांच्या आशेने  जगण्याकरता 

आणि म्हणूनच चाललो मनातील एकेक स्वप्नांचा चुराडा करत.

 आता स्वप्नांच्या वाचून जगण्याकरता..

















५६.    बाळ..मला माफ कर


आता अंतरीचे काय बोलू नि कुणाला सांगू 

ठोठावू तरी दार कुणाचं मी.

 तुला जन्माला घातलेल्या देवाचं की,

 अनंताकडे नेणाऱ्या दैवाचं.


इवला इवलासा जीव तुझा वाचवताना 

वाचवता नाही आला.

जळणाऱ्या पणतीचा एक तुकडा 

जीवापासून जपता-जपता विझून गेला. 


दुनियेच्या या बाजारात उराशी कवटाळून तुला

 कुठं कुठं फिरवलं नाही.

माणसं जगवणाऱ्या या एकाही दुकानात

 का तुझ्या जगण्याचा एखादं गुपित सापडलं नाही...?


पण  तू मात्र जगत होतीस बीन भरवशाची 

हसत-खेळत आम्हाला भरवसा देत.

 खरंच तू हसताना तुझ्या गालावरची ती कोवळी कळी

पाहून काळीज तीळ तीळ तुटायच गं पोरी.


 तुझ्या आईची तरी दशा काय सांगावी

 तू जगशील..जग अनुभवत राहशील 

ही एकच आशा धरून रात्रंदिवस

 तुला उराशी धरून ठेवायची.


 पण बाळ मरणही लाजलं असेल हं

 त्यालाही धीर झाला नसेल.

तुझा कोवळा निरागस जीव दूर जाताना..

 देवानेही आपली मान खाली घातली असेल.


 तुझा निर्जीव पडलेला चिमुकला देह पाहणं 

म्हणजे जिवंतपणीच्या मरणकळा भोगत होतो.

  तुला या जगात त्या निष्ठूराने ठाव दिला नाही ना

माझ्यासाठीही त्यानं दार उघडावं म्हणून मी त्याचं दार ठोठावत होतो.

 

बाप म्हणून सारं काही केलं बाळ..

 तुझ्यासाठी सारं काही केलं..

पण  जे  नव्हतंच काही हाती माझ्या... ते मला करता आलं नाही 

त्यासाठी जमलं तर माफ कर बाळ मला जमलं तर माफ कर..




                       ५७.      मी...


मी माणसांच्या शोधात खूप फिरलो,

खूप बोलावं मनातलं सारं काही सांगावं मनातल्या रसातळाचं

 पण असा भेटला नाही कोणीही माणूस आजपर्यंत.

तो शोध शेवटी माझ्याजवळचं येऊन थांबला.

त्यावेळी मला माझा शोध लागला.

माझ्यातला मी मला गवसलो आणि 

मग मनातलं माझं मलाच मी सांगू लागलो. 

माझ्यापुढेचं मी व्यक्त होत राहिलो.

केंव्हाही,कुठेही आणि कसाही मला वाटेल तेंव्हा

 त्याच्याशी संवाद साधू लागलो.

मी खूप आनंदी आहे आता. 

कारण जगातली एक सर्वात जवळची आणि

 सुंदर व्यक्ती मला भेटलेली आहे.

आणि ती म्हणजे माझ्यातला मी.







५८. जगणं स्वतःसाठी.


द्या मस्तपैकी झोकून स्वतःला स्वतःमध्ये कधीतरी

भेटा स्वतःला दिवसातून एकदा तरी

थोडं बोलून बघा ना

थोडं विचारून बघा

काय हवंय स्वतःकडून स्वतःसाठी

आहे रोजचं जगणं व्याप,जबाबदारी

घ्या ना थोडा विसावा स्वतःसाठी स्वतःपाशी

जगायचंचं आहे आपल्यांच्यासाठी

आपलं जगणंच आहे त्यांच्यासाठी

पण थोडं जगुया ना स्वतः स्वतःसाठी.


                             









५९. करार.


येतील संकटे ती तर ठरलेलीचं आहेत.

फक्त तुला अढळ रहायचंय आपल्या स्थानावर 

जराही विचलित न होता.

पेलत रहायचीत प्रत्येक वादळे येणाऱ्या संकटांची.

तू सापडशील त्या वादळात, भिरभिरत राहशील.

पण तू समर्थ आहेस अशी येणारी वादळे पेलण्यासाठी.

असेल सगळी विदारक परिस्थिती.

पण तू ढळू देऊ नकोस स्वतःला.

तू निश्चल रहा, टिकवून ठेव मनाची शांती.

चंचलतेला बांध करकचून 

निराशतेला दे झुगारून.

नको होऊस दुःखी,कष्टी,असहाय.

भय,चिंता,क्रोध ही जळमटे टाक जाळून.

वाट तर खाचखळग्यांचीच असणार.

वाटेवरच्या अडथळ्यांना नको देऊ दूषणे

हिंमत बांधून टाक पाऊल पुढे पुढे

तू..पडणार..अडखळणार पण

थांबलास तर हार निश्चितचं आहे.

तू चालत रहा...लढत रहा...निर्धास्तपणे.

आजच्या काळोखानंतर उद्या उष:काल होणारचं आहे.

लक्षात ठेव जगण्यासाठी

 इथे अखेरपर्यंत फक्त लढण्याचा करार आहे.





















६०. मोरपीस


निळया नभाचे पाखरू उतरले  का खाली...

कुठून कसे खुडून पडले एकटेच  रानीवनी

निळ्याशार डोहाचे जल निळे निळे

घोटले असेल  मोर जिवाने कोणासही न कळे ?

का बुडवली असतील पिसे इंद्रधनुच्या रंगी 

तेव्हांच भरले रंग मोरपिसा अंगी.

नभापरी निळ्या किती नितळ निळी कांती.

उमटली असेल बरे कुठल्या कुंचल्यातूनी 

नितळकांत देहाच्या देखण्या किती छटा 

काठास मऊ केशरी विविधांगी जटा.

मधोमध देखणा टपोर काजळकाळा 

एकुलता एक वसलेला मोठासा डोळा.

 भरवी नानारंग मनाचिये अंगी

रूप तुझे कैसें हे विविधांगी

मनमोराचा फुलवी पिसारा

मोरपीसा तुझा रंगच न्यारा.





६१. हो विश्वात्मक..


कर विशाल हृदय सामावून घे अवघ्या विश्वाला.

बघ तुझं मन केवढं आहे अथांग अवकाशाएवढं..

नको ठेऊ संकुचित स्वतःला.

तुझ्यातल्या मी पणाला मागे सारून व्यापून टाक अवघ्याना..

इथले अवघे जीव तुझेचं आहेत. 

त्यांना तुला आपलंसं करायचंय.

तुझ्यात आहे ते सामर्थ्य..तीे हिंमत 

इथल्या वाईटांवर मात करून परिवर्तन घडवण्याची.

तू एकटा नाहीस.

चांगुलपणाच्या या प्रवाहात तुला मिळतील 

तुझ्यासारखे असंख्य सोबती..

अनादीकाळापासून सुरू आहे ही चळवळ 

तुला तिचा भाग व्हायचंय.

विश्वाच्या कल्याणाचं भव्य दिव्य स्वप्नं साकार करण्याची संधी 

एक मानव म्हणून तुला मिळालीय ती तुला साकारायचीय.

जागव तुझ्या हृदयातील ती स्वयंस्फूर्तीची वात..

उजळवून टाक तुझ्या अस्तित्वाने तुझा भोवताल. 

कर दृढ आत्मविश्वास टाक एकेक 

पाऊल पुढे अखंडित विश्वाच्या कल्याणासाठी.

