बालग्राम परिवाराच्या भेटीने जुन्या आठवणींना मिळाला उजाळा...
बालग्राम परिवाराच्या भेटीने जुन्या आठवणींना मिळाला उजाळा...
कित्येक वर्षाने आज बालग्राम परिवाराला भेटता आले. इतक्या वर्षाने पाहताना ते जुने दिवस मनात जसेच्या तसे उभारत होते...सगळं कसं बदलत गेलं पण बालग्राम आहे तसं आहे...आठवणीतला जुना ठेवा जपून ठेवावा तसं मायेची ऊब देत बालग्राम अजूनही तिथेच आहे. डी.एड झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात बालग्राम पन्हाळा येथे सहा महिने काम केले.छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनगडावर वास्तव्य करायला भेटणं हा माझ्या आयुष्यातील एक भाग्याचा आणि आनंदाचा काळ होता. बालग्रामसारख्या चिमुकल्या मुलांना मायेचा आधार देऊन माय बापासारखे प्रेम देऊन जपणाऱ्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. मला वाटत माझ्या सामाजिकतेच्या जडणघडणीला इथूनचं सुरुवात झाली...बालग्रामधील ते जुने क्षण ती मायाळू लेकरं आमचा तो एक परिवार होता...किती छान होते ते दिवस..बालग्रामधील त्या आठवणींचा तो सोनेरी काळ माझ्या जीवनातील हळव्या क्षणांच्या आठवणींचं माहेरघरचं झालं होतं जणू...बालग्रामधील आल्हाददायक पहाट असो अथवा ती रमणीय सायंकाळ असो आजही मनावर शांततेच्या समयी राज्य करते. बालग्रामला निरोप दिल्यानंतर आज खूप वर्षांनी बालग्राम परिवाराला आमच्या शाळेच्या स्टाफ सहित भेट देण्याचा योगायोग आला. आणि इतक्या वर्षांनंतर येथील मुलांना भेटून खूप आनंद झाला. बालग्राम संस्थेचे संचालक हावळ काका, अधीक्षक संतोष गायकवाड सर यांच्यासोबत कितीतरी वर्षानंतर प्रत्यक्ष मनमोकळा संवाद साधण्याची आणि चर्चा करण्याची संधी मिळाली. बालग्राममधील त्या वेळेचे आता बरेच जुने विद्यार्थी आता नाहीत परंतु आताच्या विद्यार्थ्यांना जवळून भेटता आले खूप आनंद वाटला मनाला...शेवटी ज्या शांत निरव सायंकाळी मी बालग्रामध्ये मुलांच्यासोबत प्रार्थना घ्यायचो योगायोग अशाच आजच्या सायंकाळी मुलांना बालग्रामवर लिहिलेली प्रार्थना सांगता आली...याचा मनाला एक आनंद आणि समाधान मिळाले. शेवटी आम्हीं जाताना ती लेकरं आमच्या पाया पडत होती. किती संस्कारशील आहेत लेकरं. संतोष सर तर अंतःकरणपूर्वक बालग्राम आणि या मुलांना जपत आहेत. या मुलांची चांगली काळजी घेत आहेत.. त्याचसोबत त्यांच्यावर संस्कारही करत आहेत. बालग्राम आणि मुलांना भेटून आम्हांलाही एक ऊर्जा मिळाली. बालग्राम परिवाराला भेटण्याची संधी दिल्याबद्दल संतोष सर आणि हावळ काका यांचे मनःपूर्वक धन्यवाद..! अशीच बलग्राम परिवाराची आणि लेकरांची भरभराट होवो ह्याच सदिच्छा...!!
- किरण सुभाष चव्हाण.
![]() |
Before |
![]() |
After |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा