श्वावत विकासासाठी मुलभूत विज्ञान आव्हाने आणि शक्यता. - किरण सुभाष चव्हाण.
श्वावत विकासासाठी मुलभूत विज्ञान आव्हाने आणि शक्यता.
आज २१ व्या शतकाकडे वाटचाल करताना अशी कोणतीही गोष्ट नाही की, ज्याला विज्ञानाचा स्पर्श नाही. ज्ञानाला संशोधनाची जोड देऊन अजोड कार्य करण्याची क्षमता ठेवते ते विज्ञान. सर्वच क्षेत्रातील विज्ञानाचे अस्तित्व अनन्यसाधारण आहे. विज्ञानाने विकासाची उद्दिष्टे सफल होत असताना मानवी जीवनात सर्व प्रकारची समृद्धता आणि संपन्नता आणली.पण विकास ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे वेळोवेळी त्या विकासात सुधारणांना वाव असतो.विकास करताना कोणता विकास आपल्याला हवा आहे ? आणि त्यासाठी काय करावे लागेल ? याचा विचार होणे महत्वाचे आहे. विकास साधत असताना तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कोणत्याही प्रकारच्या अविकासाच्या बाधा न आणता तो विकास संक्रमित झाला पाहिजे. म्हणजेच तो श्वावत विकास होय. जागतिक पर्यावरण व विकास आयोगाने १९८७ मध्ये श्वावत विकासाची व्याख्या अशी केली आहे की, " विकास ज्याने विद्यमान पिढीच्या गरजा पूर्ण होतात आणि त्यासाठी पुढील पिढ्यांच्या कौशल्यांशी तडजोड न करता त्यांच्याही गरजा पूर्ण करता येतील " याचाच अर्थ नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर अत्यंत सुजाणपणे केला पाहिजे जेणेकरून भविष्याच्या पिढीला साधनसंपत्तीच्या संकटांना सामोरे जावे लागणार नाही.
श्वावत विकास साधताना आपल्या मूलभूत विज्ञानासमोर कोणती आव्हाने आहेत ,ती आव्हाने स्वीकारण्याची आणि त्या आव्हानांची पूर्तता करण्याची क्षमता आपले विज्ञान कसे ठेऊ शकते याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा योग्य समन्वय साधून किंबहुना पर्यावरण स्नेही तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्याकडे आपण वाटचाल केली पाहिजे. पण आज विकासाच्या नावाखाली पर्यावरणात वाढता मानवी हस्तक्षेप ही चिंतेची बाब आहे. आज हिरवी जंगले नष्ट होऊन सिमेंटची जंगले वाढणे याला आपण विकास नाही म्हणू शकत.वाढते शहरीकरण,औद्योगिककरण,रस्ते, विविध प्रकल्प यासाठी अधिकाधिक जंगले ,डोंगर विकासाच्या नावाखाली चिरडत आहोत. त्यामुळे आपली जैवविविधता धोक्यात आली आहे. त्यामुळे हे पर्यावरण टिकवून ठेवायचे असेल तर श्वावत विकासामध्ये पर्यावरण संवर्धनाला आपण प्राधान्य दिले पाहिजे. पर्यावरण टिकवून ठेवणे,वृक्षलागवड, पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर अशाप्रकारे पर्यावरणाशी समतोल साधून विकास साधला पाहिजे.
लोकसंख्या वाढ - हे आजच्या काळातले सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या ही कोणत्याही विकासाला मारकच असते. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवने,मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे कठीण होऊन जाते. लोकसंख्येमुळे गरिबी, बेरोजगारी, भूकबळी यांचेही प्रमाण वाढत जाते किंबहुना वाढती लोकसंख्या ही अनेक समस्यांना निमंत्रण देत असते. यामुळे समस्यांच्या निराकणात मूळ विकास बाजूला राहतो. म्हणून आपल्याला शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणणे फार महत्वाचे आहे.
गरिबी हे विकासाच्या आड येणारे प्रमुख कारण मानले जाते. एकबाजूला आपण विकास साधत असताना दुसऱ्याबाजूला गरिबीचे विदारक चित्र हा विरोधास आज आपल्याला सगळीकडे दिसून येतो. विकासाच्या पायात बेड्या घालायचे काम ही गरिबी करीत असते. गरिबीमुळे चांगले शिक्षण घेता येत नाही. चांगले शिक्षण नाही तर चांगली नोकरी, व्यवसाय या संधी कशा उपलब्ध होणार.? अन्न,वस्त्र,निवारा, आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभुत गोष्टींना महाग असणाऱ्या जनतेचा आज विकासाशी दुरान्वयेही संबंध नाही. त्यामुळे श्वावत विकास जर आपल्याला साधायचा असेल तर गरिबी हटाओ चा नारा आपण पहिल्यांदा दिला पाहिजे. देशातील गरिबी कशी कमी करता येईल,कोणत्या उपाययोजना राबवता येईल याचा अभ्यास केला पाहिजे. गरिबी शिक्षणाच्या आड येऊ नये यासाठी शासनानेही उपक्रम हाती घेतले पाहिजेत. शिक्षणाच्या बळावर गरिबीवर मात करून विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकतो त्यामुळे एकंदरीत गरीब जनता विकासाच्या मुख्य प्रवाहात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण श्वावत विकासाचे ध्येय गाठू शकणार नाही.
ऊर्जास्रोतांचा वापर - आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी विविध ऊर्जास्रोतांचा वापर आपण करत असंतो. पेट्रोल,डिझेल,नैसर्गिक वायू अशा जैविक इंधनाचा वाढता व बेसुमार वापर वाढतचं चालला आहे. सध्या लोकसंख्येच्या समप्रमाणात वाहनांची संख्या पहायला मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात वाहनांचे ही महत्व नाकारता येत नाही. पण या वाढत्या वाहनांच्या इंधनाची गरज भागवताना हे मर्यादित इंधनसाठे संपून जातील की काय अशी भीती संशोधक व्यक्त करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण याचा गांभीर्याने विचार करून पर्यायी ऊर्जास्रोतांच्या निर्मितीवर भर दिला पाहिजे. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवून पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर कमी केला पाहिजे.
प्रदूषण - विज्ञानाच्या सहाय्याने आपण प्रगती करीत असताना दुसऱ्याबाजूला अनेक सामाजिक समस्या देखील निर्माण करत आहोत. वायू,जल आणि ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. विकासाच्या नावाखाली आपण आपली नैसर्गिक संसाधने धोक्यात आणत आहोत. सांडपाणी, कंपन्यांचे कारखान्यांचे मळमिश्रीत पाणी आपण जलाशयात सोडतो त्यामुळे जलप्रदूषण होत आहे, वाहने,कारखाने,युद्धात वापरली जाणारी स्फोटके यामुळे वायू प्रदूषणात वाढ होत आहे. किंबहुना हवेत कार्बनचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीसारखी अवघ्या जगाला भेडसावणारी समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यामुळे प्रदूषण रोखणे त्यावर उपाययोजना करणे आणि किंबहुना प्रदूषण कसे कमी करता येईल आणि जास्तीत जास्त प्रदूषण कसे टाळता येईल यावर येणाऱ्या काळात विज्ञानाच्या सहाय्याने संशोधन होणे गरजेचे आहे.
ई कचरा - आजचे युग हे डिजिटल युग आहे असं आपण म्हणतो.माहिती तंत्रज्ञानाने क्रांती केली. आणि एक सगळं जग एका क्लिकवर आलं.आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. म्हणजे मोबाईल,संगणक, टी. व्ही. अशी आणि अशाप्रकारची अनेक साधने आपली अत्यावश्यक गरज बनली आहेत. त्यामुळे अशा साधानांचा वापर वाढला आहे पण नकळतपणे आता आधीच्याच कचऱ्याचा निचरा होण्याऐवजी आता त्यात ई- कचऱ्याची भर पडत चालली आहे. हे कोणाच्याही लक्षात येत नाही.आणि मुख्यत्वेकरून अजून तरी यावर म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे ई कचऱ्याचा निचरा करायचा असेल तर त्याचा पूणर्वापर करा या अभियानावर भर दिला पाहिजे.
आरोग्य - विज्ञानाच्या माध्यमातून आज आपण सर्व सुखसोयी निर्माण केल्या. वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की आज एका व्यक्तीचे हृदय दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपीत करता येते. सर्व प्रकारच्या आजारांवर आज आपण उपचार पद्धती शोधून काढत आहोत. पण मुळात आरोग्य धोक्यात येण्याची कारणे तपासून पाहिली तर सध्या शेतात रासायनिक खतांचा वाढलेला बेसुमार वापर. आपण शेतपीक पिकवतो त्या अशा रासायनिक खतांचा, वेगवेगळ्या औषधांचा वापर करून. त्यामुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस नष्ट होत चालली,कसदार अन्न आज मिळेनासे झालेय,केमिकल युक्त फळे अन्न पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. म्हणजे नैसर्गिक आणि सात्विक आहार आपल्यापासून दूर होऊन त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे हे सर्व लक्षात घेऊन अशा गोष्टींचा आपल्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होत आहे याचा विचार केला पाहिजे. उपचाराच्या अगोदर मुळात आपले आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण विज्ञानाच्या सहाय्याने आपण निर्माण केलेल्या सुख सोयी,विकास जर आपल्याला उपभोगायचा असेल तर आपले आरोग्यही तितके चांगले असणे आवश्यक आहे.
असं म्हटलं जातं, "विज्ञानाने दिले आम्हांला शक्तीचे वरदान कातर डोळे असून आम्हीं झालो अंध समान" विज्ञानाने आपण बरीच प्रगती,विकास साधला परंतु तो साधत असताना काही चुकाही होत गेल्या. त्या चुकाकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. त्या चुका टाळून सुधारून नवा विकास नवा ध्यास या संकल्पनेतून श्वावत विकासाकडे मोठ्या आशेने आपण पहात आहोत. असा विकास की जो चिरंतन चिरकाळ टिकू शकेल. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे निरंतर प्रवाहित होऊ शकेल. म्हणून आज आपल्या मूलभूत विज्ञानासमोरील आव्हाने ओळखून ती दूर करण्याचा प्रयत्न करताना सर्व शक्यतां तपासून पाहिल्या पाहिजेत. तरंच आज आज मुलभूत विज्ञानाच्या पायावर उद्याच्या सुंदर,सर्वांगीण मूळ श्वावत विकासाचा कळस गाठू शकतो.
- किरण सुभाष चव्हाण.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा