सावित्रीच्या लेकी आज स्वतंत्र आहेत का.. 🌸 सावित्रीच्या लेकी स्वतंत्र आहेत का? – स्त्री स्वातंत्र्याचा विचार 🌸
🌸 सावित्रीच्या लेकी स्वतंत्र आहेत का? 🌸
सावित्रीच्या लेकी आज स्वतंत्र आहेत का..?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,समाजसुधारणेसाठी शिक्षणाची धारणा जनमाणसात रुजवणारे महात्मा फुले, स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, समाजात न्याय,समता प्रस्थापित करणारे शाहू महाराज, दीन दलितांचे कैवारी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः या विभूतींना वंदन करते तसेच या व्यासपीठावरील ज्ञानवंत,प्रज्ञावंत मान्यवर, सुज्ञ परिक्षक आणि हे विचारमोती टिपण्यासाठी बसलेले श्रोतेजन आपणा सर्वांना नमस्कार करून
आपल्यासमोर विषय मांडते आहे...सावित्रीच्या लेकी आज स्वतंत्र आहे का..?
सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की, परवाची एक घटना आहे मनीषा पाटील नावाची शूर नारी भारतीय सैन्यात बी.एस.एफ मध्ये कार्यरत आहे. परवा आपल्या दहा महिन्याच्या बाळाला घरी ठेऊन देशाच्या सीमेवर रक्षण करण्यासाठी गेली..? म्हणजे आजची स्त्री देशाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेत असतील तर स्त्री स्वतंत्र आहे की नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्हींचं मला सांगा...काय असेल...?
मला सांगा काय असेल...? ..........
ठीक आहे आता दुसरी घटना अशी कोल्हापूरमधील बोन्द्रेनगरमधील एका कॉलेजवयीन मुलीने एका गल्लीबोळातल्या सडकहऱ्याच्या नाहक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली...मला सांगा यात तिची काय चूक होती... तिला तिच्या पध्दतीने जगण्याचा अधिकार तिला होता की नव्हता...आणि होता तर तिचा अधिकार का हिरावून घेतला..? तिला तिचं आयुष्य स्वतंत्रपणे जगता येऊ शकत होतं की नव्हतं...मग तिच्या या स्वातंत्र्याचं काय झालं..?
मग आता मला सांगा....आहे आमची सावित्रीची लेक सुरक्षित..? आहे तिचं स्वातंत्र्य सुरक्षित..?
........ याचे उत्तर नाही...
ह्या दोन्हीही नुकत्याच घडलेल्या घटना आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. म्हणजे म्हणतात ना शितावरून भाताची परीक्षा...आपल्या आजूबाजूच्या वातावरणातूनच आपण जाणून घेऊया ना, आजची सावित्रीची लेक स्वतंत्र आहे का..? एकाबाजूला स्त्री स्वतंत्र आहे असं एक चित्रं आहे आणि दुसऱ्या बाजूला स्त्री स्वतंत्र नाही असेही चित्रं आहे...अशी सगळी विचित्र परिस्थिती आज आपल्याला दिसते आहे.
म्हणजेचं स्त्री च्या स्वातंत्र्याबद्दल विचार करताना परस्परविरोधी भिन्न अशी परिस्थिती समोर येते. एकीकडे देशाच्या सीमेवर जाऊन देशाच्या रक्षणाची जबाबदारी घेणारी स्त्री आणि दुसरीकडे त्याच देशात स्त्री सुरक्षित नाही तिला आपलं अस्तित्व गमावून बसावं लागतं. .तर खरंच महिला स्वतंत्र झाली का याचा विचार करताना परवाची ही घटना डोळ्यात अंजन घालणारी आहे..अशा सडकहऱ्यांच्या नाहक त्रासाल कंटाळून एक मुलगी आत्महत्या करत असेल. अशा एका कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात ४० मुलींनी आत्महत्या केल्या आहेत. तर मुद्दा हा आहे की ,स्त्री तिच्या ठिकाणी स्वतंत्र आहेच पण तिच्यावर वाईट डोळा ठेवणाऱ्या या नराधमांच्या डोळ्यातून ती स्वतंत्र झाली का हा खरा प्रश्न आहे.
आता मूळ प्रश्नाकडे आपण पुन्हा येऊयात सावित्रीची लेक आज स्वतंत्र आहे का..? मंडळी मला जर हा प्रश्न विचाराल तर माझं उत्तर आहे हो असंच आहे...मी या प्रश्नाबद्दल १००% सकारात्मक आहे. सावित्रीची लेक स्वतंत्रचं आहे...कारण एकेकाळी चूल आणि मूल सांभाळणारी आपली स्त्री आज देशाच्या सर्वोच्च पदावर राहून देशाचा कारभार पाहात असेल तर ती स्वतंत्र नाही असे आपण कसे म्हणू शकतो...आज शिक्षणाच्या बळावर मुली सातासमुद्रापार गेल्या, अंतराळात गेल्या .पण तिला अवकाशाचं स्वातंत्र्य देताना पोटच्या गर्भात तिला स्वातंत्र्य दिलं का हा खरा प्रश्न आहे. आजच्या युगातही स्त्री भ्रूण हत्या करून तिचं अस्तित्वचं पोटातून खुडून टाकतो आहोत. मंडळी इथून तिच्या खऱ्या स्वातंत्र्याची लढाई सुरू होते..ती म्हणजे तिच्या अस्तित्वाची लढाई.
