ती सावित्रीची लेक...गरिबीशी झुंज देत ज्ञानाचे धडे गिरवीत राहिली...त्या काळातही तिच्या माऊलीने जिद्दीने तिला शिकवलं ,लहानच मोठं केलं...आणि केवळ शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या त्या पोरींनं आईचं स्वप्न साकार केलं...हातात पेन्सिल धरून शिकणारी पोरं... हातात खडू घेऊन पोरांना शिकवू लागली आणि त्या गरीब, दीनदुबळ्या आईची लेक मास्तरीन झाली...हा प्रवास आहे..गेली ३३ वर्षे अखंडितपणे ज्ञानदानाची सेवा करणाऱ्या ज्ञानाईचा अर्थातच सौ.आक्काताई शंकर केंगार यांचा...
सौ. आक्काताई शंकर केंगार यांचा जन्म वडील श्री.शिवराम दादोबा गेजगे व आई इंदूबाई गेजगे यांच्या पोटी १ जून १९६६ रोजी गंगापूर या ठिकाणी झाला. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची ,घरामध्ये आठरा विश्व दारिद्र्य...त्यावेळी वाजंत्री हा घरचा पारंपरिक व्यवसाय. पण वडिलांचं छत्र अचानक हरपल्यामुळे मायलेकी आईच्या माहेरी म्हणजे गंगापूर या ठिकाणी येऊन राहिल्या. नवऱ्याचं अचानक संसारातून जाणं. पोटाला एक लेक अशा परिस्थितीमध्ये आईने हिम्मत हारली नाही.
ज्या काळात मुलींच्या शिक्षणाला अजूनही एवढं महत्त्व प्राप्त झालेलं नव्हतं. मागासवर्गीय म्हणून समजल्या जाणाऱ्या वाजंत्री समाजातल्या एका माऊलीने आपल्या लेकीला शिकवायचं. आणि मोठं करायचं हे जे स्वप्न पाहिलं हाच किती त्या काळामधला त्या माऊलीचा मोठा क्रांतिकारी विचार होता. आपला पती नसताना परिस्थितीपुढे हात टेकून आपण कसंतरी पोट भरायचं हा विचार या माऊलीने केला नाही तर उलट परिस्थितीशी दोन हात करून, मोलमजुरी करून प्रसंगी डोक्यावरून मातीच्या चुली घेत त्या विकून आपल्या लेकीला खूप शिकवायचं हा एक उदात्त विचार या माऊलीने केला.
तिनं ठरवलं परिस्थितीशी टक्कर देऊन लेकीला शिकवायचं आणि मोठं करायचं. आणि यासाठी या माऊलीचे वडील म्हणजे सौ आक्काताई केंगार यांचे आजोबा श्री.भाऊसो गोपाळ केंगार आणि आजी चंद्रभागा केंगार यांच्या सावलीखाली आणि डोंगरासारखा आधार असणारे एकूण सहा मामा सदाशिव, शंकर, रामचंद्र केंगार हे वाजंत्री म्हणून भागामध्ये प्रसिद्ध कलाकार होते. भजनसम्राट म्हणूनही त्यांची ख्याती होती. तर सतीश,पांडुरंग, शिवाजी केंगार हे तेव्हा नोकरी करत होते. या सहा मामांनी आपल्या एकुलत्या एक लाडक्या भाचीला पोटच्या मुलीचे प्रेम देऊन तिच्या शिक्षणामध्ये आणि पुढील तिच्या वाटचालीमध्ये खूप मोठा वाटा उचलला आणि मग सुरू झाला लहानग्या आक्काताईच्या शिक्षणाचा प्रवास.
आईने लोकांच्या शेतात उन्हातान्हात, पाऊस वाऱ्यात मोलमजुरी केली. राबराब राबली बिचारी आणि तुटपुंज्या येणाऱ्या त्या मोलमजुरीच्या पैशातून लेकीला एकेक इयत्ता शिकवू लागली. कधी उन्हाळ्यात चिखल तुडवून हाताने मातीच्या चुली घडवायच्या आणि त्या गावांगावामध्ये जाऊन गल्लीत उन्हातानाच डोक्यावरती त्या चुली घेऊन हिंडून फिरून विकायच्या आणि येणाऱ्या त्या पैशातून आपल्या लेकीच्या वह्या पुस्तकांची सोय करायची. या संघर्षात सगळ्याच भावांची तिला साथ मिळत होती. यावेळी आक्काताईचा पांडुरंगमामा मिलिटरीमध्ये नोकरीला होता. तो आपल्या बहिण व भाचीसाठी देशाच्या सीमेवरून अधून मधून पन्नास रुपयांची मनी ऑर्डर पाठवून देत असायचा.
गंगापूर येथील प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते सातवी पर्यंत आक्काताई यांचे शिक्षण झाले. त्याच्यानंतर दौलत विद्यामंदिर मडिलगे येथे हायस्कूलचे आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. यावेळी गंगापूर पासून मडीलगेपर्यंत एस.टी ची सोय नव्हती तरीसुद्धा आईच्या उन्हातानातल्या कष्टकरी हाताची जाणीव ठेवून या लेकीने पायी चालत जाऊन अगदी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर तिथून अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी या ठिकाणी प्रवेश घेतला.
दरम्यान १९८७ साली श्री.शंकर केंगार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. परंतु त्यानंतर देखील त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले व पुढे स्पेशल बी.ए.बी.एड ला प्रवेश घेऊन कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी इथून बी.एडचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या या वाटचालीमध्ये आईने तर कष्ट घेतलेचं त्यासोबत त्यांच्या आजी-आजोबांनी आणि सहा मामांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला त्यांना काहीही कमी पडू दिले नाही. अक्काताई यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी जसे माहेरच्या लोकांनी कष्ट घेतले तसेच आपल्या पत्नीला नोकरी लागावी म्हणून पुढील जबाबदारी त्यांचे पती श्री शंकर केंगार यांनी घेतली. त्यासाठी प्रसंगी त्यांनी खेडोपाडी लग्नामध्ये वाजवण्याचे काम केले, रस्त्यावरची खडी फोडली आणि रस्त्यावर डांबर टाकण्याचे सुद्धा त्यांनी काम केले.
आणि शेवटी या सर्वांचे कष्ट फळाला आले ते म्हणजे सर्वप्रथम १९९१ साली इस्लामपूर मधील आदर्श बालक विद्यामंदिर उरुण इस्लामपूर या ठिकाणी एक वर्ष मॅडमांना नोकरीची संधी मिळाली. पण अल्पकाळचं ही नोकरी ठरली. पण पुढे त्यांच्या जीवनात एक अनपेक्षित वळण येणार होते. एकदा कागलमध्ये गीत रामायणचा श्रवणीय असा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला लोकांची प्रचंड गर्दी होती. आणि या गीतरामायणाच्या कार्यक्रमात आक्काताई यांचे मामा श्री.सतीश केंगार हे प्रमुख गायक होते. त्यांच्या सुरमयी गायकीने सर्व कागलकरांना मंत्रमुग्ध केले. तेंव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या श्री. वसंतराव देशपांडे सरांना त्यांचे गायन इतके भावले की त्यांनी आपुलकीने त्यांना बोलावून घेतलं, त्यांची आपुलकीने विचारपूस करून खुप कौतुक केलं.. तेव्हा या मामाने बक्षिसी म्हणून काय मागितला असेल..? ना स्वतःसाठी..ना आपल्या मुलांच्यासाठी.. जे मागितलं ते फक्त आपल्या भाचीसाठी..देशपांडे सरांना ते म्हणाले, "माझ्या भाचीला आपल्या शाळेत नोकरी द्या एवढं दान माझ्या पदरात टाका." आणि ते दान त्यां थोर मनाच्या दातृत्वशील माणसांनी त्यांना देऊन टाकलं... आक्काताईला त्यांच्या शाळेत घ्यायचं त्यांनी कबूल केलं... मग काय इथेच आक्काताईच्या जीवनाच सोनं झालं...सतीश मामांच्या त्या सुरांनी अक्काताईच्या जीवनाचे सुर जुळवून आणले.
श्री वाय.डी माने अण्णा आणि श्री वसंतराव देशपांडे सरांच्या पुढाकाराने दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कसबा सांगाव या शाळेमध्ये आक्काताईंना नोकरीची संधी मिळाली आणि अशा प्रकारे १९९३ साली कसबा सांगाव येथील शाळेत हायस्कूल शिक्षिका म्हणून त्यांच्या नोकरीला सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं अखंडित व्रत त्यांनी हाती घेतलं. मॅडमांचा विषय हिंदी आणि इतिहास त्यासोबत मराठी विषयाचे अध्यापन देखील त्यांनी केले. हिंदी विषयाच्या अध्यापिका म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मुलांना ज्ञानदानाचे काम केले. सुरुवातीला दोनशे रुपये एवढ्या तुटपुंज्या पगारावरती त्यांनी दिवस काढले. या काळामध्ये त्यांचे पती शंकर केंगार हे सुद्धा श्री लक्ष्मी विद्यालय जुनियर कॉलेज हसुरमध्ये अध्यापक म्हणून काम करत होते. पण ते सुद्धा विनाअनुदानित मध्ये असल्यामुळे त्यांना देखील पगार नव्हता..दोघांनाही नोकरी होती पण पगार नव्हता अशी अवस्था होती.
अशात दोन लेकरं पोटाला होती. संसाराचा गाडा कसा हाकायचा हा प्रश्न होता संघर्ष काही पाठ सोडायला तयार नव्हता .पुन्हा एकदा हा अत्यंत खडतर काळ सुरू झालेला होता. मुलांना ज्ञानदानाचे काम करायचं परंतु हातामध्ये पगार येत नव्हता तरीसुद्धा हार न मानता या दांपत्याने आपल्या विद्यार्थ्यांना निरपेक्ष भावनेने ज्ञानदानाचे काम केले. यावेळी त्यांच्या सासूबाई सखुबाई प्रसंगी सांगावमधल्या लोकांच्या शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करून आपल्या या लेकाच्या कुटुंबाला हातभार लावत होत्या. पोराला शिकवण्यापासून त्याचा संसार उभा करून देण्यापर्यंत त्यांनीही खूप खस्ता खाल्या.
पण आक्काताई यांच्या कष्टाला,जिद्दीला आणि त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या त्यांच्या सर्व कुटुंबाच्या मेहनतीला शेवटी फळ आले आणि १९९४ साली त्यांचा नियमित पगार सुरू झाला. सर्वांना आनंद झाला.
मॅडमांचा स्वभाव अगदी मायाळू, ममत्वाने ओतप्रोत भरलेला आणि संवेदनशील मनाच्या हळव्या अशा मॅडम. आईच्या अंतःकरणाने आपल्या विद्यार्थ्यांना आपलं लेकरू समजून अध्यापन करायच्या. स्टाफमध्ये सर्वांशी मिळून मिसळून राहून सर्वांशी मायेने वागून काम करत राहायच्या. शाळा म्हणजे आपलं दुसरं कुटुंब समजून त्यांनी शाळेचा प्रपंच देखील नीटनेटका केला. ज्या संघर्षातून मी आले , ज्या परिस्थितीतून मी घडले त्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्याही विद्यार्थ्यांनी संघर्षातून,खडतर परिस्थिती,परिश्रमातून आपलं ध्येय गाठलं पाहिजे यासाठी अगदी अंतकरणाने, तळमळीने त्या विद्यार्थ्यांना अध्यापन करायच्या.
या ज्ञानमाऊलीच्या सावलीमध्ये असंख्य विद्यार्थी आजपर्यंत घडले. शिकून लहानाचे मोठे झाले आणि आपापल्या क्षेत्रांमध्ये ते आज कार्यरत आहेत. आज देखील ते विद्यार्थी अतिशय आत्मीयतेने मॅडमची आठवण काढतात, मॅडमांना भेटतात. ज्ञानाच्या संस्काराने घडवणारी या लेकरांची ती शाळेतील आईच होती. मॅडम आणि विद्यार्थ्यांचा हा नात्याचा ओलावा आई व लेकराच्या स्तरावरचा होता.
आदर्श शिक्षिका गौरव: म्हणून त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या योगदानाबद्दल २०२१ साली जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग पंचायत समिती कागल यांच्याकडून सन्मान करण्यात आला. तर २०२५ साली नाविद मुश्रीफ अधिष्ठान कागल यांच्याकडून आदर्श शिक्षिका म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला.
तेहतीस वर्षांचा अखंडित हा ज्ञानयज्ञ सुरू होता आणि आज ३३ वर्षांची प्रामाणिक, निरपेक्ष,निस्पृह अशी सेवा बजावून ३१ मे २०२६ रोजी मॅडम आपल्या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. सावित्रीबाई फुले यांची ही लेक खऱ्या अर्थाने त्यांच्या शिक्षणाच्या परंपरेतील वारसदार आहे. ज्ञानदानाचं व्रत हाती घेऊन ३३ वर्षे त्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये आपली सेवा बजावली. अर्थातच सत्तर ते नव्वदच्या दशकातला तो काळही मुलींच्या शिक्षणासाठी एवढा अनुकूल नव्हता. मुलींनी चूल आणि मूल सांभाळण्यापर्यंतची मानसिकता समाजातून अजून गेलेली नव्हती. अशा काळामध्ये वाजंत्री समाजातील एक स्त्री पुढे येते. आपल्या आई-वडिलांच्या आणि आपल्या भावांच्या आधाराने आपल्या लेकीला शिकवून शिक्षिका बनवते. खरच धन्य आहे ती माऊली..आणि तिचे कष्ट. .. त्या माऊलीचा आदर्श आजच्या स्त्रियांनी घ्यायला हवा असाच आहे.
खरंच आई असावी तर अशी असावी. मामा असावेत तर असे. मॅडमांच्या शिक्षणापासून नोकरीपर्यंत त्यांच्या पाठीशी पहाडासारख्या उभ्या असणाऱ्या त्यांच्या आई, सासूबाई, आजी-आजोबां, सहा मामांचा आणि त्यांच्या पतीच्या खूप मोठ्या पाठबळावर त्या शिक्षिका झाल्या. मॅडमांच्या संसारातील रत्नासारखी दोन पुत्ररत्न एक वैभव आणि दुसरा सागर. वैभव आज मेकॅनिकल अभियंता म्हणून कार्यरत आहे तर सागर हा त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून एक शिक्षक म्हणून आदर्श प्रशाला कसबा सांगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
मॅडम.... ३३ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहात. लहानपणापासूनच अतिशय कष्टातून घेतलेला शिक्षणाचा ध्यास आणि एकूणच आतापर्यंतचा प्रवास तुमच्या डोळ्यासमोर तरळत असेल ना..? एका मागून एक आठवणी तुमच्या मनाच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत असतील...आणि डोळ्यांच्या कडा आपोआपच पाणावत असतील. आत्तापर्यंत ज्ञानदानाचा हा यज्ञ अखंड तुम्ही तेवत ठेवलात आणि आज ही शाळा , आपले लाडके विद्यार्थी सोडून तुम्हाला आता सेवानिवृत्त व्हावं लागतंय.
शाळारूपी आईच्या कुशीत तिच्या सावलीत तुम्हीं असंख्य लेकरं घडवलात. ही शाळा म्हणजे तुमचं माहेरघर झालं होतं. त्या माहेरतील शाळारूपी आईला मागे ठेऊन,आपल्या लेकरांना मागे सोडून ही लेक जणू पुन्हा सासरी चालली आहे.. आपल्या घरी परतत आहे. मॅडम तुम्हीं या शाळेला सोडून जाताना ती शाळा देखील बघा कशी गहिवरलेली आहे. अबोल होऊन आपल्याला निरोप द्यायला उभी आहे. गेली ३३ वर्षे ज्यांचा सहवास लाभला असे तुमचे सहकारी भावंडेसुद्धा आपली मोठी बहीण, आमच्या लाडक्या मॅडम सेवानिवृत्त होऊन आपल्याला सोडून जाणार म्हणून सदगतीत झाले असतील. त्या निष्पाप लेकरांची तर काय सांगावी अवस्था.
आमचा लाडक्या मॅडम आता पुन्हा आमच्यावर शिकवायला येणार नाहीत म्हणून बिचारी कावरी बावरी झाली असतील.
परंतु एखाद्या टप्प्यावर आपल्याला सेवानिवृत्त व्हावच लागतं. हा सगळा मांडलेला सारीपाट मागे सोडून आपल्याला पुढे जावंचं लागतं. मॅडम तुम्ही अतिशय आत्मीयतेनं, चांगल्या मनाने आपल्या लेकरांना घडवलात.आपलं घर,आपला संसार सांभाळून तुम्ही शाळेचा देखील प्रपंच सांभाळत अध्यापनाची सेवा पार पाडलात. तुमच्या या अध्यापनातून असंख्य लेकरांची घर उभारलीत. हीच तुमच्या आजपर्यंतच्या कार्याची शिदोरी ,पुण्याई घेऊन आज सेवानिवृत्त होत आहात. आज हा दिवस पाहण्यासाठी तुमची ती कष्टकरी माऊली म्हणजे तुमची आई,तुमचे आजी-आजोबा,तुमच्या सासूबाई आणि तुमचे आज एकच मामा हयात आहेत परंतु आज ते पाच मामाही या ठिकाणी पाहिजे होते. आज तुमच्या सेवापूर्तीच्याक्षणी स्वप्नंपूर्ती झालेल्या त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा आनंदाश्रू वाहिले असते.. आनंदाने ,अभिमानाने त्यांचा उर अगदी भरून आला असता.
आज पर्यंत घर सांभाळत शाळा सांभाळताना तारेवरची कसरत केला असाल ना..? आता सेवानिवृत्तनंतर आपल्या घराकडे पूर्ण लक्ष द्या... नोकरीच्या कालावधीमध्ये आपल्याला काही गोष्टी करता नाही आल्या त्याला संपूर्ण वेळ द्या. स्वतःला आणि कुटुंबाला जपा. आरोग्याची काळजी घ्या, खूप फिरा, जीवनाचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या त्या माहेरामधील लोक.. कदाचित काहीजण या जगामध्ये आज नसतीलही.. परंतु त्यांच्या सहवासाच्या आठवणींचा गंध ज्या मातीत आजही दरवळतोय त्या मातीला भेटून आशीर्वाद घ्या...
तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा...!
जय हो..! मंगल हो..!
किरण सुभाष चव्हाण
मोबा - ८८०६७३७५२८