रविवार, १ नोव्हेंबर, २०२६

साधेपणातून समृद्ध आयुष्याची शिकवण देणारा ज्ञानाचा वाटसरू : श्री दशरथ आनंदा अस्वले सर

 

साधेपणातून समृद्ध आयुष्याची शिकवण देणारा ज्ञानाचा वाटसरू : श्री दशरथ आनंदा अस्वले सर

             

                            काही माणसं अत्यंत साधी सरळ निर्मळ मनाची असतात. आणि तीच आपल्याला जास्त भावतात. आपल्या साधेपणाचा चांगुलपणा पेरत ज्यांनी आपल्या आयुष्यात माणसांचा मळा फुलवला... खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी शिकवण देत साने गुरुजींच्या विचारांनी प्रत्येक विद्यार्थी घडवला. असे विद्यार्थीप्रिय शिक्षक ते अजातशत्रू निगर्वी व्यक्तिमत्त्व आदरणीय श्री दशरथ आनंदा अस्वले सर... आज पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने....

निसर्ग संपन्न आजरा तालुक्यातील डोंगर माथ्यावर वसलेल्या चिमणे या छोटेखानी गावात वडील आनंदा अस्वले व आई हौसाबाई या शेतकरी दांपत्याच्या पोटी १४ ऑक्टोबर १९६८ साली दशरथ अस्वले सरांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. पाठीवर एक लहान भाऊ वसंत अशी ही दोन भावंडे. आई वडील शेतकरी. शेतीभातीच्या जीवावरच कुटुंबाची गुजराण चालायची. घरची परिस्थिती तशी बेताचीचं परंतु आई-वडिलांनी सुरुवातीपासून मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. आई-वडिलांच्या निथळत्या घामावर दोन्ही भावाचं शिक्षण सुरू झालं. दशरथ अस्वले सरांचं प्राथमिक शिक्षण शिवराज विद्यालय चिमणे या ठिकाणी पूर्ण झाले. त्या काळात त्यांच्या कोवळ्या मनावर संस्कार करणारे शिक्षक सु.रा देशपांडे, स्नेहलता देशपांडे, धोंडीराम चव्हाण, राजाराम आरदाळकर पांडुरंग कांबळे या गुरुजनांनी अस्वले सरांना प्राथमिक धडे देऊन शिक्षणाचा पाया भक्कम केला.

त्यानंतर माध्यमिक शिक्षण कर्मवीर विद्यालय चिमणे या ठिकाणी पूर्ण केले. यावेळी त्यांना डी.डी कांबळे सर, पी. एन कांबळे सर वाय.एन. देसाई सर, डी.एन शिर्के सर, एम. बी.बिंरबोळे सर, बी,एम.पाटील सर, एम.बी पाटील मॅडम, ढवळे सर यासारखे प्रेमळ व शिस्तप्रिय शिक्षकांनी अस्वले सरांच्या मऊ हळुवार भावनेच्या विद्यार्थ्यांला योग्य आकार दिला.

सरांचा लहानपणापासूनच लाजरा बुजरा आणि खूप भित्रा असा स्वभाव होता.. गंमत म्हणजे शाळेत कुठल्याही मुलीशी बोलायच म्हटलं तर सरांच्या घशाला कोरड पडायची. इतकी धास्ती. शालेय दशेत सरांचे मराठी व इंग्रजीचे हस्ताक्षर टपोर मोत्यासारखे. त्यामुळे हस्ताक्षर स्पर्धेत शाळेत प्रथम क्रमांक ठरलेला असायचा.

लहानपणी आईवडिलांना शेतात मदत करणं, राना- शिवारात जनावरांना चारायला नेणं अशी कामे ते आवडीने करायचे. चिमण्याच्या त्या रांगड्या मातीत खेळत बागडत गल्लीबोळात दारा घरात चिमुकली पाऊले दौडत होतीचं. पण सरांचे बालपण आईच्या माहेरी म्हणजे आरदाळ या गावीही जास्त रमले. तिथेच आजी आजोबा व मामांच्या मायेच्या सहवासात ते राहू लागले. त्यांचे थोरले मामा ज्येष्ठ साहित्यिक सदानंद पुंडपाळ, हरिभाऊ पुंडपळ व शंकर पुंडपळ यांचे प्रेम त्याना मिळालेच पण त्यांच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत तिन्हीं मामांचा मोलाचा वाटा आहे.

पुढे जागृती ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज या ठिकाणी कॉमर्सला प्रवेश घेतला येथे त्यांना प्राध्यापक डॉ.सुभाष शेळके सर, एस आर पाटील सर, महावीर मर्जे सर, जी.एस सुर्वे सर, सुभाष पाटील सर अशा गुरूंच्या मांदियाळीत सरांचे व्यक्तिमत्त्व घडू लागले.. गावाकडचा लाजरा बुजरा मुलगा कॉलेजला गेल्यानंतर मात्र मनातील भीती गळून पडली आणि ते मित्र-मैत्रिणींच्या मध्ये मनमोकळेपणाने वावरू लागले.

शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी मग यशवंत डी एड कॉलेज कोडोली पन्हाळा या ठिकाणी १९८७ ते ८९ याकाळात व्यावसायिक पदवी म्हणजेच डीएडचे शिक्षण पूर्ण केले. अशाप्रकारे शिक्षणाच्या एकेक पायऱ्या पादाक्रांत करत अखेर त्यांनी नोकरीचे यशशिखर गाठले. १ /०८/१९९१ साली सहाय्यक शिक्षक म्हणून प्रथम गुहागर जिल्हा रत्नागिरी येथील कुटगिरी पातीवाडी शाळा नंबर २ या ठिकाणी सरांनी ४ वर्षे ज्ञानदानाची सेवा बजावली तिथून शाहूवाडीतील विद्यामंदिर कांडवण येथे बदली होऊन आले.

या दरम्यान १९९५ साली सर विवाहबद्ध झाले. व सौ संगिता त्यांच्या आयुष्यात सौभाग्यवती बनून आल्या. सरांचा सुखी संसार सुरू झाला. पुढे त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली थोरले चिरंजीव सुशांत आणि घरात ऐश्वर्याची भरभराट घेऊन अली ती कन्या म्हणजे ऐश्वर्या..

पुढे आजरा तालुक्यातील विद्यामंदिर बहिरेवाडी शाळा व त्यानंतर ज्या मातीत सरांची बालपण गेले त्या आजोळमध्ये म्हणजे विद्या मंदिर आरदाळ शाळेमध्ये सुद्धा त्यांना शिकवण्याचे भाग्य मिळाले.

२००४ साली सरांच्या आयुष्यात एक दुःखद घटना त्यांच्या आयुष्यात घडली ती म्हणजे त्यांचे शिक्षक असणारे धाकटे बंधू वसंत अस्वले यांचे अचानक निधन झाले. हा त्यांच्या कुटुंबासाठी अनपेक्षित असा धक्का होता. पण यातून स्वतःला सवलत सरांनी आपल्या आई-वडिलांना आधार दिला.

यानंतर कागल तालुक्यातील शिवाजी विद्यामंदिर मुरगुड, पुन्हा आजरा तालुक्यातील विद्या मंदिर मासेवाडी या ठिकाणी चार वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले व सध्या सुलगाव प्राथमिक शाळेत दोन वर्षे अध्यापन करून आपल्या अखंडित सेवेची पूर्तता करत सर आज सेवानिवृत्त होत आहेत.

ज्ञानदानाची ३५ वर्षांची अखंड सेवा...

आतापर्यंत एकूण सात शाळेत सरांनी अत्यंत प्रामाणिकपणे व तळमळीने ज्ञानदानाचे कार्य केले. आजपर्यंत हजारो विद्यार्थी सरांच्या हातून शिकून अनेक मोठ्या पदावर कार्यरत आहेत. आपल्यासारख्याच शेतकरी सर्वसामान्य कुटूंबातून आलेल्या मुलांच्या घरी ज्ञानाचा दीप सरांनी प्रज्वलित केला. विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेल्या आपल्या लाडक्या सरांना आजही ते विद्यार्थी प्रेमाने भेटायला येतात.

आपल्या शिक्षकी पेशाच्या संपूर्ण सेवाकाळात सरांनी अतिशय प्रामाणिक, निष्कलंक अशी सेवा बजावली. आपली शाळा व आपले विद्यार्थी हे जणू सरांचे दुसरे घरच झाले होते. आपला जास्तीत जास्त वेळ त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी दिला. ज्ञानदानाचे व्रत सांभाळताना त्यांच्या पत्नी सौ संगिता यांची खंबीर साथ सरांना मिळाली.. नावाप्रमाणेच सुशील व संस्कारशील चिरंजीव सुशांत आज उच्च शिक्षण घेऊन आयटी कंपनीत नोकरी करतो. तर कन्या ऐश्वर्याचे बी फार्मसीचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

आपल्या कुटुंबासारखाच सरांनी आपल्या विद्यार्थ्यांचा, जुन्या नव्या मित्र परिवाराचा गोतावळा अगदी मायेन सांभाळला आहे.

सर जरी कागलला राहत असले, तरी चिमणे या आपल्या गावी आईला ते नेहमी भेटायला येतात, गावातल्या सर्व लोकांशी सरांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कुणाच्या आनंदाचा सोहळा असो किंवा कुणाच्या घरी दुःखाचे सावट असो सर आवर्जून उपस्थित राहतात. सर्वांच्या सुखदुःखात आपलेपणाने सहभागी होतात. कुणाच्या अपरोक्ष अडल्या नडल्या ना आपापल्या परीने मदत करत राहतात.

सरांचा स्वभाव म्हणजे नितळ निर्मळ पाण्यासारखा स्वच्छ. वागण्यात आज्ञाधारक नम्र आणि विनयशीलपणा. सरांना आपल्या मराठी शाळेपासून कॉलेजपर्यंत लाभलेल्या सर्व गुरुजनांची नावे अगदी मुखोद्गत आहेत. हीच खरी गुरूंच्या विषयीची त्यांची कृतज्ञता आहे.

सरांच्या विचारांच्यामध्ये कमालीचा स्वच्छंदीपणा आहे. आपल्याला आवडेल ते करायचे, आवडेल ते खायची आवडेल त्या ठिकाणी फिरायचे अशाप्रकारे खऱ्या अर्थाने मनमुराद जगण्याचं भान सर जपत असतात. जे कोणी भेटतील त्यांच्याशी समरस होणारे, सर्वांशी खेळीमेळीने वागणार, कुठलीही अनौपचारिकता न बाळगता सहज सोप्या भाषेत मनमोकळा संवाद साधत सर्वांना आपलेसे करणारे अस्वले सर म्हणजे सर्वांचा आवडता माणूस.

कोणताही जवळचा माणूस भेटला की, त्यांना पदरचा चहा देण्याची सरांना दांडगी हौस. ज्यांनी सरांच्या सोबत चहाची चव चाखली आहे त्यांनाच खऱ्या अर्थाने सरांच्या गोड स्वभावाचा अनुभव आलेला असेल. अत्यंत साध्या स्वभावामुळे सर आपल्या उभ्या आयुष्यामध्ये पैशापेक्षा माणसाला माणूस जोडत गेले. पैशाच्या श्रीमंती पेक्षा माणसांची श्रीमंती त्यांनी जपली. त्यामुळे त्यांच्या जवळील समाधान हीच सरांची सर्वात मोठी संपत्ती आहे.

पैशापेक्षा माणसांची श्रीमंती जपणारे व्यक्तिमत्त्व!

पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणसांची श्रीमंती त्यांनी जपली. त्यामुळे त्यांच्या जवळील समाधान हीच सरांची सर्वात मोठी संपत्ती आहे.

आजच्या या काळात असे निगर्वी निस्पृह, निराभिमानी निरपेक्ष आणि निष्कलंक व्यक्तिमत्व भेटणं दुर्मिळचं आहे.. कोणत्याही पदाचा त्यांना अभिमान नाही आज ते राजर्षी शाहू शिक्षण मंडळ आरदाळ व हिरण्यकेशी गृहतारण संस्था आजरा या संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. पण कोणत्याही पदाचा साधा लवलेशही त्यांच्या वागण्या बोलण्यातून कधी दिसत नाही. उलट आपल्या संस्थेतील शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा दरवर्षी ते स्वतःच्या खर्चाने सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम करत असतात.

सर आज ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आपण सेवानिवृत्त होत आहात. आई-वडिलांनी कष्टातून दिलेल्या शिक्षणाचे सर तुम्ही चीज केलात आणि असंख्य विद्यार्थी घडवून प्रामाणिकपणे सेवा बजावलात.

आता शाळेतील आमचे प्रेमळ विद्यार्थीप्रिय शिक्षक आता उद्यापासून आपल्याला शिकवण्यासाठी येणार नाही. या भावनेने ती चिमुकली मनं नाराज झाली असतील.. तुमच्या परतीच्या चाहूलीने त्यांच्या डोळ्यांच्या काठावर त्या अश्रूंचे मोती अडून बसले असतील. ती रोजची शाळा देखील सद्गतीत होऊन उभी असेल.

तुम्हालाही आता कागलपासून आजऱ्यापर्यंत येण्यासाठी रोजची धावपळ करावी लागणार नाही. ना मॅडमांना सकाळी लवकर उठून आता डब्यासाठी घाई गडबड करावी लागेल... उद्यापासून घर ते शाळा आणि शाळा ते घर दररोजच्या येरझाऱ्यार्‍या बंद होतील. आणि घरातच पाऊले अडखळतील.

आपल्या बसचा नेहमीचा प्रवासी कुठे दिसत नाही म्हणून रोजच्या बसच्या ड्रायव्हर कंडक्टरांना सुद्धा कुठेतरी चुकल्यासारखे वाटेल.

आजपर्यंतचा ज्ञानाच्या वाटेवरचा प्रवास, अनुभवाचा सारीपाट आज आपल्या डोळ्यासमोर उभा राहत असेल. दररोजच्या शाळेतील मुलांचा तो भोवतीचा गराडा, सकाळची कोवळ्या सुरतील प्रार्थना, दिवसभरातील कानांवर पडणारा त्यांचा तो किलबिलाट उद्यापासून सगळं काही थांबलेलं असेल... घराच्या चार भिंतीत तो सूर कानात गुंज घालेल.

आता इथून पुढे रोज आठवणींची शाळा तुमच्या मनात भरेल.. जिवाभावाच्या विद्यार्थ्यांचे ते निरागस प्रसन्न चेहरे बंद डोळ्याच्या पडद्याआड रोज उभा राहतील. दिवसभर सोबत असणारे छोट्या भावासारखे असणारे आपले सहकारी शिक्षक कुंभार उद्या पासून सोबत नसतील तेंव्हा चुकल्यासारखं वाटेल... शाळेकडे येता जाता वाटेत गाठ पडून आपुलकीने चौकशी करणारा पालक आता थोडीच दररोज घरी भेटायला येणार आहे...

सेवानिवृत्ती म्हणजे थांबणं नाही...

सेवानिवृत्ती म्हणजे थांबणं नाही तर पुन्हा एका नव्या ऊर्जेने आयुष्याच्या आणखीन एका नव्या पर्वाला सुरुवात करणं...

असो पण सेवानिवृत्ती म्हणजे थांबणं नाही तर पुन्हा एका नव्या ऊर्जेने आयुष्याच्या आणखीन एका नव्या पर्वाला सुरुवात करणं...

आता तुम्हाला वेळेची सोबत असेल. आता फक्त तुम्ही आणि तुमचा वेळ. आतापर्यंतच्या धावपळीत मागे काही राहून गेलं असेल, काही आवडते छंद असतील ते आता पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

तुमचं बालपण अंगाखांद्यावर घेणारी ती तुमची माती आज तुम्हाला साद घालतेय. त्या गावच्या मातीला भेट द्या आपल्या आईला सांभाळा, कुटुंब, मित्र परिवाराला जास्तीत जास्त वेळ द्या आणि आम्हाला विश्वास आहे की सेवानिवृत्तीनंतरच हे इनिंग तुम्ही आणखीन खूप मनमुराद आणि मनसोक्तपणे तुम्ही जगणारचं आहात...

खूप फिरा जीवनाचा पुन्हा नव्याने आनंद घेत राहा तुमच्या इथून पुढच्या वाटचालीस खूप सार्‍या शुभेच्छा..

जय हो..! मंगल हो ..!

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

ग्रामीण साहित्यिक नंदू साळोखे यांच्या जीवन व लेखन प्रवासाविषयीचा सविस्तर लेख

 

ग्रामीण साहित्यिक नंदू साळोखे यांच्या जीवन व लेखन प्रवासाविषयीचा सविस्तर लेख

ग्रामीण साहित्यिक नंदू साळोखे

‘शरीराच्या संवेदना हरवलेल्या वेेेदनेचा प्रवास.

        आजरा तालुक्यातील बेलेवाडी हुबळगी हे छोटेसं खेडेगाव.या गावातील सखाराम केरबा साळोखे व आक्काताई सखाराम साळोखेे यांच्या पोटी राम- लक्ष्मणागत दोन लेकरं जन्माला आली. थोरला मुलगा प्रकाश उर्फ नंदू आणि धाकटा सागर. एक छोटेसं शेतकरी कुटुंब.शेती हा प्रमुख व्यवसाय. या कुटुंबात २५ ऑगस्ट १९७८ रोजी नंदूजींचा जन्म झाला. एक चुणचुणीत गोरागोमटा पोर.गावच्या शाळेत जाऊ लागला, आपल्या सवंगड्यांसोबत गावाच्या मातीत खेळू- बागडू लागला. रान शिवारी सख्यासोबत्यांच्या संगतीने हिंडू फिरू लागला.गल्ली गावात दुडदुडत्या चालीने दौडू लागला. असे हे स्वच्छंदी बालपणाचे दिवस, भिंतीवरच्या कॅलेंडरच्या पानांनी कूस बदलावी तसे  मागे पडत गेले.दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.लहानगा नंदू आता जाणता झाला.  शेताघरातल्या कामात लक्ष घालु लागला. सळसळत्या तारुण्याचं उमदं वय. कोणतंही काम करण्याचा उरात भरलेला जोश.पण एकीकडे या उमलत्या तारुण्यावर घाव घालण्यासाठी नियती दबा धरून बसलेली.

                ते साल होतं १ जानेवारी १९९८. अंगात तारुण्याची रग होती.त्या दिवशी नंदूजींनी उत्साहाच्या भरात,एक मण भाताचं पोतं डोक्यावर घेतलं नी तसेच घराच्या दिशेनं चालू लागले. आणि काही कळायच्या आत डोक्यावरच्या पोत्यासह नंदूजी खाली कोसळले.पोत्याखाली दबले गेले.मोठा अनर्थ घडला.नियतीने आपला डाव साधला.दुर्देवी वेळेनं मोठा घात केला,पाठीच्या कण्याला जबर मार लागला,गंभीर दुखापत झाली.त्यानंतर उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण नंदूजींचे अर्धे शरीर गारद झाले होते. त्याला जिवंत करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.तीन महिने उपचार सुरू होते पण इलाज चालला नाही. मेंदूपासून खाली पायापर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या संवेदनशील नसा दबल्या गेल्याने कमरेखालचा भाग संवेदनाहीन झाला. शेवटी डॉक्टरांनी घोषित केले की,नंदूजी आता इथून पुढे कधी स्वतःच्या पायावर चालू शकणार नाहीत.

किती मोठा धक्का नंदूजीसह साऱ्या कुटुंबाला होता.हसत्या खेळत्या उमलत्या आयुष्यालाच त्या घटनेने सुरुंग लावला.जिवलगांच्या काळजाला भेगा पडल्या. नंदूजींच्या मनावर तर नकारात्मक विचारांनी कब्जाच केला. टोकाचे विचार सतत  मनाला टोकरू लागले. तिथून पुढे नवी मुंबई वाशी येथील 'शरण अपंग पुनर्वसन केंद्र' येथे भरती केलं गेलं.आता आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं होतं.

                शालेय जीवनापासून वाचनाची थोडी गोडी होती,ती कामाला आली. हळू हळू पुस्तकांची जवळीक वाटू लागली. या घटनेनंतर वाचनाची गती वाढू लागली.

पायांनी तर आता चौफेर उधळता येणार नव्हतं. पण मनाचा मात्र वारू शब्दांच्या सहवासात चौखूर उधळत होता. आणि जगण्याचं एक तत्व गवसलं.'शरीरानं अपंग झालो तरी, आपण मनानं कधीच अपंग नसतो.' शब्दांच्या पाठीवर स्वार होऊन आपण चहूमुलखाची सफर करू शकतो.

आणि मग मनाला शब्दांची साथसंगत मिळत गेली. शब्द इतके घनिष्ट झाले की, या अपंग पुनर्वसन केंद्रात असताना शांत समयी शब्दांना अर्थाच्या धाग्यात ओवून  कवितेच्या एकेक  माळा बनवण्याचा मनाला छंद जडत गेला.

                तब्बल बारा वर्षे म्हणजे एक तप संत साहित्याचे वाचन केले.वाचनाच्या विस्तीर्ण प्रदेशात धुंडाळताना विविधांगी वाचनाची आवड जोपासली. कथा,कविता,कादंबऱ्या मनाला भुरळ पाडत गेल्या. किती वाचू नि किती नको.आता फक्त बेभान होऊन वाचत राहणं.आधाश्यासारं मन पुस्तकांच्या पानापानावर रुंजी घालत होतं.आणि खरंतर उद्ध्वस्त जगण्याला दुरुस्त करण्याचं, मोडून पडलेल्या आयुष्याला पुन्हा उभा राहण्याचं,मरण्यासाठी विष मागणाऱ्या मनाला जगण्याचं बळ देण्याचं काम या शब्दांनी केलं,पुस्तकांनी केलं.

आता ''शब्दची आमुच्या जीवाचे जीवन" हे शब्द नंदूजींच्या जीवाचे जीवन झाले.

हळूहळू विविधांगी वाचनातून लिखाणाची गोडी लागली. आणि नंदूजी म्हणतात तसं 'संत महंतांच्या पंक्तीतल्या उष्ट्यावर आमच्या शब्दांच्या पंक्ती झडतात.'वाचनाने प्रगल्भता लाभली आणि त्या ओघात त्यांची लेखणी प्रसवली. पानांवरचे शब्द वाचायची सवय होती आता  पानांवर शब्द उमटवायची सवय जडली.सुरुवातीला लेखणीस प्रारंभ झाला.सुरुवातीला कविता त्यानंतर कथा,कादंबऱ्या,लेख असे विविधांगी लेखन स्फुरत गेले.धामणे गावचे ज्येष्ठ साहित्यिक शि. गो.पाटील या गुरूंचे बोट धरून या शिष्याने लेखनप्रवासातले पहिले पुस्तक साकारले. यासाठी डॉ. संभाजी जगताप साहेबांची प्रेरणा मिळाली.आणि पहिल्यांदा २०१५ साली ग्रामीण ढंगातलाहा पहिला वहिला 'लुगडं'कथासंग्रह नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

कोहिनूर फाउंडेशन मुंबईचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य वाङमयीन पुरस्कार या पुस्तकाला मिळाला.त्यानंतर ग्रामीण समकालीन जीवन कवेत घेणारा 'जांभळीखालचा झरा'  हा दुसरा कथासंग्रह श्री. पावले सर यांच्या सहकार्याने २०१६ साली प्रकाशित झाला.दक्षिण महाराष्ट्र साहित्य  सभेचा उत्कृष्ट वाङमयीन पुरस्कारही या पुस्तकाला मिळाला. तसेच साने गुरुजी वाचनालय झुलपेवाडी यांचे समारंभपूर्वक गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.या दोन कथासंग्रह नंतर २०१८ साली 'केतकी' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. 

अशा साहित्य क्षेत्रातील यशस्वी वाटचालीबद्दल साप्ताहिक कोल्हापूर व लोकशाहीर द. ना. गव्हाणकर साहित्यभूषण पुरस्कार २०१९ या पुरस्काराने गौरविण्यात आले. गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकांची सुंदर प्रस्तावना लाभलेली 'इपळाप' ही 'कादंबरी आता लवकरच प्रकाशित होत आहे. 

तर 'आठवणीतील साठवण' व 'काळोखाला सूर्य बिलगला'(दोन्हीं आत्मचरित्रात्मक पुस्तके) या कादंबऱ्या तर 'बिवाळा' व्यक्तीचित्रणात्मक पुस्तक आगामी प्रकाशाच्या वाटेवर आहेत.अनेक मासिक,दिवाळी अंक ,वृत्तपत्रे यातून सातत्याने लेखन चालूच असते.

                जीवन प्रवासात एका क्षणी नियतीने दगा दिला अर्ध शरीर जायबंदी केलं.आज २२ वर्षे झालीत हे अपंगत्व येऊन. शरीर अंथरुणाला खिळलं आहे,मातीत धडपडणारे पाय आज गादीवर निर्जीव होऊन निपचित पडलेले असतात. खूप त्रास होतो,वेदना अव्याहतपणे साथ देत असतात. कधी पाठीला जखमा होतात ,पचनक्रिया बिघडते, मूत्राशयाचा संसर्ग हा तर ठरलेलाच. कधी तापानं अंग फणणतं. कधी अवघ्या अंगाला कापरा भरतो.शत्रूसारखे एकेक आजार या शरीरावर विजय मिळवण्यासाठी टपून बसलेले असतात. काही लिहायचे म्हटले तरी हात कापतात.नीट बसता येत नाही,एका कुशीवर होऊन लेखन करावे लागते.  पण हार मानणारे ते नंदूजी कसले..?

त्यांनी सर्वांवर  कधीच मात केलीय. अशा आजारपणात धावून येतो,तो एक माणसातला देव तो देव म्हणजे डॉक्टर संभाजी जगताप. नंदूजींच्या कसल्याही आजारपणात ते एकेकदा घरी येऊन उपचार करतात. सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असतात.नंदूजींचे प्रकृती स्वास्थ्य उत्तम ठेवण्यात त्यांचा खूप मोठा आधार आहे. शारीरिक पातळीवरचा हा संघर्ष खूपदा मानसिक स्वास्थ्याला आव्हान देत असतो.सुरुवातीला चिडचिडेपणा व्हायचा, राग अनावर व्हायचा. सगळ्यांचा त्रागा वाटायचा. पण वेदनांच्या या नानाकळांची अनुभूती आता सर्वांगाला झाली होती.आणि म्हणून या अनुभूतीला मनाच्या सहानुभूतीची जोड मिळत गेली.आजतागायत असहाय वेदना शरीरानं झेलल्या अन मनानं सोसल्या पण आता अशा सहनशीलतेतून मनाला शांती नी संयमाची स्थिती प्राप्त झाली. आता मनाच्या शांतीत सारं काही विरून जातं.

                आई-वडिल या पोटच्या गोळ्याला आजही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपताहेत. लेकराचं उभं आयुष्य असं अपंगत्वाच्या तावडीत सापडलं हा त्यांच्या काळजावर पडलेला घाव कधी न भरून येण्यासारखा आहे. तो घाव इतका वर्मी होता की, उभ्या आयुष्यभराचं दुःख पदरात घातलं.आजही या कष्टाळू आई-बापाचे हिरमुसलेले चेहरे हृदयातल्या त्या ओल्या जखमांची साक्ष देतात.

१४ वर्षे वनवास भोगणाऱ्या  रामाला जशी लक्ष्मणाची अखंड साथ लाभली. तशी आज २२ वर्षे हा अपंगत्वाचा वनवास भोगणाऱ्या भावाला लक्ष्मणागत साथ मिळते आहे ती आपल्या पाठच्या भावाची म्हणजेच सागरजी यांची.नावाप्रमाणेच मायेचा हा सागर आहे.आजच्या कलियुगामध्ये दुर्मिळ अशी ही  राम लक्ष्मणागत भावांची जोडी आहे.

आपल्या थोरल्या बंधूची सेवा अखंडपणे हा भाऊ करत आला आणि आजही करतो आहे.घरातील ऊठ-बस किंवा बाहेरचा प्रवास असू दे ,चाकाच्या खुर्ची मधून दोन हातावरती अंतराळी घेऊन एखाद्या ठिकाणी बसवायचं नी पुन्हा चाकाच्या खुर्चीत ठेवायचं अशी सगळी मायेची उठाठेव  बंधू सागरजी करतात. अतिशय प्रेमळ,जिव्हाळा असणाऱ्या भावाची आणि त्यांच्या पत्नीची साथ नंदूजींना मिळते आहे.

                सागरजींच्या संसाररुपी वेलीवर फुललेली दोन फुले केतकी आणि स्वरा. यांचा तर नदूजींना विशेष लळा.या फुलांच्या सहवासात त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुगंध आला आहे. शब्दांनी जगण्याची हिंमत दिली, पुस्तकांच्या सहवासात जगणे साध्य झाले,वाचनातून समृद्धता आली.समृद्ध व प्रगल्भ ज्ञानातून लेखणीचा उगम होत राहिला आणि या शब्दांच्या प्रवाहामध्ये अनेक संवेदनशील मनांची नाती जुळत गेली. जीवंत हृदयाची माणसे भेटत गेली. आज सभोवार संत सज्जनांचा जीवलगांचा गोतावळा निर्माण झाला आहे. संतरुपी गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी सारख्या गुरुभेटीने तर नंदूजींचे अवघे जीवन धन्य धन्य झाले आहे.

आज काय गमावलं नी काय कमावलं..? याचा हिशोब मांडताना...काय गमावलं. तर नियतीने दोन पायच हिरावून घेतले ना..? पण याच्या उलट आज नदूजींच्या एका हाकेवर धावून येणारे असंख्य पाय हे त्यांचे झालेत.

शरीर जरी एका ठिकाणी स्तब्ध असलं तरी मनानं मात्र उंच भरारी घेतलीय,शब्दांच्या जगात भटकंती करताना स्वतःमधला एक उत्तम संवेदनशील लेखक गवसला.त्यांच्या शब्द सामर्थ्यामधून वाचकांची नाळ त्यांच्या लेखणीला जोडली गेली.माणसातला एक वेगळा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली.समाजातील मान,सन्मान,प्रतिष्ठा चालत त्यांच्याकडे आली.

जगण्याच्या वाटेवर अडखळलेल्या पावलांना आज नदुजींकडे पाहून पुढे चालण्याची प्रेरणा मिळते... आज हे नदुजींनी कमावलं.नंदूजी आपली पाऊले कधीही थांबली नाहीत तर तर धडपडले आजपर्यंत तुमच्या आईवडिलांच्या पावलांच्या रूपातून,आज धडपडताहेत भाऊ सागरजींच्या रूपातून आणि इथून पुढे सदैव धडपडत राहतील तुमच्या लाडक्या लेकी केतकी आणि स्वरा यांच्या पावलांच्या रूपातून.

'जय हो...मंगल हो..!!'

- किरण सुभाष चव्हाण (पांगिरे)
मोबा - ८८०६७३७५२८.


त्यांची अंतरणाला खेळलेली अवस्था

त्यांची अंतरणाला खेळलेली अवस्था

अशा अवस्थेतही लेखन आणि वाचनाचा ध्यास

अशा अवस्थेतही लेखन आणि वाचनाचा ध्यास

ग्रामीण साहित्यिक नंदू साळोखे यांची प्रकाशित पुस्तके

ग्रामीण साहित्यिक नंदू साळोखे यांची प्रकाशित पुस्तके
ग्रामीण साहित्यिक नंदू साळोखे यांची प्रकाशित पुस्तके
ग्रामीण साहित्यिक नंदू साळोखे यांची प्रकाशित पुस्तके
ग्रामीण साहित्यिक नंदू साळोखे यांची प्रकाशित पुस्तके

राम लक्ष्मणासारखी भावांची जोडी नंदूजी सोबत त्यांचे भाऊ सागर

राम लक्ष्मणासारखी भावांची जोडी नंदूजी सोबत त्यांचे भाऊ सागर

गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी यांच्यासोबत

गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी यांच्यासोबत

ग्रामीण लेखक नंदू साळोखे यांची क्षणचित्रे अवश्य पहा खालील लिंकवर.

▶ ग्रामीण लेखक नंदू साळोखे यांची क्षणचित्रे पाहा

ग्रामीण साहित्यिक नंदू साळोखे यांच्या जीवन, संघर्ष, वाचन आणि लेखनप्रवासाची ही शब्दचित्रमय कहाणी.

गुरुवार, २ जुलै, २०२६

परीक्षा

 परीक्षा.