जिला अनेक वर्षे चूल मूल आणि घराच्या उंबरठ्याची सीमारेषा घालून तिच्या प्रगतीचे पंख छाटण्यात आले त्याच स्त्रीने आज दाखवून दिलेय की, ती कशातही मागे नाही. जिच्या हाती आता लालपरीचं स्टेअरिंग आलंय, ती आकाशात विमान उडवते , अवकाशात झेपावते.एवढेच नाही समुद्राच्या तळाशी राहून संशोधन करते मग सांगा स्त्रीने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय की, नाही..? आजकाल दहावी,बारावी बोर्डाच्या परीक्षेत कोण बाजी मारतंय पाहा..कोण..? मुलीचं बाजी मारताहेत ना. हे सर्व घडून आलंय ते तिला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे आम्ही नाकारत नाही पण तिनेही तिला मिळालेल्या या स्वातंत्र्याचं स्वतःच्या कर्तृत्ववाने सोनं करून दाखवलंय हे ही तितकंच खरंय.
खरं तर आज आमच्या लेकीबाळी स्वतंत्र आहेत पण त्याचं स्वातंत्र्य सुरक्षित आहे का..? याचा विचार होणे गरजेचे आहे. आज गल्लीपासून दिल्ली पर्यन्त आमच्या लेकीबाळी सुरक्षित पणे वावरू शकतात का...नाही तर मग कोपर्डीपासून दिल्लीपर्यन्त घडणाऱ्या अशा बलात्काराच्या घटनानी रोज देश का हादरतोय..राजरोसपणे आमच्या लेकीबाळीवर अत्याचार होतायेत. आमच्या रस्त्यावरून आमच्या मुली सुरक्षित फिरु शकत नाहीत... हे वासनांध नराधम तिच्यावर झडप टाकण्यासाठी टपून बसलेले असतात..मग मला सांगा आमची सावित्रीची लेक आमच्या वासनेतून खऱ्या अर्थाने मुक्त झाली का..? तिला मिळालेलं स्वातंत्र्य सुरक्षित आहे का..? महात्मा गांधीजी एकेठिकाणी म्हणाले होते की आमच्या देशातील स्त्री रात्री अपरात्री रस्त्यावरून निर्भयपणे हिंडू फिरू शकेल तेंव्हा आपला देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून स्त्री स्वातंत्र्यचा विचार करताना गांधीजीचा हा विचार मला अधिक महत्वाचा वाटतो.
ऑनर किलिंगच्या घटना तर आपण अलीकडे पाहत असतो एका दलित मुलासोबत लग्न केल्याने एका भावाने आपल्या बहिणीचा खून केला..मला सांगा आपल्या भावाने एका दलित मुलीसोबत लग्न केल्यामुळे आजपर्यंत कोणत्या बहीणने भावाचा खून केला हो..? मग नात्याचं स्वातंत्र्य तिच्या जीवावर का उठतं...? . अगदी अलीकडील श्रद्धा वालकर हत्याकांडाची घटना आपल्याला माहितीच असेल. आपली प्रेयसी दुसऱ्या मुलांसोबत बोलते या संशयातून त्या नराधमाने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले...केवळ परपुरुषासोबत बोलते म्हणून जर एवढ्या थराला जात असेल तर तिचं वैयक्तिक स्वातंत्र्य तिला किती धोकादायक ठरू शकतं याचं हे उदाहरण नव्हे का..? म्हणजे अशा विकृत मानसिकतेतून आजची स्त्री स्वतंत्र झाली का हा खरा प्रश्न आहे.
स्त्रीला स्वातंत्र्य देणारे आपण कोण मुळात स्त्री स्वतंत्रच आहे.. निसर्गानेचं तिला हे स्वातंत्र्य बहाल केलंय.निसर्गाने तिला मोकळा श्वास दिलाय. पण आजच्या रूढी परंपरा, जाचक प्रथा,पुरुषी मानसिकता, वासना स्त्रीकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोन अशा दूषित वातावरणात तिचा श्वास गुदमारतोय प्रसंगी तिचा श्वास घेतला जातोय. यात दोष तिचा नाही तर तो आपला आहे. स्त्री ही वस्तू नाही तिच्यावर मालकी हक्क गाजवायला.तर स्त्री ही स्वतंत्र अशी वास्तू आहे. जिला प्राचीन काळापासून आदिमायेचा आणि आदिशक्तीचा इतिहास आहे. आणि म्हणून आजची सावित्रीची लेक स्वतंत्र आहे का..? हा प्रश्न करताना या सावित्रीच्या लेकीचं स्वातंत्र्य सुरक्षित आहे का आणि ते अबाधित राहणार आहे का हा खरा प्रश्न आहे..
- किरण सुभाष चव्हाण (पांगिरे)
मोबा- 8806737528
💬 तुमचं मत आम्हाला नक्की कळवा!
तुम्हाला हा लेख कसा वाटला? सावित्रीच्या लेकी खरंच स्वतंत्र आहेत का? तुमचं विचार नक्की लिहा. तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा. 👇
✍️ इथेच खाली Comment box मध्ये तुमचं मत लिहा.
✅ तुमची प्रतिक्रिया इतर वाचकांनाही प्रेरणा देईल.
👉 तुमचं मत काय? कमेंट करा आणि चर्चा सुरू करा!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा