शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२६

अपयशाला चितपट करून संघर्षाच्या बळावर यशाचं वैभव प्राप्त करणारा वैभव!

 



✦ प्रेरणादायी यशोगाथा ✦

अपयशाला चितपट करून संघर्षाच्या बळावर यशाचं वैभव प्राप्त करणारा वैभव!

जिद्द • चिकाटी • संयम • संघर्ष • यश

वैभव आळवे यांची प्रेरणादायी यशोगाथा

संघर्षातून यशाकडे वाटचाल करणारा वैभव आळवे

पहाटेच्या साखर झोपेला धुडकावून लावून तो पहाटेच्या बोचऱ्या थंडीतला गार वारा कापत तो एकटाच धावत असायचा. तिथून मग गारगोटीच्या त्या ग्रंथालयामध्ये अभ्यासाची पुस्तकं घेऊन दिवसभर अभ्यास करत बसायचा. पहाटेचा शारीरिक व्यायाम आणि दिवसभर ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेची तयारी. कोणताही सण,उत्सव असो अथवा गावात कोणता कार्यक्रम पण तो कधीच तनामनाने त्यात मिसळला नाही. माणसांच्या गर्दीत तो एकट्याने चालत राहिला. एकलव्याला जसा पोपटाचा फक्त डोळा दिसत होता तसं त्याच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं. पोलीस भरती व्हायचं. अनेक वेळा त्याला यशानं हुलकावणी दिली. पण तो थांबला नाही. लवकरात लवकर त्याला नोकरी मिळवणं आवश्यक होतं कारण मागे आईचा एकटीचा कौटुंबिक वनवास. आई शेतात एकटी राबत संसाराचा गाडा हाकत होती... घरातील आजोबा तेही उतारावयाकडे झुकलेले. मागे शिक्षण घेत आईला घरकाम आणि शेतात मदत करण्याची जबाबदारी उचलणारा छोटा भाऊ. शेतीच्या जीवावर उदरनिर्वाह. आईची आपल्या भावाची मागची परिस्थिती त्याला बघवत नव्हती म्हणून तो प्रसंगी आपल्या आईच्या आजी आजोबांच्या कडे राहून अभ्यास करायचा. जोपर्यंत मी नोकरी मिळवणार नाही तोपर्यंत मी गावाकडे जाणार नाही असा त्यांने चंग बांधलेला होता.

...घरातील एक कर्ता पुरुष म्हणून त्याला आपल्या घरासाठी, काही तरी करणं गरजेचं होतं. कौटुंबिक जबाबदारीचा ताणही त्याच्यावर होताच. रात्रंदिवस आम्हां युद्धाचा प्रसंग अशाप्रकारे युद्धपातळीवर त्याचे प्रयत्न सुरू होते. त्याने कधीच हार मानली नाही. किंवा परिस्थितीचा बाऊ करत प्रयत्नांच्या पासून बाजूला झाला नाही .रात्रंदिवस मेहनत घेऊन जिद्द, चिकाटी आणि संयम ठेवून अखेर ज्याने यशाला गवसणी घातली तो म्हणजे वैभव आळवे. वाट्याला येणाऱ्या अपयशाला धूळ चारत अखेर मुंबई पोलीस भरतीमध्ये त्याने यश प्राप्त केले. कोणतीही अकॅडमी नाही फक्त स्वतःच्या कष्टाच्या आणि हिमतीच्या बळावर वैभवने शारीरिक चाचणीमध्ये 50 पैकी 48 आणि लेखी परीक्षेमध्ये 100 पैकी 98 गुण प्राप्त करून नुसतंच यश नव्हे तर दैदिप्यमान यश त्याने गाठले.

🏆 वैभवचे दैदीप्यमान यश 🏆

98/100

लेखी परीक्षा

48/50

शारीरिक चाचणी

स्वतःच्या मेहनतीच्या बळावर मुंबई पोलीस दलात निवड!

भुदरगड तालुक्यातील पांगिरे गावचा एक भाग असणाऱ्या आणि डोंगराच्या कुशीत एका कोपऱ्यात वसलेल्या आळवेवाडी (खोरी) या छोट्याशा वाडीतून आलेल्या वैभवने मुंबईच्या मैदानावर आपल्या गुणांची चुणूक दाखवून दिली. वैभवने दाखवून दिलेलं आहे की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मध्ये बुद्धिमत्तेची आणि गुणवत्तेची कमी नाही. फक्त गरज आहे त्याला प्रयत्नांची जोड देण्याची.

मराठी शाळेत असताना वैभव माझा विद्यार्थी होता. मला त्याचा विशेष अभिमान आहे. जेव्हा तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा. तेव्हा अनेकदा त्याला अपयशाचा सामनाही करावा लागला, तेव्हा आम्हीही त्याला नोकरीसाठी विविध पर्याय सुचवायचो. पण मनात त्याने निश्चय केलेला होता की, काहीही करून मला पोलीस भरती व्हायचंच आहे. अतिशय शांत मनमिळावू आणि संवेदनशील असणारा वैभव अभ्यासामध्ये हुशार आणि आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवणारा निश्चयी विद्यार्थी. शेवटी त्याने आपला निश्चय सत्यात उतरवला. प्रत्येक यशाच्या मागे संघर्षाचा एक वेगळा इतिहास असतो. वैभवच्या या यशाच्यामागे संघर्षाचा एक वेगळा इतिहास होता.

जेव्हा मी त्याचं अभिनंदन करायला घरी गेलो. तेव्हा वैभवने आपला यशाचा अनुभव सांगताना म्हटले की,

"सर यश मिळाल्यानंतर जो आनंद आहे त्यापेक्षा त्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षात खरा आनंद आहे."

— वैभव आळवे

खर आहे यशाच्या आनंदात सगळे वाटेकरी असतात पण संघर्षात आपला एकट्याचाच वाटा असतो.

वैभवच्या या अनुभवातून आलेल्या शब्दांतून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक चांगला संदेश जातो की, तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करताना मनापासून करा, परिस्थिती तुमची परीक्षा बघत असते पण तुम्ही संयम ठेवा. जिद्द, चिकाटी आणि स्वतःची मेहनत ठेवलात तर तुम्ही एक दिवस स्वतःच्या बळावर यशाला गवसणी घालू शकता. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही चालत राहायचं.

"जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही, चालत राहायचं."

वैभव तुझ्या या यशासाठी तुझं खूप खूप अभिनंदन..! आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. उद्याचा वैभव आम्हाला पीएसआय च्या वर्दीत बघायला मिळावा हीच अपेक्षा...

धन्यवाद...!

जय हो..! मंगल हो..!!

- किरण सुभाष चव्हाण.

मोबा - 8806737528.

1 टिप्पणी:

  1. संघर्षमय प्रवासातून मिळालेले दैदीप्यमान यश.... वैभवचे हार्दिक अभिनंदन.... खुप छान लेखन सर 🎉💐

    उत्तर द्याहटवा

मातीशी नाळ जपणारा, उपेक्षितांच्या जगण्याला शब्द देणारा अस्सल ग्रामीण साहित्यिक! डॉ. राजन गवस | जन्मदिन विशेष

  कथामय मराठी कथा प्रस्तुत मातीशी नाळ जपणारा, उपेक्षितांच्या जगण्याला शब्द देणारा अस्सल ग्रामीण साहित्यिक! साहित्यि...