कोणता झेंडा घेऊ हाती. ?
कोणता झेंडा घेऊ हाती. ?
देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात झेंड्याला अनन्यसाधारण महत्व आहे.विशेषतः महाराष्ट्रात शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाची मेढ रोवली.. आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन अवघ्या वारकऱ्यांची मांदियाळी एकत्रित आणिली...शेकडो वर्षे खांदेपालट करून आजही वारकऱ्यांच्या खांद्यावरून ही भगवी पताका डौलाने पंढरपूरला जाते..म्हणजे आजही या वारकऱ्यांना एकत्रित गुंफण्याचं काम या भगव्याने केले आहे. मंदिरांच्या कळसावर असो अथवा वारकऱ्यांच्या खांद्यावर असो या भगव्या झेंड्याच्या मुळाशी अध्यात्माचा पाया रचला गेलेला आहे. या महाराष्ट्रात एकीकडे अध्यात्म आणि दुसरीकडे स्वराज्य हे दोन प्रवाह भगव्या झेंड्याच्या निशाणीने कालोघात प्रवाहित होत राहीले.
झेंडा म्हणजे एकेकाळी आपल्या अस्मितेचं,निष्ठेचं आणि समर्पणाचं प्रतिक होतं.धगधगत्या तेजस्वी ओजस्वी कर्तृत्वाचा ताठ बाणा म्हणजे झेंडा..उंच आस्मानी भिरभिरत्या वाऱ्यावर अभिमानाने फडफडणारा झेंडा म्हणजे अवघ्या मुलुखमैदानाची शान...आपल्या मातीची आणि माणसांची आण, बाण, शान राखणारा झेंडा म्हणजे छातीत ठासून अभिमान भरण्याचा आणि उभा राहण्याचा असा स्वातंत्र्याचा सुवर्णकाळ ...ताठ मानेने आणि निर्धास्तपणे जगण्याचा सोहळा साजरा करावा तर या झेंड्याच्या आसऱ्याखाली. पहाटेच्या फुटलेल्या पहिल्या गोंड्याच्या धारधार किरणांचा वार झेलावा तो आस्मानीच्या झेंड्याने. झेंडा चेतवतो स्फुल्लिंग अंगात..फुलवतो अंगार रोमारोमात...तोच रणांगणावरती लढण्याचं बळ देतो...तोच मरणाला कवटाळण्याचं धाडस देतो..फुरफुरणाऱ्या घोड्यांच्या पाठीवर स्वार होऊन फडफडत हा झेंडा एकेकाळी अवघा मुलुख पादाक्रांत करत अटकेपार गेला.. आणि अवघं साम्राज्य कवेत घेत आपलं प्रजापती छत्र प्रस्थापित केलं...याचं झेंड्याने दूर दूरवरच्या साम्राज्यावर आपली मदार ठेवली... दऱ्या खोऱ्यांवर आपली नजर ठेवली..इथल्या झाडाफुलांवर, पशुपक्षांवर , शेताबांधावर आपली छाया ठेवली..इथल्या प्रजेवर माया लावली... तो ताठ मानेने रात्रंदिवस आपल्या मुलुखाचं रक्षण करीत राहिला...
या झेंड्यापायी कित्येकांनी आपली जान नौछावर केली. देव्हाऱ्यातल्या समईतली वात तेवत ठेवावी तशी रणांगणातला झेंडा तळपत ठेवण्यासाठी आमच्या कित्येक मावळ्यांनी जीवाचं रान केलं..जीवाचं दान देऊन झेंड्याची शान राखली... राज.. गडावर भगवा फडकीवल्याशिवाय तोंड दावणार नाही असं म्हणत महाराष्ट्राच्या साडेतीनशे गडावर या दऱ्या खोऱ्यातल्या बाजी,मुरारजी, तान्हाजी अशा सरदारांनी आणि लाखो मावळ्यांनी आपला झेंडा उरावर घेत शत्रूची दाणादाण उडवत झेंडा फडकवत ठेवला....प्रसंगी प्राणाला मुकले पण कधी झेंड्याला माती दाखवली नाही...माणसातलं आणि मातीतलं बळ घेऊन उभ्या देहाने तोलामोलाने खडा असणारा धगधगत्या तेजाचा अलंकार म्हणजे झेंडा..
पण काळ बदलला आणि झेंडेपण बदलत गेले...झेंड्यांचे रंग बदलत गेले..झेंड्याखालची माणसं बदलत गेली... प्रत्येकाचा नवा रंग.... नवा झेंडा... झेंड्या प्रमाणे नवा अजेंडा...एकेकाळी मातीची शान मिरवणारा झेंडा आज ज्याच्या त्याच्या मती प्रमाणे निशाण घेऊन फिरू लागलाय. कुणाच्या झेंड्याखाली किती माणसे यावरून त्या झेंड्यांचं महत्व पणाला लागतं..आता गट-तट पक्षानुरूप झेंडे आलेत. जितके पक्ष तितके झेंडे. हल्लीच्या राजकारणात जसा पक्षांचा सुळसुळाट झाला तसे झेंडे माना वर करून वळवळ करू लागलेत.. गर्दीला आपल्याकडे वळवू लागलेत.. आता झेंड्यापायी नाही त्याग करावा लागत.. झेंड्यापायी नाही संघर्ष करावा लागत...झेंड्यापायीची निष्ठा आता राहिलीच आहे कुठं..? ज्याच्यासाठी मरण तळहातावर घेऊन फिरावं असं तो झेंडाच आपला राहिलाय कुठं..?. एकेकाळी एका झेंड्याखाली एकवटणारी माणसं आज अनेक झेंड्यात विभागली गेली. झेंडयांच्या रंगानुसार माणसांनी आपापले रंग धारण केलेत.. प्रत्येकाला आपापला रंग प्रिय....आपाल्या रंगाला मानणारी लोकं प्रिय. तोच आपला समाज. समाजालाही ओळख देणारे नवे झेंडे तयार झालेत. धर्म, जाती पंथ, संप्रदाय नुसार ठरलेले प्रत्येकाचे झेंडे.
एकेकाळी एका झेंड्याखाली एकवटणारी माणसं आज अनेक झेंड्यात विभागली गेली. झेंड्यांविषयीच्या नात्याची आणि नेत्यांचीही आता नीती बदलली.आपापल्या मर्जीनुसार, आणि सोयीनुसार लोक पक्ष बदलू लागले..झेंडे बदलू लागलेत. आपल्या स्वार्थानुसार झेंड्याचे रंग धारण करू लागलेत. झेंडयांच्या मुळाशी आता राजकारण आणि अजेंड्यावर सत्ताकारण ठरलेलं असतं.. सध्याच्या राजकारणात सत्ता,पद, पैसा,प्रतिष्ठा यारून झेंडे निवडले जातात आणि मग हेच झेंडे खांद्यावरून वाहिले जातात..पहिल्यासारखी झेंड्या विषयीची अस्मिता राहिलीच आहे कुणाच्या उरात ? जिकडं सत्ता,पद, पैसा तिकडं चांगभलं म्हणणारी सत्ता पिपासू लोक एका रात्रीत आपला झेंडा बदलतात. सत्तेत राहून घोटाळे करायचे आणि ई. डी (ED) च्या धाकाने झेंडे बदलायचे आणि झेंड्याच्या आडोशाने भ्रष्टाचार खपवायचे आता अशीच रीत झाली आहे.. आता रस्त्या रस्त्यावरून, फ्लेक्सवर, गाड्यावर चिकटवले जाताहेत अनेक प्रकारचे झेंडे...माणसांच्या मनात आपली प्रतिमा ठसवण्यासाठी... प्रतिष्ठा वाढविण्यासाठी..जणू विविधांगी विविधरंगी झेंड्यानी व्यापून टाकलाय प्रत्येक माणूस गल्ली ,गाव , शहर , राज्य आणि देश...
दर पाच वर्षांनी गल्लीबोळात पाहायला मिळतो याच झेंड्यांचा सुळसुळाट...मिरवतात झेंडे गल्लोगल्ली, दारोदारी...केला जातो प्रचार प्रसार खिशाला लावून झेंडे आणि घातली जातात माणसे खिशात. एकेकाळी झेंड्यासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवून आत्मसमर्पण देणारी माणसं कुठं आई आणि आज झेंड्यांच्या जीवावर आपलं घर भरणारी माणसं कुठं...? आजच्या राजकारणात झेंडा म्हणजे धन मिळवणारं साधन झालाय. झेंड्याखाली लोकांची गर्दी जमवणं आणि गर्दीवर आपलं वर्चस्व गाजवणं हेच चित्र पहायला मिळतं. याच झेंड्याच्या साक्षीनं दिली जातात नवनवी आश्वासनं...बेरोजगारी,गरिबी महागाई, नोकरी या मुद्यावरून घातला जातो हात लोकांच्या प्रश्नांना... मागितलं जातं मतांचं दान.. आणि मग हेच लोक देतील आपल्याला जीवदान म्हणून भोळी जनता घेते त्यांचा झेंडा खांद्यावर पुन्हा.. आपल्याच माणसांत आपल्याच दाराघरात गल्लीगावात झेंड्याच्या नावाखाली पाडले जातात गट- तट आणि मग सुरू होते टोकदार ईर्षा, चढाओढ झेंड्या - झेंड्याच्यामध्ये.. मी मोठा की तू मोठा...कोण गहाण कोण महान...कोण सज्जन कोण दुर्जन...काढली जातात उनीदुणी...जुंपली जातात भांडणं... आणि मग शेवटी त्याच झेंड्यांचे दांडे काढून फोडली जातात डोकी एकमेकांची...कुणासाठी कोण भांडतो हेच माहिती नसतं कुणाला..? झेंड्याच्या राजकारणात नुसती सामान्य माणसांची होत राहते चिरफाड...एक काळ असा होता झेंडा उंचावण्यासाठी धडपडत असायची आता झेंडा खाली खेचण्यासाठी धडपड सुरू असते...कुणाचा झेंडा किती खाली खेचला यावरून तो विजयी ठरतो.
पहिल्यासारखे घोड्याच्या पाठीवर स्वार होऊन हाती झेंडा घेऊन लढाईला जाणारे वीर आता नामशेष झालेत. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा गुलाल उधळायचा झाला तरी आजच्या तरुणाईत अशी वीरश्री संचारते की विजयाच्या उन्मादामध्ये गाडीच्या पुंगळ्या काढून झेंडे मिरवले जातात गल्लोगल्लीने..जसा की दिल्लीचा विजय प्राप्त केल्याचा आविर्भाव उतरलेला असतो झोकांडी खात असलेल्या झेंड्यात. दिशाहीन तरुणाईच्या हातात असतोच कुठल्या तरी पक्षाचा झेंडा...हवेत नुसताच भिरभिरणारा झेंडा आणि भरकटलेल्या तरुणाईच्या हातात पोकळ दांडा..
ते देतात आपल्या हातात एखादा झेंडा त्यांच्या निशाणीचा...आणि आपण फिरत राहतो त्याच झेंड्याभोवती वर्षानुवर्षे..परंतु आपल्या हाती काय आलं..? कुणालाच माहिती नसतं.. आपल्या हातात शेवटी झेंड्याच्या दांड्याशिवाय काही नसतं..? मग आमच्या पोरांचे हात फक्त यांच्या झेंड्याचे दांडे धरायला तयार करायचे का..? आणि आजच्या राजकारण्यांचा हा फंडा आमच्या सामान्य जनतेच्या लक्षात येणार आहे का..? ..".मला माझ्याच स्वप्नांची तहान आहे, म्हणून माझा भारत देश महान आहे." अशा आजच्या राजकारणात आणि झेंड्यांच्या या गर्दीत असा एकही झेंडा जवळचा वाटत नाही ज्याच्याशी आपली अस्मिता जोडली जावी, ज्याच्या पायी निष्ठा वाहावी. आणि.एकेकाळी या झेंड्यापायी माणसं मरत होती आता प्रश्न पडतो मनात कोणता झेंडा घेऊ हाती..?
पण एक झेंडा लढता लढता मरण पत्करत ज्यांनी फडकवत ठेवला. या देशाचा वसा आणि वारसा त्याच्या रूपाने आमच्या हाती सोपवला.. या देशासाठी हसत हसत फासावर गेले ते क्रांतीवर भगतसिंग, राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आझाद... ज्यांनी इंग्रजांच्या जुलूमात तून आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली...अनेकांच्या बलिदानातून, त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि या देशात तिरंगा अभिमानाने फडकला... तो तिरंगा जो क्रांतिवीरांच्या बलिदानाचे प्रतीक आहे, देशाच्या शांततेचं प्रतीक आहे , आणि देशाच्या शेती संपन्न समृद्धतेचं प्रतिक आहे असा तो...आजही तितक्याच तेजाने आणि उज्वलतेने देशाचा सन्मान करीत जगात आपली मान उंचावत आहे...त्या झेंड्याच्या पायी आमची भक्ती,शक्ती आणि प्रीती वाहिलेली आहे...हाच झेंडा मला जगण्याचं आणि लढण्याचं बळ देईल..या झेंड्याच्या गर्दीत मी कधी हरवणार नाही... रंगाच्या राजकारणात मी कधी मिसळणार नाही.. आणि उगाचच कुठल्याही झेंड्याचा भार विनाकारण वाहणार नाही...धर्माचा ना पक्षाचा कोणताच झेंडा माझा नाही. एकच झेंडा तोचं माझा मी त्याचा...असा तो माझा प्यारा तिरंगा...मला प्रश्न पडणार नाही कधी... कोणता झेंडा घेऊ हाती...? गरजच काय कुणाचा झेंडा घेण्याची हाती ? एक भारतीय म्हणून तिरंगा असता माझ्या हाती..
गहाण टाकणार नाही हात कुठल्याही झेंड्यासाठी
त्यापेक्षा दान करेन माझे हात फक्त तिरंग्यासाठी
असतील अनेक झेंडे भुलणार नाही रंगा..
हाती असेल सदैव माझा प्राणप्रिय तिरंगा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा