रविवार, १ नोव्हेंबर, २०२६

शिवरायांच्या सह्याद्रीला अबाधित ठेवूया



 

शिवरायांच्या सह्याद्रीला अबाधित ठेवूया

🌿 निसर्ग संवर्धनाचा एक प्रामाणिक आवाज 🌿
शिवरायांच्या सह्याद्रीला अबाधित ठेवूया

टोरेंट कंपनीच्या ३००० हजार मेगा वॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पासाठी, शासन भीमाशंकर जवळील कर्जत या ठिकाणी जंगलातील सहाशे एकर जमिनीवरील ३२ हजार हुन अधिक झाडांची कत्तल करणार आहे. हे एक उदाहरण झालं पण एका माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार शासन अशा प्रकारचे अजून २३ प्रकल्प सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आणणार आहे. लतावेलींच ,झाडां-झुडपांच,पशु पक्षांचं भरलं गोकुळ नांदणाऱ्या जगलांचं साम्राज्य उध्वस्त करून विकासाच्या नावाखाली प्रकल्पाचं साम्राज्य उभा करत आहे.

कोणत्याही विकासाच्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही, अशा प्रकल्पामुळे अर्थातचं उद्योग निर्माण होतील, लोकांना रोजगार उपलब्ध होईल, दळणवळणाच्या सोयी सुविधा निर्माण होऊन विकासाला चालना मिळेल पण त्यासाठी झाडांच्या मुळावर घाव घालून जंगले नष्ट करून होणारा विकास आम्हाला नको आहे. मानवाच्या विकासासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचे बलिदान का व कशासाठी ?

दुष्काळ तोंडावर आहे, पिकं करपून गेली आहेत. पाण्याची टंचाई आता आवासून उभी आहे. अशात भरीस भर म्हणून हजारो एकरावरची लाखो झाडे तोडण्याचं काम शासन करत आहे. वन विभाग सुद्धा यावर काही हरकत घेताना दिसत नाही. सध्या दुष्काळ पडला आहे त्यासाठी तुमचा कोणताही विकासाचा प्रकल्प आभाळातून पाऊस पाडू शकत नाही पण ज्यांच्यामुळे पाऊस पडतो त्या खऱ्या अर्थाने जीवन जगवण्याऱ्या प्रकल्पाचे मॉडेल म्हणजे ही झाडे आहेत हे आपण का विसरत आहोत ?

तुम्ही म्हणता की हे पर्यावरण पूरक प्रकल्प आहेत. पण एकीकडे शतकानुशतके अधिवास असलेली नैसर्गिक साधनसंपदा नष्ट करून दुसऱ्या बाजूला असे पर्यावरण पूरक प्रकल्प उभा राहत असतील तर अशा प्रकल्पांना पर्यावरण पूरक प्रकल्प म्हणायचे का ? पर्यावरण पूरक विकास कशाला म्हणतात,ज्यात फक्त मानवाच्या कल्याणाचा नाही तर त्यामध्ये सर्व सजीव सृष्टीचा विचार केला जातो. एकीकडे मानवासाठी विकास उभा करताना जंगले भकास करावी यात कसला आला आहे विकास ?

भीमाशंकरच्या या जंगलात शेकडो वर्षापासून अस्तित्वात असलेली स्थानिक प्रजातीची हिरडा,बेहडा,आंबा,जांभूळ ,अंजनी, साग आणि दुर्मिळ वनस्पती तोडली जात आहेत तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्य प्राणी शेकरू, बिबट्या, भेकर, उदमांजर, ठेकडे (खार) आणि अनेक याव्यतिरिक्त, तिथे शेकडो दुर्मीळ पक्षी आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण कीटकांचा नैसर्गिक अधिवास असणारे समृद्ध असे हे जंगल आहे. मग आपल्या मानवाच्या विकासासाठी या समृद्धपणावरच आपण घाव घालणार आहोत का ? त्या रानावनातल्या त्या दऱ्याखोऱ्यातल्या निष्पाप पशु पक्षांची, झाडां माडांची घरं उजाड करून त्यांचा शाप घेऊन आम्हाला आमच्या घरात प्रकाशाची दिवाळी नाही साजरी करायची.

एकेकाळी याच सह्याद्रीच्या घनदाट जंगलाने आमच्या शिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण केले. याच सह्याद्रीच्या घनदाट जंगलाचा आधार घेत आमच्या राजाने गनिमी काव्याने शत्रूंची पळता भुई थोडी केली. इतिहासात या सह्याद्रीने आपली घट्ट छाती पुढे करून पर मूलखातल्या शत्रूंशी मुकाबला केला पण दुर्दैवाने आज याच सह्याद्रीला वाचवण्यासाठी आपल्याला स्वकीयांशी लढण्याची वेळ आलेली आहे. एकेकाळी ज्या सह्याद्रीने आमच्या माणसाचं रक्षण केलं. तीच माणसं पण आता या सह्याद्रीला घनदाट हिरवाईला कुरतडायला चालली आहेत.

स्वीडन मधील ग्रेटा थुनबर्ग नावाची एक चिमुरडी वयाच्या पंधराव्या वर्षी देशातील पर्यावरण वाचवण्यासाठी जर आंदोलन करत असेल, तर आपल्यालाही आता गप्प बसून चालणार नाही. सर्वांना भरभरून देणाऱ्या निसर्गासाठी आता तरी आपण एक पाऊल पुढं येणं गरजेचं आहे.

आज या महाराष्ट्रातील सह्याद्रीला तथापी भीमाशंकरचे जंगल वाचवण्यासाठी या सह्याद्रीच्या कुशीतील शिवरायांचा प्रत्येक मावळा इथल्या प्रत्येक पशुपक्षी,प्राणी, लतावेली, झाडे वाचवण्यासाठी सज्ज असेल. आमचा निर्धार पक्का आहे प्रत्येक झाडावर कुऱ्हाडी चालवण्याच्या अगोदर तुम्हाला आमच्या धडावर कुऱ्हाडी चालवाव्या लागतील. आम्ही आता मागे हटणार नाही आमच्या सह्याद्रीची ही हिरवाई जपून ठेवण्यासाठी प्राणपणाने लढत राहू. प्रसंगी तुमच्या जेसीबीच्या फाळाला टक्कर देण्यासाठी छातीची ढाल करून आम्ही उभे राहू.

झाडं देत राहतात, त्यांची देण्याची परंपरा आहे. अहो त्यांना दगड मारलात तर त्या बदल्यात तुम्हाला ती फळंच देतील. स्वतः उन्हाच्या झळा सोसून तुम्हाला सावली देतील. ही त्यांची देण्याची संस्कृती आहे. माणूस देत मात्र काही नाही उलट घेत सुटला आहे इतका की, स्वतःच्या स्वार्थासाठी तो निसर्गाला ओरबाडत आहे.. त्या झाडांच्यासारखं देता येत नसलं तरी निदान घेताना तरी आपली मर्यादा आपण सांभाळून राहिलं पाहिजे. हा निसर्ग फक्त माणसासाठी नाही तर इथल्या प्रत्येक सजीवांच्यासाठी आहे हे आपण विसरून चालणार नाही.

झाडे आपला पाय रोवून आपल्या जागेवर उभी आहेत शतकानुशतके, आपल्या अगोदरपासून. त्यांनी कधीच कुठल्या सीमा ओलांडल्या नाहीत..आपणच रस्ते, धरणे, प्रकल्प अशा विकासाच्या नावाखाली त्यांच्या कत्तली करत जंगला - जंगलात घुसखोरी करत आहोत. आता जंगली प्राणी आपल्या घरा ,दारात, गाव, शहरात दिसतात म्हणून तक्रार करतो पण ते आपल्या घरात येत नाहीत तर आपण त्यांच्या राज्यात आपली गावे ,शहरे वसवली आहेत.

झाडं मुकी असतात, ती बोलत नाहीत प्रतिकार करू शकत नाहीत, आपल्या कत्तलीच्या अन्यायाची दाद ती बिचारी मागणार कुठे.? म्हणून का आपण हा जंगलांचा ऱ्हास घडवत आहोत ?

सह्याद्री ,भीमाशंकर वाचला पाहिजे यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून आवाज घुमत राहीला पाहिजे. एकेका निष्पाप झाडांसाठी आता माणसांनी पुढे आले पाहिजे.

स्वराज्याच्या रक्षणासाठी हाच सह्याद्री जसा धावून आला होता. आता गरज आहे त्याच्या रक्षणासाठी आपल्याला धावून जाण्याची. चला सर्वांनी पुढे येऊया आपल्या शिवरायांच्या सह्याद्रीला अबाधित ठेऊया.

✍️ लेखक
किरण सुभाष चव्हाण
📞 मोबा - ८८०६७३७५२८
🌳 निसर्ग वाचवा • सह्याद्री वाचवा • जीवन वाचवा 🌳

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मातीशी नाळ जपणारा, उपेक्षितांच्या जगण्याला शब्द देणारा अस्सल ग्रामीण साहित्यिक! डॉ. राजन गवस | जन्मदिन विशेष

  कथामय मराठी कथा प्रस्तुत मातीशी नाळ जपणारा, उपेक्षितांच्या जगण्याला शब्द देणारा अस्सल ग्रामीण साहित्यिक! साहित्यि...