सुगरण पक्षाच्या जीवनाचा वेध घेत पक्षी विश्वात डोकावणारी कादंबरी : कलविण
पक्षी जीवनावर आधारित रामकृष्ण मगदूम लिखित 'कलविण' ही छोटेखानी कादंबरी बसल्या बैठकीत वाचून होणारी मात्र चक्क पक्षी जीवनाचा टिपलेला अचूक वेध मनाला खिळवून ठेवतो. कधी काळी बंदुकीने पाखरं टिपणारे लोकं ते आज त्यांच्या जीवनावर कादंबरी टिपली जाते. याचा अर्थ मानव किती सहृदयी,संवेदनशील आणि स्वतःच्या जगण्यापलीकडचे विश्व समजून घेणारा आहे याची साक्ष ही कादंबरी देते. बयाजी आणि बया या सुगरण आणि सुगरणी जोडप्याचा आणि त्यांच्यासह राहणाऱ्या पक्षांच्या संसारातील संघर्ष ओघवत्या शैलीत मांडलेला आहे. आत्तापर्यंत मानवी जीवनाशी संबंधित कादंबऱ्या वाचनात आल्या परंतु पक्षी जीवनातील ही कादंबरी वाचताना मनात अनेक प्रश्न होते की, कादंबरीचे स्वरूप कल्पकता आणि वास्तवता याचा मेळ लेखकाने कसा घातला असावा ?. पण सुरुवातीला वाचताना आपण अलगद पणे मानवी विश्वातून निसर्गाच्या सानिध्यात पक्षी विश्वात कसे जातो हे कळतही नाही. म्हणजे मानवी मन हे एवढे विलक्षण आहे की जसे पाणी एखाद्या भांड्याचा आकार धारण करते तसे आपले मन हे कोणत्याही जीवाशी म्हणजे प्राणी पक्षांशी समरस होऊ शकते. वाचताना आपण त्या सुगरण पक्षाशी, त्याच्या चाललेल्या संघर्षाशी समरस होऊन जातो. लेखक बयाजी हे मुख्य पात्र घेऊन त्याच्या जीवनाचा आणि त्यांच्या जगण्याचा भोवताल अत्यंत सूक्ष्मपणे मांडत जातो. कादंबरी वाचताना प्रत्येक शब्दगणिक त्या निसर्गाशी आणि पक्षी जीवनाशी एकरूप व्हायला होते. तो निसर्ग ,झाडी झुडपे, वेली बेट ,गवत हाच आपला भोवताल बनून जातो. वाचताना अगदी डोळ्यांत हिरवाई दाटते. विहिरीवरच्या त्या सुगरणींच्या टांगलेल्या खोप्यात आपल्याही मनाचं पाखरू अलगद जाऊन बसतं. कसं असेल आतून खोपा, कसं बागडत असेल आतून ते घरटं, ती चिमणी पिल्लं मन अगदी त्या कल्पनाविश्वात रमून जातं. आणि त्या विश्वास रममाण होण्यास भाग पाडणारे असे कथानक आहे. पक्षी जीवनाचं एक रहस्यमय गूढ कमी अधिक प्रमाणात का असेना साऱ्यांच्याच मनात असतं. त्या गुढमय रहस्याची उकल ही कादंबरी वाचताना होते. पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाचा एक संसार असतो. त्यांचं राहणं, जगणं ,वाढण आणि वाढवणं याचा विलक्षण अनुभव येतो तो अशा कादंबरी वाचनातून.
माणूस काय किंवा पक्षी काय त्याला आपलं घरटं उभा करताना किती कष्ट उपसावे लागतात. विशेषतः सुगरणीचा खोपा हा आपल्यासाठी कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय आहे. सुगरण आणि सुगरणी हे जोडपं एकत्र येण्यासाठी खोपा हे त्यांच्या जवळ येण्याचा केंद्रबिंदू आहे. मग आपल्या जोडीदाराणीला आपला खोपा आवडावा म्हणून सुगरण पक्षी अपार कष्टातून अव्याहतपणे ते घरटं विणत असतो. कधी नैसर्गिक संकट तर कधी मानवी हस्तक्षेत यातून ते घरटं पुन्हा पुन्हा मोडतं पण तो पक्षी हार न मानता पुन्हा पुन्हा विणतो. कधी झाडावर कधी बेटावर तर कधी विहिरीच्या काठावर अनेक ठिकाणी जागा बदलतो. आणि एक दिवस ते सुंदर घरटं पहायला सुगरणी येतात तिला आवडलं तर ती त्या खोप्यासह त्याला ही स्वीकारते आणि मग त्यांचा संसार सुरू होतो. अंडी उबवण, त्यातून पिल्लांचा जन्म त्यांचं रक्षण करणं आणि त्यांना खाऊ पिऊ घालणं या त्यांच्या दैनंदिन जीवनातील व्यवहारांचं चित्रण लेखकाने सखोलपणे मांडले आहे. पक्षांच्या रोजच्या जगण्यातील संघर्षाचा वेध या ठिकाणी वाचावयास मिळतो. आपल्याला वाटतं की, पक्षांचं जीवन किती स्वछदी आहे. कल्पना विश्वात रमताना आपण सहज म्हणून जातो की, मला जन्म मिळाला तर मला पक्षी व्हायला आवडेल. पण आपण कधीच त्यांचं जीवन जवळून अनुभवलेलं नसतं. त्यांच्याही जीवनात त्यांना किती संघर्ष करावा लागतो. एव्हाना वरवर आपण पक्षीनिरीक्षणा पलीकडे जास्त त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. पण ही कादंबरी वाचल्यानंतर जाणवतं की, आपण पक्षी जीवनापासून किती नामानिराळे आहोत. एखादी व्यक्ती पक्षी जीवनाच्या किती जवळ जाऊन त्यांचं विश्व समजावून घेते. इतकंच नाही तर आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांचं संपूर्ण जगणं आपल्या शब्दाच्या सामर्थ्यावर मांडू शकते.
लेखकाचा पक्षीनिरीक्षणाचा अभ्यास अफाट आहे. निसर्गाच्या सानिध्यातला वावर आणि तिथल्या झाडा, पाना, फुला, फळाशी,वेली,झुडुपाशी, मातीशी लेखकाचे एक घट्ट नाते आहे. म्हणून तर सुगरण पक्षी जशी एकेक वीण आणून आपला खोपा मोठ्या कष्टातून विणतो तसेच एकेका शब्दांतून सखोल आत्मीयतेने त्यांनी ही सुंदर कादंबरी आकाराला आणली आहे.कादंबरी वाचल्यानंतर कळतं यामागे अनेक वर्षांची ही तपश्चर्या आहे. पक्षी विश्व जर आपल्याला जवळून समजावून घ्यायचं असेल तर अवश्य ही कादंबरी वाचली पाहिजे. अशीच लेखन प्रांतातील त्यांची भरारी उंच उंच यशशिखरे पादाक्रांत करो. त्यांच्या हातून नवनवे लेखन स्फुरत जावो आणि वाचकांना वाचायला मिळो. त्यांच्या कलविण या कादंबरीसह भावी लेखन वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा...!!
जय हो...! मंगल हो..!!
किरण सुभाष चव्हाण.
८८०६७३७५२८
पुस्तकासाठी संपर्क :
लेखक- रामकृष्ण मगदूम
प्रकाशक- रावा प्रकाशन, कोल्हापूर.
पृष्ठे-८०
संपर्क मोबा :+919420778963
सुंदर परिक्षण ...
उत्तर द्याहटवा