🌧️ पावसासाठी भैरीदेवाला जलाभिषेक...
मायमाऊलींच्या भक्तीला मिळाला पावसाचा आशीर्वाद!
आरदाळ : श्रद्धा, भक्ती आणि प्रार्थनेने देवाला घातले साकडे; दुपारीच पावसाने लावली हजेरी...
पावसाने ओढ दिल्याने सर्व जीव व्याकुळ झाले आहेत. आज भर पावसाळ्याच्या दिवसांतही रणरणत्या उन्हाने धरतीमायेला अक्षरशः भाजून काढले आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी, तहानलेली जमीन आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेले रानशिवार अशीच काहीशी अवस्था सगळीकडे बघायला मिळते.
आभाळात अजूनही मायेचे ढग दिसत नाहीत ना जमिनीवर पावसाचा थेंब बरसत आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे.
अखेर गावातील ग्रामस्थांनी आपल्या ग्रामदैवत भैरीदेवाला जलाभिषेक करून पावसासाठी साकडे घालण्याचा संकल्प केला.
आज सकाळी लवकरच गावातील मायमाऊलींनी डोक्यावर पाण्याच्या घागरी घेत भक्तिभावाने भैरीदेव मंदिराकडे प्रस्थान केले. मंदिरात पोहोचल्यानंतर गावचे गुरव श्री. शिवाजी गुरव यांच्या हस्ते भैरीदेवाला जलाभिषेक करण्यात आला. जलाभिषेकाने देवाचा गाभारा पाण्याने भरून गेला.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घंटानाद करत देवाच्या चरणी एकच गाऱ्हाणे घातले...
श्री. शिवाजी गुरव यांनी हे गाऱ्हाणे शब्दांत मांडले....
"हे महाराजा...
पाऊस पाणी पडू दे,
पीक पाणी चांगले येऊ दे,
रानशिवार हिरवेगार होऊ दे,
सगळेजण सुखी आणि समाधानी राहू दे..."
लहान निरागस लेकरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी हात जोडून भैरीदेव महाराजांकडे पावसासाठी प्रार्थना केली. भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाने भरलेल्या या वातावरणात सर्वांनी देवाकडे मनोभावे मागणे मागितले.
आणि देवाची किमया बघा..!
या भक्तीची प्रचिती जणू त्याच दिवशी पाहायला मिळाली. दुपारीच आभाळ दाटून आले आणि पावसाने आरदाळ गावासह परिसरात हजेरी लावली. बराच काळ प्रतीक्षेत असलेल्या धरतीमाईला पावसाच्या सरींनी चिंब भिजवले. रानशिवाराला नवसंजीवनी मिळाली.
श्रद्धेने आणि आत्मीयतेने केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते, असा विश्वास ग्रामस्थांच्या मनात आणखी दृढ झाला. भैरीदेव महाराजांच्या चरणी घातलेल्या साकड्याला मिळालेला हा आशीर्वाद म्हणून ग्रामस्थांनी या क्षणाकडे पाहिले.
🌧️ देवा महाराजा... 🌧️
असाच पाऊस पडू दे,
सगळे रानशिवार चिंब चिंब भिजू दे,
शेतात भरघोस पीक येऊ दे,
आणि सर्वांच्या घरात सुख-समृद्धी नांदू दे...