अवघ्या जीवांची काळजी वाहताना 

त्या दुःखी- पीडित,

रंजल्या- गांजल्यांना आपलंसं करायचंय तुला.

इथं आदी अंती जे जे उदात्त-उन्नत- मंगल आहे. 

त्यात तुझ्याही अस्तित्वाचा वाटा असणार आहे.

कर समृद्ध स्वतःला.

विचारांचा..कर्तृत्वाचा..हृदययाची व्यापकता

तुला इतकं व्यापक व्हायचय..

इतका की तुला विश्वात्मक व्हायचंय..















६२. वरद 


आम्हांला माफ कर

२१ व्या शतकाकडे वाटचाल करणारे आम्हीं

आजही अंधश्रद्धेच्या कुबड्या घेऊन जगतोय.

आम्हीं लावलाय शोध प्रत्येक गोष्टीचा

पण आम्हांला अजूनही गवसलं नाही ते तंत्रज्ञान

जे की या अंधश्रद्धेला मुळापासून उखडून टाकू शकेल.

आणि मुळात गवसेल तरी कसं तंत्रज्ञान...

ते ज्ञान जन्माला घालणाऱ्या ज्ञानवंतांचीचं

इथे भरदिवसा हत्या केली जाते.

अंधश्रद्धेचा अंधकार दूर करणारा दीपकचं

विझवला जातोय..

वरद...

निदान तुझ्यारूपातून तरी अंधश्रद्धेचा अंधकार दूर लोटावा म्हणून

म्हटलं द्यावी विचारांची ज्योत तुझ्यासारख्या भावी पिढीकडे.

पण त्याच काळ्या अंधारात अघोरी कृत्यांचे 

बळी ठरताहेत तुझ्यासाखे निष्पाप जीव.

अंधश्रद्धाळू क्रुरकर्मे वावरतायेत आपल्या भोवती.

आमच्या निष्पाप लेकरांचा सहज घास घेण्यापर्यंत 

मजल जातेय यांची.

 एवढी जनजागृती होऊनही

 खरंच अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ 

घराघरांतपर्यंत पोचलीय का आमची..?

आज आपल्याच गल्लीत अंधश्रद्धेने पछाडलेले सैतान 

टपून बसलेत आमच्या चिमुकल्या वरदवर...


आणि आम्ही काहीच करू शकत नाही..?

कुठे कमी पडतोय आम्हीं..? 

आज आपल्या घरात आमचा वरद सुरक्षित नाही..





                   










६३.  लावणी


नजरेचा रोखून बाण काय बघता असं रोखून 

राया तुमच्यासाठी बसले नटूनथटूून $$ नटूनथटून.


आज बघा कसं पाखरू गावलं अलगद जाळ्यामधी 

आता नाही सुटका यातून माझी धडधड होतय उरी

साधली कशी शिकार माझी ही खोडी नाही बरी.

न कळता मिटूनी गेली दोघांमधली दरी

घायाळ झाले मी तुमच्या नजरेनं...नजरेनं


राया तुमच्यासाठी की हो बसले नटूनथटूून नटूनथटून.


डोळ्यात नशा उतरली जहरी नजरेनं मला घेरली 

विळख्यात अडकले बाई अंगात धुंदी पेरली.

मऊ केसांत घालुनी हात घडी विस्कटून टाकली

सांडली गजऱ्यांची माळ  फुलं गेली चिरडून...चिरडून 


राया तुमच्यासाठी की हो बसले नटूनथटून नटूनथटून


पुरं झालं की आता राया तुम्हीं किती लुटता मजा 

मी थकले बाई सोडा आता किती छळताय मला

 रात्रीचा मेवा हा राया थोडा उद्यासाठी राखूनी ठेवा

बघा पहाटच पडलंय शुक्राचं टिपूर चांदणं...टिपूर चांदणं


राया तुमच्यासाठी की हो बसली नटून नटूनथटून नटूनथटून.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"

भारताची जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुख- किरण चव्हाण.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'