ज्ञानदानाचं व्रत घेऊन अखंड ज्ञानदान करणारी ज्ञानाई: सौ. आक्काताई शंकर केंगार
गरिबीच्या चुलीपासून ज्ञान मंदिरापर्यंतचा प्रवास
सौ. आक्काताई शंकर केंगार यांचा जन्म वडील श्री.शिवराम दादोबा गेजगे व आई इंदूबाई गेजगे यांच्या पोटी १ जून १९६६ रोजी गंगापूर या ठिकाणी झाला. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची ,घरामध्ये आठरा विश्व दारिद्र्य...त्यावेळी वाजंत्री हा घरचा पारंपरिक व्यवसाय. पण वडिलांचं छत्र अचानक हरपल्यामुळे मायलेकी आईच्या माहेरी म्हणजे गंगापूर या ठिकाणी येऊन राहिल्या. नवऱ्याचं अचानक संसारातून जाणं. पोटाला एक लेक अशा परिस्थितीमध्ये आईने हिम्मत हारली नाही.
तिनं ठरवलं परिस्थितीशी टक्कर देऊन लेकीला शिकवायचं आणि मोठं करायचं. आणि यासाठी या माऊलीचे वडील म्हणजे सौ आक्काताई केंगार यांचे आजोबा श्री.भाऊसो गोपाळ केंगार आणि आजी चंद्रभागा केंगार यांच्या सावलीखाली आणि डोंगरासारखा आधार असणारे एकूण सहा मामा सदाशिव, शंकर, रामचंद्र केंगार हे वाजंत्री म्हणून भागामध्ये प्रसिद्ध कलाकार होते. भजनसम्राट म्हणूनही त्यांची ख्याती होती. तर सतीश,पांडुरंग, शिवाजी केंगार हे तेव्हा नोकरी करत होते. या सहा मामांनी आपल्या एकुलत्या एक लाडक्या भाचीला पोटच्या मुलीचे प्रेम देऊन तिच्या शिक्षणामध्ये आणि पुढील तिच्या वाटचालीमध्ये खूप मोठा वाटा उचलला आणि मग सुरू झाला लहानग्या आक्काताईच्या शिक्षणाचा प्रवास.
आईने लोकांच्या शेतात उन्हातान्हात, पाऊस वाऱ्यात मोलमजुरी केली. राबराब राबली बिचारी आणि तुटपुंज्या येणाऱ्या त्या मोलमजुरीच्या पैशातून लेकीला एकेक इयत्ता शिकवू लागली. कधी उन्हाळ्यात चिखल तुडवून हाताने मातीच्या चुली घडवायच्या आणि त्या गावांगावामध्ये जाऊन गल्लीत उन्हातानाच डोक्यावरती त्या चुली घेऊन हिंडून फिरून विकायच्या आणि येणाऱ्या त्या पैशातून आपल्या लेकीच्या वह्या पुस्तकांची सोय करायची. या संघर्षात सगळ्याच भावांची तिला साथ मिळत होती. यावेळी आक्काताईचा पांडुरंगमामा मिलिटरीमध्ये नोकरीला होता. तो आपल्या बहिण व भाचीसाठी देशाच्या सीमेवरून अधून मधून पन्नास रुपयांची मनी ऑर्डर पाठवून देत असायचा.
गंगापूर येथील प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते सातवी पर्यंत आक्काताई यांचे शिक्षण झाले. त्याच्यानंतर दौलत विद्यामंदिर मडिलगे येथे हायस्कूलचे आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. यावेळी गंगापूर पासून मडीलगेपर्यंत एस.टी ची सोय नव्हती तरीसुद्धा आईच्या उन्हातानातल्या कष्टकरी हाताची जाणीव ठेवून या लेकीने पायी चालत जाऊन अगदी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर तिथून अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी या ठिकाणी प्रवेश घेतला.
दरम्यान १९८७ साली श्री.शंकर केंगार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. परंतु त्यानंतर देखील त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले व पुढे स्पेशल बी.ए.बी.एड ला प्रवेश घेऊन कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी इथून बी.एडचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या या वाटचालीमध्ये आईने तर कष्ट घेतलेचं त्यासोबत त्यांच्या आजी-आजोबांनी आणि सहा मामांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला त्यांना काहीही कमी पडू दिले नाही. अक्काताई यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी जसे माहेरच्या लोकांनी कष्ट घेतले तसेच आपल्या पत्नीला नोकरी लागावी म्हणून पुढील जबाबदारी त्यांचे पती श्री शंकर केंगार यांनी घेतली. त्यासाठी प्रसंगी त्यांनी खेडोपाडी लग्नामध्ये वाजवण्याचे काम केले, रस्त्यावरची खडी फोडली आणि रस्त्यावर डांबर टाकण्याचे सुद्धा त्यांनी काम केले.
आणि शेवटी या सर्वांचे कष्ट फळाला आले ते म्हणजे सर्वप्रथम १९९१ साली इस्लामपूर मधील आदर्श बालक विद्यामंदिर उरुण इस्लामपूर या ठिकाणी एक वर्ष मॅडमांना नोकरीची संधी मिळाली. पण अल्पकाळचं ही नोकरी ठरली. पण पुढे त्यांच्या जीवनात एक अनपेक्षित वळण येणार होते. एकदा कागलमध्ये गीत रामायणचा श्रवणीय असा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला लोकांची प्रचंड गर्दी होती. आणि या गीतरामायणाच्या कार्यक्रमात आक्काताई यांचे मामा श्री.सतीश केंगार हे प्रमुख गायक होते. त्यांच्या सुरमयी गायकीने सर्व कागलकरांना मंत्रमुग्ध केले. तेंव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या श्री. वसंतराव देशपांडे सरांना त्यांचे गायन इतके भावले की त्यांनी आपुलकीने त्यांना बोलावून घेतलं, त्यांची आपुलकीने विचारपूस करून खुप कौतुक केलं.. तेव्हा या मामाने बक्षिसी म्हणून काय मागितला असेल..? ना स्वतःसाठी..ना आपल्या मुलांच्यासाठी.. जे मागितलं ते फक्त आपल्या भाचीसाठी..देशपांडे सरांना ते म्हणाले, "माझ्या भाचीला आपल्या शाळेत नोकरी द्या एवढं दान माझ्या पदरात टाका." आणि ते दान त्यां थोर मनाच्या दातृत्वशील माणसांनी त्यांना देऊन टाकलं... आक्काताईला त्यांच्या शाळेत घ्यायचं त्यांनी कबूल केलं... मग काय इथेच आक्काताईच्या जीवनाच सोनं झालं...सतीश मामांच्या त्या सुरांनी अक्काताईच्या जीवनाचे सुर जुळवून आणले.
श्री वाय.डी माने अण्णा आणि श्री वसंतराव देशपांडे सरांच्या पुढाकाराने दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कसबा सांगाव या शाळेमध्ये आक्काताईंना नोकरीची संधी मिळाली आणि अशा प्रकारे १९९३ साली कसबा सांगाव येथील शाळेत हायस्कूल शिक्षिका म्हणून त्यांच्या नोकरीला सुरुवात झाली.
अशात दोन लेकरं पोटाला होती. संसाराचा गाडा कसा हाकायचा हा प्रश्न होता संघर्ष काही पाठ सोडायला तयार नव्हता .पुन्हा एकदा हा अत्यंत खडतर काळ सुरू झालेला होता. मुलांना ज्ञानदानाचे काम करायचं परंतु हातामध्ये पगार येत नव्हता तरीसुद्धा हार न मानता या दांपत्याने आपल्या विद्यार्थ्यांना निरपेक्ष भावनेने ज्ञानदानाचे काम केले. यावेळी त्यांच्या सासूबाई सखुबाई प्रसंगी सांगावमधल्या लोकांच्या शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करून आपल्या या लेकाच्या कुटुंबाला हातभार लावत होत्या. पोराला शिकवण्यापासून त्याचा संसार उभा करून देण्यापर्यंत त्यांनीही खूप खस्ता खाल्या.
पण आक्काताई यांच्या कष्टाला,जिद्दीला आणि त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या त्यांच्या सर्व कुटुंबाच्या मेहनतीला शेवटी फळ आले आणि १९९४ साली त्यांचा नियमित पगार सुरू झाला. सर्वांना आनंद झाला.
मॅडमांचा स्वभाव अगदी मायाळू, ममत्वाने ओतप्रोत भरलेला आणि संवेदनशील मनाच्या हळव्या अशा मॅडम. आईच्या अंतःकरणाने आपल्या विद्यार्थ्यांना आपलं लेकरू समजून अध्यापन करायच्या. स्टाफमध्ये सर्वांशी मिळून मिसळून राहून सर्वांशी मायेने वागून काम करत राहायच्या. शाळा म्हणजे आपलं दुसरं कुटुंब समजून त्यांनी शाळेचा प्रपंच देखील नीटनेटका केला. ज्या संघर्षातून मी आले , ज्या परिस्थितीतून मी घडले त्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्याही विद्यार्थ्यांनी संघर्षातून,खडतर परिस्थिती,परिश्रमातून आपलं ध्येय गाठलं पाहिजे यासाठी अगदी अंतकरणाने, तळमळीने त्या विद्यार्थ्यांना अध्यापन करायच्या.
या ज्ञानमाऊलीच्या सावलीमध्ये असंख्य विद्यार्थी आजपर्यंत घडले. शिकून लहानाचे मोठे झाले आणि आपापल्या क्षेत्रांमध्ये ते आज कार्यरत आहेत. आज देखील ते विद्यार्थी अतिशय आत्मीयतेने मॅडमची आठवण काढतात, मॅडमांना भेटतात. ज्ञानाच्या संस्काराने घडवणारी या लेकरांची ती शाळेतील आईच होती. मॅडम आणि विद्यार्थ्यांचा हा नात्याचा ओलावा आई व लेकराच्या स्तरावरचा होता.
तेहतीस वर्षांचा अखंडित हा ज्ञानयज्ञ सुरू होता आणि आज ३३ वर्षांची प्रामाणिक, निरपेक्ष,निस्पृह अशी सेवा बजावून ३१ मे २०२६ रोजी मॅडम आपल्या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. सावित्रीबाई फुले यांची ही लेक खऱ्या अर्थाने त्यांच्या शिक्षणाच्या परंपरेतील वारसदार आहे. ज्ञानदानाचं व्रत हाती घेऊन ३३ वर्षे त्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये आपली सेवा बजावली. अर्थातच सत्तर ते नव्वदच्या दशकातला तो काळही मुलींच्या शिक्षणासाठी एवढा अनुकूल नव्हता. मुलींनी चूल आणि मूल सांभाळण्यापर्यंतची मानसिकता समाजातून अजून गेलेली नव्हती. अशा काळामध्ये वाजंत्री समाजातील एक स्त्री पुढे येते. आपल्या आई-वडिलांच्या आणि आपल्या भावांच्या आधाराने आपल्या लेकीला शिकवून शिक्षिका बनवते. खरच धन्य आहे ती माऊली..आणि तिचे कष्ट. .. त्या माऊलीचा आदर्श आजच्या स्त्रियांनी घ्यायला हवा असाच आहे.
मॅडम.... ३३ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहात. लहानपणापासूनच अतिशय कष्टातून घेतलेला शिक्षणाचा ध्यास आणि एकूणच आतापर्यंतचा प्रवास तुमच्या डोळ्यासमोर तरळत असेल ना..? एका मागून एक आठवणी तुमच्या मनाच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत असतील...आणि डोळ्यांच्या कडा आपोआपच पाणावत असतील. आत्तापर्यंत ज्ञानदानाचा हा यज्ञ अखंड तुम्ही तेवत ठेवलात आणि आज ही शाळा , आपले लाडके विद्यार्थी सोडून तुम्हाला आता सेवानिवृत्त व्हावं लागतंय.
परंतु एखाद्या टप्प्यावर आपल्याला सेवानिवृत्त व्हावच लागतं. हा सगळा मांडलेला सारीपाट मागे सोडून आपल्याला पुढे जावंचं लागतं. मॅडम तुम्ही अतिशय आत्मीयतेनं, चांगल्या मनाने आपल्या लेकरांना घडवलात.आपलं घर,आपला संसार सांभाळून तुम्ही शाळेचा देखील प्रपंच सांभाळत अध्यापनाची सेवा पार पाडलात. तुमच्या या अध्यापनातून असंख्य लेकरांची घर उभारलीत. हीच तुमच्या आजपर्यंतच्या कार्याची शिदोरी ,पुण्याई घेऊन आज सेवानिवृत्त होत आहात. आज हा दिवस पाहण्यासाठी तुमची ती कष्टकरी माऊली म्हणजे तुमची आई,तुमचे आजी-आजोबा,तुमच्या सासूबाई आणि तुमचे आज एकच मामा हयात आहेत परंतु आज ते पाच मामाही या ठिकाणी पाहिजे होते. आज तुमच्या सेवापूर्तीच्याक्षणी स्वप्नंपूर्ती झालेल्या त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा आनंदाश्रू वाहिले असते.. आनंदाने ,अभिमानाने त्यांचा उर अगदी भरून आला असता.
आज पर्यंत घर सांभाळत शाळा सांभाळताना तारेवरची कसरत केला असाल ना..? आता सेवानिवृत्तनंतर आपल्या घराकडे पूर्ण लक्ष द्या... नोकरीच्या कालावधीमध्ये आपल्याला काही गोष्टी करता नाही आल्या त्याला संपूर्ण वेळ द्या. स्वतःला आणि कुटुंबाला जपा. आरोग्याची काळजी घ्या, खूप फिरा, जीवनाचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या त्या माहेरामधील लोक.. कदाचित काहीजण या जगामध्ये आज नसतीलही.. परंतु त्यांच्या सहवासाच्या आठवणींचा गंध ज्या मातीत आजही दरवळतोय त्या मातीला भेटून आशीर्वाद घ्या...
तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा...!
जय हो..! मंगल हो..!
किरण सुभाष चव्हाण
मोबा - ८८०६७३७५२८
॥ मानपत्र ॥
प्रति,
सौ. आक्काताई शंकर केंगार
(सेवानिवृत्त शिक्षिका)
आज आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि अखंड ज्ञानदानाची सेवा पूर्ण करून आपण सेवानिवृत्त होत आहात, हा क्षण आम्हा सर्वांसाठी अत्यंत भावूक आणि अभिमानाचा आहे.
गंगेसारख्या गंगापूरच्या मातीत जन्मलेल्या, गरिबीशी झुंज देत, आईच्या कष्टाची जाणीव ठेवून आणि परिस्थितीवर मात करून तुम्ही शिक्षिका झालात. आपल्या माऊलीने मोलमजुरी करून, मातीच्या चुली विकून आणि भावांच्या प्रेमाच्या सावलीत उभे केलेले तुमचे व्यक्तिमत्व, आज हजारो विद्यार्थ्यांना घडवणारी एक 'शाळेतील आई' झाली आहे.
१९९३ साली कसबा सांगाव येथील शाळेत रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत, हिंदी, इतिहास आणि मराठी विषयाच्या अध्यापनातून तुम्ही केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर विद्यार्थ्यांना संघर्षातून ध्येय गाठण्याचे संस्कार दिले. विनाअनुदानित काळातील खडतर आर्थिक परिस्थिती असो किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या, तुम्ही हार मानली नाही. तुमच्या या तळमळीचे, ममत्वाचे आणि संवेदनशीलतेचे प्रतीक म्हणून २०२१ चा जिल्हा परिषद कोल्हापूरचा पुरस्कार आणि २०२५ चा आदर्श शिक्षिका पुरस्कार ही केवळ एक पोचपावती आहे.
तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या तुमच्या आईचे कष्ट, आजी-आजोबांचे आशीर्वाद, सासूबाईचे पाठबळ, मामांचे मार्गदर्शन आणि पतीची साथ, या सर्वांचे फळ म्हणून आज तुम्ही एक यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. आपल्या या ध्येयवेड्या प्रवासात, आपण आपल्या वैभव आणि सागर या दोन्ही पुत्रांनाही उत्तम संस्कारांनी घडवले आहे. वैभवने मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून आणि सागरने आपल्याच पावलांवर पाऊल ठेवून शिक्षक म्हणून समाजात स्वतःला सिद्ध केले आहे.
ज्या शाळेला तुम्ही आपले माहेर मानले, ज्या विद्यार्थ्यांना लेकरांप्रमाणे जपले, त्यांना निरोप देताना आज शाळाही गहिवरलेली आहे. आज सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे असताना, तुम्ही कमावलेली ही पुण्याई, असंख्य लेकरांच्या आयुष्यात पडलेले ज्ञानाचे संस्कार आणि तुमच्या कार्याचा हा अखंड प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
तुमच्या पुढील वाटचालीस, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आम्ही मनःपूर्वक शुभेच्छा देतो. तुमचा पुढील प्रवास सुखमय आणि आनंददायी होवो! हीच प्रार्थना..!
जय हो..! मंगल हो...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा