शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

शिक्षक दिनीच घेतला अखेरचा श्वास... विनाअनुदानित शिक्षक किशोर पाटील यांचा करुण अंत | १५ वर्षांची अध्यापनाची नि:स्वार्थ सेवा करून शेवटपर्यंत पगार मिळाला नाही.

 

किशोर पाटील सर

शिक्षकदिनादिवशीच किशोर पाटील या विनाअनुदानित शिक्षकाने घेतला अखेरचा श्वास.

करणखेडा ता- अमळनेर जि- जळगाव ते पुणे-कोल्हापूर परतीचा प्रवास करताना अतिशय दुःखद अंतःकरणाने लिहितोय. ज्या माणसासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आम्हीं भेटायला गेलो तो माणूस त्या सकाळीच निघून गेला होता. आम्हीं तिथे संध्याकाळी पोहोचल्यानंतर कळालं की, सर सकाळीच निघून गेले. सर आजारी आहेत म्हणून त्यांना पाहण्यासाठी माझ्या गावापासून म्हणजे पांगिरे ता भुदरगड जि कोल्हापूर येथून दुपारी ३ वाजता मी आणि माझी थोरली बहीण बाहेर पडलो गाड्या बदलत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६.:३० वाजता जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील करणखेडा या गावी पोहोचलो. तिथे पोहोचण्यासाठी तब्बल २७ तास ३० मिनिटांचा आणि सुमारे ८०० कि. मी. चा हा प्रवास करताना फक्त मनात एकच आस होती की,ज्यांच्याबरोबर आजपर्यंत फक्त फोनवर बोलणं व्हायचं त्या सरांना एकदा जवळून प्रत्यक्षात पाहता येईल. ..पण सरांना प्रत्यक्षात पाहणं आमच्या नशिबातच नव्हतं..आम्हीं पोहोचण्याच्या अगोदरच सर या जगातून निघून गेले होते.आम्हीं पोहोचलो आणि समोर सरांचा मुलगा पारसला बघून मनाला धक्काच बसला..त्याच्या डोक्यावरचे केस उतरवले होते..ते बघूनच आम्हाला सगळं कळालं. त्याचे मामा पुढे आले आणि म्हणाले..."सर पारस पोरका झाला.." तेव्हा तर मला काहीच बोलायचे सुचेना..

किशोर पाटील सर एक हुशार, संवेदनशील आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व. सर नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन एका महाविद्यालयात २०११ पासून प्राध्यापक होते. पण पगार नव्हता. गेली १५ वर्षें त्यांनी विनावेतन म्हणजे शासनाचा १ रु.या ही न घेता अध्यापनाचे काम केले. अनेक वर्षे झाली पगार नाही, घर कसे चालवायचे..? कुटूंबाचे कसे व्हायचे..? या विवंचनेतून अथवा ताणतणावातून सरांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. एक तर पगार नाही घरची तुटपुंजी शेती, घरी वयोवृध्द आई, पत्नी,एक लहान मुलगा असे कुटूंब.मुळात पगार नाही पुन्हा त्यात हे आजरपण सुरू झाले. घरातली कर्ती व्यक्तीच अशी अंथरुणाला खिळल्यावर काय करायचे..? उपचारासाठी लाखों रुपयांचा खर्च येणार होता.

जन्मदात्रीने किडनी दिली आणि ५ सप्टेंबर २०१८ रोजी किडणी प्रत्योरोपण शस्त्रक्रिया झाली आणि शिक्षकदिनाला त्यांचा नवा पुनर्जन्म झाला. हा खर्च त्यावेळी सुमारे १३ लाखांच्या घरात आला. अशावेळी या आजाराच्या येणाऱ्या उपचारासाठी सरांच्या विद्यार्थ्यांनी हातात कटोरा घेऊन भीक मागून निधी गोळा केला.. ही बातमी लोकमत पेपरमध्ये बघून मी सरांच्या संपर्कात आलो. आणि मग पुढे मी ही सरांची ही संघर्षकहाणी लिहून मदतीचे आवाहन केले होते. त्याला धुळ्यातील ' एकला चलो रे' या साप्ताहिकात प्रसिद्धी मिळाली. पुढे जाऊन मी जेंव्हा विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नावर विनाअनुदानित संघर्षगाथा हे पुस्तक लिहिले यात सविस्तरपणे सरांची व्यथा मांडली त्यामुळे पुस्तकातुन सरांची ही व्यथा अवघ्या महाराष्ट्रभर गेली.

अशाप्रकारे लेखणीच्या माध्यमातून किशोर सर मला जोडले गेले व ते माझे जिव्हाळ्याचे मित्र, एक मार्गदर्शक झाले होते. याच्याही पुढे जाऊन बंधूतुल्य प्रेम आमच्यात निमार्ण झाले होते. एका वेदनेला शेकडो किलोमीटरवरच्या माणसांच्या संवेदनांची नाळ जोडली.त्याला कारण सरांचा स्वभाव..इतका मृदू ,मुलायम आणि लाघवी होता की, आमच्यात घरच्यासारखे संबंध निर्माण झाले. माझ्या मित्र परिवारात व घरात ही सरांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. . फोनवरून बोलताना त्यांचे ते मृदू शब्द..".सर जी..." या शब्दाने होणारी सुरुवात अगदी प्रत्येक शब्दांतून त्यांची आत्मीयता प्रकट व्हायची.माझ्या प्रत्येक लिखाणाला सरांची भरभरून दाद मिळायची. हिंदी विषयावर सरांचे प्रभुत्व होते त्यांना एका संस्थेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार ही मिळालेला होता...हिंदी विषयाच्या लेखनात मी सरांचे मार्गदर्शन घ्यायचो.

वरचेवर मी फोन करून सरांची तब्येतीविषयी विचारायचो. सरांना त्रास होत असायचा पण त्यातून ही ते सकारात्मक बोलायचे..स्वतः त्रासात असून देखील इतरांना प्रेरणा मिळेल अशी त्यांची रसाळ वाणी होती. गेले काही महिने त्यांची तब्येत अधिकच खलावलेली होती. सरांच्या किडण्या पुन्हा निकामी होऊन सरांना न्यूमोनिया झाला होता. दवाखान्यात उपचार सुरू होते. आम्हाला सरांना भेटायला जायचे होते पण मंध्यतरी गणपतीचा सण आल्याने नंतर जाण्याचे ठरवले. पण त्याअगोदर माझ्या बहिणीशी फोनवरून बोलताना ते म्हणाले होते "आक्का आता आपल्या हातात काय नाही, तुम्ही देवाला प्रार्थना करा मी बरा व्हावा म्हणून..." हे त्यांचं शेवटचं बोलणं ठरलं.

४ सप्टेंबरला सरांना भेटण्यासाठी आम्हीं दोघे बहीणभाऊ बाहेर पडलो. पण सरांची गाठभेट काही पडली नाही. आम्हीं प्रवासात असतानाच दुसऱ्याच दिवशी सकाळी ५ सप्टेंबर रोजी किशोर सर निघून गेले. आणि "सर जी..." या प्रेमळ हाकेला मी पोरका झालो.मला वाटतं माझे वडीलबंधुचं गेले. सरांच्या घरातून निघताना पारस या आपल्या मुलासाठी सरांनी लिहिलेल्या प्रेमळ पत्राचा फोटो मारून घेतला आणि एस.टी तुन परतीचा प्रवास करताना ते पत्र वाचत होतो. माझी बहीणही ते ऐकत होती..त्या प्रेमळ शब्दांची आपल्या लेकरावरील पाखर वाचून आम्हीं सद्गदीत झालो. इतकं काही आपल्या लेकरासाठी मांडून ठेवलंय बापानं की, वाचताना अक्षरशः गहिवर आणणारं असं ते पत्र. सरांना वाचवण्यासाठी सरांच्या पत्नीने शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केलेत. ना अंगावरच्या दागिन्यांकडे ना स्वतःच्या खाण्यापिण्याकडे त्यांनी लक्ष दिलं. रात्रंदिवस सरांची सेवा करणं हेचं त्याचं व्रत ठरलेलं होतं. सरांचे दोन मेव्हणेही अतिशय खंबीरपणे आपल्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू वाचवण्यासाठी धडपडत होते.

काय योगायोग आहे बघा ना...आठ वर्षांपूर्वी शिक्षक दिनाला किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. आणि कालच्या शिक्षक दिनाला सरांचे निधन झाले आणि सरांचा विषय हिंदी त्या दिनाला त्यांचे उतरकार्य येते. म्हणजे शिक्षकीपेशाशी अतिशय प्रामाणिक राहिलेला माणूस शेवटी हा दुर्दवी योगायोग साधून गेला..शेवटी पगाराची आशा मनात ठेवून गेले सर...सरांची केस औरंगाबाद उच्च न्यायालयात खूप वर्षांपासून प्रलंबित आहे...मला म्हणायचे " केसचा निकाल लागला तर माझे सगळे प्रश्न सुटतील. सर माझा पगार सुरू होईल.". पण शेवटपर्यंत काहीचं झाले नाही, शेवटी माणूस गेला पण त्याला न्याय काही मिळाला नाही...म्हणजे या व्यवस्थेत माणूस जिवंत असताना न्याय मिळेल की नाही याची शाश्वती नाही.. गेली १५ वर्षे विनावेतन काम करूनही सरांचा हक्काचा पगार त्यांना मिळाला नाही...आज त्यांचे कुटूंब उघड्यावर आले..ना शासनाने.. ना त्या न्याय देवतेने कुणीच त्यांची दखल घेतली नाही. त्यांना जिवंत असताना न्याय मिळाला नाही आणि म्हणून आयुष्यभर पगाराची आशा करायला लावणाऱ्या या शासन आणि न्याय व्यवस्थेचा शिक्षक दिनाला आपला देह ठेवून या विद्यार्थीप्रिय शिक्षकाने निषेधच नोंदवला आहे...असं म्हणायला हरकत नाही.

सरांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना...भावपूर्ण श्रद्धांजली.💐

किरण सुभाष चव्हाण.

किशोर पाटील सरांचे पत्र

किशोर पाटील सरांनी आपल्या मुलाला लिहिलेलं पत्र

बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

वाकीघोल परिसरातील आनंददायी निसर्गवारी – हिरवाईचा साज

 


वाकीघोल परिसरातील आनंददायी निसर्गवारी.

                         भरजरी मखमली शालूचा हिरवागार पदर मावळत्या अंगाला पसरून हिरवाईचा साज लेवून सजून धजून उभी असलेली ती वनराई. दोन्हीं बाजुंनी दंड थोपडून अंगावर हिरवाईचा कोट चढवून रुबाबात उभे असल्यासारखे पाठीराखे पहाडी डोंगर. एका डोंगराच्या मध्ये कोरडे ठाक पडलेले निसरड्या फिकट पांढऱ्या धबधब्याचे घसरते पात्र.एखाद्या लेकुरवाळीचं लेकरू पुढ्यात बागडावं तसं त्या हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत लपलेली ती एवढीशी वाडी. दोन्हीं बाजुले डोंगर आणि त्या निसर्गमायेच्या  हिरव्यागार समृद्ध संपन्नतेच्या नगरात आनंदाने नांदणारी ती वाडी म्हणजे त्या निसर्गमायेचं लेकरू जणू. 

                      राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील अगदी शेवटचं टोकं म्हणजे ही कामतेवाडी. एका गल्लीतचं आटोपणारी.काजू,फणस,आंबा करवंदीच्या वेलींनी गुंफलेली. अगदी दुर्गम आणि कोकणी भाग. अंतिम मुक्कामाचं ठिकाण म्हणजे ही वाडी.याच्यापुढे ना रस्ता ना कोणतं गांव.तिच्या मावळतीला फक्त न फक्त जंगलाचं साम्राज्य. पाठीराख्या डोंगराचा आधार घेऊन पूर्वेला पुढा करून पश्चिमेची अंतिम सीमा सांगणारी ही कामतेवाडी.          

                        आडोली गावच्या महालक्ष्मी विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.पी.पाटील सरांच्या आग्रहावरून जंगलभ्रमंती करण्याचा योग आला. त्यांच्या चारचाकी गाडीतून या वाडीत मी पहिल्याप्रथमच आलो होतो. हिरव्यागार रानातून या वाडीच्या पोटात शिरलेला वळवळणाचाकाळा करकरीत डांबरी रस्ता.हा रस्ता  येणाऱ्या नवगतांचे स्वागत करत आजूबाजूची हिरवाई दाखवत आपसूक या वाडीत आणून सोडतो.  वाडीच्या काही अंतर लांबूनचं मंदिराचा गोलाकार पांढरट रंगाचा देखणा कळस त्या गुजबुर देवराईसारख्या हिरव्यागार पृष्ठभागावर उठून दिसत होता. वाडीत शिरल्यानंतर मग रस्त्याच्या दोन्हीं बाजुंनी बेंगलोर खापरीच्या नव्या जुन्या घरांची रांगचं सुरु होते. आम्हीं या वाडीत पोहोचलो तेंव्हा भर दुपार व्हायला आली होती. त्या गल्लीतल्या बालचमूना गाडीत घेतले आणि थोड्या अंतरावर जाऊन गाडी मराठी शाळेच्या समोर उभी केली.

                        शाळेच्या खालच्या अंगाला असलेल्या एका घरात गेलो.वरती गडद निळा आणि खाली मातकट रंगाने रंगरंगोटी केलेले ते घर.त्या घराची एक पारंपरिक जुनी ढब दिसून येत होती.  शेणाने सारवलेली शेंड्यावरची कट्टी, एका कोपऱ्यात गुंडाळून ठेवलेला भाताचा तट्ट्या.आत गेलो तर शेणाने सारवलेली भुई.घरात नऊवरीतल्या त्या रांगड्या मावशीने हसतमुख आनंदाने आमचे स्वागत केले. आणि  मधाची बाटलीचं मावशी घेऊन बाहेर आली.  जंगलातून गोळा केलेला तो मध.अगदी अस्सल मधाने मावशीने आमचे तोंड गोड केले.आम्हीं तोंड गोड करण्यापुरता दोघांनी चमचाभर मध घेतला. मधा सारखेच मावशीचे बोलणेही मधाळ... मायाळू शब्द.थेट हृदयाला भिडणारे. तिथून बाहेर पडल्यानंतर उंचवटावरून मी ती वाडी न्याहाळत होतो.एका गल्लीच्या मधल्या कप्प्यातून डोंगराचा संपूर्ण भाग नजरेच्या टप्प्यात येत होता. एका घराच्या भिंतीला लागून उभे असलेले फणसाचे झाड.खालच्या फांदीला काटेरी टुमदार फणस दिसत होते. फणसाच्या झाडाखाली बैलगाडी लावलेली. त्या मोकळ्या मैदानात चिमुरडी पोरं खेळ खेळत होती. दोघे तिघे त्या बैलगाडीच्या जु वर दोन्हीं बाजूला बसून स्वतःला तोलत होते. ते दृश्य पाहताना बालपणीचा भूतकाळ नजरेत गोळा झाला. 

              

      एका कोनाड्यातून सुरुवात होणाऱ्या दोन घरांच्या मधल्या बोळातून जंगलात जाणाऱ्या पाय वाटेवरून आम्हीं जंगलाच्या दिशेने निघालो. दोन्हीं बाजूच्या दरडेवर वाढलेल्या झुडपांची एक बाकदार कमान तयार झाली होती.त्या बाकदार झुपकेदार कमानीतून पलीकडच्या तेजस्वी किरणशलाका उठून दिसत होत्या. आम्हीं दोघे आणि आमचे छोटेसे बालदोस्त होते गणेश, पृथ्वीराज,श्री हरी,आदित्य. ते पुढे आणि आम्हीं त्यांच्या मागे. वाडीला मागे टाकून एकदासे शिरलो आम्हीं जगलांत. एका उतारावर छोटी नदी लागली.एक दोन डबके वगळता सगळी नदी कोरडी ठाक. सगळे दगड गोटे, मोठाले खडक त्या रणरणत्या उन्हात तापत होते.दोन्हीं दरडेकडेला झाडं वेलीनी आच्छादलेल्या होते.नदीच्या वरच्या आंगचे दृश्य तर

एखाद्या  भुयारासारखे भासत होते. नदीच्या काठाला असलेल्या जांभळीच्या खाली एक नितळगार पाण्याचे छोटेसे डबके होते. कॅरमच्या पिसासारख्या फिरणाऱ्या इकडे तिकडे  पाण्यावर फिरणाऱ्या नितळ्या बघितल्या. त्यांना 'water skelter' असं म्हणतात त्या ज्या पाण्यात असतात ते सर्वात स्वच्छ पाणी असते.'पाटील सरांनी थोडक्यात अशी त्यांची माहिती आम्हांला सांगितली.

                  नदीकाठची आंब्याची,जांभळीची झाडं बघत पुढे चालू लागलो. आमचा आदित्य म्हणाला, "सर या नदीकाठच्या झाडांचे आंबे आंबटंच असतात. जगलांतल्या झाडांचे आंबे गोड असतात." लहान मुलांचे निरीक्षण किती जबरदस्त होते. कारण त्यांनी ते अनुभवलंय त्यांनी ते चाखलय. अशीच आमची फौज आणखीन दाट जंगलात शिरू लागली.एकेक चढण वळण घेत एकेक कदम पुढे टाकू लागलो.डोक्यावरती सूर्यनारायण तळपत होता.कडक उन्हाचे लोळ अंगावर बरसत होते पण आजूबाजूला इतकी हिरवाई दाटली होती की उन्हाची पर्वा करावीशीचं वाटत नव्हती. वृक्ष लता वेलींच्या सहवासात जाणवत होता तो मायेचा गारवा.डोळ्यांनी ती दाट हिरवाई पाहताना आमची नजर ही हिरवाईने दाटून गेली होती. माळरानावरच्या करवंदीच्या झुडुपांकडे आमचा मोर्चा वळाला. या झुडुपांकडून त्या झुडुपांकडे. कुठे कच्ची- कुठे पिकलेली छोटी मोठी ,आंबट गोड करवंदे. काटेरी वेलींच्या हिरव्याकंच पानांच्या ताटव्यावर लगडलेली काळीभोर करवंद पाहून मन हरखून जायचं.त्यांची चव चाखायला उतावीळ व्हायचं.ती अलदग तोडत तोंडात टाकत चव चाखत आम्हीं रानोमाळ तुडवू लागलो. एक नवीनच फळाचा आस्वाद घ्यायला मिळाला साधारण चिक्कू सारखे दिसणारे आणि चवीला गाभूळ चिंचेच्या चवीसारखे आंबटगोडयुक्त लागणाऱ्या या फळांचे नाव होते 'हळू'..खूपच अवीट चवीचा आस्वाद घ्यायला मिळाला. माळावरच्या खरबुड दगडावर बसून फोटो सेल्फी काढण्याचा मोह आवरत नव्हता. अगदी अंगावर धावून येतायत की काय असे दोन्हीं बाजूला तसेच पश्चिमेला असणारे डोंगर. दाट झाडी वेली झुडपानी पार आच्छादून गेलेला अगदी घनदाट परिसर.रान सजीवांच्या खाणाखुणा जागोजागी पहायला ऐकायला मिळत होत्या.जंगलाचा काही अंशी भाग फिरून वाडीच्या मावळत्या आंगच्या जगलांला वळसा घालून पुन्हा आम्हीं वाडीत परतलो.

              रणरणत्या उन्हाचा तडाखा सुरूच होता. तहानलेल्या आमच्या जीवाला पाण्याची ओढ लागली होती. त्या डेरेदार केळीच्या सावलीत पाण्याचा नळ होता. या सावलीत जाऊन नितळ थंडगार पाणी ओंजळीत घेऊन पहिल्यांदा पाण्याचे फपकारे तोंडावर मारले.त्या उन्हाच्या रकात अंगभर ओला गारवा पसरत गेला.ओंजळीतले पाणी घटाटा पिऊन तहान शमवली. आता भुकेची जाणीव होत होती. आमच्या पाटील सरांची त्या वाडीभर ओळख.शाळेच्या विद्यार्थ्यांमुळे सरांचा इथल्या प्रत्येक  वाडीकरांशी स्नेह व ऋणानुबंध अगदी घट्ट. कुणापाशी अगदी हक्काने सांगावे अशी सारी घरची लोकं. एका मावशीला पाटील सरांनी जेवणाविषयी सांगितले. ती मावशी लगोलग आमच्या पुढं गेली.आम्हीं काही वेळाने त्यांच्या घरी पोहोचलो.मावशी साधी होती तसंच तिचं ते घरंही साधं.आम्हीं आत आलो. पार आम्हांला तिने जेवणखोलीत चुली समोर बसवून तिनं जे रांधलं होतं ते मनापासून आणि मायेनं वाढलं. चुली समोर बसून आमच्याशी भरभरून बोलत होती. पोटभर जेवण्याचा आग्रह करीत होती.आम्हीं मनसोक्त जेवून तृप्तीचा ढेकर दिला.त्या माऊलीच्या हातच्या साध्या सात्विक जेवणाला महागड्या हॉटेलमधल्या पंचपक्वणाची सर कधीच येऊ शकणार नाही.मावशीचा निरोप घेऊन खूप समाधानाने आम्हीं बाहेर पडलो.

                माघारी वळताना काही अंतरावर असणाऱ्या हिरव्यागार देवराईला भेट दिली.एखादा ऋषी नदीकाठी ध्यानस्थ बसावा तशी शांत,स्थिर,अविचल घनदाट अशी ती देवराई. या ठिकाणी एका झाडाखाली उघड्यावरचं 'बाटम देवाचं' देवस्थान आहे.नदीकाठी वसलेली ही देवराई झाडी लतावेलींनी अगदी भरभरून आणि बहरून गेली आहे. चिरस्थायी शांतता,तिला दुभंगणारी ती चिमणी पाखरांची चिवचिव करणारी नादमयता, डेरेदार वृक्ष आणि वेलींचा अधिवास,जमिनीला अंथरलेला पालापाचोळा असा सगळा देखणा हिरवाईचा गोतावळा. क्षणभराच्या उपस्थितीत चिरंतन शांततेच्या सुखाचा लाभ या देवराईच्या कुशीत मिळतो. हे ठिकाण पाहून आम्हीं माघारी वळलो.

                    हिरवागार बहरलेला घनदाट निसर्ग,त्याच्या कुशीतील जगापासून दूर असलेली ती छोटीशी वाडी.वाडीतील साधी,सोपी,सरळ कष्टाळू आणि मायाळू माणसं. आजही ती माणसं सायंकाळी विठ्ठल मंदिरात जमून हरीभजनात दंग होतात. हे सुख जवळून पहायला अनुभवायला मिळालं. किती नटून-थटून, सजून- धजून निसर्ग उभा असतो ना आपल्यासाठी. त्याला न्याहाळलं पाहिजे,अनुभवलं पाहिजे त्याच्या अधिवासात चार पावलं चाललं पाहिजे. इथली प्रत्येक झाडं, वेली रान झुडपे आपल्या भेटीसाठी आसुलेली असतात.त्यांची ही एक भाषा आहे. ती समजून घेतली पाहिजे.त्यांच्याशी हितगुज साधलं पाहिजे. इथल्या जंगलातला रानमेवा पिकलेला आहे  त्याचा आस्वाद घ्यायचा कुणी..? रानमेवा विकत घेऊन खाण्यात मजा नाही तो इथं येऊन चाखण्यात खरी मज्जा आहे.सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडून या खऱ्या खुऱ्या हिरव्यागार जंगलाच्या पोटात शिरलं पाहिजे.  जबाबदारी,व्याप याचा उंबरठा ओलांडून या मोकळ्या प्रदेशात काही क्षण वावरलं पाहिजे,सोशल मीडियात गुंतलेलो आपण एकदा मोकळा श्वास घेण्यासाठी इथे आलं पाहिजे. 

निर्जीव स्क्रीनवर असलं हे सजीव  सुख आपण कधीच अनुभवू शकत नाही.ते शाश्वत सुख अनुभवायचं असेल तर इथंच यावं लागेल. इथल्या रानजीवांचा संसार याची देही याची डोळा आपण पाहिला पाहिजे. प्रत्येक झाड वेली झुडपानां आपला स्पर्श झाला पाहिजे. अशी ही वाकीघोल परिसरातील आमची छोटीशी ही निसर्गवारी समृद्ध आणि संपन्न अशी ठरली. ती आपलीही ठरावी निसर्गाच्या रम्य सुखाची आनंदाची अनुभीती आपणही जरूर लुटावी.



  - किरण सुभाष चव्हाण.

  ८८०६७३७५२८.

"शिवम परिवार पांगिरे: प्रेरणा, एकत्रित संकल्पना आणि काकांजींचा आशीर्वाद"

 शिवम परिवार पांगिरे.

'शिवम परिवार पांगिरे या आमच्या परिवाराची अशी ही अनोखी स्थापना'.*


           दिव्याखाली अंधार म्हणतात ना अशीच आमची आतापर्यंत गत होती.परंतु एका दिव्य प्रकाशाने तो अंधार नाहीसा व्हावा असं झालं.कारण मागच्या रविवारी १ सप्टेंबर रोजी काकांजीचा चरणस्पर्श आमच्या गावी माझ्या घरी झाला.आणि त्यानंतर रविवार ८ सप्टेंबर रोजी आदल्या रात्री ज्या आजीविषयी चर्चा करून आम्हीं झोपी गेलो होतो, दुसऱ्यादिवशी तिचाच विचार घेऊन अस्वस्थ मनाने उठलो.आणि अवचित हळुवार एका संकल्पनेने मनात जन्म घेतला.आणि आमच्या सहृदयी मंडळींनी या संकल्पनेला उस्फुर्तपणे प्रतिसाद देत काकांजीच्या विचाराने प्रेरित झालेलो आम्हीं प्रातिनिधिक स्वरूपात एकत्र आलो.आणि आजीच्या घरी निघालो.

             आमच्या गावातील बायाका पाटील या आजीबाई.वय जवळपास ७० च्या पुढे असावं.आजीच्या गरिबीची वेगळी ओळख करून द्यायला नको.त्या जुन्यापन्या घरात आजी एकटीच राहते.तिला सोबत करते ती फक्त तिची गरिबी.याच गरिबीमुळं अगदीच ती उतार वयाकडे झुकल्यासारखी दिसते.चालताना काठीचा आधार घेऊन चालते.अशक्त झाली आहे.एकाकी असं जीवन.नवरा,मुलंबाळं यांचं सुख तिच्या नशिबी नाही.पण भावांची मुलं ती आपलीच मुलं अशी  मानते.ते ही तिच्याकडे लक्ष देतात.कधी घरी आली की खाऊपिऊ घालतात.शेवटी त्यांचा आधार आहे.पण तिला एकाकी जगण्याची सवयच झाली आहे.   

              तिचं घर तिच्यासारखंच थकलेलं.दारातोंडाला पावसाचं पाणी तुंबलं होतं.आत गेल्यानंतर कळतं की,ते किती सुरक्षित आहे.दिवसाकाठी ही अंधार भरून राहतो.लाईटची व्यवस्था नाही.काळवंडलेल्या जाडजूड तुळया,एका कोपऱ्यात नकाडी म्होरी.. तिच्यापुढची भुई गरावून ओली झालेली. निकारड्याला मोजकी जरबंदी भांडी,प्लॅस्टिकच्या बरण्या,कधीपासून थंड पडलेली मातीची चूल.

           आम्हीं आत गेलो आजीजवळ जाऊन बसलो..आजीचा अवतार व तिची ती अवस्था बघून सगळी परिस्थिती लक्षात येत होती...काही मोजकेच प्रश्न विचारले...पेन्शनचा विषय काढताच आजीने आमच्यासमोर हातच जोडले.ती चापसत आमचे पाय धरू लागली....आम्हालाच ते कसतरी वाटू लागलं.अशी असून देखील तिला पेन्शन सुरू नाही.आम्हीं तिला धीर दिला.

आता आम्हीं ठरवलंय.आजीच्या जवळच्या नातलगांच्या सहकार्याने आम्हीं शिवम परिवार आजीची इथून पुढची जबाबदारी घेणार आहोत....दुसरी गोष्ट म्हणजे त्या घरात लाईटची व्यवस्था नाही...आम्हांला ती व्यवस्था करायची आहे आणि तिसरं आणि महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे आजीची पेन्शन मंजूर करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.तसेच आजीच्या मोफत उपचाराची जबाबदारी आमचे शिवम साधक डॉक्टर सुनील लाड यांनी स्वीकारली आहे.अशा कार्याच्या शुभारंभातून आणि काकाजींच्या आशिर्वादाने आजीच्या या चंद्रमौळी झोपडीत आज आम्हीं शिवम परिवार पांगिरेची स्थापना करीत आहोत.आणि शिवम परिवार पांगिरे या आमच्या छोट्याशा परिवाराची ओळख आम्हांला समाजकार्यातून निर्माण करून द्यायची आहे.

*'काम हीच आमच्या परिवाराचे तत्व राहील'*  प्रथमतः आमच्या या कार्याला शुभेच्छा व प्रेरणा म्हणून.

आमच्या शिवम परिवार मुरगुड विभागाने  वडीलबंधूंच्या नात्याने आमच्या शिवम परिवाराकडे आजीला महिनाभर पुरेल इतके संपूर्ण जेवणाचे किट दिले, आम्हीं ते मुरगुड मधून आणून रात्री आजीकडे सुपूर्द केले.त्या किटमधील सामान व्यवस्थित ठेवायला आजीला मदत करताना एक दोन जरबंदी डबे मी उघडून पाहिले एका डब्यात आजीने कायबाय भरून ठेवलेलं आणि दुसरा डबा अर्धा पिटाने भरलेला..पण त्या पिटात अळ्या भरलेल्या...काही त्या टोपणावरही दिसत होत्या.

दिव्याच्या उजेडात आजी ते ठेवण्यासाठी धडपडत होती.आम्हीं आजीचं अंथरून पाहिलं..दोन पोती खाली अंथरलेली व एक रग पायाशी पडलेला...दांडीवर दोन जीर्ण गोधड्या मात्र होत्या..आम्हीं वाकून बाहेर पडलो.

            खरंच काकांजी... आमच्या दिव्याखालचा अंधार होता तो आता नाहीसा झाला आहे.आजीच्या पुढ्यात बसून तिची अवस्था जवळून पाहताना आमची आम्हांला लाज वाटू लागली.की अजूनपर्यंत गरिबीने हतबल झालेल्या आजीकडे आमचं लक्षच गेलं नाही.आम्हीं स्वच्छ प्रकाशात ऐसपैस आरामात राहतो पण दुसरीकडे मात्र ही आमची आजी या एका खोपड्यात किती तिष्ठत... कष्टत जगत होती.आम्हीं पुढं बघण्याच्या नादात पायात बघायचेच राहून गेले होते..आता झाले गेले मागे टाकून आम्हांला आजपासून पुन्हा नव्याने  सुरुवात करायची आहे..अशा हलाखीच्या हतबल जिवापर्यंत आम्हांला पोहोचायचं आहे.शिवम परिवार पांगिरे या परिवाराच्या माध्यमातून अशा सामाजिक कार्याला सुरुवात करत आहोतच.काकाजींच्या अमृतरुपी वाणीने आणि विचारांनी प्रेरित होऊन निश्चितच पुढील काळात यामधील शिवम साधकांची संख्या वाढणार आहे.या परिवाराचा सदस्य  आपणही होऊ शकता.अजून कोणाला या परिवारात यायचं असेल तर सेवाभावी वृत्तीने आपणही  सामील होऊन समाजाप्रती आपल्या कार्याचे योगदान या परिवाराच्या माध्यमातून देऊ शकता. तर चला मग

*"अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोकं"* या उक्तीला आपल्या कृतीची जोड देऊया.


जय हो..! मंगल हो..!!


*'शिवम परिवार पांगिरे' कार्यालयाचे आज साध्या पध्दतीने झाले उदघाटन.*


             आदरणीय गुरुवर्य इंद्रजीत देशमुख साहेब काकाजींच्या प्रेरणेतून *'अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक'*

हे ब्रीद घेऊन आपल्या शिवम परिवार पांगिरे कार्यालयाचे आज मंगळवार दि.१०/०९/२०१९ रोजी साध्या पद्धतीने आमचे शिवम साधक व मार्गदर्शक श्री नामदेव पाटील सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले.

            सुरुवातीला शिवम साधक श्री अनिल सुतार यांनी प्रस्तावना मांडली, यामध्ये थोडक्यात आपल्या शिवम परिवाराचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला आपल्याला माणूस म्हणून एकत्र येऊन माणसांच्या जाणिवा,नेनिवा लक्षात घेऊन समाजातील गरीब,गरजू व उपेक्षित माणसांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्यांच्या अडचणी, समस्या निवारण्याचे प्रयत्न यामाध्यमातून करायचे आहेत.अशा सामाजिक कामातून आपल्या शिवम परिवाराची ओळख आपल्याला निर्माण करायची आहे.तसेच नामदेव पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित शिवम साधक व आपल्या शिवम परिवाराला भरभरून प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.उत्साही व आनंदी वातावरणात हा छोटासा कार्यक्रम संपन्न झाला.यशवंत गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले सामाजिक विचारांनी प्रभावित असणाऱ्या संवेदनशील माणसांची मांदियाळी म्हणजे हा शिवम परिवार आहे.आणि यांतील शिवम साधकांना एका ध्येयाच्या धाग्यात गुंफून 

*'आनंदाचे आवारू मांडू जगा.'*  या कार्याचा सुगंध या समाजात पसरवायचा आहे.हेच परमकर्तव्य या शिवम परिवाराचे असेल.आणि म्हणून 

यावेळी गावातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व समाजकार्यात आपले योगदान द्यायचे आहे त्यांनी शिवम साधक म्हणून या परिवारात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले.

                यावेळी शिवम साधक श्री.नामदेव पाटील, श्री.अनिल सुतार,श्री यशवंत गुरव,डॉ.सुनील लाड,पांडुरंग आरागडे,राजेंद्र भोसले,प्रवीण आराध्ये, युवराज कांबळे,अक्षय पेरणोले,सुदर्शन  पाटील आदी उपस्थित होते.


🙏🙏!! राम कृष्ण हरी!!🙏🙏


♦ *'शिवम परिवार पांगिरे'*♦


🔹 *स्थापना दिनांक.-*

       १० सप्टेंबर २०१९.


🔷 *प्रमुख मार्गदर्शक व प्रेरणास्थान.-* गुरुवर्य आदरणीय इंद्रजीत देशमुख साहेब (काकांजी)



🔶 *'शिवम साधक'*🔶


१) श्री.नामदेव सतुन्या पाटील.(सेवानिवृत्त शिक्षक.)

२) श्री.यशवंत परशुराम गुरव.

३) श्री. पांडुरंग साताप्पा इंगळे.

४) श्री.सुनील शामराव लाड.

५) श्री.अमर रघुनाथ जाधव 

६) श्री.अनिल सातापा सुतार.

७) श्री जयवंत मारुती जाधव.

८)किरण सुभाष चव्हाण.

९) प्रवीण प्रकाश आराध्ये

१०) अक्षय नवनाथ पेरणोले.

११) विनायक बाळू गायकवाड

१२) सुदर्शन संजय पाटील.


*टीप:-* आपणही या परिवाराचा एक सदस्य होऊ शकता.सेवाभाव वृत्तीने समाजाप्रती आपले योगदान या परिवारात सामील होऊन देऊ शकता.


*आपले ब्रीद व उद्दिष्ट -* 


'अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक."


 🏠 *शिवम परिवार पांगिरे संपर्क कार्यालय:*

ग्रामपंचायत पांगिरे समोरील बिल्डिंग.


📱 *शिवम साधक संपर्क -*

श्री. यशवंत गुरव - ९७६४७५५७५४.

श्री. सुनील लाड - 

९५५२७०१७०८

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८








सोमवार, ११ ऑगस्ट, २०२५

 














भाऊ आणि बहीण

भाऊराया…

ओवाळीते भाऊराया, माझ्या जीवाची गं माया, माझ्या रूपाची छाया, माझा गं भाऊराया… न्हाऊ घालते घालते, पाटावरी बसवुनी, दृष्ट काढते काढते, काजळ-तीट लावुनी. माझ्या अवतीभोवती फिरतो गं माझा भाऊ, जशी गाईच्या भोवती फिरते लाडाचं वासरू. माझा गं तो पाठीराखा, त्याची डोंगराएवढी माया, बापासारखा त्याचा आधार, त्याला देईन आईची माया. उद्याले मोठा होईल, माझ्या सासरी गं तो येईल, माझ्या माहेराचा तो मुराळी, मला माहेरी घेऊन येईल. माझा गं तो निवृत्ती, माझा गं तो ज्ञानोबा, माझा इवलासा सोपाना, मी गं त्याची मुक्ताबाई. ओवाळीते भाऊराया, भाऊ माझा सुखात राहू दे, देवा माझ्या लाडक्या भावाला उदंड आयुष्य लाभू दे…

✍️ लेखक: तुमचं नाव

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

भाऊराया : रक्षाबंधन निमित्त कविता

 

     
रक्षाबंधन कविता


भाऊराया…

ओवाळीते भाऊराया, माझ्या जीवाची गं माया, माझ्या रूपाची छाया, माझा गं भाऊराया…

     

न्हाऊ घालते घालते, पाटावरी बसवुनी, दृष्ट काढते काढते, काजळ-तीट लावुनी.

     

माझ्या अवतीभोवती फिरतो गं माझा भाऊ, जशी गाईच्या भोवती फिरते लाडाचं वासरू.


माझा गं तो पाठीराखा, त्याची डोंगराएवढी माया, बापासारखा त्याचा आधार, त्याला देईन आईची माया.

      

उद्याले मोठा होईल, माझ्या सासरी गं तो येईल, माझ्या माहेराचा तो मुराळी, मला माहेरी घेऊन येईल.

     

माझा गं तो निवृत्ती, माझा गं तो ज्ञानोबा, माझा इवलासा सोपाना, मी गं त्याची मुक्ताबाई.

     

ओवाळीते भाऊराया, भाऊ माझा सुखात राहू दे, देवा माझ्या लाडक्या भावाला उदंड आयुष्य लाभू दे…

✍️ किरण सुभाष चव्हाण



सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

चष्मा - किरण सुभाष चव्हाण.

 

चष्मा...

चष्मा घालतात माणसं..
मग स्पष्ट दिसायला लागतं.
न ओळखता येणारी
दुरवरची माणसंही
ओळखता येतात..
तसे चष्मे पारदर्शक असतातचं..

पण

जातीचे,
धर्माचे,
प्रातांचे,
भाषेचे,
सीमांचे,
रंगाचे...

चष्मे घातल्याने स्पष्ट दिसेलच असं नाही
समोरील माणूस आणि

जवळचा माणूस देखील

माणूसचं आहे म्हणून

ओळखताही येत नाही.

तसे चष्मे असतातच पारदर्शक
पण त्यामागची दृष्टी असेलच असं नाही.

- किरण सुभाष चव्हाण

शनिवार, २६ जुलै, २०२५

🌿 रोप लावणीची गोष्ट – कोवळ्या रोपांपासून हिरव्या सोन्यापर्यंतचा प्रवास | लेखन : किरण सुभाष चव्हाण

रोप लावणी फोटो

🌱 आपल्या रोप लावणीची सुरुवात 🌱

🌱 रोप लावण 🌱

रोप लावण लावण | आज आलिया भरात
रोपं कोवळी कोंबण | मऊ मऊ चिखलात ||

लेकीवाणी रोप माझी | दिसतीया गं साजिरी ||
तान्ह्या हिरव्या अंगाची | माझी लाजिरी गोजिरी ||

भरतार माझा बाई | चिखलान गं माखला
कड काढितो बांधाची | माझ्या पोटचा धाकुला ||

सासू तरव्यात माझी | गाणं गातीया सुरात
नणंद आणूनि देती | माझ्या तरवा हातात ||

बांध लिंपितो गं बाई | उभा वाफ्यात सासरा
हाती दिराच्या शोभतो | बैल जोडीचा कासरा ||

चिखलाची गं आंबील | उभ्या अंगाला शिंपती
पावसात वाकूनीया | सख्या रोपण करीती ||

दाटी वाटीनं लाविली | रोप मोठाले होईल
हिरवं गं शेत माझं | उद्या सोन्याचं होईल ||

वयल्या अंगानं पावसानं एकसारखी धार सुरू केली की, वाफ्यातनी तरवा टाकायचा.. तरवा चांगला हिरवादाट इतभर फुटून आला की, सुरू झाली बघा रोपा लावणीची लगबग. वरनं एकसारखा कोसळणारा धो धो पाऊस आणि सगळ्या शिवारात रोप लावणीची धांदल. आमच्या बायकासनी तरी भागाटल्यापासून थाराचं नाही. तसं रोपा सुरू झाल्या की त्यांच्या पायाला दम कुठला असतोय. भगाटायला कावळं करकरायला लागलं की यांची जेवण करायची लगबग, जेवणाचं आटोपलं की म्हशींच्या धारा...धारा काढायच्या ते घरातलं सगळं आवराआवर करून डोईवर कागदाची खोळं घेऊन शेताच्या वाटला लागायचं... घरात करणारी म्हातारी कोतारी असली की या बायका आपलं एक मार्गी लवकरच शेताकडं..मागणं आणि शेरडा करडांची लटाबर असतीचं संग म्हणा. शेतात पाय टाकला रे टाकला की कंबरला पावसाळी कागद घट्ट बांधून तिरवड्यावर बुड टेकून तरव्यात बसायचं... हिरव्यागार तरव्याचा ताटवा पुढ्यात घिवून तिरावड्या वर बसून घाई घाईनं मग तरवा वरबडायचा...तरवा निघल तसा खालच्या गढूळ पाण्यात खदबळून वरच्या पात्यानं भोवतीबोर गुंडाळून पेंड्या करायच्या आणि मग मागं ठेवत पुढे सरकायचं.....

रोपंच आणि या माय माऊलींचं नातंच न्यारं...लेकीला जन्माला घालून तिचं हात पिवळं होईपतोर आई तिला जशी जीवापाड जपतीया.. आक्षी तसंच कोवळ्या हिरव्यागार अंगाच्या रोपासनी मऊ चिखलाच्या पोटात रवून त्या मोठाल्या होईपतोर त्यांची माय माऊल्या निगराणी ठेवत्यात... त्याच्यावरनं मायेचा हात फिरवत्यात तवा कुठ सुगीला रोपा सोन्या मोत्यांनी मडत्यात.

सगळ कस हिरवं हिरवं... झाडं हिरवी झुडपं हिरवी.. सगळा रान शिवार हिरवाकंच डोळ्यात जणू हिरवाई दाटून येते.. हिरवाईचा शालू जणू जमिनीला अंथरलेला. वयल्या गडद काळ्या अभाळातन दाट सरीन कोसळणारा साऱ्या सृष्टीला चिंब चिंब भिजवणारा पाऊस..पांढऱ्या धुक्याची झालर अंगावर पांघरून लांबूनच राना शिवारावर नजर ठेवून असल्याला पाठीराखा डोंगर.मधल्या व्हाळा चिवळाटातन धुमाळीनं पळत असल्याल खळाळत नितळगार पाणी.

बरं का..? रोपा लावणीचं काम म्हणजे दोघा तिघांचं काम नव्ह. कवा कवा रोपा लावणीला पाहुण्यारावळ्यांची मदत घ्यावी लागतीया .आळ बळनं का असना गल्लीतल्या माणसांस्नी बी रोपा लावायला बोलवायला लागतंय. माझं कोणा वाचून आडत नाही असं म्हणून नाही चाल. अशायेळी सगळ्यांची गरज पडतीया .कामाच्या माणसांचा पैराच करावा लागतोया.आज माझ्यात तर उद्या तुझ्यात अस केलं तरंच तवा कुठं रोप लावून वसारतीया म्हणायची. म्हाताऱ्या आयाबायांच्या कडं तरवा काढायचं काम...डोक्यावर इरलं घेऊन खालच्या तिरावड्यावर बसून बोलत चालत त्या तरवा वरबडत असत्यात...... रोप लावायची म्हणजे कंबार घट्ट असावी लागतीया इळभर वाकून रोप लावायला लागत्यात म्हणून तरण्या बाया रोप लावायच्या कामाला.. .शेतातली पारंपरिक गीतं तवा बायकांच्या ओठांवर नांदत असत्यात...किटलीतनं कपात धार लावून चा वतावा तसं वाफ्या वाफ्यातनं बांधवरच्या चिवळाटातन 'चा' गत लाल पाण्याचा मुसंडा खालच्या दिशेनं वाहत असतो.

पुरुष माणस चिखल करायला.. उभं आंग चिखलानं राड रिबीट व्हतं...पयलं बैलांचं , रेड्याचं औत असायचं... उभ्या पावसात खालच्या चिखलातून बैलगुठा जोरात पळवायचा...बैलवान दादा तर एक पाय गुठ्यावर ठेवून लंगडी घालतचं बैलं हाकत असायचा..बैलांची पांढरी पाठ लाल चिखलान माखून जायाची.पयला गुंठ्यान चिखल करायला वेगळीच रंगत यायची ..आता बैलं, गुठा मागं पडला आता जिकडं बघावं तिकड पॉवर ट्रेलरन चिखल केला जातो..एकजण हातात खोरं घेऊन बांधाच्या कडा काढायच्या कामावर असतो.. बांधाच्या कडा नीट काढल्याशिवाय वाफ्याला शोभा येत नाही..वावार देखणं दिसत नाही..."बांध नीट काढलं नाही तरी मालकीण बाई म्हणते, " आव बांध सळळ काढा की, नाही तर येणारी जाणारी लोकं नावं ठेवतील, म्हणजे काम कसंही करून चालायचं नाही इकडं काम पण करताना वावार देखणं पण दिसलं पाहिजे .. आधन मधनं पाण्याकड लक्ष ठेवावं लागतं. पाऊस जरा वसारला तर पाणी कमी पडून चालायचं नाही. नाहीतर चिखल पातळ होत नाही.पांदीच्या व्हाळाचं नाही तर चिवळाटातलं पाणी अडवून वाफ्यात घालायचा आणि आंबीलीसारखा पातळ बिरबिरीत चिखल करायचा...म्हणजे बायकासनी चटाटा रोपा लावायला येत्यात..

लाल मातीच्या चिखलाच्या पातळ आंबीलीत एका हातात तरव्याची पेंडी धरून दुसऱ्या हातानं एकेक काडी बीरबीरीत चिखलाच्या पोटात रवत माग सरकायचं..वयन पावसाच्या थेंबक्याला आणि इकडं बाईच्या हाताला जरा म्हणून दम नसतोय.. पहिली इरली असायची किती बी नेटका पाऊस येऊ दे की, इरली घट आत थेंब का कुठंला येईल. एवढ्या गारठ्याच्या पावसात इरल्यामुळे अंगाला उब मिळायची. पण आता कागदाची खोळ आली आणि उभा कोसळणारा पाऊस थेट अंगावर घेऊन वाकून रोपा लावायच्या..आता तिरावडी, इरली पोत्याची खोळ मागं पडली म्हणायची... पण निदान या रोप लावणीच्या कामाच्या निमित्ताने कोकणातल्या भागात कुठं कुठं दिसत्यात म्हणायची.. या टायमाला तरव्याची एक गंमत आसती.. कुणाला तरवा कमी पडतोय तर कुणाला जादा व्हतोय. मग कुणाला पुरूट पडून उरला आसल तर न्या जावा म्हणत्यात...तेवढीच. कुणाची तरी गरज भागतीया...आता तर मोबाईलच्या व्हाट्सअप ग्रुप वरून तरवा फिरायला लागलाय म्हणं... अमुक पेंड्या तमुक पेंड्या शिल्लक राहिल्यात कुणाला पायजे असलं त्यानी घेऊन जावा म्हणून मेसेज फिरतोया मोबाईलवरनं.

पावसानं जरा इसवाटा घेतला की दुपारच्याला उघड्या माळरानाला नाही तर मिळल त्या जाग्याला बसायचं आणि त्या वलीतच दुपारचा भाकरतुकडा मोडायचा. शेतमालकीनीन करून आणल्याली उसळ बचाक बचाकभर डावीन ती लोकांच्या भाकरीवर वाढती....बांधावर बसून तळहातावर घेतलेल्या कांदा भाकर, उसळ आणि मिरचीच्या ठेच्याची चवरव कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळलं व्हय...या जेवणाचं सुख घ्यावं ते आमच्या मायाबापड्यानीच.

पाऊस किती बी कोसळू दे की चार वाजता गरमागरम चा आला की तिथंच बांधाकडला जरा बुड टेकून 'च्या' चा एकेक घुटका घेतला की अंगातला गारठा पळून जातोया तेवढाच जीवाला तजेला मिळतोय..

जसजशी सायंकाळ होईल तशी आयाबायाची जास्तच झनपण सुरू व्हती...गडबडीन हात हालीवत्यात. धारच्या बायकांस्नी मग घरला परतायची ओढ लागतीया. घरातल्या जनावरांस्नी वैरणकाडी पायजे म्हणून सांज व्हायला वैरणीचा भारा कापून तयार ठेवला जातो..हातातली तरव्याची मुठ संपवून शेवटचं आळं खवुन बायका वाफ्यातनं बाहीर पडत्यात...आणि मग सांज वकोत झाला कीं बापयमाणसं डुईवर वैरणीचा भारा आणि मागणं आया बाया घराच्या वाटला लागत्यात.

माती संग माती व्हऊन
आंगभर चिखल लिंपूण
चिखलामधी घामाचं शिंपण करून
उभा पाऊस अंगावर झेलून
काळ्या आईच्या कुशीत
हिरवं सपान जवा लाविलं
तवाले उद्या कुठं
शेतं सोन्यामोत्याचं होईल
सोन्यामोत्याच होईल.

असं या रोपा लावणीचं काम...साधसुध नाही चांगला महिना घुमतोया रोप लावन करायला.. आंग नी आंग शिणून जातंय..दिसभर वाकून श्यान कंबार घाईला येतीया.. बोट चिंबून जात्यात.. तरवा काढून काढून बोटांची नारं निघत्यात...उभा पाऊस अंगावर झेलावा लागतोया....भूक तान हरपून जाती...आज चिखलात जीव कालवला तर उद्या कुठं पदरात चार दाण पडत्यात.पुढ्यात आल्याला भात खाताना काय वाटत नाही पण रोप लावताना कळतंय काय हाल व्हत्यात ते..इथं राबण्याला येळ नसतोया..सकाळच्या धारा काढून शेताला पळायचं ते दिसभर पावसाच्या धारत न्हाऊन घामाच्या धारा चिखलात सांडून सांजच्या धारलाचं घरला परतायचं...

- किरण सुभाष चव्हाण

🌱 चला आता रोप लावणीच्या शेतात जाऊया… 🌱

📸 आमची रोप लावणी गॅलरी 🌱

🌿 चला मग, रोप लावणीचा हा सुंदर प्रवास व्हिडिओतून पाहूया! 🎬

💚 एकदा नक्की पाहा आणि तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये जरूर लिहा!

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

मातीशी नाळ जपणारा, उपेक्षितांच्या जगण्याला शब्द देणारा अस्सल ग्रामीण साहित्यिक! डॉ. राजन गवस | जन्मदिन विशेष

  कथामय मराठी कथा प्रस्तुत मातीशी नाळ जपणारा, उपेक्षितांच्या जगण्याला शब्द देणारा अस्सल ग्रामीण साहित्यिक! साहित्यि...