साधेपणातून समृद्ध आयुष्याची शिकवण देणारा ज्ञानाचा वाटसरू : श्री दशरथ आनंदा अस्वले सर
काही माणसं अत्यंत साधी सरळ निर्मळ मनाची असतात. आणि तीच आपल्याला जास्त भावतात. आपल्या साधेपणाचा चांगुलपणा पेरत ज्यांनी आपल्या आयुष्यात माणसांचा मळा फुलवला... खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी शिकवण देत साने गुरुजींच्या विचारांनी प्रत्येक विद्यार्थी घडवला. असे विद्यार्थीप्रिय शिक्षक ते अजातशत्रू निगर्वी व्यक्तिमत्त्व आदरणीय श्री दशरथ आनंदा अस्वले सर... आज पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने....
निसर्ग संपन्न आजरा तालुक्यातील डोंगर माथ्यावर वसलेल्या चिमणे या छोटेखानी गावात वडील आनंदा अस्वले व आई हौसाबाई या शेतकरी दांपत्याच्या पोटी १४ ऑक्टोबर १९६८ साली दशरथ अस्वले सरांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. पाठीवर एक लहान भाऊ वसंत अशी ही दोन भावंडे. आई वडील शेतकरी. शेतीभातीच्या जीवावरच कुटुंबाची गुजराण चालायची. घरची परिस्थिती तशी बेताचीचं परंतु आई-वडिलांनी सुरुवातीपासून मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. आई-वडिलांच्या निथळत्या घामावर दोन्ही भावाचं शिक्षण सुरू झालं. दशरथ अस्वले सरांचं प्राथमिक शिक्षण शिवराज विद्यालय चिमणे या ठिकाणी पूर्ण झाले. त्या काळात त्यांच्या कोवळ्या मनावर संस्कार करणारे शिक्षक सु.रा देशपांडे, स्नेहलता देशपांडे, धोंडीराम चव्हाण, राजाराम आरदाळकर पांडुरंग कांबळे या गुरुजनांनी अस्वले सरांना प्राथमिक धडे देऊन शिक्षणाचा पाया भक्कम केला.
त्यानंतर माध्यमिक शिक्षण कर्मवीर विद्यालय चिमणे या ठिकाणी पूर्ण केले. यावेळी त्यांना डी.डी कांबळे सर, पी. एन कांबळे सर वाय.एन. देसाई सर, डी.एन शिर्के सर, एम. बी.बिंरबोळे सर, बी,एम.पाटील सर, एम.बी पाटील मॅडम, ढवळे सर यासारखे प्रेमळ व शिस्तप्रिय शिक्षकांनी अस्वले सरांच्या मऊ हळुवार भावनेच्या विद्यार्थ्यांला योग्य आकार दिला.
सरांचा लहानपणापासूनच लाजरा बुजरा आणि खूप भित्रा असा स्वभाव होता.. गंमत म्हणजे शाळेत कुठल्याही मुलीशी बोलायच म्हटलं तर सरांच्या घशाला कोरड पडायची. इतकी धास्ती. शालेय दशेत सरांचे मराठी व इंग्रजीचे हस्ताक्षर टपोर मोत्यासारखे. त्यामुळे हस्ताक्षर स्पर्धेत शाळेत प्रथम क्रमांक ठरलेला असायचा.
लहानपणी आईवडिलांना शेतात मदत करणं, राना- शिवारात जनावरांना चारायला नेणं अशी कामे ते आवडीने करायचे. चिमण्याच्या त्या रांगड्या मातीत खेळत बागडत गल्लीबोळात दारा घरात चिमुकली पाऊले दौडत होतीचं. पण सरांचे बालपण आईच्या माहेरी म्हणजे आरदाळ या गावीही जास्त रमले. तिथेच आजी आजोबा व मामांच्या मायेच्या सहवासात ते राहू लागले. त्यांचे थोरले मामा ज्येष्ठ साहित्यिक सदानंद पुंडपाळ, हरिभाऊ पुंडपळ व शंकर पुंडपळ यांचे प्रेम त्याना मिळालेच पण त्यांच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत तिन्हीं मामांचा मोलाचा वाटा आहे.
पुढे जागृती ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज या ठिकाणी कॉमर्सला प्रवेश घेतला येथे त्यांना प्राध्यापक डॉ.सुभाष शेळके सर, एस आर पाटील सर, महावीर मर्जे सर, जी.एस सुर्वे सर, सुभाष पाटील सर अशा गुरूंच्या मांदियाळीत सरांचे व्यक्तिमत्त्व घडू लागले.. गावाकडचा लाजरा बुजरा मुलगा कॉलेजला गेल्यानंतर मात्र मनातील भीती गळून पडली आणि ते मित्र-मैत्रिणींच्या मध्ये मनमोकळेपणाने वावरू लागले.
शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी मग यशवंत डी एड कॉलेज कोडोली पन्हाळा या ठिकाणी १९८७ ते ८९ याकाळात व्यावसायिक पदवी म्हणजेच डीएडचे शिक्षण पूर्ण केले. अशाप्रकारे शिक्षणाच्या एकेक पायऱ्या पादाक्रांत करत अखेर त्यांनी नोकरीचे यशशिखर गाठले. १ /०८/१९९१ साली सहाय्यक शिक्षक म्हणून प्रथम गुहागर जिल्हा रत्नागिरी येथील कुटगिरी पातीवाडी शाळा नंबर २ या ठिकाणी सरांनी ४ वर्षे ज्ञानदानाची सेवा बजावली तिथून शाहूवाडीतील विद्यामंदिर कांडवण येथे बदली होऊन आले.
या दरम्यान १९९५ साली सर विवाहबद्ध झाले. व सौ संगिता त्यांच्या आयुष्यात सौभाग्यवती बनून आल्या. सरांचा सुखी संसार सुरू झाला. पुढे त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली थोरले चिरंजीव सुशांत आणि घरात ऐश्वर्याची भरभराट घेऊन अली ती कन्या म्हणजे ऐश्वर्या..
पुढे आजरा तालुक्यातील विद्यामंदिर बहिरेवाडी शाळा व त्यानंतर ज्या मातीत सरांची बालपण गेले त्या आजोळमध्ये म्हणजे विद्या मंदिर आरदाळ शाळेमध्ये सुद्धा त्यांना शिकवण्याचे भाग्य मिळाले.
२००४ साली सरांच्या आयुष्यात एक दुःखद घटना त्यांच्या आयुष्यात घडली ती म्हणजे त्यांचे शिक्षक असणारे धाकटे बंधू वसंत अस्वले यांचे अचानक निधन झाले. हा त्यांच्या कुटुंबासाठी अनपेक्षित असा धक्का होता. पण यातून स्वतःला सवलत सरांनी आपल्या आई-वडिलांना आधार दिला.
यानंतर कागल तालुक्यातील शिवाजी विद्यामंदिर मुरगुड, पुन्हा आजरा तालुक्यातील विद्या मंदिर मासेवाडी या ठिकाणी चार वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले व सध्या सुलगाव प्राथमिक शाळेत दोन वर्षे अध्यापन करून आपल्या अखंडित सेवेची पूर्तता करत सर आज सेवानिवृत्त होत आहेत.
ज्ञानदानाची ३५ वर्षांची अखंड सेवा...
आतापर्यंत एकूण सात शाळेत सरांनी अत्यंत प्रामाणिकपणे व तळमळीने ज्ञानदानाचे कार्य केले. आजपर्यंत हजारो विद्यार्थी सरांच्या हातून शिकून अनेक मोठ्या पदावर कार्यरत आहेत. आपल्यासारख्याच शेतकरी सर्वसामान्य कुटूंबातून आलेल्या मुलांच्या घरी ज्ञानाचा दीप सरांनी प्रज्वलित केला. विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेल्या आपल्या लाडक्या सरांना आजही ते विद्यार्थी प्रेमाने भेटायला येतात.
आपल्या शिक्षकी पेशाच्या संपूर्ण सेवाकाळात सरांनी अतिशय प्रामाणिक, निष्कलंक अशी सेवा बजावली. आपली शाळा व आपले विद्यार्थी हे जणू सरांचे दुसरे घरच झाले होते. आपला जास्तीत जास्त वेळ त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी दिला. ज्ञानदानाचे व्रत सांभाळताना त्यांच्या पत्नी सौ संगिता यांची खंबीर साथ सरांना मिळाली.. नावाप्रमाणेच सुशील व संस्कारशील चिरंजीव सुशांत आज उच्च शिक्षण घेऊन आयटी कंपनीत नोकरी करतो. तर कन्या ऐश्वर्याचे बी फार्मसीचे शिक्षण पूर्ण झाले आहे.
आपल्या कुटुंबासारखाच सरांनी आपल्या विद्यार्थ्यांचा, जुन्या नव्या मित्र परिवाराचा गोतावळा अगदी मायेन सांभाळला आहे.
सर जरी कागलला राहत असले, तरी चिमणे या आपल्या गावी आईला ते नेहमी भेटायला येतात, गावातल्या सर्व लोकांशी सरांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कुणाच्या आनंदाचा सोहळा असो किंवा कुणाच्या घरी दुःखाचे सावट असो सर आवर्जून उपस्थित राहतात. सर्वांच्या सुखदुःखात आपलेपणाने सहभागी होतात. कुणाच्या अपरोक्ष अडल्या नडल्या ना आपापल्या परीने मदत करत राहतात.
सरांचा स्वभाव म्हणजे नितळ निर्मळ पाण्यासारखा स्वच्छ. वागण्यात आज्ञाधारक नम्र आणि विनयशीलपणा. सरांना आपल्या मराठी शाळेपासून कॉलेजपर्यंत लाभलेल्या सर्व गुरुजनांची नावे अगदी मुखोद्गत आहेत. हीच खरी गुरूंच्या विषयीची त्यांची कृतज्ञता आहे.
सरांच्या विचारांच्यामध्ये कमालीचा स्वच्छंदीपणा आहे. आपल्याला आवडेल ते करायचे, आवडेल ते खायची आवडेल त्या ठिकाणी फिरायचे अशाप्रकारे खऱ्या अर्थाने मनमुराद जगण्याचं भान सर जपत असतात. जे कोणी भेटतील त्यांच्याशी समरस होणारे, सर्वांशी खेळीमेळीने वागणार, कुठलीही अनौपचारिकता न बाळगता सहज सोप्या भाषेत मनमोकळा संवाद साधत सर्वांना आपलेसे करणारे अस्वले सर म्हणजे सर्वांचा आवडता माणूस.
कोणताही जवळचा माणूस भेटला की, त्यांना पदरचा चहा देण्याची सरांना दांडगी हौस. ज्यांनी सरांच्या सोबत चहाची चव चाखली आहे त्यांनाच खऱ्या अर्थाने सरांच्या गोड स्वभावाचा अनुभव आलेला असेल. अत्यंत साध्या स्वभावामुळे सर आपल्या उभ्या आयुष्यामध्ये पैशापेक्षा माणसाला माणूस जोडत गेले. पैशाच्या श्रीमंती पेक्षा माणसांची श्रीमंती त्यांनी जपली. त्यामुळे त्यांच्या जवळील समाधान हीच सरांची सर्वात मोठी संपत्ती आहे.
पैशापेक्षा माणसांची श्रीमंती जपणारे व्यक्तिमत्त्व!
पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणसांची श्रीमंती त्यांनी जपली. त्यामुळे त्यांच्या जवळील समाधान हीच सरांची सर्वात मोठी संपत्ती आहे.
आजच्या या काळात असे निगर्वी निस्पृह, निराभिमानी निरपेक्ष आणि निष्कलंक व्यक्तिमत्व भेटणं दुर्मिळचं आहे.. कोणत्याही पदाचा त्यांना अभिमान नाही आज ते राजर्षी शाहू शिक्षण मंडळ आरदाळ व हिरण्यकेशी गृहतारण संस्था आजरा या संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. पण कोणत्याही पदाचा साधा लवलेशही त्यांच्या वागण्या बोलण्यातून कधी दिसत नाही. उलट आपल्या संस्थेतील शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा दरवर्षी ते स्वतःच्या खर्चाने सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम करत असतात.
सर आज ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आपण सेवानिवृत्त होत आहात. आई-वडिलांनी कष्टातून दिलेल्या शिक्षणाचे सर तुम्ही चीज केलात आणि असंख्य विद्यार्थी घडवून प्रामाणिकपणे सेवा बजावलात.
आता शाळेतील आमचे प्रेमळ विद्यार्थीप्रिय शिक्षक आता उद्यापासून आपल्याला शिकवण्यासाठी येणार नाही. या भावनेने ती चिमुकली मनं नाराज झाली असतील.. तुमच्या परतीच्या चाहूलीने त्यांच्या डोळ्यांच्या काठावर त्या अश्रूंचे मोती अडून बसले असतील. ती रोजची शाळा देखील सद्गतीत होऊन उभी असेल.
तुम्हालाही आता कागलपासून आजऱ्यापर्यंत येण्यासाठी रोजची धावपळ करावी लागणार नाही. ना मॅडमांना सकाळी लवकर उठून आता डब्यासाठी घाई गडबड करावी लागेल... उद्यापासून घर ते शाळा आणि शाळा ते घर दररोजच्या येरझाऱ्यार्या बंद होतील. आणि घरातच पाऊले अडखळतील.
आपल्या बसचा नेहमीचा प्रवासी कुठे दिसत नाही म्हणून रोजच्या बसच्या ड्रायव्हर कंडक्टरांना सुद्धा कुठेतरी चुकल्यासारखे वाटेल.
आजपर्यंतचा ज्ञानाच्या वाटेवरचा प्रवास, अनुभवाचा सारीपाट आज आपल्या डोळ्यासमोर उभा राहत असेल. दररोजच्या शाळेतील मुलांचा तो भोवतीचा गराडा, सकाळची कोवळ्या सुरतील प्रार्थना, दिवसभरातील कानांवर पडणारा त्यांचा तो किलबिलाट उद्यापासून सगळं काही थांबलेलं असेल... घराच्या चार भिंतीत तो सूर कानात गुंज घालेल.
आता इथून पुढे रोज आठवणींची शाळा तुमच्या मनात भरेल.. जिवाभावाच्या विद्यार्थ्यांचे ते निरागस प्रसन्न चेहरे बंद डोळ्याच्या पडद्याआड रोज उभा राहतील. दिवसभर सोबत असणारे छोट्या भावासारखे असणारे आपले सहकारी शिक्षक कुंभार उद्या पासून सोबत नसतील तेंव्हा चुकल्यासारखं वाटेल... शाळेकडे येता जाता वाटेत गाठ पडून आपुलकीने चौकशी करणारा पालक आता थोडीच दररोज घरी भेटायला येणार आहे...
सेवानिवृत्ती म्हणजे थांबणं नाही...
सेवानिवृत्ती म्हणजे थांबणं नाही तर पुन्हा एका नव्या ऊर्जेने आयुष्याच्या आणखीन एका नव्या पर्वाला सुरुवात करणं...
असो पण सेवानिवृत्ती म्हणजे थांबणं नाही तर पुन्हा एका नव्या ऊर्जेने आयुष्याच्या आणखीन एका नव्या पर्वाला सुरुवात करणं...
आता तुम्हाला वेळेची सोबत असेल. आता फक्त तुम्ही आणि तुमचा वेळ. आतापर्यंतच्या धावपळीत मागे काही राहून गेलं असेल, काही आवडते छंद असतील ते आता पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.
तुमचं बालपण अंगाखांद्यावर घेणारी ती तुमची माती आज तुम्हाला साद घालतेय. त्या गावच्या मातीला भेट द्या आपल्या आईला सांभाळा, कुटुंब, मित्र परिवाराला जास्तीत जास्त वेळ द्या आणि आम्हाला विश्वास आहे की सेवानिवृत्तीनंतरच हे इनिंग तुम्ही आणखीन खूप मनमुराद आणि मनसोक्तपणे तुम्ही जगणारचं आहात...
खूप फिरा जीवनाचा पुन्हा नव्याने आनंद घेत राहा तुमच्या इथून पुढच्या वाटचालीस खूप सार्या शुभेच्छा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा