सेवागौरव विशेषांक
❝ देव्हाऱ्यात जशी एखादी समई शांतपणे तेवत असते... कुणी तिच्याकडे बघो अथवा न बघो, तिचं तेवत राहणं सदैव चालू असतं. आपल्या तेवण्याने ती केवळ देव्हाऱ्यालाच नव्हे, तर संपूर्ण घराला मांगल्याचा आणि पावित्र्याचा प्रकाश देत असते. अशीच काही माणसं असतात जी आयुष्यभर प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून, सदैव तेवत राहतात आणि आपल्या कर्तृत्वाने समाज अन् राष्ट्राला प्रकाश देत असतात... ❞
अशाच एका शांत, निगर्वी, मितभाषी आणि अखंडित सेवेचा कर्तव्यनिष्ठ कर्मयोगी व्यक्तिमत्त्वाच्या सन्मानार्थ हा 'सेवागौरव विशेषांक' शब्दांकित करताना मनापासून अभिमान वाटत आहे.
भारतीय डाक विभागातील तब्बल ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्कलंक आणि आदर्श सेवेनंतर डेप्युटी पोस्ट मास्टर उच्च श्रेणी-२ (मुख्य डाकघर, कोल्हापूर) पदावरून सेवानिवृत्त होत असलेले आदरणीय श्री. अशोक राजाराम चव्हाण (दादाश्री) यांच्या जीवनकार्याचा, कर्तव्यनिष्ठेचा आणि समर्पित सेवाभावाचा गौरव करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे.
३५ वर्षांचा हा सेवाकाळ म्हणजे केवळ एका शासकीय नोकरीचा प्रवास नाही, तर तो एका व्रतस्थ कर्मयोग्याने अखंडपणे चालविलेला कर्तव्ययज्ञ आहे.
कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांचा आदर्श जपणाऱ्या
श्री. अशोक राजाराम चव्हाण (दादाश्री) यांच्या प्रदीर्घ सेवेला
हा 'सेवागौरव विशेषांक' कृतज्ञतापूर्वक समर्पित.
पोस्ट ऑफिस मधमधील ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आज आपण सेवानिवृत्त होत आहात, यानिमित्ताने आपल्या जीवन कार्याचा हा शब्द प्रपंच आपणास विनम्र सादर...!
अखंडित सेवेचा कर्तव्यनिष्ठ कर्मयोगी श्री.अशोक राजाराम चव्हाण यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने
देव्हाऱ्यात जशी एखादी समई शांतपणे तेवत असते कुणी तिच्याकडे बघो अथवा न बघो तिचं तेवत राहणं सदैव चालू असतं. आपल्या तेवण्याने ती देव्हाऱ्यालाच नव्हे तर संपूर्ण घराला मांगल्याचा, पावित्र्याचा प्रकाश देत असते. अशीच काही माणसं असतात जी सदैव तेवत राहून आपले कार्य करत असतात. आणि असंच एक शांत मनाचं, मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री.अशोक राजाराम चव्हाण आज आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून डेप्युटी पोस्ट मास्टर उच्च श्रेणी २ पदावरून मुख्य डाकघर कोल्हापूर येथून सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने..
पांगिरे या छोटेखानी गावात वडील राजाराम गोपाळ चव्हाण व आई नानुबाई राजाराम चव्हाण यांच्या पोटी १ जून १९६६ रोजी त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच. सुरुवातीच्या काळात वडील मुंबई गिरणी कामगार म्हणून मुबंईमध्ये कामाला होते पण पुढे गिरणी बंद पडल्या व त्यानंतर त्यांनी गावी येऊन आपला पारंपरिक चप्पल व्यवसाय करू लागले. घरी चार भावंडात थोरला मुलगा या नात्याने घरची जबाबदारी आपसुकच अशोक चव्हाण यांच्यावर येऊन पडली. पण स्वतःच्या शिक्षणाबरोबरच तीन भावंडांच्या शिक्षणाची ही त्यांनी तेवढीच काळजी घेतली.
सुरुवातीपासूनच शाळेत हुशार, सर्वांशी प्रेमाने वागणारे अतिशय शांत आणि मितभाषी व्यक्तिमत्व. आज्जी कमळाबाई, आई वडील आणि मुंबईचे त्यांचे चुलते हिरालाल आण्णा यांच्या छत्रछायेखाली ते लहानाचे मोठे झाले...त्यांच्या प्रेमळ छायेत त्यांच्या संस्कारांची जडणघडण होत गेली. त्यांचे प्राथमिक शिक्षण पांगिरे येथील विद्या मंदिर मराठी शाळेमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर श्री लक्ष्मी विद्यालय हसुर खुर्द या ठिकाणी हायस्कूलचे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. व पुढील शिक्षणासाठी त्यांनी गारगोटी मधील कर्मवीर हिरे कॉलेज या ठिकाणी प्रवेश घेऊन १९८९ साली अर्थशास्त्र विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. जेंव्हा नोकरी नव्हती तेंव्हा शिवण यंत्रावर कपडे शिवण्याचे कामही त्यांनी केले.
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एम,ए साठी देवचंद कॉलेज निपाणी येथे प्रवेश घेत असतानाच... त्या काळी नव्वदच्या दशकात एका वर्तमानपत्रात पोस्ट ऑफिसमधील एका पदासाठी जाहिरात झळकली...आणि या जाहिरातीने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातुन पोस्टल असिस्टंट या पदासाठी अनुसूचित जाती मधून एकच जागा भरायची होती. नोकरीसाठी अर्ज करायचा की नाही अशी संधिग्धता मनात असताना त्यांनी सहजच या पदासाठी अर्ज केला आणि आश्चर्य म्हणजे बारावीचे गुण प्लस पदवीचे दहा टक्के गुण अशा गुणवत्तेच्या आधारावर कोल्हापूर जिल्ह्यातुन श्री अशोक चव्हाण यांची पोस्टल असिस्टंट या पदावर नियुक्ती झाली. खरंच हा आमच्या सर्वांसाठी अभिमानाचा सुवर्णक्षण होता.
अशाप्रकारे सर्वप्रथम १९९१ साली ट्रेनिंगच्या कालावधीत गारगोटी पोस्ट ऑफिस येथे प्रथम पदभार सांभाळला. १६ जून १९९२ साली भोगावती परिते येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल असिस्टंट या पदापासून त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. दर चार वर्षांनी बदली ठरलेली असते त्याप्रमाणे पुढे कामाच्या निमित्ताने गारगोटी ,कोडोली, बावड्यातील हेड ऑफिस, मार्केट यार्ड तिथून गांधी नगर,गोकुळ शिरगाव,इचलकरंजी ,कोल्हापूरातील शुक्रवार पेठ, पुन्हा मार्केट यार्ड,आंबेवाडी आणि सध्या कोल्हापूर हेड ऑफिसमध्ये प्रमोशन होऊन डेप्युटी पोस्ट मास्टर पदावरून निवृत्त होत आहेत. असा बदलीचा आणि कामाचा एकूण प्रवास राहिलेला आहे.
घरातून सकाळी नऊ बाहेर पडल्यानंतर ऑफिस मध्ये जायचे ते रात्री सात तरी कधी आठला घरी परतायचे..तन-मन अर्पण करून त्यांनी अतिशय समर्पित भावाने आपले कार्य सुरू ठेवले. ऑफिसची वेळ त्यांनी कधी चुकवली नाही. वक्तशीरपणा हा त्यांची अंगी भिनलेला गुणच. कधीही आपल्या कार्यामध्ये खंड पाडला नाही,कधीही कोणत्या कारणास्तव अनावश्यक रजा घेतली नाही. आपले काम भलं आणि आपण अशा पद्धतीने त्यांनी आपले काम सुरू ठेवले. त्यांच्या जीवनातील सगळ्यात प्रिय कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे आपले काम. त्यांचे हे काम आपल्या राष्ट्राला,सर्वसामान्य लोकांना समर्पित होते. म्हणजे एका अर्थाने राष्ट्र सेवा करण्याच्या कर्तव्यात त्यांनी कधीच कसूर केली नाही.
ग्राहक सेवा हीच ईश्वरसेवा... आपल्या ग्राहकांना प्रामाणिकपणे सेवा दिली.. ग्राहक म्हणजे त्यांच्यासाठी दैवतचं. ग्राहक सेवा हीच ईश्वरसेवा त्यांनी मानली. म्हणून तर त्यांच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक त्यांच्या कामाबद्दल समाधानी असायचा. आपल्या सहकाऱ्यांशी मिळून मिसळून सर्वांशी प्रेमाने वागत आपले काम करत राहिले. त्यांच्या या प्रामाणिक कार्याची पोचपावती म्हणून २०२१ साली जिल्ह्यातुन Best Employee Of The Year award ने इंडियन पोस्ट कडून सन्मानित करण्यात आले.
त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय शांत,निगर्वी,निस्पृह आणि मितभाषी. मोजकेच शब्द बोलतात पण त्यांचे ते अनुभवाचे बोल असतात. ऑफिसमधले सहकारी असोत किंवा आपले ग्राहक सर्वांशी नम्रपणे सुसंवाद ठरलेला. कुटूंबात सर्वांशी मायेने वागणारे,आपुलकीने विचारपूस करणारे आणि, वेळात वेळ काढून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे वडीलकीच्या अनुभवाचे व्यक्तिमत्व..
चव्हाण परिवारामध्ये एक आदर्श कुटुंब म्हणून श्री.अशोक चव्हाण यांच्या संपूर्ण कुटुंबाकडे बघितले जाते. आणि यांचे कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबात असलेली आईवडिलांची सेवा करण्याची परंपरा... आईवडिलांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. . आई वडील कोल्हापूर मध्ये येथे येऊन त्यांच्याकडे राहायचे. नोकरी सांभाळत त्यांनी व वहिनींनी आईवडिलांची सेवा केली. खरंतर चौघाही भावंडांनी अतिशय मनापासून आपल्या आई वडिलांची शेवटपर्यंत सेवा केली.
आम्हीं तर लहानपणापासून त्यांना अशोकदादा या नावाने प्रेमाने हाक मारतो..आणि ते आमच्या सर्व चव्हाण परिवाराचे वडीलधारी 'दादाश्री' आहेतच. आमच्या लहानपणापासून आम्हांला त्यांचा खूप अभिमान वाटतो की आमचे अशोक दादा पोस्ट ऑफिस मध्ये एका मोठ्या पदावर काम करतात.आमच्या घरात अस सांगितले जायचं की, .माणूस असाва तर अशोक दादांच्या सारखा. खूप शिकायचे आणि अशोक दादांच्या सारखे व्हायचे हा धडा आम्हाला लहानपणी त्यांच्याकडे बघून आम्हाला मिळत आलेला आहे..
भावंडांचे आदर्श रूप: सर्व भावंडांच्यामध्ये थोरले असल्याने त्यांनी अगदी वडीलकीच्या भावनेने त्यांनी आपल्या भावांच्यावर प्रेम केले महाराष्ट्रातील संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशा सद्गुणी भावंडांप्रमाणे अशोक,आनंदा,पंडित आणि सुनिल हे चौघे भाऊ....जणू त्यांचेच रूप... संत निवृत्तीसारखाच शांत,विरक्त आणि प्रेमळ असा अशोक दादांचा स्वभाव आणि थोरला भाऊ म्हणून आपल्या भावंडांवरती लोभ. या भावंडात कधीही कोणत्या गोष्टीवरून भांडण नाही वाद नाही, अशोक दादांचा शब्द म्हणजे अंतिम इतका आदर त्यांच्यात पाहायला मिळतो. आपल्या लहान भावंडाना समजून उमजून घेणारा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी पार पाडणारा आणि, काळजी वाहणारा, त्यांच्या सगळ्याच गोष्टी आईच्या अंतकरणाने पदरात घेणारा. अशोक दादा म्हणजे जणू या भावंडांसाठी आईवडिलांचे प्रतिरूपचं
अशोक चव्हाण यांचे कुटूंब संत निरकरी मिशनमधील विचारांचे पाईक आहे. सर्वांशी प्रेमाने बोलणे प्रेमाने वागणे, शुद्ध आचरण आणि आध्यात्मिक विचारांची मांदियाळी कुटुंबात पाहायला मिळते. संत निरंकारी मिशनच्या अध्यात्मिक सहवासामुळे अतिशय शांत,समाधानी आणि समृद्ध आयुष्याची वाटचाल आजपर्यंत राहिली आहे.
एका खेडेगाव पासून सुरू झालेला हा प्रवास आज कोल्हापूरसारख्या एका मोठ्या शहरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि आजवरच्या त्यांच्या प्रवासामध्ये सौभाग्यवती सौ अनिता चव्हाण (वहिनी) यांची खंबीर साथ त्यांना मिळाली म्हणून त्यांना आपल्या कामाला योग्य तो न्याय देता आला. त्यांच्या संसार वेलीवरती दोन फुले उमलली. दोन्हीही संस्कारशील अशी मुले एक जीवन आणि दुसरा निखिल.जीवन आज टीसीएस पुणे येथे आयटी विभागात बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे तर निखिल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (पुणे, हिंजवडी) येथे इंटर्नशिप करत आहे.
आज ३५ वर्षांचा हा निरपेक्ष,प्रामाणिक आणि अखंड सेवेचा कर्मयज्ञ आज खंडित होतोय. एक कर्तव्यनिष्ठ कर्मयोगी आपल्या निष्कलंक कर्तव्यातून सेवामुक्त होत आहे. त्यांनी आपल्या कार्यातून एक उदात्त असा आदर्श घालून दिला आहे.
दादाश्री..आज आपण सेवानिवृत्त होत आहात.. आता लवकर उठून तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी ती आवरा,आवर करावी लागणार नाही.. ना वहिनींना डब्यासाठी स्वयंपाक गृहात लगबग करावी लागेल...आता नित्यनेमाने घड्याळाच्या ९ च्या ठोक्याला ऑफीसकडे वळणारी गाडीची चाके आता वळणारी चाके दारातच थांबलेली असतील.. ऑफिसकडे जाण्याची ओढ आणि सायंकाळी ऑफिस सुटल्यानंतर ऑफिसमध्ये रेंगाळणारी पाऊले आता...घरातच विसावा घेतील..
३५ वर्षांचा तो सारीपाट डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटाच्या पडद्यासारखा सरकत असेल ना..?. किती जड अंतःकरण झालं असेल...नोकरी म्हणजे तुमचं एक अनुभवाचं कर्तव्याच आणि सातत्यानं कामात व्यस्त राहण्याचं दुसरं जग होतं..डाक घर म्हणजे तुमचं दुसरं घर झालं होतं.. माहिती आहे एका प्रामाणिक सेवकाला आपल्या रोजच्या कर्तव्यातून मुक्त होताना मनात किती वेदना होत असतील..आपल्या ऑफिसमधल्या सहकारी व्यक्तींचा कुटूंब सोडून दूर जाताना मन किती व्याकुळ होत असेल..नेहमीची साथसोबत असणारे अशोक चव्हाण साहेब आता दररोज ऑफिसमध्ये येणार नाहीत त्यांचा सहवास आपल्या लाभणार नाही म्हणून आज त्या सहकाऱ्यां डोळ्याच्या कडा पानावल्या असतील. आपल्या स्वभावाने तुम्ही कुटुंबापासून ऑफिसपर्यंत जिवाभावाच्या नात्याचे ऋणानुबंध निर्माण केले..
पण एका विशिष्ट टप्प्यावर सेवानिवृत्त व्हावं लागतं..तुम्ही सर्वस्व अर्पून आपली सेवा बजावलात.. आता स्वतःसाठी आणि आपल्या कुटूंबासाठी वेळ द्या...आपल्या गावच्या मातीपासून दूर राहून नोकरीसाठी झोकून देऊन काम केलात आता त्या गावच्या मातीला भेट द्या..त्या मातीतल्या माणसांना भेटत जा...खूप फिरा..आरोग्याची काळजी घ्या..जीवनात ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्यात आता त्या पूर्ण करा.निवृत्ती म्हणजे. जीवनाची एक नवी इनिंग इथून पुढे सुरू होतेय..मस्त राहा जीवनाचा मनमुराद आनंद घ्या..
जय हो मंगल हो..!
मनमिळावू व्यक्तिमत्त्व – अशोक राजाराम चव्हाण
पांगिरे गावचे सुपुत्र श्री. अशोक राजाराम चव्हाण हे अनेक वर्षे पोस्ट विभागात प्रामाणिकपणे सेवा बजावत कोल्हापूरमध्ये कार्यरत राहिले. आपल्या साध्या राहणीमानाने, शांत स्वभावाने आणि कायम हसतमुख चेहऱ्याने त्यांनी प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.
माणसांशी आपुलकीने वागणं, दुसऱ्यांच्या अडचणी समजून घेणं आणि योग्य मार्गदर्शन करणं हा त्यांचा स्वभावच होता. समाजात एकनिष्ठ राहून त्यांनी अनेकांना चांगले सल्ले दिले. त्यांच्या बोलण्यात माया होती, विचारांत साधेपणा होता आणि वागण्यात माणुसकी होती.
आई-वडिलांची सेवा करताना त्यांनी कधीही कर्तव्यापासून पळ काढला नाही. आपल्या गावात त्यांनी कमावलेला मान-सन्मान हा त्यांच्या चांगुलपणाची साक्ष देतो.
💐💐 पोस्ट ऑफिसची वर्षानुवर्षांची सुंदर साथ,
प्रामाणिकपणा आणि माणुसकीची धरली वाट।
३१ मे ला निवृत्तीचा येईल जरी क्षण,
तरी सर्वांच्या मनात राहील त्यांचं प्रेरणास्थान।
कामात प्रामाणिकपणा, वागण्यात साधेपणा,
माणसांशी जोडला प्रेमाचा सुंदर धागा।
निवृत्ती फक्त सेवेतून असेल आज,
पण आदर्श व्यक्तिमत्त्व राहील कायम मनामनांत 🙏🙏💐💐
आठवणींचा स्मृतिगंध
📸 कालपटावर उमटले जे सुंदर क्षणांचे सुंदर रंग, 📸
भावी प्रवासाला गंधाळत राहील हाच गोड स्मृतिगंध! 🌸
‘लोकप्रिय माणसातील माणूस अशोकदा’
आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसतेः एकतर तिचा काळ संपून जातो किंवा वेळ! त्याप्रमाणे सेवा कालावधीतील काळ वेळ संपला. वयाची ६० वर्षे झाली की सेवानिवृत्त व्हावेच लागते. असेच आमचे मित्र ज्यांना आम्ही मोठ्या भावाप्रमाणे मानतो, ते आदर्शवत व्यक्तिमत्त्व आदरणीय श्री अशोक राजाराम चव्हाण! ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
मी आज प्राथमिक शिक्षक म्हणून माझ्या पायावर उभा आहे, ते फक्त आणि फक्त अशोकदामुळे! घरात अभ्यास करण्यास जागा नसल्याने मी अशोकदाच्या घरी अभ्यासाला जात होतो. माझ्यासोबतच माझ्यासारखे अनेकांचे येणे होते आणि त्यांच्या घरातील 'माडीवर' आमची अभ्यासिका असायची. आपल्याच घरासारखी वागणूक मिळाल्यामुळे स्वतःच्या घरापेक्षा अशोकदाच्या घरी मी जास्त वेळ असे.
मी दहावी झालो... पुढे काय? त्यावेळची आमची परिस्थिती ओळखून मला योग्य मार्गदर्शन करून डी.एड. चा फॉर्म भरण्यापासून ते डी.एड. ला ॲडमिशन मिळेपर्यंत सर्व सहकार्य, सर्व प्रयत्न अशोकदाने केले आणि मला डी.एड. मिळाले, मी शिक्षक झालो. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, या यशात अशोकदाचे सर्व कुटुंब यांचा सिंहाचा वाटा आहे. या कुटुंबाचे ऋण मी आजही विसरलेलो नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये कोणताही सुख-दुःखाचा प्रसंग घडला तरी त्या प्रसंगात मी एक घटक म्हणून सामील असतो.
'अशोक दा', हा घरातील पहिले पुत्ररत्न म्हणून कुटुंबातील सर्वांचा लाडका होताच, पण त्यांचा स्वभाव इतका चांगला होता की शेजारपाजारी, गल्ली आणि समाजात त्यांच्याविषयी मोठी आपुलकी होती. अतिशय प्रामाणिक, स्वच्छंदी, सदा अबोल, मितभाषी असे व्यक्तिमत्त्व म्हणजे अशोकदा.
जीवनामध्ये कोणीही विसरणार नाही अशी अविस्मरणीय घटना म्हणजे— अशोकदा बी.ए. पास झाले होते, त्याच दरम्यान नोकरी भरतीची जाहिरात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये एकच जागा भरणे संदर्भात ती जाहिरात होती. कोल्हापूर जिल्ह्यातील त्या एका जागेसाठी अशोकदाने अर्ज केला आणि त्यांच्या आई-वडिलांच्या पुण्याईने अशोकदाची निवड झाली! अशोकदा पोस्टात नोकरीला लागले. त्यांच्या पाठीमागे त्यांचे आई-वडील यांचे योगदान खूप मोठे आहे.
कै. राजाराम गोपाळ चव्हाण
आज वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्याने अशोकदा सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून व मातले परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा! त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
आज आपण सेवानिवृत्त होत आहात. आपण भारतीय डाक सेवेमध्ये जीवनातील अमूल्य काळ आणि वेळ दिला आहे. सेवाकाळामध्ये घडलेल्या कडू-गोड आठवणींची शिदोरी आपल्यासोबत आयुष्यभर राहील यात शंका नाही. आपला संपूर्ण सेवाकाळ आपण अत्यंत इमानदारीने, निष्ठेने आणि निष्कलंकपणे पार पाडला आहे.
आपल्या समंजस, प्रेमळ, मनमिळाऊ व कष्टाळू स्वभावामुळे आपण अनेक सहकारी आणि वरिष्ठांची मने नक्कीच जिंकली असणार, यामध्ये तीळमात्र शंका नाही. त्यासाठी तुम्ही १००% हक्कदार आहात.
सेवाकाळातील कामाप्रती तुमची सचोटी आणि निष्ठा यांमुळे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडी, छंद यांना अनेकदा मुरड घालावी लागली, पुरेसा वेळ देता आला नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन ते शिक्षण, नातेसंबंध जपताना व इतर जबाबदाऱ्या सांभाळताना, तसेच कामाचा ताण व शारीरिक अडचणींना सामोरे जाताना आपली बरीच दमछाक आणि तारेवरची कसरत झाली असेल; पण ते तुम्ही कधीही कोणास जाणवू दिले नाही.
कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदाऱ्या पार पाडताना, नातेसंबंध जपताना, रीतीरिवाज व मानपान करताना आपण कोणतीही काटकसर किंवा कंजुषी केली नाही. स्वतःच्या मनातील दुःख तुम्ही कधीही दुसऱ्यांना दाखवले नाही किंवा कोणासमोर भावना व्यक्त केल्या नाहीत.
तुमच्या आयुष्यातील सर्व्हिसचा एक टप्पा आज पूर्ण झाला आहे. आता निवृत्तीनंतरच्या काळामध्ये वेळेअभावी, कामाच्या व्यापामुळे, ताणामुळे व इतर जबाबदाऱ्यांमुळे राहिलेल्या तुमच्या आवडीनिवडी, छंद, इच्छा, पर्यटन, वाचन व इतरही जे काही तुमच्या मनामध्ये आहे, ते सर्व संकल्प पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ द्या. मनसोक्त आणि मनमुरादपणे आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने घालवा. प्रकृतीला जपा, तब्येतीची काळजी घ्या.
तुमची सेवाकाळामध्ये दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल व निवृत्तीनंतरच्या आनंदी, सुखकर आयुष्यासाठी माझ्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला मनःपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा! 🌹🙏🙏
निवृत्तीनंतरचे आयुष्य तुम्हाला हवे तसे व तुमच्या इच्छेनुसार जावो आणि तुम्हाला निरोगी, आनंदी दीर्घ आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आज ३१ मे २०२६ आमचे दाजी आज सेवानिवृत्त होत आहेत! आजपर्यंत दाजींना सुट्टी मिळाली तर ते येतील असं व्हायचं; पण उद्यापासून दाजींचं आयुष्य बदलणार आहे. ते आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. ते व्यक्ती म्हणून खूप छान आहेत. त्यांनी कधीच कोणाला दुखावलं नाही, आपल्या परीने सर्वांना मदत केली. त्यांनी फक्त सेवा दिली नाही तर त्या सेवेला आत्माच दिला. काम करताना त्यांनी नाती जपली आणि प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं. मग ते सहकारी असोत की ग्राहक, सर्वांशी सहकार्याचे नातेसंबंध जोपासले. ते आज सेवानिवृत्त होत आहेत पण त्यांची सेवा संपली नाही तर त्याचं स्वरूप बदललं आहे, कारण प्रेरणादायी माणसं कधीच निवृत्त होत नाहीत.
आमच्या घरातील दोन नंबरचे जावई म्हणजे दाजी! २ जून १९९७ ला माई आणि दाजींचा विवाह झाला आणि दाजी आमचे पाहुणे झाले. पण त्यांनी जावयाचा रुबाब कधीच दाखवला नाही, उलट ते आम्हाला आमचे मोठे वडील किंवा भाऊ आहेत असेच नेहमी वागत-बोलत. माझ्या बाबांना नेहमी वाटायचं की आपले जावई सरकारी नोकरीत असावेत आणि निर्व्यसनी असावेत. अगदी सर्वांच्या मनासारखे पाहुणे मिळाले म्हणून आम्ही खूप आनंदी झालो.
त्यांच्या लग्नानंतरचा एक प्रसंग मला आठवला; भाऊ व बाबा कामानिमित्त परगावी गेले होते व आई अचानक आजारी पडली. अगदी तिला पहाटे खूपच त्रास व्हायला लागला, तर दाजी अगदी नवीन असून देखील पहाटे सहा वाजता आईला दवाखान्यात घेऊन गेले. आम्हाला त्या दिवशी खूप आधार वाटला. दाजींनी कोणताच परका भाव न ठेवता आपल्या आईप्रमाणे सासूबाईंची काळजी घेतली. तसेच त्यांच्या गावाकडील कोणीही मंडळी आजारी असू देत, त्यांच्या दवाखान्याची सोय करणे, जेवणाचे डब्बे देणे हे काम त्यांनी आतापर्यंत केलेले आहे.
दाजी खूप मितभाषी आहेत आणि विनोदी पण! मी लहान असल्याने मला नेहमीच प्रेरणा देत आले आहेत आणि माझी नेहमीच चेष्टा करतात. त्यांना मी लहान बहिणीसारखीच आहे, त्यामुळे मीही मनमोकळे बोलत असते. माई आणि दाजींनी अगदी त्यांच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे मला प्रेम दिले, मला सांभाळले. मला कधीच परकेपणा जाणवला नाही, माझे सगळे लाड पुरवले. माझ्या अडचणीच्या काळात, माझ्या जडणघडणीच्या काळात त्यांनी मला आधार दिला; यासाठी मी तुम्हां दोघांची खूप खूप ऋणी राहीन.
माई आणि दाजी ही जोडी नेहमी शांत व संयमी आहेच. माईने दाजींना खूप मोठी, सार्थ आणि खंबीर अशी साथ दिली. कारण माई पै-पाहुण्यांकडे, दुःखद प्रसंगी किंवा आनंदाच्या प्रसंगी जाताना नेहमी घरी लवकर येण्यासाठी धडपड करायची; कारण दाजींना संध्याकाळी वेळेत जेवण मिळालं पाहिजे असा तिचा नेहमीच प्रयत्न असायचा. दाजींना सुखद प्रसंगी येता आले नाही तरी दाजी सुद्धा दुःखात सामील होत असत. शिवाय मुले जीवन व निखिल ही दोघेही अशीच सेवाभावी आहेत.
पण दाजींचा जीवन प्रवास नक्कीच केवळ सुखाचा नव्हता. आपल्या आयुष्याच्या विविधरंगी पुस्तकातील सोनेरी आठवणींचे पान म्हणजे आपलं जीवन! दाजींनी आपल्या भविष्याला आकार दिला. आपले संस्कार, आपली शाळा, आपले आई-बाबा त्यांचे संस्कार, आपले बालपणीचे गरिबीतले दिवस, आपल्या आई-बाबांचं स्वप्न पूर्ण करण्याची धडपड, शाळा, कॉलेज, अभ्यास, आई-बाबांना मदत, शिवणकाम, छोटी-मोठी कामं त्यांनी केली. प्रत्येक अडचणीत आपली महत्त्वाकांक्षा आणि आपले प्रयत्न सोडले नाहीत. जीवनात आलेल्या कठीण प्रसंगांना ते धैर्याने पुढे गेले. खूप जिद्दीने, प्रयत्नपूर्वक केलेली धडपड, तेच कष्ट, ती मेहनत आणि त्याचं फळ म्हणजे पेपरमधील पोस्ट खात्यातील जाहिरात बघून त्यांनी फॉर्म भरला आणि नोकरी लागली!
नोकरी लागली म्हणजे झालं असं होत नाही, त्यासाठी देखील पुन्हा तळमळीने प्रयत्नपूर्वक नोकरी टिकवावी लागते. सर्वांना खूप पगार आहे असे वाटत असते, पण ती नोकरी टिकवण्यासाठी आणि वरच्या पोस्ट मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने खूप मोठा त्याग केलेला असतो. आपल्या कुटुंबाची जबाबदारी, आई-बाबांची जबाबदारी, भावंडांची जबाबदारी, बाप म्हणून घेतलेली जबाबदारी... अशा विविध भूमिका साकारल्यानंतरच जीवनाची खरी किंमत कळते, तसेच दाजींचे जीवन आहे. आम्हा प्रत्येक भावंडांना त्यांनी प्रेरणा दिली, मदत केली, कठीण प्रसंगी योग्य मार्गदर्शन केले.
माझे डी.एड. झाले तेव्हा बाबा सेवानिवृत्त झाले होते. मला नोकरी लागेपर्यंत मी शिक्षणासाठी त्यांच्या घरीच होते. पत्ता पण दाजींच्या ऑफिसचा! त्यामुळे माझ्या नोकरीची पहिली ऑर्डर दाजींच्याच हातून आली, तेव्हा दाजी खूप खुश झाले आणि मला म्हणाले, "तुझी नोकरी फिक्स आहे, तुला लगेच शाळा मिळणार बघ!" मी त्यांच्या घरीच होते, मला खूप आनंद झाला. मला नेहमीच प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शन करणारे गुरु म्हणजे आमचे दाजी! आज सेवानिवृत्त होत आहात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, यापुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा.
✨ Happy Retirement Daji! ✨
आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे
नाव जरी असले सेवानिवृत्ती
तरी तीच घेऊन येईल
तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती!
पुन्हा एकदा तुम्हाला सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा!
दाजी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत याच सदिच्छा!
पोस्ट ऑफिस मधल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आज आपण सेवानिवृत्त होत आहात, यानिमित्ताने आपल्या जीवन कार्याचा हा शब्द प्रपंच आपणास विनम्र सादर...! अखंडित कामाचा कर्तव्यनिष्ठ कर्मयोगी श्री. अशोक राजाराम चव्हाण यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने
काही व्यक्ती आपल्या पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर आपल्या स्वभावामुळे, कार्यामुळे आणि माणुसकीमुळे लोकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करतात. भारतीय डाक विभागात तब्बल ३५ वर्षे प्रामाणिक, निष्ठावान आणि लोकाभिमुख सेवा देत डेप्युटी पोस्ट मास्टर या पदावरून सेवानिवृत्त होत असलेले आदरणीय श्री. अशोक राजाराम चव्हाण हे असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे.
१ जून १९६६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पांगिरे या गावात त्यांचा जन्म झाला. आई सौ. नानुबाई चव्हाण यांच्या मायेचे संस्कार आणि वडील राजाराम गोपाळ चव्हाण यांच्या कष्टाळू वृत्तीची प्रेरणा त्यांच्या आयुष्याचा मजबूत पाया ठरली. घरची परिस्थिती अत्यंत साधी आणि संघर्षमय होती. वडील मुंबईतील गिरणीत काम करत होते; मात्र गिरण्या बंद झाल्यानंतर गावी परत येऊन त्यांनी पारंपरिक व्यवसाय सुरू केला. मर्यादित उत्पन्न, मोठा परिवार आणि अनेक जबाबदाऱ्या — या सर्व परिस्थितीत मोठा मुलगा म्हणून अशोकसाहेबांवर जबाबदाऱ्यांचे ओझे लहानपणापासूनच आले.
परंतु संकटांपुढे हार मानणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. शिक्षण घेत असताना शिवणकाम तसेच मिळेल ती कामे करून त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. एवढेच नव्हे तर आपल्या भावंडांच्या शिक्षणाची आणि प्राथमिक गरजांची जबाबदारीही समर्थपणे पार पाडली. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. पांगिरे येथे प्राथमिक शिक्षण, हासूर येथे माध्यमिक शिक्षण आणि गारगोटी येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करत त्यांनी अर्थशास्त्र विषयातून बी.ए. पदवी संपादन केली.
पदवी शिक्षणानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते; मात्र नियतीने त्यांच्यासाठी वेगळीच वाट निवडली होती. भारतीय डाक विभागाच्या भरती परीक्षेत त्यांची निवड झाली आणि त्यांचा शासकीय सेवाप्रवास सुरू झाला.
सन १९९१ मध्ये भोगावती परिते पोस्ट ऑफिस येथे त्यांनी पोस्टल असिस्टंट म्हणून प्रथम पदभार स्वीकारला. त्यानंतर गारगोटी, कोडोली, कसबा बावडा, कोल्हापूर हेड पोस्ट ऑफिस, Market Yard, गांधी नगर, गोकुळ शिरगाव, इचलकरंजी, शुक्रवार पेठ, आंबेवाडी आणि अखेरीस शिवाजी पेठ येथे पोस्टल हेड म्हणून त्यांनी यशस्वी सेवा बजावली.
पोस्टल असिस्टंट, सब पोस्टमास्टर, एल.एस.जी. पोस्टमास्टर ते एच.एस.जी. डेप्युटी पोस्टमास्टर कोल्हापूर सिटी हेड पोस्ट ऑफिस असा त्यांचा प्रवास हा केवळ पदोन्नतीचा प्रवास नाही; तर तो कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा प्रवास आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची शिस्त आणि कामाप्रती असलेली निष्ठा. “कर्तव्य प्रथम” हा त्यांचा जीवनमंत्र होता. तब्येत कशीही असो, परिस्थिती कोणतीही असो — कार्यालयीन कामात कोणतीही तडजोड नाही, ही त्यांची भूमिका कायम राहिली. वेळेचे अचूक नियोजन, वक्तशीरपणा आणि कामातील काटेकोरपणा यामुळे त्यांनी सहकारी व वरिष्ठांचा कायम विश्वास संपादन केला.
त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी होता. कार्यालयातील कर्मचारी, एजंट, ग्राहक किंवा सहकारी — प्रत्येकाशी त्यांनी नेहमी आदराने आणि नम्रतेने संवाद साधला. त्यामुळे त्यांनी केवळ अधिकारी म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनही लोकांची मने जिंकली. ज्या-ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली, तिथल्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि ग्राहकांच्या मनात आपुलकी दिसून आली. हीच त्यांच्या सेवाभावाची खरी कमाई म्हणावी लागेल.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून सन २०२१ मध्ये India Post तर्फे त्यांना "Best Employee of the Year Award" या सन्मानाने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या सातत्यपूर्ण प्रामाणिक सेवेचा योग्य सन्मान होता.
अशोकसाहेबांचे कौटुंबिक जीवनही तितकेच आदर्शवत आहे. पत्नी सौ. अनिता चव्हाण यांनी प्रत्येक कठन प्रसंगी त्यांना खंबीर साथ दिली. मुलगे जीवन आणि निखिल यांनीही आपल्या वडिलांकडून शिस्त, कष्ट आणि प्रामाणिकपणाचे संस्कार घेतले. कुटुंबाचा आधार आणि प्रेम यामुळेच त्यांनी आयुष्यभर काम आणि नाती यांचा सुंदर समतोल राखला.
आज सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे असताना मागे वळून पाहताना त्यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी वाटतो. संघर्षातून उभे राहून, कर्तव्यनिष्ठेने काम करत आणि माणुसकी जपत यशस्वी आयुष्य कसे जगावे, याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे. सेवानिवृत्ती हा त्यांच्या कार्याचा शेवट नाही; तर एका सुंदर नव्या पर्वाची सुरुवात आहे. त्यांच्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि सुखसमृद्धी लाभो, हीच सदिच्छा.
✨ क्षण आनंदाचे, बंध रेशमाचे... ✨
❤️ अशोकराव चव्हाण साहेबांच्या सेवापूर्ती सोहळ्यातील काही सुवर्णक्षण आणि कौटुंबिक आनंद ❤️
🍁 कर्तव्याचा सुवर्णप्रवास 🍁
🌹 आदरणीय श्री. अशोक राजाराम चव्हाण साहेबांना सेवानिवृत्ती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹नम्र, शिस्त, सेवाभाव जणू गंगेचे निर्मळ कूळ...
सहकाऱ्यांच्या मनामधल्या जिव्हाळ्याचा ध्यास,
चव्हाणसाहेब नावामधुनी भरतो आपुलकीचा श्वास...॥
कर्तव्य निष्ठा जपणारे, जणू माणुसकीचे झरे...
पस्तीस वर्षांची सेवा, लाभला गौरवाशाली मान,
सेवानिवृत्तीच्या क्षणी आज दुमदुमला सन्मान...॥
चव्हाणसाहेब नाव घेताच दाटे सन्मान अंतःकरणभर...!
सेवेचा हा प्रवास तुमचा प्रेरणांचा दीप झाला,
पोस्टल असिस्टंट ते डेप्युटी पोस्ट मास्टर असा इतिहास सुवर्ण झाला...॥
कष्टाच्या वाटेवरूनी ओलांडली यशाची शीव...
आई नानुबाईंचे संस्कार, वडिल राजारामांचे कष्ट महान,
गरीबीच्या त्या वादळातही जपला स्वाभिमान...॥
भावंडांच्या प्रत्येक स्वप्नांसह फुलवली जीवन वात...
पांगिरे ते हासूर आणि गारगोटीचा शिक्षण प्रवास,
अर्थशास्त्राच्या ज्ञानामधुनी साकारला पदवीचा ध्यास...॥
इंडियन पोस्टच्या सेवेसाठी भाग्याने दार उघडले...
भोगावती परिते पोस्ट ऑफिसातून सेवायज्ञ सुरू झाला,
कर्तव्याच्या प्रत्येक वाटेवर जनसेवेचा आदर्श निर्माण केला...॥
जिथे जिथे गेले साहेब तिथे जोडले माणुसकीचे नाते...॥
गांधीनगर, इचलकरंजी, आंबेवाडी, गोकुळ शिरगाव,
प्रेम, नम्रता, सेवाभावाने जिंकला साऱ्यांचा ठाव..।।
डेप्युटी पोस्ट मास्टर म्हणून लाभला जनसेवेचा सन्मान...॥
पोस्ट ग्राहक, एजंट, सहकारी, अधिकारी सारे आपलेसे केले,
बदलीच्या प्रत्येक क्षणी अनेक डोळे नकळत ओले झाले...॥
कर्तव्यालाच देव मानून जगले आयुष्य नियम....
तबीयत जरी साथ न देई तरी कधी न थांबले पाय,
सेवेच्या त्या व्रतामधुनी घडले, जीवन धन्य होय...॥
सहकाऱ्यांच्या डोळ्यांत दिसे कौतुकाची भर...
माणुसकीची श्रीमंती घेऊन जगला हा प्रवास,
चव्हाणसाहेब नावामधुनी दरवळतो विश्वास...॥
प्रामाणिकतेच्या मार्गावरचे आयुष्य प्रेरक स्वरूप...॥
"Best Employee" पुरस्काराने गौरव झाला खास,
कोल्हापूर जिल्ह्यात उजळला कर्मसेवेचा सुवास...
सचोटीच्या त्या मार्गावरचे दीपस्तंभ होई...॥
पस्तीस वर्षांची ही सेवा झाली एक सुवर्ण कहाणी,
कर्तव्यनिष्ठ जीवनाची आज सजली सुंदर निशाणी...॥
आनंद, आरोग्य, सुखसमृद्धी भरू दे प्रत्येक श्वास...
सेवानिवृत्ती नाही शेवट, नव्या आनंदी पर्वाची चाहूल,
उराशी घेऊन अनुभव, फुलवा अमूल्य जीवन फुल...॥
जनसेवेच्या इतिहासात राहील तुमचा सुवर्ण तारा...
कर्तव्य, निष्ठा, सेवाभाव यांचे तुम्ही दीप महान,
सेवानिवृत्ती निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छांचा सन्मान...॥॥
🤝 सेवानिवृत्ती निमित्त मित्राला शुभेच्छा - चार शब्द 🤝
माझ्या शालेय जीवनातील एक खरा सच्चा मित्र श्री अशोक राजाराम चव्हाण यांच्याबद्दल...अशोक हा खूप मितभाषी, शांत स्वभावाचा, अभ्यासू, हुशार, होतकरू आणि नेहमी मदत करणारा, सर्व गुण संपन्न असा अजातशत्रू मित्र आहे. आम्हा दोघांचा शैक्षणिक जीवनप्रवास 'जीवन विद्या मंदिर पांगिरे' या प्राथमिक शाळेतून सुरू झाला. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत आम्ही एकत्र शाळा शिकलो. दहावीचा निकाल लागला आणि अशोक चांगल्या मार्काने पास झाला, मी पण पास झालो. त्यानंतर कॉलेजचे मार्ग आम्हा दोघांचे वेगळे झाले. मी ११ वी आणि १२ वी पुण्याला पूर्ण केली व अशोकने गारगोटीला पूर्ण केली.
कालांतरानं पुन्हा आम्ही दोघे सिनिअर कॉलेज पूर्ण करण्यासाठी एकत्र आलो व आम्ही बी.ए. ला प्रवेश घेतला. तशी माझी परिस्थिती बेताची होती व अशोकची चांगली होती. मी दिवसातील ८०% वेळ अशोक बरोबर घालवायचा. प्रथम वर्ष (बी.ए.) झाल्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की आपण दिवसाची नोकरी करायची आणि रात्री कॉलेज करायचं. त्यामुळे आम्ही कोल्हापूरला गेलो व 'देशभक्त रत्नाप्पा आण्णा कुंभार' या नाईट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
आमी बी.ए. करत असताना माझ्या जीवनात अचानक टर्निंग पॉईंट आल्यानंतर मी बी.ए. सोडून B.Ed. ला ॲडमिशन घेतले व अशोकने बी.ए. पूर्ण केले. दरम्यानच्या काळात केंद्र शासनाची पोस्टाची जाहिरात वर्तमानपत्रात आली, पण पूर्ण जिल्ह्यात केवळ एकच पोस्ट होती. अशोक विचार करीत होता काय करावे? त्याला वाटत होते की जिल्ह्यात एकच जागा आहे आणि आपली निवड कशी होणार? असा विचार करत असताना आम्ही त्याला अर्ज करण्यास प्रवृत्त केले आणि अशोकचे भाग्य उजळले! अशोकची निवड झाल्याचे समजले आणि माझ्या मनाला खूप खूप समाधान वाटले.
अशोक केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाला, ते खाते म्हणजे सर्वसामान्य जनतेची सेवा करणारे होते. अशोक, तू भाग्यवान आहेस की तुझ्या हातून समाजातील सर्वसामान्य जनतेची सेवा करणारे खाते मिळाले आणि त्या माध्यमातून तू अविरत समाजाची सेवा केलीस.
✨ कर्तव्यनिष्ठेचा गौरव आणि कौटुंबिक आधारस्तंभ! ✨
शुभेच्छुक: सुरेश मारुती महाजन
पप्पा...
जीवन अशोक चव्हाण
कर्तव्यनिष्ठ पोस्ट कर्मचारी : श्री अशोक राजाराम चव्हाण
कृतज्ञता आणि आभार
आदरणीय श्री. अशोक राजाराम चव्हाण (दादाश्री) यांच्या सेवापूर्तीनिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या या 'सेवागौरव विशेषांकासाठी' ज्यांनी ज्यांनी आपले अमूल्य विचार, आठवणी आणि सदिच्छा लेखांच्या माध्यमातून आमच्याकडे पाठवल्या, त्या सर्व स्नेहीजण, हितचिंतक, कार्यालयीन सहकारी आणि मित्रपरिवाराचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्यामुळेच हा विशेषांक देखणा, समृद्ध आणि संस्मरणीय होऊ शकला आहे. हा आपुलकीचा स्नेह इथून पुढेही असाच कायम राहो, हीच सदिच्छा! जय हो, मंगल हो...!