शी$$ बाई उद्यापासून 

आमची परीक्षा 

रोज रोज पुन्हा पुन्हा 

अभ्यासाची शिक्षा 


आई म्हणते जाता-येता

अभ्यास कर नीट 

काय सांगु बाई याचा 

किती आलाय वीट


बाबा म्हणतात बाळ 

उठत जा लवकर 

पहाटेच्या शांत वेळी 

करत जा पाठांतर


 रोज रोज उजळणी

 घेते आमची ताई 

खेळायला जराही 

बाहेर सोडत नाही 


दादा करी शहाणपणा

सांगे चुगल्या घरी 

पाहा कशी टाळाटाळ 

करते तुमची परी 


अभ्यासात हयगय

करायचे नाही 

पहारा किती कडक

काय सांगू बाई


 शाळेमध्ये अभ्यासाच्या 

रोज नव्या सूचना 

शिक्षक म्हणतात मुलांनो 

अभ्यास करताय ना ?


मन लावून अभ्यास करून

देऊया परीक्षा 

चांगल्या गुणांची

होईल पूर्ण अपेक्षा.


किरण सुभाष चव्हाण

शनिवार, २७ जून, २०२६

🌸 वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अविनाश लोंढे यांची अनोखी साहित्यिक भेट; ‘@75’ कवितासंग्रहाचे प्रकाशन 🌸

 

वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अविनाश लोंढे यांची अनोखी साहित्यिक भेट

‘@75’ कवितासंग्रहाचे प्रकाशन


अविनाश लोंढे लिखित व असुस प्रकाशन प्रकाशित ‘@75’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन साहित्यिकांच्या उपस्थितीत अत्यंत भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
विशेष म्हणजे आपल्या वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अविनाश लोंढे यांनी ७५ कवितांचा हा कवितासंग्रह आपल्या वडिलांना समर्पित करून एक अनोखी साहित्यिक भेट दिली.

विशेष म्हणजे हा कविता प्रकाशनाचा सोहळा घरातील सदस्यांच्या उपस्थितीत, परिसरातील साहित्यिकांना आमंत्रित करून अत्यंत आपुलकीच्या वातावरणात औपचारिक पद्धतीने घरामध्येच आयोजित करण्यात आला होता. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त साहित्याच्या माध्यमातून दिलेली ही अनोखी भेट उपस्थित सर्वांच्या मनाला भावली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक संजय खोचारे सर तसेच अभिनय कलाकार व डॉक्टर संभाजी जगताप उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित सर्व साहित्यिकांचे स् स्वागत व प्रास्ताविकातून सौ. विद्या खामकर मॅडम यांनी कवी अविनाश लोंढे यांच्या वडिलांना दीर्घायुष्य मिळावे व अशीच १०० कवितांच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाची संधी मिळावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या

 अविनाश लोंढे यांनी ‘@75’ या कवितासंग्रहामागील भूमिका व उद्देश स्पष्ट केला. त्यांचे वडील ईश्वर लोंढे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हा ७५ कवितांचा संग्रह त्यांनी त्यांना समर्पित केला आहे.

वडिलांच्या जीवनातील संघर्ष, चढ-उतार, अनुभव तसेच सामाजिक आणि परिसरातील विविध विषयांना कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात आले आहे.

यावेळी अविनाश लोंढे यांनी प्रत्येक शाळा व ग्रंथालयामध्ये ‘@75’ या पुस्तकाच्या प्रती भेट देण्याचा संकल्प व्यक्त केला.

यानंतर सदर कार्यक्रमात डॉ.संभाजी जगताप, संजय खोचारे,ईश्वर लोंढे व उपस्थित साहित्यिकांच्या शुभहस्ते ‘@75’ कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

मनोगत व्यक्त करताना डॉक्टर संभाजी जगताप यांनी पुस्तकाचे कौतुक करत भुदरगड तालुक्यातून नवनवीन साहित्यिक निर्माण होत असून त्यांच्या लेखणीतून दर्जेदार साहित्याची निर्मिती होत असल्याचे सांगितले.

अशा साहित्यिकांना प्रोत्साहन देणे, त्यांचे साहित्य वाचणे आणि त्यांना प्रेरणा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

संजय खोचारे यांनी आपल्या ग्रामीण शैलीतील भाषणातून अविनाश लोंढे यांच्या कवितासंग्रहाचे कौतुक केले. ग्रामीण साहित्यिकांच्या लेखनाचा संदर्भ देत आपल्या परिसरातील साहित्यिकांनी लेखणीच्या बळावर मोठी उंची गाठली आहे.

आपणच आपल्या साहित्यिकांना मोठे केले पाहिजे, असे मत व्यक्त करत त्यांनी पुस्तकाला शुभेच्छा दिल्या.

किरण चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून ‘@75’ कवितासंग्रहाला शुभेच्छा देत ईश्वर लोंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यानंतर सचिन दुधाळे यांनी सुरेश भट यांच्यासारख्या गजलगारांचा संदर्भ देत आपल्या खुमासदार शैलीत मनोगत व्यक्त केले.

तानाजी पावले यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा, निसर्ग आणि सामाजिक वास्तवावर भाष्य करत या वेदना साहित्यामधून मांडल्या गेल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले.

यानंतर अविनाश लोंढे यांनी आपल्या ‘@75’ कवितासंग्रहातील काही निवडक कवितांचे वाचन केले. त्यांच्या हृदयस्पर्शी कवितांना उपस्थित साहित्यिक व रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर चारोळीकार सौ. विद्या खामकर मॅडम यांनी सुद्धा प्रेम आणि वेदना या विषयांवरील त्यांच्या निवडक चारोळ्यांचे सादरीकरण केले.

वडिलांविषयीचे प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा साहित्यिक सोहळा सर्वांच्या मनाला भिडला.
शब्दांच्या माध्यमातून अविनाश लोंढे यांनी आपल्या वडिलांचे जीवन, संघर्ष आणि भावना जिवंत केल्या. या प्रसंगी ईश्वर लोंढे यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि अभिमानाने त्यांचा उर भरून आला.

सदर  कार्यक्रमास डॉ.संभाजी जगताप ,संजय खोचारे, तानाजी पावले गुरुजी,विद्या खामकर,अशोक गुरव, बाळासो जाधव,किरण चव्हाण, सचिन दुधाळे,सुशांत बोटे,सौ पवार सर्व साहित्यिक, रसिक प्रेमी, लोंढे परिवारातील सदस्य उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण मगदूम यांनी केले. विविध साहित्यिक व कवितांचे दाखले देत त्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. साहित्यिकांनी एकत्र येऊन साहित्याचा उत्सव साजरा केला पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

साहित्यिक, रसिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ‘@75’ कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

पुस्तक प्रकाशनातील क्षणचित्रे

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..!

कवी अविनाश लोंढे यांच्या ‘@75’ कवितासंग्रहासाठी हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या पुढील लेखन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. साहित्य क्षेत्रात आपल्या लेखणीचा सुगंध असाच दरवळत राहो, हीच सदिच्छा.

,

रविवार, २१ जून, २०२६

📰 आरदाळमध्ये पावसासाठी भैरीदेवाला जलाभिषेक... मायमाऊलींच्या भक्तीला मिळाला पावसाचा आशीर्वाद! | आरदाळ

 

🌧️ पावसासाठी भैरीदेवाला जलाभिषेक...
मायमाऊलींच्या भक्तीला मिळाला पावसाचा आशीर्वाद!



आरदाळ : श्रद्धा, भक्ती आणि प्रार्थनेने देवाला घातले साकडे; दुपारीच पावसाने लावली हजेरी...

पावसाने ओढ दिल्याने सर्व जीव व्याकुळ झाले आहेत. आज भर पावसाळ्याच्या दिवसांतही रणरणत्या उन्हाने धरतीमायेला अक्षरशः भाजून काढले आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी, तहानलेली जमीन आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेले रानशिवार अशीच काहीशी अवस्था सगळीकडे बघायला मिळते.

आभाळात अजूनही मायेचे ढग दिसत नाहीत ना जमिनीवर पावसाचा थेंब बरसत आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे.

अखेर गावातील ग्रामस्थांनी आपल्या ग्रामदैवत भैरीदेवाला जलाभिषेक करून पावसासाठी साकडे घालण्याचा संकल्प केला.

आज सकाळी लवकरच गावातील मायमाऊलींनी डोक्यावर पाण्याच्या घागरी घेत भक्तिभावाने भैरीदेव मंदिराकडे प्रस्थान केले. मंदिरात पोहोचल्यानंतर गावचे गुरव श्री. शिवाजी गुरव यांच्या हस्ते भैरीदेवाला जलाभिषेक करण्यात आला. जलाभिषेकाने देवाचा गाभारा पाण्याने भरून गेला.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घंटानाद करत देवाच्या चरणी एकच गाऱ्हाणे घातले...

श्री. शिवाजी गुरव यांनी हे गाऱ्हाणे शब्दांत मांडले....

"हे महाराजा...
पाऊस पाणी पडू दे,
पीक पाणी चांगले येऊ दे,
रानशिवार हिरवेगार होऊ दे,
सगळेजण सुखी आणि समाधानी राहू दे..."

लहान निरागस लेकरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी हात जोडून भैरीदेव महाराजांकडे पावसासाठी प्रार्थना केली. भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाने भरलेल्या या वातावरणात सर्वांनी देवाकडे मनोभावे मागणे मागितले.

आणि देवाची किमया बघा..!

या भक्तीची प्रचिती जणू त्याच दिवशी पाहायला मिळाली. दुपारीच आभाळ दाटून आले आणि पावसाने आरदाळ गावासह परिसरात हजेरी लावली. बराच काळ प्रतीक्षेत असलेल्या धरतीमाईला पावसाच्या सरींनी चिंब भिजवले. रानशिवाराला नवसंजीवनी मिळाली.

श्रद्धेने आणि आत्मीयतेने केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते, असा विश्वास ग्रामस्थांच्या मनात आणखी दृढ झाला. भैरीदेव महाराजांच्या चरणी घातलेल्या साकड्याला मिळालेला हा आशीर्वाद म्हणून ग्रामस्थांनी या क्षणाकडे पाहिले.

🌧️ देवा महाराजा... 🌧️

असाच पाऊस पडू दे,
सगळे रानशिवार चिंब चिंब भिजू दे,
शेतात भरघोस पीक येऊ दे,
आणि सर्वांच्या घरात सुख-समृद्धी नांदू दे...


हीच प्रार्थना पुन्हा एकदा भैरीदेव महाराजांच्या चरणी. 🙏

शुक्रवार, ५ जून, २०२६

ज्ञानदानाचं व्रत घेऊन अखंड ज्ञानदान करणारी ज्ञानाई: सौ. आक्काताई शंकर केंगार

 
आक्काताई शंकर केंगार

ज्ञानदानाचं व्रत घेऊन अखंड ज्ञानदान करणारी ज्ञानाई: सौ. आक्काताई शंकर केंगार

गरिबीच्या चुलीपासून ज्ञान मंदिरापर्यंतचा प्रवास

ती सावित्रीची लेक...गरिबीशी झुंज देत ज्ञानाचे धडे गिरवीत राहिली...त्या काळातही तिच्या माऊलीने जिद्दीने तिला शिकवलं ,लहानच मोठं केलं...आणि केवळ शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या त्या पोरींनं आईचं स्वप्न साकार केलं...हातात पेन्सिल धरून शिकणारी पोरं... हातात खडू घेऊन पोरांना शिकवू लागली आणि त्या गरीब, दीनदुबळ्या आईची लेक मास्तरीन झाली...हा प्रवास आहे..गेली ३३ वर्षे अखंडितपणे ज्ञानदानाची सेवा करणाऱ्या ज्ञानाईचा अर्थातच सौ.आक्काताई शंकर केंगार यांचा...

                            सौ. आक्काताई शंकर केंगार यांचा जन्म वडील श्री.शिवराम दादोबा गेजगे व आई इंदूबाई गेजगे यांच्या पोटी १ जून १९६६ रोजी गंगापूर या ठिकाणी झाला. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची ,घरामध्ये आठरा विश्व दारिद्र्य...त्यावेळी वाजंत्री हा घरचा पारंपरिक व्यवसाय. पण वडिलांचं छत्र अचानक हरपल्यामुळे मायलेकी आईच्या माहेरी म्हणजे गंगापूर या ठिकाणी येऊन राहिल्या. नवऱ्याचं अचानक संसारातून जाणं. पोटाला एक लेक अशा परिस्थितीमध्ये आईने हिम्मत हारली नाही.

ज्या काळात मुलींच्या शिक्षणाला अजूनही एवढं महत्त्व प्राप्त झालेलं नव्हतं. मागासवर्गीय म्हणून समजल्या जाणाऱ्या वाजंत्री समाजातल्या एका माऊलीने आपल्या लेकीला शिकवायचं. आणि मोठं करायचं हे जे स्वप्न पाहिलं हाच किती त्या काळामधला त्या माऊलीचा मोठा क्रांतिकारी विचार होता. आपला पती नसताना परिस्थितीपुढे हात टेकून आपण कसंतरी पोट भरायचं हा विचार या माऊलीने केला नाही तर उलट परिस्थितीशी दोन हात करून, मोलमजुरी करून प्रसंगी डोक्यावरून मातीच्या चुली घेत त्या विकून आपल्या लेकीला खूप शिकवायचं हा एक उदात्त विचार या माऊलीने केला.

                       तिनं ठरवलं परिस्थितीशी टक्कर देऊन लेकीला शिकवायचं आणि मोठं करायचं. आणि यासाठी या माऊलीचे वडील म्हणजे सौ आक्काताई केंगार यांचे आजोबा श्री.भाऊसो गोपाळ केंगार आणि आजी चंद्रभागा केंगार यांच्या सावलीखाली आणि डोंगरासारखा आधार असणारे एकूण सहा मामा सदाशिव, शंकर, रामचंद्र केंगार हे वाजंत्री म्हणून भागामध्ये प्रसिद्ध कलाकार होते. भजनसम्राट म्हणूनही त्यांची ख्याती होती. तर सतीश,पांडुरंग, शिवाजी केंगार हे तेव्हा नोकरी करत होते. या सहा मामांनी आपल्या एकुलत्या एक लाडक्या भाचीला पोटच्या मुलीचे प्रेम देऊन तिच्या शिक्षणामध्ये आणि पुढील तिच्या वाटचालीमध्ये खूप मोठा वाटा उचलला आणि मग सुरू झाला लहानग्या आक्काताईच्या शिक्षणाचा प्रवास.

                      आईने लोकांच्या शेतात उन्हातान्हात, पाऊस वाऱ्यात मोलमजुरी केली. राबराब राबली बिचारी आणि तुटपुंज्या येणाऱ्या त्या मोलमजुरीच्या पैशातून लेकीला एकेक इयत्ता शिकवू लागली. कधी उन्हाळ्यात चिखल तुडवून हाताने मातीच्या चुली घडवायच्या आणि त्या गावांगावामध्ये जाऊन गल्लीत उन्हातानाच डोक्यावरती त्या चुली घेऊन हिंडून फिरून विकायच्या आणि येणाऱ्या त्या पैशातून आपल्या लेकीच्या वह्या पुस्तकांची सोय करायची. या संघर्षात सगळ्याच भावांची तिला साथ मिळत होती. यावेळी आक्काताईचा पांडुरंगमामा मिलिटरीमध्ये नोकरीला होता. तो आपल्या बहिण व भाचीसाठी देशाच्या सीमेवरून अधून मधून पन्नास रुपयांची मनी ऑर्डर पाठवून देत असायचा.

                          गंगापूर येथील प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते सातवी पर्यंत आक्काताई यांचे शिक्षण झाले. त्याच्यानंतर दौलत विद्यामंदिर मडिलगे येथे हायस्कूलचे आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. यावेळी गंगापूर पासून मडीलगेपर्यंत एस.टी ची सोय नव्हती तरीसुद्धा आईच्या उन्हातानातल्या कष्टकरी हाताची जाणीव ठेवून या लेकीने पायी चालत जाऊन अगदी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर तिथून अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी या ठिकाणी प्रवेश घेतला.

                        दरम्यान १९८७ साली श्री.शंकर केंगार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. परंतु त्यानंतर देखील त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले व पुढे स्पेशल बी.ए.बी.एड ला प्रवेश घेऊन कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी इथून बी.एडचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या या वाटचालीमध्ये आईने तर कष्ट घेतलेचं त्यासोबत त्यांच्या आजी-आजोबांनी आणि सहा मामांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला त्यांना काहीही कमी पडू दिले नाही. अक्काताई यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी जसे माहेरच्या लोकांनी कष्ट घेतले तसेच आपल्या पत्नीला नोकरी लागावी म्हणून पुढील जबाबदारी त्यांचे पती श्री शंकर केंगार यांनी घेतली. त्यासाठी प्रसंगी त्यांनी खेडोपाडी लग्नामध्ये वाजवण्याचे काम केले, रस्त्यावरची खडी फोडली आणि रस्त्यावर डांबर टाकण्याचे सुद्धा त्यांनी काम केले.

                          आणि शेवटी या सर्वांचे कष्ट फळाला आले ते म्हणजे सर्वप्रथम १९९१ साली इस्लामपूर मधील आदर्श बालक विद्यामंदिर उरुण इस्लामपूर या ठिकाणी एक वर्ष मॅडमांना नोकरीची संधी मिळाली. पण अल्पकाळचं ही नोकरी ठरली. पण पुढे त्यांच्या जीवनात एक अनपेक्षित वळण येणार होते. एकदा कागलमध्ये गीत रामायणचा श्रवणीय असा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला लोकांची प्रचंड गर्दी होती. आणि या गीतरामायणाच्या कार्यक्रमात आक्काताई यांचे मामा श्री.सतीश केंगार हे प्रमुख गायक होते. त्यांच्या सुरमयी गायकीने सर्व कागलकरांना मंत्रमुग्ध केले. तेंव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या श्री. वसंतराव देशपांडे सरांना त्यांचे गायन इतके भावले की त्यांनी आपुलकीने त्यांना बोलावून घेतलं, त्यांची आपुलकीने विचारपूस करून खुप कौतुक केलं.. तेव्हा या मामाने बक्षिसी म्हणून काय मागितला असेल..? ना स्वतःसाठी..ना आपल्या मुलांच्यासाठी.. जे मागितलं ते फक्त आपल्या भाचीसाठी..देशपांडे सरांना ते म्हणाले, "माझ्या भाचीला आपल्या शाळेत नोकरी द्या एवढं दान माझ्या पदरात टाका." आणि ते दान त्यां थोर मनाच्या दातृत्वशील माणसांनी त्यांना देऊन टाकलं... आक्काताईला त्यांच्या शाळेत घ्यायचं त्यांनी कबूल केलं... मग काय इथेच आक्काताईच्या जीवनाच सोनं झालं...सतीश मामांच्या त्या सुरांनी अक्काताईच्या जीवनाचे सुर जुळवून आणले.

                           श्री वाय.डी माने अण्णा आणि श्री वसंतराव देशपांडे सरांच्या पुढाकाराने दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित,  बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कसबा सांगाव या शाळेमध्ये आक्काताईंना नोकरीची संधी मिळाली आणि अशा प्रकारे १९९३ साली कसबा सांगाव येथील शाळेत हायस्कूल शिक्षिका म्हणून त्यांच्या नोकरीला सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं अखंडित व्रत त्यांनी हाती घेतलं. मॅडमांचा विषय हिंदी आणि इतिहास त्यासोबत मराठी विषयाचे अध्यापन देखील त्यांनी केले. हिंदी विषयाच्या अध्यापिका म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मुलांना ज्ञानदानाचे काम केले. सुरुवातीला दोनशे रुपये एवढ्या तुटपुंज्या पगारावरती त्यांनी दिवस काढले. या काळामध्ये त्यांचे पती शंकर केंगार हे सुद्धा श्री लक्ष्मी विद्यालय जुनियर कॉलेज हसुरमध्ये अध्यापक म्हणून काम करत होते. पण ते सुद्धा विनाअनुदानित मध्ये असल्यामुळे त्यांना देखील पगार नव्हता..दोघांनाही नोकरी होती पण पगार नव्हता अशी अवस्था होती.

अशात दोन लेकरं पोटाला होती. संसाराचा गाडा कसा हाकायचा हा प्रश्न होता संघर्ष काही पाठ सोडायला तयार नव्हता .पुन्हा एकदा हा अत्यंत खडतर काळ सुरू झालेला होता. मुलांना ज्ञानदानाचे काम करायचं परंतु हातामध्ये पगार येत नव्हता तरीसुद्धा हार न मानता या दांपत्याने आपल्या विद्यार्थ्यांना निरपेक्ष भावनेने ज्ञानदानाचे काम केले. यावेळी त्यांच्या सासूबाई सखुबाई प्रसंगी सांगावमधल्या लोकांच्या शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करून आपल्या या लेकाच्या कुटुंबाला हातभार लावत होत्या. पोराला शिकवण्यापासून त्याचा संसार उभा करून देण्यापर्यंत त्यांनीही खूप खस्ता खाल्या.

                      पण आक्काताई यांच्या कष्टाला,जिद्दीला आणि त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या त्यांच्या सर्व कुटुंबाच्या मेहनतीला शेवटी फळ आले आणि १९९४ साली त्यांचा नियमित पगार सुरू झाला. सर्वांना आनंद झाला. 

                  मॅडमांचा स्वभाव अगदी मायाळू, ममत्वाने ओतप्रोत भरलेला आणि संवेदनशील मनाच्या हळव्या अशा मॅडम. आईच्या अंतःकरणाने आपल्या विद्यार्थ्यांना आपलं लेकरू समजून अध्यापन करायच्या. स्टाफमध्ये सर्वांशी मिळून मिसळून राहून सर्वांशी मायेने वागून काम करत राहायच्या. शाळा म्हणजे आपलं दुसरं कुटुंब समजून त्यांनी शाळेचा प्रपंच देखील नीटनेटका केला. ज्या संघर्षातून मी आले , ज्या परिस्थितीतून मी घडले त्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्याही विद्यार्थ्यांनी संघर्षातून,खडतर परिस्थिती,परिश्रमातून आपलं ध्येय गाठलं पाहिजे यासाठी अगदी अंतकरणाने, तळमळीने त्या विद्यार्थ्यांना अध्यापन करायच्या.

                     या ज्ञानमाऊलीच्या सावलीमध्ये असंख्य विद्यार्थी आजपर्यंत घडले. शिकून लहानाचे मोठे झाले आणि आपापल्या क्षेत्रांमध्ये ते आज कार्यरत आहेत. आज देखील ते विद्यार्थी अतिशय आत्मीयतेने मॅडमची आठवण काढतात, मॅडमांना भेटतात. ज्ञानाच्या संस्काराने घडवणारी या लेकरांची ती शाळेतील आईच होती. मॅडम आणि विद्यार्थ्यांचा हा नात्याचा ओलावा आई व लेकराच्या स्तरावरचा होता.

आदर्श शिक्षिका गौरव: म्हणून त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या योगदानाबद्दल २०२१ साली जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग पंचायत समिती कागल यांच्याकडून सन्मान करण्यात आला. तर २०२५ साली नाविद मुश्रीफ अधिष्ठान कागल यांच्याकडून आदर्श शिक्षिका म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला.

                          तेहतीस वर्षांचा अखंडित हा ज्ञानयज्ञ सुरू होता आणि आज ३३ वर्षांची प्रामाणिक, निरपेक्ष,निस्पृह अशी सेवा बजावून ३१ मे २०२६ रोजी मॅडम आपल्या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. सावित्रीबाई फुले यांची ही लेक खऱ्या अर्थाने त्यांच्या शिक्षणाच्या परंपरेतील वारसदार आहे. ज्ञानदानाचं व्रत हाती घेऊन ३३ वर्षे त्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये आपली सेवा बजावली. अर्थातच सत्तर ते नव्वदच्या दशकातला तो काळही  मुलींच्या शिक्षणासाठी एवढा अनुकूल नव्हता. मुलींनी चूल आणि मूल सांभाळण्यापर्यंतची मानसिकता समाजातून अजून गेलेली नव्हती. अशा काळामध्ये वाजंत्री समाजातील एक स्त्री पुढे येते. आपल्या आई-वडिलांच्या आणि आपल्या भावांच्या आधाराने आपल्या लेकीला शिकवून शिक्षिका बनवते. खरच धन्य आहे ती माऊली..आणि तिचे कष्ट. .. त्या माऊलीचा आदर्श आजच्या स्त्रियांनी घ्यायला हवा असाच आहे.

खरंच आई असावी तर अशी असावी. मामा असावेत तर असे. मॅडमांच्या शिक्षणापासून नोकरीपर्यंत त्यांच्या पाठीशी पहाडासारख्या उभ्या असणाऱ्या त्यांच्या आई, सासूबाई, आजी-आजोबां, सहा मामांचा आणि त्यांच्या पतीच्या खूप मोठ्या पाठबळावर त्या शिक्षिका झाल्या. मॅडमांच्या संसारातील रत्नासारखी दोन पुत्ररत्न एक वैभव आणि दुसरा सागर. वैभव आज मेकॅनिकल अभियंता म्हणून कार्यरत आहे तर सागर हा त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून एक शिक्षक म्हणून आदर्श प्रशाला कसबा सांगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

                            मॅडम.... ३३ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहात. लहानपणापासूनच अतिशय कष्टातून घेतलेला शिक्षणाचा ध्यास आणि एकूणच आतापर्यंतचा प्रवास तुमच्या डोळ्यासमोर तरळत असेल ना..? एका मागून एक आठवणी तुमच्या मनाच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत असतील...आणि डोळ्यांच्या कडा आपोआपच पाणावत असतील. आत्तापर्यंत ज्ञानदानाचा हा यज्ञ अखंड तुम्ही तेवत ठेवलात आणि आज ही शाळा , आपले लाडके विद्यार्थी सोडून तुम्हाला आता सेवानिवृत्त व्हावं लागतंय.

शाळारूपी आईच्या कुशीत तिच्या सावलीत तुम्हीं असंख्य लेकरं घडवलात. ही शाळा म्हणजे तुमचं माहेरघर झालं होतं. त्या माहेरतील शाळारूपी आईला मागे ठेऊन,आपल्या लेकरांना मागे सोडून ही लेक जणू पुन्हा सासरी चालली आहे.. आपल्या घरी परतत आहे. मॅडम तुम्हीं या शाळेला सोडून जाताना ती शाळा देखील बघा कशी गहिवरलेली आहे. अबोल होऊन आपल्याला निरोप द्यायला उभी आहे. गेली ३३ वर्षे ज्यांचा सहवास लाभला असे तुमचे सहकारी भावंडेसुद्धा आपली मोठी बहीण, आमच्या लाडक्या मॅडम सेवानिवृत्त होऊन आपल्याला सोडून जाणार म्हणून सदगतीत झाले असतील. त्या निष्पाप लेकरांची तर काय सांगावी अवस्था.
आमचा लाडक्या मॅडम आता पुन्हा आमच्यावर शिकवायला येणार नाहीत म्हणून बिचारी कावरी बावरी झाली असतील.

                         परंतु एखाद्या टप्प्यावर आपल्याला सेवानिवृत्त व्हावच लागतं. हा सगळा मांडलेला सारीपाट मागे सोडून आपल्याला पुढे जावंचं लागतं. मॅडम तुम्ही अतिशय आत्मीयतेनं, चांगल्या मनाने आपल्या लेकरांना घडवलात.आपलं घर,आपला संसार सांभाळून तुम्ही शाळेचा देखील प्रपंच सांभाळत अध्यापनाची सेवा पार पाडलात. तुमच्या या अध्यापनातून असंख्य लेकरांची घर उभारलीत. हीच तुमच्या आजपर्यंतच्या कार्याची शिदोरी ,पुण्याई घेऊन आज सेवानिवृत्त होत आहात. आज हा दिवस पाहण्यासाठी तुमची ती कष्टकरी माऊली म्हणजे तुमची आई,तुमचे आजी-आजोबा,तुमच्या सासूबाई आणि तुमचे आज एकच मामा हयात आहेत परंतु आज ते पाच मामाही या ठिकाणी पाहिजे होते. आज तुमच्या सेवापूर्तीच्याक्षणी स्वप्नंपूर्ती झालेल्या त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा आनंदाश्रू वाहिले असते.. आनंदाने ,अभिमानाने त्यांचा उर अगदी भरून आला असता.

                        आज पर्यंत घर सांभाळत शाळा सांभाळताना तारेवरची कसरत केला असाल ना..? आता सेवानिवृत्तनंतर आपल्या घराकडे पूर्ण लक्ष द्या... नोकरीच्या कालावधीमध्ये आपल्याला काही गोष्टी करता नाही आल्या त्याला संपूर्ण वेळ द्या. स्वतःला आणि कुटुंबाला जपा. आरोग्याची काळजी घ्या, खूप फिरा, जीवनाचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या त्या माहेरामधील लोक.. कदाचित काहीजण या जगामध्ये आज नसतीलही.. परंतु त्यांच्या सहवासाच्या आठवणींचा गंध ज्या मातीत आजही दरवळतोय त्या मातीला भेटून आशीर्वाद घ्या...

तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा...!

जय हो..! मंगल हो..!

किरण सुभाष चव्हाण

किरण सुभाष चव्हाण
मोबा - ८८०६७३७५२८

सौ. आक्काताई शंकर केंगार

॥ मानपत्र ॥

प्रति,

सौ. आक्काताई शंकर केंगार

(सेवानिवृत्त शिक्षिका)

आज आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि अखंड ज्ञानदानाची सेवा पूर्ण करून आपण सेवानिवृत्त होत आहात, हा क्षण आम्हा सर्वांसाठी अत्यंत भावूक आणि अभिमानाचा आहे.

गंगेसारख्या गंगापूरच्या मातीत जन्मलेल्या, गरिबीशी झुंज देत, आईच्या कष्टाची जाणीव ठेवून आणि परिस्थितीवर मात करून तुम्ही शिक्षिका झालात. आपल्या माऊलीने मोलमजुरी करून, मातीच्या चुली विकून आणि भावांच्या प्रेमाच्या सावलीत उभे केलेले तुमचे व्यक्तिमत्व, आज हजारो विद्यार्थ्यांना घडवणारी एक 'शाळेतील आई' झाली आहे.

१९९३ साली कसबा सांगाव येथील शाळेत रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत, हिंदी, इतिहास आणि मराठी विषयाच्या अध्यापनातून तुम्ही केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर विद्यार्थ्यांना संघर्षातून ध्येय गाठण्याचे संस्कार दिले. विनाअनुदानित काळातील खडतर आर्थिक परिस्थिती असो किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या, तुम्ही हार मानली नाही. तुमच्या या तळमळीचे, ममत्वाचे आणि संवेदनशीलतेचे प्रतीक म्हणून २०२१ चा जिल्हा परिषद कोल्हापूरचा पुरस्कार आणि २०२५ चा आदर्श शिक्षिका पुरस्कार ही केवळ एक पोचपावती आहे.

तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या तुमच्या आईचे कष्ट, आजी-आजोबांचे आशीर्वाद, सासूबाईचे पाठबळ, मामांचे मार्गदर्शन आणि पतीची साथ, या सर्वांचे फळ म्हणून आज तुम्ही एक यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. आपल्या या ध्येयवेड्या प्रवासात, आपण आपल्या वैभव आणि सागर या दोन्ही पुत्रांनाही उत्तम संस्कारांनी घडवले आहे. वैभवने मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून आणि सागरने आपल्याच पावलांवर पाऊल ठेवून शिक्षक म्हणून समाजात स्वतःला सिद्ध केले आहे.

ज्या शाळेला तुम्ही आपले माहेर मानले, ज्या विद्यार्थ्यांना लेकरांप्रमाणे जपले, त्यांना निरोप देताना आज शाळाही गहिवरलेली आहे. आज सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे असताना, तुम्ही कमावलेली ही पुण्याई, असंख्य लेकरांच्या आयुष्यात पडलेले ज्ञानाचे संस्कार आणि तुमच्या कार्याचा हा अखंड प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

तुमच्या पुढील वाटचालीस, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आम्ही मनःपूर्वक शुभेच्छा देतो. तुमचा पुढील प्रवास सुखमय आणि आनंददायी होवो! हीच प्रार्थना..!

               जय हो..! मंगल हो...!

॥ आपला प्रवास प्रेरणादायी आणि वंदनीय आहे ॥

मातीशी नाळ जपणारा, उपेक्षितांच्या जगण्याला शब्द देणारा अस्सल ग्रामीण साहित्यिक! डॉ. राजन गवस | जन्मदिन विशेष

  कथामय मराठी कथा प्रस्तुत मातीशी नाळ जपणारा, उपेक्षितांच्या जगण्याला शब्द देणारा अस्सल ग्रामीण साहित्यिक! साहित्यि...