गांव विकताना पाहिला
दिवसाढवळ्या लोकशाहीचा उदो उदो पाहिला.
आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.
बोल किती द्यायचं पाचशे हजार..दोन हजार मताला.?
अहो तुम्ही द्याल तेवढं मी हायचं की तयार घ्यायला.
तो बघा आताच हजार देऊन गेला तुम्ही किती देताय.?
हे घे दोन हजार त्याच्यापेक्षा डब्बल.
मी काय कमी वाटलो का काय..?
मग उचल भंडारा,घे शपथ,म्हण माझं मत नाही बदलत.
हा बघ उचलला,घेतली शपथ तुझ्या आईच्यान नाही बदलत..
दारू आमची मजा तुमची जाऊ दे गाडी सरळ धाब्यावरती.
खा-प्या भरा पोटं आडवं- तिडवं पण बोट बरोबर बटणावरती.
दारू मटण पैशावरती गांव ताव मारताना पाहिला.
आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.
काय होता इतिहास इथे मातीचा... मातीसाठी माणसांचा.
सारं काही विसरला माणूस क्षणात पैशासाठी बदलला.
आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.
स्वराज्यासाठी,मातीसाठी,राजाच्या एका शब्दासाठी जान कुर्बान करायचीत इथं माणसं.
आणि आता कोण कुठला ,कुणाच्या स्वार्थासाठी आज स्वतःलाच विकायला तयार झालीत माणसं.
भंडारा उचलायचे इथे एकेकाळी हर हर महादेवाच्या घोषात मातीच्या इमानासाठी आमचे जिगरबाज मावळे
आणि आज स्वार्थासाठी देवालाचं गहाण टाकून चोरी छुपे उचलतायत भंडारा बेईमान कावळे.
आयुष्य वेचलं की रे घरादारावर तुळशीपत्र ठेऊन त्या महान लोकांनी या मातीला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
आणि आपल्याचं स्वार्थासाठी निष्ठा विकून तुम्हीं स्वतःला एवढं कवडीमोल होऊ दिलं.
अरे तरुणांनो,तुमच्या वयाचे असताना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फासावर गेलेत या देशासाठी.
का सळसळत नाही असं तुमचं ताजं रक्त निदान गावासाठी तरी?
जिवंतपणीच बांधलं की रे कफन डोक्याला त्यांनी या मातीसाठी.
आणि तुम्हीं कुणाच्या पैशाची बाटली ओठाला लावून तरुण रक्ताला बाटवताय कुणासाठी..?
सत्ताच पाहिजे आहे,गावचा विकास-प्रगती करायची आहे
मग त्यासाठी का तुम्हाला पैशाचा एवढा खेळ करावा लागला..?
आणि पाच वर्षांसाठी लोकांचा विश्वास तुम्हांला विकत घ्यावा लागला ?
घेणाऱ्यांनी आणि देणाऱ्यांनीही बघा कसा सत्तेसाठी घोडेबाजार मांडला.
आणि रात्रीच माझा गांव मी विकताना पाहिला.
दिवसाढवळ्या लोकशाहीचा उदो उदो...
लोकशाही.. लोकशाही.. लोकशाही...
कुठली लोकशाही....?
रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा गळा घोटताना पाहिला
आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.
- किरण सुभाष चव्हाण.
वास्तव.👌
उत्तर द्याहटवाकटू आहे पण अगदी सत्य आहे.very nice